1) रामा विना राम..
रामा विना राम नाही जीवनी,
राम आहे साऱ्या जीवांची संजीवनी,
राम आहे चराचरात भरुनी,
रामा विना राम……॥१॥
राम, एक पत्नी, एक बाणी, एक वचनी,
राम अयोध्यांच्या वदनी,
रामजन्मे दशरथ कौशल्या धन्य,
धन्य, धन्य जीवनी
रामा विना राम……॥२॥
राम नामे तरती पाषाण जीवनी,
श्वास, निश्वास अन दशदिशातूनी,
राम स्मरणे पतितही जाती उध्दरूनी,
रामा विना राम…॥३॥
राम नाम जपता जाती दुराचार जळूनी,
नितळ होई मन षॾरिपू झडूनी,
गर्व, अहंकार, मानअपामान जातील गळूनी,
रामा विना राम…..॥४॥
चेत अचेत क्षणात राम भजावा मनी,
राममय होऊनी जावू या क्षणोक्षणी,
सारे विश्वच होईल राममई,
राममई राममई
रामा विना राम……॥५॥
राम नामाचा महिमा अपार समजूनी,
राम नामाचा गजर करू रात्रंदिन,
रामाचा हा ध्यास मन्मनी
रामा विना राम नाही जीवनी ॥६॥
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जै जै जै राम
श्रीराम जै जै जै राम
श्रीराम जै जै जै राम
श्रीराम जय राम जय जय राम
रामा विना राम नाही जीवनी ॥७॥
— रचना : आशारेखा. कोल्हापूर
2) रामनवमी उत्सव
अयोध्यानगरी उषःकाल झाला,
गर्जती दुंदुभी झडे चौघडा
उभारा गुढ्यातोरणे स्वागताला,
पंचारती घेई औक्षणाला //
चैत्राच्या नवमीचा मुहूर्त हा
माध्यान्ही तळपे रविराज हा
कौसल्याराणीच्या अंकावरी या
रघुवंश उदय झाला पहा
आनंदे कौतुके औक्षण करुया,
पुष्पवृष्टी करा स्वागताला //
आम्रतरु आज मोहोरला
राजा ऋतुंचा आनंदला
आमंत्री कोकीळ पक्षीगणांना
दशरथ राजास पुत्र जाहला
उत्सव साजरा,वाटूं
या साख-या ‘श्रीराम’ ठेविले नाम तया //
— रचना : स्वाती दामले. बदलापूर.
3) अयोध्या दर्शन..
राम झाला वनवासी
वैभव त्यागे मोहमुक्त
माता शब्द शिरोधार्ह
वाटून सुख होई रिक्त
प्रभू पादुका गादीवर
भरत राहतो व्रतस्थ
न भोगी राज वैभव
राजा असूनि त्रयस्थ
सुवर्णलंका जिंकूनही
बिभीषणा दिले तक्त
अयोध्या हो स्वर्गमयी
रामराज्य देई सशक्त
सत्ता मोहात गुंतलेले
आम्ही म्हणे रामभक्त
रामाचे नावावर सत्ता
मिळवू पाहतो तख्त
अयोध्या दर्शना युद्ध
विचार केवढे अशक्त
भेटणार ना खरा राम
जोवर ना होई विरक्त
राजकारण बाजू ठेवा
नको मत भेद संतप्त
चला अयोध्या दर्शना
जायचे सगळे संयुक्त
बनावे जनतेचे सेवक
राघवासम मोह मुक्त
आपसूक बना सम्राट
राज्य हे अनभिषिक्त
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
