आमची छायाचित्रे पाहून प्रत्येकाला वाटेल, या बहूधा शाळेतल्या मैत्रिणी असतील किंवा एकाच महाविद्यालयात शिकलेल्या, गेट टुगेदर साठी एकत्र जमल्या असतील ! किंवा असंही मनात येईल एकाच आस्थापनात काम करणाऱ्या सहकारी असतील ? पण असे अजिबात नाही. आम्ही साऱ्याजणी तीनचार वर्षांपूर्वी एकमेकांस ओळखतही नव्हतो किंवा आमची यापूर्वी कधी भेट ही झालेली नव्हती.
आम्ही सर्व जणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून, गावातून आणि राज्यातून विविध भाषिक मैत्रिणी योगायोगाने एकत्र आलो आहोत. आमच्या पैकी बहुसंख्य मैत्रिणी जेष्ठ नागरिक आहेत. काहीजणीं आमच्यापेक्षा खूप लहान आहेत.
आमच्या या समूहाला आम्ही “आम्ही मैत्रिणी” असं नाव दिले आहे. “मैत्री” किती सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहे, नाही का ? मैत्री अर्थात मित्रता, दोस्ती किंवा एकमेकांमध्ये सौहार्दता किंवा सद्भावना असणे. मैत्री ही दोन किंवा दोन पेक्षा अधिक जणांमध्ये होत असते. मैत्री विश्वास आणि स्नेह पूर्ण संबंधांवर टिकून असते.मैत्री ही करुणा व एकमेकांचे कल्याण यावर आधारित असते. मैत्रीत परस्परांची सुखदुःख वाटून घेतली जातात. जे जे योग्य आहे त्याचं समर्थन केले जाते. मैत्री नि:स्वार्थ भावनेतून जपली जाते. आपल्याकडे देण्याची वृत्ती असली की, मैत्री उमलत राहते.
असेच तीन चार वर्षांपूर्वी आम्ही चार पाच मैत्रिणी योगासने, प्राणायाम व हास्य योगाला लातूर महानगर पालिकेच्या गार्डनमध्ये सुरुवात केली. नि:शुल्क असा हा उपक्रम होता. हळूहळू एकेक मैत्रिण सहभागी होऊ लागली. मुख्य म्हणजे प्रत्येकीला काही ना काही व्याधी जडलेल्या होत्या. काहींचे असाध्य रोगामुळे शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. प्रत्येकीच्या शरीराची अन् मनाची कूरकूर चालू होती. मन पळत होते पण शरीर साथ देत नव्हते. हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, थाॅयराईड यांनी शरीरात छान बस्तान बसवले होते.

मुख्य म्हणजे साऱ्याजणी मुलांमुलींची शिक्षणं, लग्न अशा प्रमुख जबाबदारीतून मुक्त झालेल्या ! उर्वरित आयुष्य आपल्या मुला- नातवंडांबरोबर व्यतित करावं या उद्देशाने आपलं मूळ गाव, घरदार, नातेवाईक यांच्यापासून दूर आलेल्या ! फ्लॅट संस्कृतीत बंद घरं, शेजारी कोण राहतं याचा पत्ता ही नसतो. ओळख झाली तर हाय हॅलोच्या पुढे संभाषण जात नाही. मुलांना नोकरी धंद्यामुळे जेष्ठांशी बोलायला वेळ नाही, अशी आजची शहरी संस्कृती ! मोबाईल, टी.व्ही तरी किती पाहणार ?

अशा आणीबाणीच्या काळात आम्हा महिलांच्या हाती ही जादूई गुहा सापडली.
योगासने, प्राणायाम, हास्य योगामुळे शरीर व मन हसू लागले. रोजचं जगणं आनंददायी होऊ लागलं. थाॅयराईड, डायबिटीस, बी पी नियंत्रणात येऊ लागले. मैत्रिणी मोकळे पणाने बोलू लागल्या. सुखदु:खाची देवाणघेवाण होऊ लागली. रोजच्या जगण्यात रंगत यावी म्हणून नाटक सिनेमाचे वेध लागू लागले. ग्रुपने नाटक, सिनेमा पाहणे, शाॅपिंगला जाणे, याच्या जोडीनेच एकमेकींचे जन्मदिवस, लग्न दिवसानिमित्त पार्टी ही उत्स्फूर्तपणे सुरु झाली. या निमित्ताने ग्रुप मोठा होऊ लागला. “आम्ही मैत्रिणी” हे नामकरण ग्रुपला देण्यात आले. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये हा ग्रुप दिमाखात विराजमान झाला. आज तीस ते पस्तीस मैत्रिणी ग्रुपच्या सदस्य आहेत.

मकर संक्रांत आली. मस्त बहारदार पध्दतीने सामूहिकपणे तिळगुळा बरोबर मनोरंजन सुरु झाले. सांगायला आनंद वाटतो, रक्षाबंधन निमित्त सफाई कामगारांना राखी बांधून त्यांच्यासोबत आनंद साजरा करतो. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला आरोग्य शिबीराचे आयोजन, मॅरेथॉन, उखाणे स्पर्धा, महिला दिनी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, कायदेविषयक सल्ला, प्रभागातील नवनिर्वाचित उपमहापौरांचा विशेष सत्कार अशा दर्जेदार उपक्रमांनी आम्ही मैत्रिणी ग्रुपला एक उंची प्राप्त झाली आहे.
आम्ही साऱ्याजणी मध्यमवर्गीय !
संसारात गुरफटलेल्या !
देवाधर्मानिमित्त घराबाहेर पडलेल्या !
दूरच्या पर्यटनाचा आनंद अन् आस्वाद तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. पण जेव्हा अनेक जणी एकत्र येतात तेव्हा त्यांच्या आकांक्षा फुलून येतात. नवनवीन क्षितिजं खुणावू लागतात. प्रवासाची मजा काही और असते. मैत्रिणी मिळून एकत्र एंजॉय करणे हे अनोखे असते. मागील वर्षी गोवा टूर आणि यावर्षी उज्जैन, ओंकारैश्वर, इंदौरची टूर यशस्वी करुन आनंद घेतला.
ही मैत्री आमची निर्भेळ मैत्री आहे. जन्मदिवस असो की लग्नदिवस, No gift ! भेटवस्तू देणे नाही. त्या त्या दिवसाच्या शुभेच्छा देऊन फक्त आनंद घेणे आणि आनंद वाटणे, बस इतकाच उद्देश.
मैत्री ही मन मोकळे करण्यासाठी, प्रत्यक्ष मदतीपेक्षा सहानुभूतीचे चार शब्द, शक्य असेल ती मदत करणे, आधार देणे, मनावरचा ताण कमी करण्यासाठी या बाबी पुरेशा असतात.

स्त्री ही सदैव कुठल्या ना कुठल्या बंधनात अडकलेली असते. जबाबदारीतून मुक्त झाली याचा अर्थ ती पूर्ण मुक्त असते असे नाही. बाईसाठी नात्यांचे बंध घट्ट असतात. ती अलिप्त होऊन जगणं शक्य नसतं. संसाराचे पाश सहजासहजी सुटत नसतात. कुटुंब व कुटुंबाला मोठं करण्यात तिने रक्ताचं पाणी केलेले असते. या सगळ्यातून विरंगुळा म्हणून ती बाहेर पडून स्वतःच्या तनमनाला नवं संजीवनी देऊ इच्छिते.
दोन घटका स्वतः साठी वेळ देऊन मोकळेपणाने जगू इच्छिते. एक सखी परवा बोलता बोलता बोलून गेली, आम्ही सगळ्या एकत्र आलो नसतो तर वयाच्या आधीच म्हातारे झालो असतो ! खरंच तिच्या बोलण्यात केवढ मोठं तथ्य दडलं आहे नाही, का ? म्हणूनच म्हणावेसे वाटते…
घ्यावा मोकळा श्वास
मुक्त जगण्याची आस
मनसोक्त बोलावे
हुंदडावे, गाणे गावे
नाचावे, नाचता नाचता
स्वतःला विसरुन जावे
आपण ही हसावे
इतरांना हसवावे
जगणं सुंदर व्हावे
हीच एक तमन्ना…!!!

— लेखन : प्रभा वाडकर. लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

प्रभाताई वाडकर यांनी लिहिलेले “आम्ही मैत्रिणी” हे त्यांच्या अचानक जमलेल्या मैत्रिणींच्या ग्रुप बद्दलचे त्यांचे मनोगत ह्रुद्य आहे.
या वयामध्ये इतकी छान मैत्री जमून त्यांचा किती मस्त ग्रुप जमला आहे.
मैत्रिणींच्या सहवासात प्राणायाम योग हास्य क्लब असे उपक्रम करत असताना आणखी नव्या उपक्रमांची भर पडत गेली. त्याने कितीतरी जणींना दिलासा मिळाला.आजार कमी झाले. उमेद वाढली. हे सारंच सुंदर सकारात्मक आहे.
खरोखर मैत्री ही अनेक गोष्टींवरची संजीवनीच आहे.
प्रभाताई
तुम्हा मैत्रिणींच्या ग्रुपला खूप साऱ्या सप्रेम शुभेच्छा. 🌷
शुभैषी,
वेदवती कुलकर्णी