Homeसाहित्यपुस्तक परीक्षण

पुस्तक परीक्षण

“माझी जडण घडण“

“न्यूज स्टोरी टुडे” हे श्री देवेंद्र भुजबळ संपादित करीत असलेल्या पोर्टलवर प्रकाशित होत राहिलेल्या सौ. राधिका ताई भांडारकर यांच्या माझी जडणघडण या लेखमालेच्या पहिल्या भागानेच मला जितके आक्रुष्ट केले तितकेच पोर्टलच्या सर्व वाचकांनाही केले. प्रस्तावनेत संपादकांनी सांगितल्याप्रमाणे या सदराचे ७८ भाग दीड वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झाले. एकेक भाग वाचताना वाचक त्यात इतके तल्लीन झाले होते की, सोमवार कधी उजाडतो आणि राधिका ताईंच्या जडणघडणीचा पुढील भाग कधी वाचावयास मिळतो असे सर्वच रसिक वाचकांना होऊन गेले होते. ही मालिका संपूच नये असेही आम्हा वाचकांना मनापासून वाटत होते.

माझी जडणघडण हे पुस्तक म्हणजे लेखिकेचे आत्मचरित्र नव्हे, तर ते एक आत्मकथन आहे. आजवरच्या आयुष्यात तिच्या जीवनात अगदी बालपणापासून जी नानाविध माणसे आली, अनेक प्रकारचे जे अनुभव आले, त्यातून लेखिका कशी घडत गेली याचे एक सुंदर चित्र म्हणजे माझी जडणघडण हे पुस्तक असे या पुस्तकाविषयी एका वाक्यात सांगता येईल.

धोबी गल्ली या पहिल्याच माळेत लेखिका तिच्या बालपणातील काही रम्य,ह्रद्य अशा आठवणी सांगते. धोबी गल्लीतलं त्यांचं ते छोटसं घर, त्यांचा शेजार, बालपणीचे गल्लीतले सवंगडी या सर्वांविषयी वाचताना आपणही आपल्या बाल्यात अगदी सहज शिरतो आणि त्यातून पुनःप्रत्ययाचा आनंद आपल्या वाट्याला येतो. लेखिकेने “आजही माझ्या स्वप्नात तेच घर येतं” अशी सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष जीवनात सगळ्यांचीच घरे बदलतात. लग्न होऊन सासरी गेल्यावर, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या बदल्यांमुळे, लहान घरातून मोठ्या घरात जाताना, इत्यादी विविध कारणांनी आयुष्यात घरे बदलण्याचा अनुभव प्रत्येकच वाचकाने घेतला असेल. ही गोष्ट मात्र सत्य आहे की आपल्या स्वप्नात नेहमी आपले  पहिलेच घर दिसते. सांगायचा मुद्दा हा की सुरुवातीपासूनच वाचक लेखिकेच्या आयुष्यातील घटनांशी असा सहज जोडला जातो. हे कथन वाचताना, अरे माझीही कथा याहून काही फार वेगळी नाही असे वाटू लागते आणि त्यामुळेच पुढे वाचण्याची उत्कंठा वर्धित होते.

संस्कार बाल्यावस्थेतच होत असतात आणि त्यानुसार बालक हळुहळू घडत जाते. लेखिकेला नेमके हेच सांगायचं आहे. त्या म्हणतात की मोठ्यांचा मान ठेवणे, रीती परंपरा पाळणे, नम्रता, सत्य वदणे वगैरे  हे संस्कार आहेतच पण याहूनही त्यांना वेगळे काही सांगायचे आहे. त्यांच्या मते संस्काराची व्याख्या, “संस्कार म्हणजे स्वतः केलेले निरीक्षण. आजूबाजूच्या वातावरणातून मिळालेली अनेकविध चांगली- वाईट, भली- बुरी टिपणं आणि या सगळ्या तुकड्यांमध्ये मी कोणता तुकडा हे योग्य रीतीने शोधणं. ते शोधता येण्याची क्षमता म्हणजे संस्कार. “अत्यंत प्रगल्भ विचारसरणीच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांनी केलेल्या संस्कारांच्या या व्याख्येतून वाचकांना घडते.

शाळा, कॉलेज, त्यांची बँकेतील नोकरी यातून त्यांच्या आयुष्यात ज्या नानाविध स्वभावाच्या व्यक्ती आल्या त्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार सखोल निरीक्षण केले आहे. त्यातूनच अनेक चांगल्या वाईट गोष्टींचे त्यांना ज्ञान मिळत गेले आणि आज ताठ मानेने उभ्या असलेल्या राधिकाताई घडल्या असे मला म्हणावेसे वाटते. त्यांच्या विद्यार्थी जीवनातील अनेक रंगी किस्से वाचताना वाचक अगदी गुंगून जातो.

लेखिका जडणघडणीच्या एका प्रकरणात वाचकांना सांगते की माणसाला भांडतासुद्धा आलं पाहिजे आणि हा धडा त्यांना त्यांच्या तीर्थरूपांकडूनच मिळाला होता. त्या लिहितात, “एकीकडे शालिनता, नम्र वाणी, शब्दातील गोडवा जपणे, कुणाला दुखावलं जाईल असे न बोलणे अशा तऱ्हेचे बोधामृत प्राशन करीत असताना मध्येच ‘तुला उत्तम भांडताही आलं पाहिजे’ असं जेव्हा पप्पा सांगायचे तेव्हा या विरोधाभासाची नुसती गंमत नव्हे तर आश्चर्यही वाटायचं. “कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही हीच शिकवण त्यांना लहान वयात मिळाली होती. याविषयी त्यांनी केवळ गणित वेगळ्या पद्धतीने सोडवल्यामुळे बाईंनी त्यांचे गणित चूक दिले, आणि लेखिकेने ती चूक नव्हती, ती कशी बरोबर होती हे बाईना पटवून दिले, हा किस्सा मनोवेधक वाटतो.
जीवनात या अशा बाळकडूची किती आवश्यकता असते याची जाणीव आज परिपक्व झाल्यावर वाचकांनाही नक्कीच आली असेल.

कुटुंबातील माणसे, मित्र-मैत्रिणी, शिक्षक वर्ग, भोवतालचा समाज, पुस्तके, रेडिओ या सर्वांचाच लेखिकेच्या जडणघडणीवर फार मोठा प्रभाव कसा आहे हे त्यांनी सांगितलेल्या एकेक रंगतदार किश्यांवरून, त्यांच्या अनुभवांवरून आपल्याला जसजसे वाचत जातो तसतसे उलगडत जाते. त्यांच्या आयुष्यातील काही खास व्यक्तींवर त्यांनी स्वतंत्र प्रकरणे या पुस्तकात लिहिल्याचे आढळून येते. यात त्यांचे वडील, जीजी, आजोबा, वहिनींसारख्या शेजारी, रत्नाकर मतकरींसारखे साहित्य गुरु, आप्पा, वासंती वगैरे लेखांना विशेष महत्त्व आहे.

जीजीचे (लेखिकेची आजी) स्थान लेखिकेच्या आयुष्यात अनमोल आहे, हे त्यांनी वर्णिलेल्या जिजीच्या व्यक्तिमत्वावरून आपल्या लक्षात येते. लहान असताना त्यांना त्यांच्या मोठ्या टपोर्‍या डोळ्यांवरून, त्यांच्या श्यामल वर्णावरून काही लोक  हिणवीत असत,या गोष्टीचे त्यांना फार वाईट वाटायचे, परंतु त्यांची एक आजीच होती जी त्यांना “विठोबा सुद्धा काळाच होता” “तुझे डोळे तर तुझी ओळख आहे” असे सांगून त्यांच्या मनाला उभारी देत असे. राधिकाताईंच्या जडणघडणीत जिजीचा वाटा अत्यंत मोलाचा आहे.(राधिका ताईंचे *जीजी* हे जीजी चे जीवन कथा सांगणारे पुस्तक अवश्य वाचावे) त्यांची हरवलेली लहान बहीण केवळ ढग्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण डोळ्यांवरून विमलताई रांगणेकर या ठाण्यातील प्रसिद्ध समाजसेविकेने ओळखावी आणि हरवलेल्या मुलांना घरी घेऊन यावे, हा त्यांच्या आयुष्यातील प्रसंग खरोखरच अविस्मरणीय असा आहे.

त्यांना लहानपणी, “श्रावण भेटायचा तो तोंड पाठ केलेल्या बालकवी, बा भ बोरकर, पाडगावकर, यांच्या कवितांतून.,” श्रावण महिन्यातील एकेका सणांचे त्यांनी जगलेले क्षण फारच वाचनीय आहेत. हे वाचताना मला राधिका ताईंना शब्दांची धनी अशी संज्ञा द्यावीशी वाटते.

लग्न हे मुला मुलींच्या, विशेषतः मुलींच्या जीवनातील फार मोठे स्थित्यंतर असते. राधिकाताईंनीही हा अनुभव घेतला. आई-वडील आजी आणि बहिणी या छोट्याशा कुटुंबातून त्या लग्न होऊन मोठ्या कुटुंबात गेल्या, शहरी वातावरणातून अंमळनेर सारख्या ग्रामीण वातावरणात त्यांना मिसळायचे होते. माणसे निराळी, भोवतालचे वातावरण निराळे, उठण्या बसण्याची पद्धत निराळी, अशा परिस्थितीत त्यांचे या जडणघडणीतले एक एक अनुभव मनाला मोहवून टाकणारे आहेत.

लहानपणी आई-वडिलांकडून आणि विवाहानंतर सासू-सासर्‍यांकडून बरेच काही शिकत असतो हे त्यांचे मत आपल्याला पटते. राधिका ताईंच्या जीवनात त्यांच्या सासूबाईंचा वाटाही फार मोठा आहे. त्यांच्यावरचे खानदेशी संस्कार त्यांच्या सासूबाईंकडूनच झालेले आहेत.

राधिका ताई त्यांच्या आई या प्रकरणाची सुरुवातच “मला आईची महानता तेव्हाच खऱ्या अर्थाने जाणवली जेव्हा मी स्वतः आई झाले” अशी करतात. लेखिका ही कोणी वेगळी आई नाही. आई झाल्यावर आईची वेगवेगळी रूपे त्यांना उलगडत गेली. सगळ्यात कठीण काळ म्हणजे मुलाला नोकरांवर सोपवून कामाला जाणे. काय घालमेल होते जीवाची? प्रत्येकच वाचक आईचा हा अनुभव आहे. वाचताना
भावूक व्हावयास होते.

जळगावला मांडलेला स्वतंत्र संसार, दोन मुलींचा जन्म, बँकेतील नोकरी, मुलींचे परदेश गमन, त्यांचे विवाह नातवंडे या सर्व गोष्टी एका मध्यमवर्गीय पठडीतल्या असल्या तरी वाचताना हे आपलेच जीवन आहे ही भावना निर्माण होते त्यामुळे ही जडणघडण आपलीच आहे या जवळिकतेने वाचनात आपण मग्न होतो.

खरं सांगायचं तर जडणघडणीच्या एक एक लेखा विषयी लिहावे तेवढे थोडेच आहे, परंतु सगळ्या ७८ भागांवर लिहिणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे.त्यापेक्षा वाचकांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि वारंवार वाचत जावे असा मला सल्ला द्यावासा वाटतो.

सौ. राधिका ताई या अतिशय दमदार अशा लेखकांपैकी एक आहेत. त्यांची प्रवाही भाषा वाचकांचे रंजन करते यात संशयाला जागाच नाही. वैशिष्ट्यपूर्ण शब्दप्रभुत्व त्यांच्यापाशी आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.आतापर्यंत त्यांचे पाऊल, आंतर्बोल, लव्हाळी, गमभन, अंश इत्यादी अनेक कथा व ललित लेखांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांच्या जीजी या पुस्तकाला तितीक्षा पुरस्कारही मिळाला आहे.

या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिकेचे मला आणखी कौतुक करावेसे वाटते की त्या कालानुरूप चालणाऱ्या आहेत, अभ्यासू आहेत. त्यांना शेक्सपियर, कालिदास समजतो, तसेच आजची कृत्रिम बुद्धिमत्ताही(AI) समजते. या पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी एआय च्या मदतीने स्वतः बनविले आहे.

राधिका ताई तुमचा हा लेखन प्रवास असाच अखंड चालू राहण्यासाठी माझे तुम्हाला अनेकोत्तम आशीर्वाद.

अरुणा मुल्हेरकर

— परीक्षण : अरुणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments