Homeसाहित्यप्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर : काव्यात्म शब्दांजली

प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर : काव्यात्म शब्दांजली

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात जल्लोषात व स्वयंप्रेरणेने साजरी केली जाते. त्यांना प्रेरणा माणून चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि साहित्यिकांनी बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य, समता बंधुता व न्याय या मूल्यांना आपल्या साहित्यातून उजागर करून लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सकारात्मक विद्रोहाचा ठसा उमटविला. असंख्य आंबेडकरी कवी, गझलकार आपल्या रचनांमधून मानवतावादी मूल्यांचे भरणपोषण करणारे वैचारिक लेखन समाजापुढे ठेवताहेत. त्यांच्या लेखनात “जयभीम” केंद्रस्थानी असून दीपस्तंभ म्हणून बाबासाहेबांचे संघर्षमयी जीवनकार्य सतत दिशादर्शक ठरते आहे.

दरवर्षी जयंतीनिमित्त हजारो गीतांमधून जयभीमचा क्रांतिघोष दुमदुमत रहातो. नवीन गायक, गीतकार, संगीतकार प्रबोधनात्मक सादरीकरण करतात. याची सुरुवात लोककवी वामन कर्डक यांनी बाबासाहेबांच्या हयातीत केली.

लोककवी वामन कर्डक

शेगावचे कवी गवाजी बळीद जयभीम कवितेत,
“जयभीम नारा गर्जे देश सारा
भीम हा पहारा वंचितांचा”
अशी उचित शब्दांजली अर्पण करतात. समकालीन गझलेला छेद देणारे नंदकिशोर दामोधरे आपल्या आंबेडकरी गझलेत व्यक्त होतात,
“आजही हृदयात ठेवतो आम्ही आंबेडकर
आजही रक्तात पेरतो आम्ही आंबेडकर”
उठसुठ आंबेडकरांना डोक्यावर नाचवण्यापेक्षा डोक्यात घ्या हा संकुचित सल्ला देणार्यांचे कान ठिकाणावर आणण्यासाठीचे हे चोख प्रत्युत्तर आहे.

अलीकडच्या राजसत्तेने पुराणमतवादी धार्मिक कर्मकांडाचे पुनर्जीवन करण्याचा सपाटा लावला आहे. अभ्यासक्रमात लोकशाही मूल्ये, संविधानाऐवजी मनाचे श्लोक, अंधश्रद्ध बनविणारा वांझ इतिहास पेरुन पुराणमतवादी संस्कार मूल्य रूजविण्याचा अट्टाहास चालवला आहे. हे वास्तव परखडपणे नंदा अधोरेखित करतात,
“बघ संविधान आहे तुझ्या माझ्या हिताचे
मानव सुखावयाला ध्यासात भीम आहे”
“सत्ता बहाल करणे धर्मांध माणसाला
समजून मग असावे श्वासात भीम आहे”

ज्ञानाचे प्रतीक असणाऱ्या आंबेडकरांनी सर्वांना शिक्षणाचे दारं उघडले, त्यांच्या प्रेरणेने शोषित वंचित, उपेक्षितांच्या दु:खांवर‌ फुंकर घालण्याचे बळ शब्दात आले. कर्नाटकात संशोधक असलेल्या विद्रोही कवी डॉ. युवराज सोनटक्के यांनी केलेले समर्पक वर्णन,
“एक सुर्य माझा हाती हळू ठेविला पित्याने
म्हणे जीवन विज्ञान विण आपल्या हाताने” (प्रश्नांची मातृभाषा)

राज्यघटनेच्या उपोद्घातात बाबासाहेब आंबेडकरांनी जे राजकीय ध्येय मांडले त्यात समता मूल्य अग्रणी आहे. त्यांनी समताधिष्ठित संस्कारमूल्ये रूजविण्यास्तव संपूर्ण हयात घालवली. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा समान हक्कासाठीचा धर्मसंगर होता. बाबांनी माणसाला विषमतेच्या खाईत लोटणारी मनुस्मृती जाळली, ती समानतेचे तत्त्व बिंबवण्यासाठी. सुप्रसिद्ध कवी प्रा. अनंत राऊत ओजस्वी शब्दात वंदन करतात,
“मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तूं
महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तूं
परंपरेच्या चिखलामधली, जातीयतेच्या चिखलामधली
नौका चालवली…..
बां भीमा, लेकरासाठी तू हयात घालवली”
राजकीय व्यवस्था सत्ता हस्तगत करण्यासाठी, जातीच्या भिंती अभेद्य करीताहेत. धर्म अफूची गोळी तरूणाईला देऊन शिक्षण बंद पाडणारे नवनवीन प्रयोग करीत आहे.

कवी शशिकांत हिंगोणेकर महामानवाला अभिवादन करताना ‘सूर्य फुलांच्या विश्वविद्यालयाचा कुलगुरू’ संबोधतात,
“त्याने मोडले आहे,
तुमच्या पिढ्यानपिढ्यांच्या लेखणीचे कंबरडे.
अस्मितेचे लक्ष लक्ष दिवे पेटवून”
काळाची मर्यादा ओलांडणारी अरूण विघ्ने ची गझल सम्यक विचार पेरते,
“जात नावाची ही भयंकर बिमारी होत आहे
कालचे चवदार पाणी हे विषारी होत आहे”
“आजही पाणी पील्याने बालकाचा प्राण जातो
वंचितांच्या शिक्षणाची कां शिसारी होत आहे”
हाच आशय असलेली आनंदा वारांगणेंची भाव छटा,
“स्पर्शानं‌ आमच्या कसा
पाणवठा बाटला होता
मंदिराचा ही दरवाजा बंद होता.
तुमच्या रूपानं
माऊली आली घरात.”

आज भ्रष्टाचारात शिक्षण क्षेत्र अव्वल स्थानावर आहे. सामान्यांचे शिक्षण बंद करणारी राज्यकर्ती जमात पांघरुण घालण्यात धन्यता मानते. आंबेडकरी कविता सामाजिक मूल्य जपणारी, माणूसपण बहाल करण्याचा आग्रह धरणारी आहे म्हणून हे काव्य नवनिर्माणाचा ध्यास घेऊन अवतरते आहे.

साठोत्तर काळात खूप मोठ्या प्रमाणावर लिहिली गेली, आंबेडकरी कवितेने मराठीचे सारं भावविश्व हादरवून सोडलं. आंबेडकरवाद म्हणजे सर्वंकष मानवमुक्तिचे तत्वज्ञान, सम्यक क्रांतीचे तत्त्वज्ञान. आंबेडकरी काव्य प्रांताची ही तिसरी पिढी, ह्या पिढीने बाबासाहेबां नंतर बदललेली माणसं व काळाची रूपं व्यक्त केलीत “आंबेडकरवाद” कवितेत कवी एड .शंकर रामटेके त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना लिहितात,
“विषमतेच्या गर्भाशयात समतेचे बीज पेरणारा पशूरूपी मानवाच्या डोक्यात मानवतेचा मेंदू भरवणारा वाद म्हणजे – आंबेडकरवाद”
प्रस्थापिततेच्या सर्वनाशाचा विडा उचलणारा‌ बंडखोर कवी नामदेव ढसाळ यांच्या “आंबेडकर” कवितेच्या शेवटच्या कडव्याने समारोप करतो,
“जो नूतन वर्षाच्या फुलपाखरांसारखा
उडतो नि प्रकाश‌ पसरवतो.
जो रुळांबरोबर वाढत जातो.
जो युनिव्हर्सिट्यांचे चिरेबंद ढिले‌ करतो.
जो स्वतंत्रतेकडून स्वतंत्रतेकडेच जातो.
असा तू एकूलता एक आमच्या रथाचा सारथी.
जो द्विविजयी तंद्रेतून आमच्यात‌ उतरतो.
नि शेतातून, गर्दीतून, नि मोर्चातून नि लढ्यातून
आमच्या बरोबर असतो.
नि आम्हाला शोषणातून सोडवितो.
जो तू तोच तू आमचा” (गोलपिठा)

माझी अस्मिता, भारतीय आधुनिक सृजनशील समाजाचा मानबिंदू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३५ व्या जयंतीदिना निमित्त वंदन करतो.

प्रा.साहेबराव मोरे

— लेखन : प्रा.साहेबराव मोरे. चाळीसगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रज्ञा आठल्ये on “आशा भोसले”
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 2
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 1
कांचन दळवी on माझी जीवन नौका : 2
राघवेंद्र कुलकर्णी on माझी जीवन नौका : 2
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय