स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, छत्रपती संभाजीनगर आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर १५ वे विचारवेध साहित्य संमेलन २ ऑक्टोबर २०२६ रोजी भुतान देशाची राजधानी थिंपु येथे संपन्न झाले. या संमेलनाचा समग्र वृतांत.
— संपादन
निमंत्रक भाऊ सुरडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे संमेलन म्हणजे जाज्वल राष्ट्रवादी विचारांचा उद्घोष होता. सावरकरांच्या विचारांनी प्रेरित जयस्तुते महन्मंगले स्त्रोतांमधून भारताच्या धगगधगत्या क्रांतीकारांचा जयघोष आणि समर्पणाची आठवण करून देणारा हा सोहळा होता. प्रत्येकाला गोपीचंदनाचा टिळा लावून, भारतीयत्वाची ओळख तिरंगा ध्वजाचा बिल्ला प्रत्येकाच्या छातीवर लावण्यात आला.
संमेलनाचे प्रमुख आकर्षण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून संमेलनाला प्रारंभ झाला. तन्मयी मगर यांनी बुद्धीची अधिदेवता गणाधिश नृत्य सादर केले.
संमेलनाचे अध्यक्ष सुधीर सेवेकर, स्वागताध्यक्ष देवेंद्र भुजबळ, भुतानचे प्रा. माधव राव, निमंत्रक भाऊ सुरडकर, कार्याध्यक्ष स्नेहल पाठक, किरण सराफ, सुरेश देव प्रामुख्याने व्यासपीठावर होते.

प्रा. नारायण काळे, रजनी सुरडकर, अनिता गबाळे आणि सहकाऱ्यांनी स्वागत गीत सादर केले.

श्री. देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या मनोगतात महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर नेत्यांनी जाती निर्मूलनाचे केलेले काम लक्षात घेऊन, त्यांच्या अनुयायांनी एकत्र हे काम पुढे नेले पाहिजे असे सांगून आरक्षणाचा लाभ त्या त्या घरातील पहिल्याच पिढीला मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
निमंत्रक भाऊ सुरडकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, निवृत्त माहिती उपसंचालक श्री प्रभाकर पुराणिक दादांच्या माध्यमातून तीस वर्षांपूर्वी सुरू झालेला हा यज्ञ व सावरकरांचे कार्य घराघरात पोहचण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचा मी अत्यंत आभारी आहे.
भूतानचे प्रा. मोहन राव यांनी भुतानच्या वतीने उपस्थितीतांचे स्वागत करून भारत आणि भूतान हे परस्परांचे कसे नैसार्गिक मित्र आहेत हे स्पष्ट केले.

संमेलनाध्यक्ष श्री. सुधीर सेवेकर यांनी ओघवत्या व लालित्यपूर्ण अशा रसाळ वाणितून सावरकरांच्या विविध भावमुद्रा आणि वैविध्यपूर्ण कार्य यांचा आढावा घेवून विज्ञाननिष्ठ सावरकर या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
सावरकरांची देशभक्ती, त्यांचे क्रांतिकार्य आणि साहित्यविषयक योगदान याची तुलना अन्य कुणाशीही होवू शकत नाही. परंतु त्यापलिकडेही त्यांचं सामाजिक अभिसरणाचं कार्य आणि औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून ओळखलेलं यंत्राचं महत्व व बदलत्या काळानुसार बुद्धीप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन या अज्ञात पैलूंवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला.
उद्घाटन आणि अध्यक्षांच्या बीजभाषणानंतर सावरकरांनी रचलेले अजरामर गीत जयस्तुते महान्मंगले श्री. व्यंकटेश देशमूख व माने यांनी सादर केले.

संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन, स्वागताध्यक्ष देवेंद्र भुजबळ लिखीत झेप या पुस्तकाचे व शैलजा देशपांडे लिखीत सहस्त्रसूर्य सावरकर या दोंन अंकी नाटक संहितेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दोन परिसंवाद आयोजित करण्यात आले. पहिल्या परिसंवादाचा विषय होता, “तीन अग्नीशीखा” या विषयावर मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहलताई पाठक यांनी सावरकरांच्या घरातील स्त्रियांचा जीवनपट उलगडून दाखवला.
पूर्ण कुटुंबच क्रांतीकार्याकडे वळलेलं त्यामुळे घरावर कायम पोलीसांची वक्रदृष्टी. सावरकर तीन बंधू, आई लहानपणीच वारलेली. वडील नि:संग . घराची जबाबदारी वडीलबंधू बाबाराव उपाख्य गणेश दामोदर सावरकर व त्यांच्या पत्नी यशोदा अर्थात येसू वहिनी यांचेकडे. त्यात रोमारोमांत देशभक्ती ठासून भरलेली. सतत फिरती, कधी भूमिगत त्यामुळे घरातील कर्ती स्त्री म्हणून येसू वहिनींनी समर्थपणे पार पाडली. जॅक्सनच्या वधाच्या आरोपात संशयित म्हणून बाबारावांना अटक झाली व त्यांची अंदमानात रवानगी. तात्याराव अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोरल्या भावापेक्षाही अधिक क्रांतीकारी विचारांचे. मित्रमेळा असेल वा पुढची अभिवन भारत संघटना असेल यात सातत्याने गुंतलेले. त्यांच्या पत्नी यमुताई या श्रीमंत जहागिरदार कुटुंबातील असूनही या धगधगत्या यज्ञकुंडाशी विवाहबद्ध झाल्याने कायम असुरक्षित. तिसरे बंधू बाळाराव अर्थात नारायणराव हे ही थोरल्या भावांच्या वळणावर गेलेले. त्यांच्या पत्नी हरिदिनी अर्थात शांताबाई उपाख्य लक्ष्मीबाई यांची रीतही तीच. यांचं जीवन किती खडतर असेल, जीवनात किती हालअपेष्टांना सहन करावं लागलं असेल याचं अत्यंत भावनात्मक कथन त्यांनी केले. या परिसंवादाचे अध्यक्ष भाऊ सुरडकर यांनीही प्रसंगानुरुप सावरकर कुटुंबाविषयी माहिती दिली.

या परिसंवादानंतर यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडा येथील प्रा अस्मिता शिंगोटे यानी पांढरकवडा येथे सावरकरांच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.

श्री गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसर्या परिसंवादात प्राचार्य डॉ अशोक वाकोडकर यांनी सावरकरांची पत्रकारिता या विषयावर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, सावरकरांनी आपल्या संमेलनाच्या एका भाषणातुन तरुणांनी आता लेखण्यामोडा आणि बंदूक हातात घ्या हा संदेश त्यावेळेस त्यांनी दिला होता.
आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मोठे संघटन उभे केले होते. देश एकजुटीचा त्यांनी या माध्यमातून संदेश दिला होता असे प्रा वाकोडकर म्हणाले.

तिसऱ्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सावरकरांची ने मजसी ने, जयोस्तुस्ते महान्मंगले, अनादि मी अनंत मी, ही गीते, सहस्त्रसूर्य सावरकर या दोन अंकी नाटकाचे अभिवाचन, पानिपत या नाट्य उताऱ्याचे सादरीकरण, सावरकर लिखीत संगीत उःशाप नाटकातील प्रसंग मी येसू बोलते – हा एकपात्री प्रयोग, शतजन्म शोधतांना आणि सन्यस्त खड़ग या नाटकातील विरह गीत आदि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले
यातील गायक कलाकार विश्वास काळे, कांचन देशपांडे, प्रमोख तोरवी, ज्योती पाटील, सोमनाथ पिसोळे, शैलेजा सेवेकर, मधुरा टापरे, मीना पिसोळे, सुनीता डोमाळे, मीरा देशमुख, श्याम कुलकर्णी, प्रमोद पाटील, कल्पना पांडे, अंजली देशमुख, कल्पना सबनीस, रेणु मुळे, स्मिता कुडे, नारायणराव काळे, अंजली अत्रे, सुरेश दंडे, पार्थ कोकीळ यांनी सादरीकरण केले.
या सर्व कार्यक्रमात प्रा. रवींद्र मगर यांनी आपल्या खुमासदार शैलीतून सूत्रसंचलन करुन रंगत आणली.

या विचारवेध संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १३० सावरकर प्रेमी उपस्थित होते.

उपस्थितांना स्मरणिका आणि भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. आभारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
हे संमेलन यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष भाऊ सुरडकर, स्नेहल पाठक, किरण सराफ, श्री रविंद्र मगर, प्रथमेश कुलकर्णी, तेजस पवनीकर, उमेश देशपांडे, दत्तात्रय सबनीस, वैजनाथ डोमाळे यांचे सहकार्य लाभले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
