Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

हृदयन

लेखिका विद्या आनंद चौगुले, हसत हसत हातात हात घेऊन संसाररूपी सहजीवन सुरू झाले तेव्हा आनंदमय सागराच्या उधाणलाटा ‘ आनंद ‘ किनाऱ्याला अलवार स्पर्श करत होत्या. हा सुरू झालेला भवसागर अगदी सायंसमयीच्या सावल्या लांब लांब होईपर्यंत एकत्र असाच मौजमजेत सुरू रहावा हीच तर मनोकामना मनांत होती ना! ‘ पाहू दे असेच तुला नित्य हासता, जाऊ दे असाच काळ शब्द झेलता ‘ असे ते हवेहवेसे सुंदर दिवस होते. या सुखाच्या दिवसांमधली सुखद वाटचाल करत असताना मात्र नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी काळंबेरं घुटमळत होतं, सटवाईने जाणते अजाणतेपणी काहीतरी विपरित भाळी गोंदलं होतं. खळ खळ वाहणाऱ्या निर्झराला अचानक कुणीतरी बांध घालून अडवावं, त्या सुखाला अचानक भोवळ यावी, अन ………. विद्याचे पती आनंदराव यांचा ध्यानी मनी नसताना अकस्मात अपघाती मृत्यु व्हावा. पहिला श्वास ते अखेरचा श्वास या मधलं अंतर म्हणजे आयुष्य, तो प्रत्येक श्वास ईश्वराच्या हातात असतो त्याने दिलेले श्वास संपले की कोणतेही निमित्तकारण जीवन संपायला कारणीभूत असतं हेच शेवटी खरं.

आनंदरावांचं असंच झालं, ५ सप्टेंबर २०१५ रोजी प्रवासात असतानाच अपघाती मृत्यु झाला. ‘भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी’, अनेक स्वप्नं उराशी बाळगून सुरू झालेलं सहजीवन त्या दिवशी अधुरी एक कहाणी बनून राहिलं. शरद पौर्णिमेच्या चांदणराती काळ्याकुट्ट अमावास्येचा मिट्ट मिट्ट काळोख व्हावा, टप्पोर गुलाबांचा फुललेला ताटवा अचानक मुरझून जावा, झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा उलगणारा मोरपिसाराच मुडपून जावा, स्वादिष्ट झालेल्या बासुंदीत मिठाचा खडा पडावा, सुखस्वप्नांची अचानक राखरांगोळी करणारा क्षण नशिबी यावा……….

आनंदच्या अपघाती मृत्युनंतर मणभर दुःखाचे ओझे उराशी घेऊन जीवन कंठण्याची वेळ यावी. त्यांच्या मृत्युच्या दुःखातून बाहेर पडणं हे तितकं सहजसाध्य नव्हतंच मुळी परंतु पदरात दोन गोंडस अपत्य असताना शेवटी काळ हेच उत्तर असतं. असा काही काळ गेल्यावर शरिरस्वास्थाच्या कठोर परीक्षा पार पडल्यावर वर्षभराच्या घडामोडींचं पहिलंच मनोगत म्हणजे ५ सप्टेंबर २०१६ रोजी आनंदरावांना लिहिलेलं पहिलं पत्र ‘ जिवलग ‘ हे होय. दिवंगत पतीजवळ पत्ररुपी संवाद साधण्याचा हा एक आगळा वेगळा प्रयत्न ज्यातून लेखिकेच्या मनाला शांती लाभण्याचा, आयुष्यात पुन्हा पूर्ववत उभारी घेण्याचा सफल असफल प्रयत्न.

हृदयन प्रत्येक वर्षाच्या ५ सप्टेंबरला (हाच तो आनंदरावांच्या अपघाती मृत्युचा दिवस) आनंद जवळ पत्ररूपी संवाद साधला आहे. हे एक आगळे वेगळे रसायन आहे, या वेगवेगळ्या पत्रातून मांडलेल्या व्यथा, अडीअडचणीवर केलेली मात, दुःखातही सुखाच्या क्षणंचा लाभलेला मायेचा ओलावा घरी साजरे केलेले सणवार, नात्यांमध्ये जपलेला प्रेममय भावबंध, मुलांच्या दैदित्यमान प्रगतीचा धांडोळा, अशा अनेक पैलूंचा परामर्श पत्राव्दारे घेतला आहे. या जगात शरिररूपी अस्तित्वात नसलेल्या पण अंतरिक मनात घट्ट बिलगून हृददयाच्या कप्यात जसाच्या तसा जतन करून ठेवलेल्या आनंदरावांजवळ संवाद साधला आहे.

लेखिका विद्या आनंद चौगुले

लेखिकेच्या वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी पतीचे अपघाती निधन व्हावे, पदरात दोन लेकरे त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची जवाबदारी, या कठोर काळाला त्या कशा सामोऱ्या गेल्या याचा वृत्तांत म्हणजे हृदयन होय. प्रत्येक पत्राला समर्थक शीर्षक दिलं आहे जसं की जिवलग, आठवण, साथ सोबत, ताळेबंद सुखदुःखाचा, स्मरणगाथा, आनंदसेतू, घालमेल मनाची, आठव, शोध आनंदाचा, एक्सरे इत्यादी. या शीर्षकांमधूनच लेखिकेच्या भावनांचा आपलेपणा, आयुष्यात पुन्हा उभारी घेणेचे प्रयत्न याचं आकलन होत. प्रत्येक पत्र वाचताना वाचकांच्या डोळ्यातून पाणी ओघळणार, डोळ्यांच्या कडा ओलावणार इतकं भावनाविवश प्रतिभावान लेखन आहे, लेखनशैलीही उत्कृष्ठ आहे. सुबक बांधणी उत्कृष्ठ पेपर तथा पुस्तकामध्ये स्क्रिप्ट फॉन्ट / कर्सिव्ह फॉन्टचा वापर केल्यामुळे पुस्तकाचं देखणेपण अधिक सुंदर झालं आहे. आपण खरंच लिखित पत्र वाचत आहोत असा भास होतो.

पलपब पब्लिकेशन, अहमदाबादने प्रकाशित केलेले ‘ हृदयन ‘ हे पुस्तक मुळात वाचकांनी आवर्जुन वाचावे असेच आहे. हे आत्मचरित्र नाही वा आत्मकथनही नाही म्हणूनच ‘ ह्वदयन ‘ हे पुस्तक आगळे वेगळे आहे, वाचनीय आहे. रसिक वाचकप्रेमींना नक्कीच हे पुस्तक आवडेल.

सुनील चिटणीस

— परीक्षण : सुनील चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६