हेच का माझ्या नशिबी शोक गाणे गायचे
लाभले जे चांगले ते न का मोजायचे ?
ती तशी अन् तो तसा भोवती सारेच खोटे
मी खरा अन् मी बरोबर हेच का घोकायचे ?
सूर्य आहे चंद्र आहे चांदण्याचे तेज आहे
खेळत्या अंधार वाटे मस्त चालत जायचे
दुःख अपुले वाटते फार मोठे आपल्याला
आणखी आहेत दुःखी ना कधी विसरायचे
नेहमी सोपाच रस्ता जाई ना ध्येयाकडे
आड वळणे उंच खळगे सोबतीला घ्यायचे
गर्व ताठा माज हा एव्हढा नाही बरा
हार घेण्या नेहमी नम्र असते व्हायचे !
दोष व्देष तापणे सारखे ना चांगले
आयुष्य आहे फार छोटे ना कधी विसरायचे !

— रचना : विजय पांढरीपांडे. हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
