नयनाची पत्रिकाच कुठे जमत नव्हती. तिच्या आई वडिलांना वाटायचे की ज्योतिषशास्त्र हे मोठे गहन शास्त्र आहे पण त्याचा लग्नाच्याबाबत एवढा विचार कशाला ? शिवाय पत्रिका पाहून झालेले विवाह अगदी यशस्वी झालेच आहेत का? यापेक्षा वधुवरांचा रक्तगट, स्वभाव एकमेकांशी जुळत आहेत का हे बघणे मुख्य आहे. पण नयनची मैत्रीण नेहाप्रमाणे घडायला नको म्हणून नयनचे आई-वडील शांत बसायचे. नेहाचे लग्न, कार्यालय ठरले. मग पत्रिका पाहिली तर पत्रिका जुळत नाही म्हणून लग्न मोडले गेले !
एकदा नयनकडे त्यांचे दूरचे नातेवाईक आले होते. बोलता बोलता अमरचा विषय निघाला मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह, बी. एस्सी. झालेला अमर नयनचा दूरचा आतेभाऊ. हे स्थळ नयनला, तिच्या आईवडिलांना आवडले. पत्रिका पण जुळली. दोन्हीकडचा लग्न खर्च नयनकडे. साखरपुडा मुंबईत. विवाहसोहळा व परत पुण्यात स्वागत समारंभ हे सर्व थाटात पार पडले.
काय झाले कळले नाही. नयनला एका जागी दोन प्रतिमा दिसू लागल्या. एक डोळा एकदम बारीक झाला. थॉयराईड ग्रंथीत बिघाड आढळला. कायमस्वरूपी औषध सुरू झालं.
अमरची सिगारेट ओढण्याची सवय लग्नानंतर अधिकच वाढली व अजून मद्याची बाटली परमप्रिय झाली. कुसुम, नयनची आई म्हणाली, “अग नयन, तुझे वडील ड्रिंक घेतात, सिगारेट ओढतात. पण कसे पद्धतशीर. सर्व खर्च करून उरलेल्या पैशातच व वेळातच ही चैन करतात ना ? बरं, त्यामुळे, त्यांना काहीही अपाय झालेला नाही व आपल्याला, कुणालाच कसला त्रास नाही. याप्रमाणे जावईबापूंनी धोरण ठेवायला हवे, नाही का ?”
खरे पाहता, नयनला, तिच्या आईचे दारू व सिगारेटबाबतचे समर्थन अजिबात पटले नव्हते. मुळात ही व्यसनंच वाईट व भारतासारख्या उष्णकटिबंध देशात याची गरजच काय ? पण सांगून काहीही उपयोग नव्हता व जेथे दारू सिगारेटचा शौक प्रतिष्ठित पणाचे लक्षण समजले जाते तेथेच. नयन आई समोर काहीच बोलली नाही. पण तिने अमरला समजावून सांगण्याचा निर्धार केला. दारू, सिगरेट याचे सेवन नाही केले तरच ठीक असते. सिगरेटच्या धुराने दुसऱ्याला अपाय होण्याची शक्यता असते.
प्रत्यक्ष वडिलांकडून हा खास वारसा मिळालेल्या अमरचा हा नाद सुटेना किंवा मनापासून त्याकरता प्रयत्नच करेना. पण उलट साध्या लहान लहान गोष्टीवरून रागावणे, चिडणे, ओरडणे, नयनला तिच्या एका लहान झालेल्या डोळ्यावरून कमी लेखणे. इतकी अमरच्या मनाची पातळी नीच थराला गेली !
वर्षातच साकेतचा जन्म झाला. बारसे आनंदात केले. आता तरी परिस्थिती सुधारेल असे वाटले पण कसले काय….
एक दिवस सकाळीच मद्यसेवन करून सिगारेट ओढत अमर ऑफिसला गेला. शरीराचा झोक पण जात होता.
“हे पहा, मिस्टर मानकामे, तुमचा कामातील नैपुण्य पाहून, आम्ही इतके दिवस तुमच्या ऑफिसमध्ये सिगारेट ओढणे, उशीरा येणे, कधी लवकर जाणे या गोष्टींकडे दर्लक्ष केले. पण आज हे काय केले आहे ? सरळ दारू पिऊन झोकांड्या देत ऑफिसमधे येत आहात ? जा. घरी जा…” ऑफिसरने चांगलाच दम भरला. परत. “मी माझ्या पैशाने दारू पितो. सिगारेट ओढतो. तू रे कोण मला सांगणार?” अमरचे ऑफिसरला अपमानास्पद असे बेताल उत्तर.
याचा परिणाम म्हणजे अमरला तात्काळ ऑफिसमधून हाकलून देण्यात आले. बेभान अवस्थेत अमरने घराचे दार ठोठावले. साकेतला भात भरवतानाच नयन समोर आली. नयनच्या गालावर काडकन एक चपराक बसली व पाठीत रट्टा, कानही पिरगळला गेला. नयनला परिस्थितीचे भान आले. तिनेही अमरला जोरात ढकलून दिले. दोनदा थोबाडीत दिली, नाक ओढले. अमरला नयनची ही प्रतिक्रिया अनपेक्षित होती. दार उघडे होते, थोडेफार भान आले होते. उगीच शेजाऱ्यापाजाऱ्यांना, रस्त्यावर तमाशा नको म्हणून अमर गप्प राहिला. काहीच बोलला नाही.
थोड्या वेळाने अमरने आपल्या घरी आई वडिलांना फोन केला. “अहो, काय सांगू, नयनने आज मला मारले, तिच्या आई- वडिलांना सांगितले पाहिजे ! नयनचे असे वागणे बरोबर आहे काय ?”
नयनने हे ऐकले पण ती काहीच बोलली नाही, दुसरेच दिवशी, नयनचे सासू सासरे पुण्याला आले.
“वाटले नव्हते हो नयन अशी असेल ते ! आपल्या पतिदेवाशी अशी वागणूक!!” आल्या आल्याच अमरच्या आईने सुरू केले.
नयनच्या आईला अमरच्या आईची, स्वतःच्या मुलाच्या दोषांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची वृत्ती पाहून अत्यंत चीड आली. पण तरही अजूनही अमरला सुधारावे व आपल्या मुलीचा संसार सुखाने होईल या आशेने कुसुमबाईंनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांना आपली मुलगी विनाकारण असे वागणार नाही याची खात्री होती. तसेच तिला आपल्या मुलीने नवऱ्याची दादागिरी खपवून घेतली नाही याचेही बरे वाटले.
अमरला सुधारण्याचे, त्याची चूक सांगून, यापुढे तरी नीट वागण्याकरता अनेकांकडून अनेक वेळा गोडीने, समजुतीने सांगण्याचे आटोकाट प्रयत्न केले गेले. कुणीही माणूस चूक करणारच व आता होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल कुणाच्याही मनात काही राग नाही. परत दुसरे काम पहावे. सुंदर लोभस साकेतकडे लक्ष केंद्रित करावे. असे वारंवार सांगितले गेले.
लहान बालकांच्या निरागस लीलेने कुणाच्याही मनास आल्हाद लाभतोच! त्याप्रमाणे साकेतच्या मुग्ध हास्याने अमरच्या चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या.
खरोखरीच वर्ष, दोन वर्षे सुरळीत गेली. अमरने दुसरीकडे कामात चांगलीच प्रगती दाखविली. जुन्या गोष्टींचा कुणाकडूनही चुकूनही उल्लेख झाला नाही. या आनंदात नयनचे आई वडील अमेरिकेचीही सफर करून आले. छोटा साकेत, “आई डॅडी आले आहेत.” असे बोलू लागला.
पण एक काळरात्र उगवली. एका मित्राकडे अमर सहज गेला होता. आणखीनही एक दोन मित्र तेथेच जमले. व्हिस्कीच्या बाटल्या टेबलावर आल्या. अमरने ठासून नकार दिला. पण ‘अरे, बायकोला भिणाऱ्या’ अशा शब्दात अमरची अवहेलना करून मित्र, स्नेही, हितचिंतक म्हणणाऱ्यांनी अमरला यथेच्छ दारू पाजली. परत दुसरे दिवशी अमरला दारू पिण्यावाचून राहवेना, मोहच आवरेना. अमर परत या दुष्टचक्रात दुर्दैवाने अडकला. तेव्हाच नयनच्या अंगावर कोडाचे पांढरे डाग येऊ लागले होते. तिच्या आजीलाही कोड होते. पण कोड हे सांसर्गिक दुखणे नव्हे. त्वचेचा एक प्रकार होता. हे सर्व शास्त्रीय सत्य विसरून अमर कोडावरून नयनला टोचून टोचून बोलू लागला. एकदा तर त्याने संपूर्ण पगार दारूत खर्च केला.
नयनला, साकेतला घेऊन माहेरी आई- वडिलांकडे येण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. नेसत्या वस्त्रानिशी नयन माहेरी आली.
थोड्याच दिवसानी, अवघ्या चाळीस वर्षांच्या अमरने दारूच्या बाटली बरोबरच आपली जीवनयात्रा संपवली !
तरुणपणीच अमरची अशी शोकांतिका झाली. सगळ्यांनाच वाईट वाटले. एखाद्यास चुकून अपघात झाला, आजारपण आले तर गोष्ट वेगळी होती. पण सुशिक्षित अमरने स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश करून घेतला होता. सर्व चांगले चाललेले असताना.
सुदैवाने नयनच्या आई – वडिलांचे चांगले आहे. त्यांना नयन – साकेत काही जड नाहीत. नयन आपल्या भावाच्या व बहिणीच्या सुखी संसारात आनंदात आहे. स्वतः थोडे घरातले काम, थोड्याफार शिकवण्या करत आहे, साकेतकडे तिचे पूर्ण लक्ष आहे.
कै. राम गणेश गडकरी यांच्या “एकच प्याला” नाटकामधल्या सुधाकरची पुनरावृत्ती यापुढे तरी पुरे नाही का ? ड्रिंक या गोंडस नावाखाली वावरणाऱ्या दारूची हकालपट्टी, विषारी धूर सोडणाऱ्या सिगारेटचे उच्चाटन, उच्च संस्कृती असणाऱ्या भारत देशातून होणार का ?

— लेखिका : जयश्री शंकरन. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
