मराठी साहित्यात मुलाखत, संवाद आणि विचार मंथन यांना विशेष स्थान आहे. न्युजस्टोरीटुडे प्रकाशनाचे, ग्रंथालीची निर्मिती लाभलेले “संवादभूषण” हे पुस्तक या परंपरेला समृद्ध करणारे ठरते.
या पुस्तकाचे लेखक, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक श्री.देवेंद्र भुजबळ यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी साधलेले संवाद व मुलाखती या पुस्तकात आहेत.
“माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याची मनस्थिती महत्त्वाचे असते” म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि इतकेच नव्हे तर इतरांना यशस्वी होण्यासाठी मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तींचा, प्रेरणादायी जीवन कथांचा संग्रह म्हणजे “संवादभूषण” पुस्तक आहे.
संवादभूषण मध्ये हास्य कवी, जेष्ठ साहित्यिक श्री.अशोक नायगावकर, लेखक-संशोधक प्रा.डॉ. बाबासाहेब काझी, दूरदर्शनचे निवृत्त संचालक श्री अशोक डुंबरे, निर्माते राम खाकाळ, प्रसिद्ध वृत्तनिवेदिका शिबानी जोशी, दूरदर्शनचे निवृत्त कॅमेरामन श्री नरसिंग पोतकंठी, कवी, सूत्रसंचालक तथा भारतीय माहिती सेवेतील निवृत्त वरीष्ठ अधिकारी नितीन केळकर , जेष्ठ पत्रकार राजेंद्र घरत, जेष्ठ टीव्ही पत्रकार मनोज भोयर, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतलेले डॉ.बबन जोगदंड, क्रिकेटवर इंग्रजीत लेखन करणारे- मुलांना क्रिकेटचे धडे देणारे सी.के. सुब्रमण्यम, गडकिल्ले व इतिहास अभ्यासक, व्याख्याता म्हणुन मी स्वतः (प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण) लहान वयात पुस्तकांशी मैत्री केलेली, बाल ग्रंथालय सुरू करणारी मरियम मिर्झा अशा विविध क्षेत्रातील लोकांची प्रेरणादायी जीवन कथा व कार्य याची माहिती आपल्याला या पुस्तकांमधून मिळते.

एकूणच, संवादभूषण हे पुस्तक विचारप्रधान, प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण आशयामुळे मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे ठरेल, यात काही शंका नाही. व्यक्तिमत्त्वांची उंची आणि विचारांची खोली उलगडून दाखविणारे हे पुस्तक वाचकांसाठी निश्चितच संग्रहणीय ठरते.
या पुस्तकात 34 मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. या मान्यवरांमध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.इतक्या मोठ्या माणसांमध्ये माझ्यासारख्या शिवभक्ताला स्थान देऊन, माझ्या कार्यासाठी नवी उमेद, ऊर्जा दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून भुजबळ सरांचे धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर करीत राहीन व शिवकार्याच्या, इतिहास संशोधनाच्या या मार्गावर निरंतर चालत राहीन, हीच कृतज्ञता….!
मनापासून धन्यवाद….!

— लेखन : प्रा.साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण. सहाय्यक प्राध्यापक, इतिहास विभाग, पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लोणी, जिल्हा-अहिल्यानगर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
