सुरांची हुकुमत असलेली, अवघ्या जगाला डोलायला लावणारी सूरस्वामिनी आशा भोसले आपल्यातून दूर निघून गेल्या.परत कधीही न येण्यासाठी! दैवी सुरांना आपण सारेच पारखे झालो. ईश्वरी इच्छेपुढे आपण सारेच पामर! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून सादर करीत आहे, काव्यरुपी श्रद्धांजली!
— संपादक
1) सूरस्वामिनी
निखळून पडला
स्वयंप्रकाशी तारा
भूतो न भविष्यती
घडे प्रसंग सारा -१.
निखळण्याने त्याच्या
सुन्न धरती माता
निशब्द झाले सारे
सूरस्वामिनी जाता -२.
सप्तसुरांची राणी
जग सोडूनी गेली
सूर पोरके झाले
सुरमयी निमाली -३.
अंतर्धान पावला
तारा दैदीप्यमान
संगीतभक्त झाले
क्षणार्धातच म्लान -४.
लुकलुकते तारे
जरी अस्तित्वात
याचा रुबाब न्यारा
सारेच ममत्वात -५.
आशा नावाचा तारा
स्वतेजे प्रकाशला
अवघाच भूलोक
सूरगंगेत न्हाला -६.
नशिबाने ऐकली
दैवी संगीत गाणी
परतेल का पुन्हा
सप्तसुरांची राणी – ७.
–– रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली.
2) सूर सम्राज्ञी
रेंगाळे मनात आज सर्वांच्या
तुझ्या सुरांची एक लकेर
दिल अभी भरा नहीं, ना
जाओ तुम अभी छोड़कर
पण माथ्यावरचे जड ते ओझे
थकलेले पाऊल तुझे
जिवलगाने अलगद धरुनी
नेले, वाट दूर जाई च्या स्वप्नी
तू “राजहंस“ होती गात
एका तळ्यातल्या बदकांची
सूर सम्राज्ञी होती तूचि
त्या सुवर्ण काळातील गाण्यांची
संगीत सृष्टी पोरकी झाली
गेला आवाज, अनोखी शैली
चैतन्य हरवले सळसळते
हास्य हरपले खळखळते
चांदणी तेजाची, निखळली
माधुर्य लोपले गालांच्या खळी
शोक भरला उरी दाटून
तुझा गंधकोश गेला सांगून
संगीताच्या सर्वोत्तम युगाची
शेवटची ठरली तू शिलेदार
आज जाने की जिद ना करो
ओघळती रसिकांचे अश्रू अनिवार.
— रचना : स्वाती वर्तक. मुंबई
3) स्वरधीश सूर
बालवयी संगीतात रमली
जादुई आवाजाने घरो घरी
सकलांच्या हृदयात वसली
कायमच गडे होती हसरी..
गळ्यातच गे मळा फुलला
भक्तीचा तर कधी मस्तीचा
स्वराधीश सुरांना लाभला
आशिष तिजला सरस्वतीचा..
आवाजात सुरांचीच नशा
कळलेच नाही कधी राज
मनामनात रुजली आशा
असे अवगत नेमका बाज..
गातसे खणखणीत तान
भक्तीचेगळ्यातून आवाहन
तृप्त करी सकलांचे कान
आवाजात मादक आव्हान..
उचलून तारकांचे आकाश
काळ रात्रच उलटून गेली
स्मृती गंधाची दाटली उरात
भावसुमने श्रद्धांजली वाहिली..
— रचना : सौ.मीना घोडविंदे. ठाणे
4) आशा माई ..
नऊ दशकां पासून
अधिराज्य करे गीत
आशा ताईं संगतीत
अजरामर हो संगीत
भूपाळी ऐकू ताईची
पहाट व्हायची नीत
देव सुद्धा भारवलेले
श्रवणीय भक्ती गीत
मार्दव शब्दां शब्दात
फिके पडेल नवनीत
ऐका गाणी नियमित
नेम आबालवृद्ध नीत
अंगाई ऐकल्यवाचून
झोप नाही ताई येतं
वातावरण मंत्रमुग्ध
स्वर मयी ते स्वप्नवत
यौवन उस्फुर्त भरले
स्फुर्ती देई युगलगीत
प्रेमाला लाभले शब्द
तुजमुळे जुळलीप्रीत
कुठलेही गाणे सहज
कसे गं तुला अवगत
संगीतकार आसूसले
करायला साथ संगत
पार्टीत उसळे उत्साह
उन्मादक पाॅप संगीत
चमके ध्रुव ता-यासम
कुठले कर्तृत्व इंगीत
सोडून गेलीस लेकरा
दिस रेटा आठवणीत
विरह कळे ममत्वाचा
आठवणीही अगणित
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
