Homeसाहित्यसंगती रंग : १२

संगती रंग : १२

निर्लेप

उजैनच्या टूरला आम्ही गेलो होतो, तर इंदोरला अलकाताईकडे मुक्काम केला. एरवी इंदोरला जाणं होतच नाही. चार दिवस राहिलो होतो.
एक दिवस दोघी तिघी बायका आल्या. डबे देवाण -घेवाण, लगबग होती.
कसली ?
“आमच्या इंदूचा तिसरा स्मृतिदिन
आहे, “अलकाताई म्हणाली.
इंदू म्हणजे इंद्राणी. तिची मोलकरीण.
विचित्रच वाटले मला. तिचे नाव, तिने घरकामाला असणे आणि स्मृतिदिन साजरा करणे. मेळ लागेना.
मग तिनं कहाणीच ऐकवली.

इंद्राणी तिच्याकडे दहा वर्षं कामाला होती. घरंदाज बाई ती. तिन्ही मुले वाढवून नवऱ्याच्या साथीने निगुतीने संसार केलेली. हाताला कामाची सवय. नातवंडं झाल्यावरदेखील हातातले काम सुटले नाही. त्याची तिला सल नव्हती. आपल्या घरासाठी राबताना कष्ट होतात थोडेच ? पण तिचं नशीबच फिरलं. अचानक वैधव्य आलं .दिवस पालटले. सुना तिला उपाशी ठेऊ लागल्या. उपाशीपोटी काम झेपेना. मनाला साहवेना. तीन तीन मुलगे, ते त्यांच्या बायकांचे ! सुना तर परक्याच. मुलांचे वर्तन तिला बुचकळ्यात टाकत असे.

असं कसं झालं ? देवाने तिचा प्रेमळ, कर्तबगार नवरा एकाएकी ओढून नेला. मुलांना संस्कार दिले पण ते फळले नाहीत. घर मुलांच्या नावे झालेलं.

हिनं काय करावं ? रडत बसावं ? उपाशी राहावं ? नशिबाला बोल लावावा?
नाही. तशी नव्हतीच ती. नशिबापुढे हार नाही मानायची,असं मनाशी पक्कं केलं.
भुकेल्या पोटी राबणं मात्र तिनं नाकारायचं ठरवलं.
मुलांना, नातवंडांना डोळे भरून पाहिलं. शेवटचं. बोलली काहीच नाही.
अगदी मोजके चार कपडे घेतले. कुणाचा बोल नको म्हणून सुनांना दाखवून, पिशवीत भरून देव्हाऱ्याशी हात जोडले. सर्वांच्यादेखत ती निघाली.

घर मागे ठेवलं आणि सगळ्या, आठवणीदेखील…
जाते कुठे ? नाटकं चालली आहेत. मुलांना, सुनांना वाटलं.

माहेर तालेवार होतं. पण माहेरी रडकथा घेऊन जाणार नव्हती ती. तिन्ही मुलं अशी कशी, हिलाच नीट वागता येत नसेल ? शंका रास्त होती. ह्या शंकेचे निरसन पण कोणाजवळ करत बसली नाही. कोणा कोणाला स्पष्टीकरण देणार ? माहेरी हे प्रश्न विचारले असतेच !

तिनं कानातली कुडी काढली. लग्नात आईने दिलेली ठसठशीत कुडी ही. एक कुडं सोनाराकडे दिलं. पैसे उधार आणले. असे व्यवहार केले नव्हते कधी. हिंग, जिरं आणायला देखील गेली नव्हती ती बाहेर. सोनार फसवेगिरी करू शकतो. पण इतकं फसवलं गेलं आहे,नियतीकडून. तर आता ती भीतीच उरली नव्हती तिला.
त्या पैशातून भाड्याने एक खोली घेतली. एक वळकटी आणि मोजकी भांडी. अगदी फार दूर नव्हतं हे भाड्याचं घर. काही लोक ओळखत असतीलसुद्धा.
पण पर्वा करायचीच नाही म्हटल्यावर काय ! तिच्याकडे असणारी जमेची बाजू म्हणजे धडधाकट प्रकृती. घरकामाची सवय होतीच. मात्र आता घरं लोकांची असणार होती ! इंदोरमध्ये ह्या राजवाडा म्हटल्या जाणाऱ्या वस्तीत विविध स्तरातले लोक रहातात. तिला कामं मिळत गेली. मन लावून काम करणं. रजा नाही, तक्रार नाही. शरीराने साथ दिली. उतारवयात तब्बेतीच्या किती तक्रारी सुरू होतात. मनोभंग झाल्यावर त्या कशा डोकं वर काढतात. पण तसे हिचे झाले नाही.
मुलांच्याकानावर हिचं असं हातावर पोट घेऊन जगणं आलं होतं. पण तिन्ही मुलं ह्या आईने जन्माला न घातल्यासारखी होती जणू. फक्त पोट भरणं म्हणजे जगणं नाही… तिला समजत होतं. घरी किती आला- गेला पै पाहुणा ! हौशीचा संसार…
दिवस तिनं कामाला असा जुंपून घेतला की विचार करायला अवसर मिळायला नको. शेवटी भाग्य आपल्या मनगटात असते तेच खरं, हे ती अनुभवत होती. असं एकटीने, तेही मोलमजुरी करत राहणे हा नातेवाईकांचा चर्चेचा विषय होता. तोही फार काळ टिकला नाही. कारण ही चघळणारी माणसे, दुसरा इंटरेस्टिंग टॉपिक मिळाला की तिकडे वळतात !

खात्या पित्या घरातली बाई अशी एकटीच राहते. अशा अशा कारणाने रहाते, हे हळूहळू समजलं. एका घरी तिचा चहा, दुसऱ्या घरी नाश्ता अशा वेळा लागल्या. पोळ्या मऊसूत करायची. घरमालकीण सांगायची दोन जास्त कर. इथेच जेऊन जा. त्या स्वाभिमानी बाईने काहीही फुकट घेण्याचं सरळ नाकारलं.पगारातून वळते करून देत असे. शिवाय कोपऱ्या कोपऱ्यावर चहा,खाद्यपदार्थांचे ठेले होते. मनात आलं तर तिला सगळं मिळू शकत होतं. कधी सणा- सुदीला सराफा बझारमध्ये खाऊन येत असे. एके काळी ती कुटुंबासमवेत ह्या सराफा बझारमध्ये गेली होती.

स्वतःच्या घरचे काम जास्त नाहीच. कपडे पिळायचे, लहानशी खोली झाडून काढायची. पूर्ण दिवस बाहेर कामं.चहा पिऊन घर सोडायचं. वळकटीवर अंग टाकल्यावर झोप लागायची तिला.
हळूहळू तिची शिल्लक साठू लागली. तिने कुडं सोडवून आणलं. जिथे काम करायची त्या बँकेतल्या ताईंनी तिला खाते काढून दिले. ती बचत केलेले थोडे पैसे ताईंच्याच बरोबर जाऊन वृद्धाश्रमात देऊ लागली. हा पैसा माझ्यासारख्या आधार नसलेल्या बाया बापड्यांना मिळायला हवा. ताईंना ती सांगायची.
दहा अकरा वर्षे गेली. ना मुलं कधी चौकशीला आली ना ही कधी गेली.
एक दिवस ती सकाळी अशक्तपणामुळे झोपून राहिली.
“मी आता उठत नाही.” सांगून टाकलं.
आसपासचे बिऱ्हाडकरु गांगरले. मुलांना बोलावून घेऊया म्हणाले.
तिचा ठाम नकार.
त्या बँकेतल्या ताईंना बोलवा म्हणाली.
त्या आल्यावर हिनं सांगितलं, ही कुडी आहेत, त्याचे पैसे करा. जमा काढून घ्या. असे असे वाटा. थोडे पैसे ठेवा. नातवंडांना खाऊसाठी.
“अहो, असं काय बोलता ? वाटेल बरं तुम्हाला…”

“माझ्या आवाजावर जाऊ नका. खणखणीतच असतो तो. कोणाला हवं असतं का खितपत पडून मरण ? मलाही ते नकोय. असं बघा, एवढं तरी माझ्या मनासारखं होऊदे ना. की नको ?”

“मग मुलांना का बोलवायचं नाही म्हणता ?”

“ प्रेम माझा आधार होतं. माझं बळ होतं. पण आधार नसणं ही परिस्थिती देखील ताकद देते. ती माझ्याकडे आहे. मला अभिमान होता, तीन तीन मुलगे कसली ददात नसेल. तोच मोडून काढायचा ठरवलं असेल वरच्याने ! ते मी मानले आहे. निपुत्रिक म्हणूनच मरूदे मला. पण त्याला बोल तरी कसा लावू, धडधाकट शरीर त्यानेच दिलं बघा ! आता रजा घेते.”
तिनं आडव्याने नमस्कार केला.

दुपारीच ती गेली. तिचं दुखणं कोणालाही काढावं लागलं नाही.
तिच्या अंत्ययात्रेला अख्खी गल्ली लोटली.
तिच्या इच्छेप्रमाणे दान दिले.
तिच्या आठवणीसाठी अजूनही थोडे तरी दान दिले जाते.

मुलं इतकी बेइमान का निपजली असतील ? ते तिने कसे स्वीकारले असेल ? खात्या पित्या घरातली तीन मुलांचे आईपण मिरवलेली बाई. सगळं पूर्वायुष्य सहज मागे लोटून देणं सोपं आहे का ?
पुस्तकात वाचून कधी येणार नाही, अशी समजूत घेऊन जगली ती. इतकी निर्लेप जगली.
लढण्यातून समज घेतलेली, कितीतरी असतील अशी माणसे. ’स्तंभ तिथे ना कुणी बांधला,पेटली ना वात..’ ह्या प्रकारातली.

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ. अलका भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments