Homeलेखमहामानवाच्या विचारांची कास धरू या !

महामानवाच्या विचारांची कास धरू या !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज;14 एप्रिल रोजी 135 वी जयंती आहे. या निमित्ताने त्यांची थोरवी सांगणारा हा लेख. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.
— संपादक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून. भारतीय राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, मानववंशशास्त्र अभ्यासक, द्रष्टे विचारवंत, थोर समाज सुधारक, पुरोगामी कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक, शिक्षणतज्ञ, संपादक, कठोर तत्वप्रिय नेते असे बाबासाहेबांचे प्रखर बहुआयामी व्यक्तीमत्व होते.

बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे सैन्यात मेजर- सुबेदार म्हणून सेवा करीत. त्यामुळे त्यांच्या भारतात विविध ठिकाणी बदल्या होत. सेवेबरोबरच ते समाज कार्यही करीत. त्यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय. कोकण विभागाचा माहिती उपसंचालक असताना संपादक मित्र राजेंद्र घरत, मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे तथा सामाजिक कार्यकर्ते मित्र ऍड योगेश मोरे यांच्या समवेत आंबावडे येथील स्मारक पाहण्याची संधी मिळाली होती.

मध्यप्रदेशातील महू येथे बाबासाहेबांच्या वडिलांची नेमणूक असताना १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला. आता महूचे नामकरण “डॉ. आंबेडकर नगर” असे करण्यात आले आहे. सातारा येथील शासकीय विद्यालयात त्यांनी १९०० साली नोव्हेंबरमध्ये प्रवेश घेतला. १९०८ सालच्या जानेवारी महिन्यात ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले. पर्शियन आणि इंग्रजी घेऊन १९१३ मध्ये ते बी.ए. झाले. सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन १९१३ च्या जुलै महिन्यात बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले. अर्थशास्त्र हा प्रधान विषय घेऊन ते १९१५ मध्ये एम.ए. झाले. डि लीट, डीएससी, बॅरिस्टर ऍट ला असे ते उच्च विद्याविभूषित होते.

बाळासाहेबांचा ”दि कास्ट इन इंडिया” हा पहिला शोधनिबंध १९१६ मध्ये प्रकाशित झाला. इंग्लंड मधील लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पोलिटिकल सायन्स या संस्थेत ते जून १९१६ मध्ये दाखल झाले. आता ही संस्था लंडन स्कुल ऑफ इकॉनामिक्स या नावाने जगभर प्रख्यात आहे.
बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात १९१७ साली पीएचडीपर संशोधन पूर्ण केले. “स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमिडिज” हा त्यांचा ग्रंथ १९१७ मध्ये प्रकाशित झाला.

बाबासाहेब मुंबईच्या सिडेनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९१८च्या नोव्हेंबर महिन्यात रुजू झाले. त्यांनी १९२० च्या जानेवारीत ”मूकनायक” वृत्तपत्र सुरु केले. पुढे लंडन विद्यापीठाची अर्थशास्त्रातील एमएससी पदवी मिळवली.”दि प्रॉब्लेम ऑफ रुपी” या त्यांच्या शोधप्रबंधाला १९२३च्या मार्चमध्ये अर्थशास्त्रातील डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी मिळाली. तत्कालीन मुंबई शासनात विधान परिषद सदस्य (एम.एल.सी) म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

सामाजिक समतेच्या चळवळीतील अत्यन्त महत्वाचे पाऊल ठरलेला महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह १९२६च्या मार्च महिन्यात बाबासाहेबांनी घडवून आणला. १९२७ च्या एप्रिलमध्ये त्यांनी “बहिष्कृत भारत” वृत्तपत्र सुरु केले.
मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयात १९२८ मध्ये ते प्राध्यापक झाले. १९३० साली त्यांनी “जनता” पत्र सुरु केले.मानव मुक्तीच्या शांततामय संघर्षात गाजलेला काळाराम मंदिर सत्याग्रह त्यांनी १९३० ते ३५ या कालावधीत केला.

ब्रिटिश सरकारने १९३०-३२ या दरम्यान आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. १९३२ च्या सप्टेंबर मध्ये त्यांनीं पुणे करार केला. प्राध्यापक असलेल्या सरकारी विधी महाविद्यालयाचे ते १९३५ मध्ये प्राचार्य झाले.

अथक प्रयत्न करूनही जात व्यवस्था जात नाही हे पाहून त्यांनी १९३५च्या ऑक्टोबर महिन्यात येवला येथे झालेल्या जाहीर सभेत बाबासाहेबांनी हिंदु धर्मत्यागाची घोषणा केली. पुढे जवळपास २० वर्षांनी त्यांनी प्रत्यक्ष धर्म परिवर्तन केले.
१९३६ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. शिक्षण ही मूठभर माणसांची मक्तेदारी राहू नये म्हणून त्यांनी १९४५ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.या संस्थेतर्फे विविध ठिकाणी विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. या संस्थेने शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणूनच आम्ही घडलो, असे ऋण लाखो विद्यार्थी व्यक्त करतात. ”हू वेअर शुद्राज” हा त्यांचा गाजलेला ग्रंथ १९४६ मध्ये प्रकाशित झाला. १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात ते घटना समितीचे अध्यक्ष झाले.

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री झाले.बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सादर केले.हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारले. तेंव्हा पासून आपण दरवर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो.

बाबासाहेबांनी १९५० साली जून महिन्यात औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांच्या जीवन कार्याचा सन्मान म्हणून कोलंबिया विद्यापीठाने आपल्या या विद्यार्थ्यांस १९५२ मध्यें एलएलडी पदवीने गौरविले.

बाबासाहेबांनी १९५५ मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली.त्याच वर्षी “प्रबुद्ध भारत” वृत्तपत्र सुरु केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी लाखो अनुयायांसोबत नागपूर येथे बौद्धधर्म स्विकारला. नेपाळ मधील काठमांडू येथे नोव्हेंबर १९५६ मध्ये झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेला ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

या महामानवाचे महापरिनिर्वाण ६ डिसेंम्बर १९५६ रोजी दिल्ली येथे या झाले. मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीत हा महामानव चिरनिद्रा घेत आहे. येथे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्मारक होत आहे.
बाबासाहेबांना भारत सरकारच्या “भारतरत्न” या सर्वोच्च नागरी पुरस्काराने १९९० मध्ये गौरविण्यात आले. त्यांच्यावर आतापर्यंत १२ चित्रपट, अनेक माहिती पट, ६ दूरचित्रवाणी मालिका, नाटकं निर्माण झाली आहेत.

भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्मिती सहायक म्हणून काम करत असताना निर्माते सुधीर पाटणकर यांच्या समवेत मला “ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” हा टीव्हीपट राष्ट्रीय प्रसारणासाठी हिंदीतून आणि मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित करण्यासाठी मराठीतून निर्माण करण्याची संधी मिळाली होती. त्याकाळी दूरदर्शन ही एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी असल्याने ६ डिसेंम्बर १९८९ रोजी राष्ट्रीय स्तरावर रात्री नऊ वाजता प्रसारित झालेल्या या माहिती पटास देश भरातून प्रचंड प्रतिसाद लाभला होता. राष्ट्रीय प्रसारणात “प्राईम टाईम” मिळणं ते त्याकाळी अत्यन्त दुर्मीळ होतं. तो एक मोठा बहुमान समजला जात असे. या अभिमानास्पद आठवणींवर आधारित लेखही मी लिहिला होता.

बाबासाहेब आपल्यातुन शरीर रूपाने गेले असले तरी काळ जसा पुढे जात आहे, तसतसे त्यांचे “स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” असे एक ना अनेक तेजस्वी विचार ,तत्वे जगाला अधिकाधिक प्रकाशमान करत आहेत.

दरवर्षी मुंबईत १४ एप्रिल या जयंतिदिनी, ६ डिसेंबर या महा परिनिर्वाणदिनी आणि नागपूर येथे धम्म परिवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने उसळणारा जनसागर या लोकोत्तर महापुरुषाची महती गात असतो. त्यांच्या विचारांचे अनुकरणच आपल्याला व या विश्वाला पुढे नेणारे आहे.
या महामानवास मनःपूर्वक मानवंदना.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 2
प्रज्ञा आठल्ये on “आशा भोसले”
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 2
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 1
कांचन दळवी on माझी जीवन नौका : 2
राघवेंद्र कुलकर्णी on माझी जीवन नौका : 2
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय