“पिटुकली परी”
हल्दिया मधलं कोल लोडिंग संपत आलं होतं. तुतीकोरीनला निघायची तयारी सुरू होती. शिप वरील स्टाफ मधील काही मंडळी sign off होत होती. काही नवी join होत होती. आमच्या केबिनच्या समोरच चीफ ऑफीसरची केबिन होती. हे चीफ ऑफिसर साइन ऑफ होणार होते. त्यांच्या सामानाची बांधाबांध झाली होती. त्यांच्या ठिकाणी नवे चीफ ऑफिसर रुजू होणार होते.
निघायच्या आदल्या दिवशी नवे चीफ ऑफिसर अजित कल्याणपुर जॉईन झाले. त्यांच्याबरोबर त्यांची बायको सुचित्रा आणि सहा सात महिन्यांची मुलगी निशा उर्फ अनुश्री पण जॉईन झाले. एक नवी मैत्रीण आणि छोटं बाळ आमच्याबरोबर आता राहायला आलं होतं. माझ्या मनात आनंदाचा जल्लोष उसळला. आमच्या डेकवर तर एक पिटुकली परीच उतरली होती.
दुसऱ्या दिवशी दुपारी सेलिंग होतं. सुचित्रा केबिनमध्ये सामान सुमान लावण्यात गर्क होती. थोड्या वेळाने मी तिच्याकडे गेले. ओळख करून घेतली आणि क्षणार्धात आमची मैत्रीच जुळली. सेकंड इंजिनियरची बायको जहाजावर आहे हे सुचित्राला माहिती होतं. त्यामुळे तिला पण खूप छान वाटलं. पुढच्या तीन साडेतीन दिवसात निशाशी खेळण्यात वेळ कसा गेला समजलंच नाही.
सुचित्राची आवराआवरी होत असताना मी निशाला आमच्या केबिनमध्ये घेऊन यायची. ते पिल्लू पण आम्हा दोघांना पटकन चिकटलं. मग दोघींचं मिळून निशाला घेऊन जहाजावर फिरणं. एखादा पदार्थ मी केला की बाऊल भरून सुचित्राकडे पाठवला जायचाच.
निशाला मी चिऊ असं नाव ठेवलं आणि जहाजावर तेच प्रसिद्ध झालं ! तिला वरचे दोन-चार आणि खालचे दोन-चार दात आले होते. दात शिवशिवत होते त्यामुळे सगळ्यांना चावण्याचा कार्यक्रम सुरू होता.

सुचित्रा, अनुश्री/निशा/चिऊ आणि पनूकाकी वेदवती हे माझं माहेरचंच नाव आहे. शाळा कॉलेजमध्ये तेच लागलं होतं.पण माहेरी घरी सगळे मला प्रज्ञा किंवा पनू म्हणतात. मी थोड्याच वेळात निशाची पनूकाकी झाले.
मला शेजारीणबाई मिळाली आणि शेजारला घरपण आलं. जहाजावर अशी मैत्रीण मिळाली तर काय बहार येते. मग आमच्या दोघींच्या खास बायकांच्या विषयावरती गप्पा व्हायच्या. माहेर नुकतंच मागे सुटलेलं. कॉलेज, मैत्रिणी सारं सारं एकमेकींना सांगितलं जायचं. उंच, सडसडीत, गोरीपान सुचित्रा खूप बोलकी, प्रेमळ, हसरी हसरी होती. टपोऱ्या डोळ्याची कुरळ्या केसांची चिऊ म्हणजे मला तर एक खेळणंच झालं होतं.
सांगलीत आमच्या वाड्यातली शेजारच्या मराठ्यांची माधवी, बिदनुरांची हेमा, गोडशांचा धाकटा प्रसाद ही सगळी तीन-चार वर्षाची मुलं होती. त्यांचा आमच्या घरात मुक्त संचार असायचा. आमच्या स्वयंपाक घरातून वरच्या माडीकडे जाणारा एक छान जिना होता.त्याच्या पायरीवर बसून माझ्या आईबरोबर त्यांच्या गप्पा चालायच्या. मी साडेबारा वाजता कॉलेजमधून यायच्या वेळी ही टिल्ली-पिल्ली मंडळी माझी वाट बघत बसायची. कारण बरोबर त्याच वेळेला दारासमोर एक आईसफ्रूटवाला त्याची गाडी घेऊन यायचा. त्याच्या गाडीची टण टण घंटा वाजली की सगळी पिल्लं दुडू दुडू धावत यायची. पनुताई आली की कधी कधी सगळ्या चिटुकल्यांना आईसफ्रुट मिळायचं. त्यामुळे एकूण बच्चे कंपनी माझ्यावर खुश असायची आणि आता तर निशा ही चिकटली ! आमच्यासाठी तर ती लाडाचं बाळ झाली होती.

अगदी तिला बाटलीतून दुदु पाजवणं, तिला आंघोळ घालायला सुचित्राला मदत करणं मला खूप आवडायचं. तिचं मऊ मऊ गोजिरवाणं अंग पुसून पावडर लावायला खूप मजा यायची. ती पेंगुळली की कधीकधी माझ्या मांडीवर झोपायची.
ये ग तू गं गाई
चरूनी-वरूनी
चिऊबाळ ते म्हणूनी
देई दूध
अशा कितीतरी ओव्या मला पाठ यायच्या. अजूनही येतात. माझ्या ओव्या ऐकत ती मांडीवर गाढ झोपायची.
पहिली-वहिली पार्टी
तुतीकोरीनला पोहोचलो आणि त्याच दिवशी कॅप्टन कुठारनी अचानक एक मस्त अनाउन्समेंट केली. जहाजावरच्या सर्वांसाठी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पार्टी ठरवली. जहाजाचा माहौलच बदलला. सगळेजण एकदम उत्साहात आले.
माझ्यासाठी ती पहिली-वहिली पार्टी होती. सांगली सारख्या गावातून आलेली, बाळबोध संस्कारातील मी एक मध्यमवर्गीय मुलगी. पार्टी हा शब्द फक्त मला ऐकून माहित होता. कधी कधी सिनेमात पार्टी पाहिली होती. बाकी त्या वातावरणाशी किंवा mannerisms शी माझा कधीच संबंध आला नव्हता.या प्रकरणाची मला उत्सुकता तर होतीच. पण कुठेतरी थोडी भीतीही वाटत होती.
पार्टी म्हणजे नेमकं काय असतं? मी विचारलं. मुकुंद म्हणाले, अगं गप्पा-टप्पा, गाणी, कधी कधी खेळ असतात. मुख्य म्हणजे पिणं आणि खाणं. हे मात्र सगळ्यात महत्त्वाचं ! एवढंच असतं गं.आता आज रात्री तू बघशीलच !
रिक्रिएशन हॉल सजवला होता. सर्व मंडळी छान कपडे घालून हजर होती. स्टुअर्ड्सची लगबग सुरू होती. हॉलमध्ये ड्युटी ऑफिसर्स सोडून संध्याकाळी सात वाजल्यापासून बाकी सगळी मंडळी हजर होती. मुकुंद इंजिनरूम मधलं काम संपवून केबिनमध्ये आले. आंघोळ करून तयार झाले. मी ही छान नवी साडी नेसून तयार झाले. आम्ही दोघं आणि अजित सुचित्रा चिऊला घेऊन… असे सगळे रिक्रिएशन हॉलमध्ये गेलो.
सिगरेटच्या धुराने आणि वासाने हॉल भरला होता. हसण्या, खिदळण्याचा आवाज ऐकू येत होता. म्युझिक वाजत होतं.
आम्ही दरवाज्याशी पोहोचलो तर यंग कॅडेट्स, ज्युनिअर इंजिनियर, डेक ऑफिसर्स यांचा डान्स सुरू होता. आम्ही दोन मिनिटं तसेच उभे राहिलो. त्यांची दंगामस्ती सुरू होती. आम्ही आलेले त्यांच्या लक्षात आल्या बरोबर सगळे चिडीचूप बसले. वर्गात बाई शिराव्या आणि पोरं गपचूप बसावीत तसं झालं. सगळेजण अगदी आदबशीरपणे वागत होते. तेवढ्यात कॅप्टन कुठार पण आले. सर्वांनी आमचं स्वागत केलं. या पार्टीत जहाजावर दोन स्त्रिया, sorry तीन….. किंवा अडीच स्त्रिया असल्याने त्यांना संकोच वाटत होता.
पिटुकली चिऊ खोकायला लागली. सिगारेट पिणं बंद करण्यात आलं. रिक्रिएशन रूमचे डेक जवळचे दार स्टुअर्डने उघडून टाकले. वाऱ्याचा जोरदार गरम झोत आत शिरला. सगळा धूर बाहेर गेला. त्यामुळे मला आणि मुकुंदांना ही खूप बरं वाटलं.
त्यानं दार परत घट्ट लावलं. आत एअर कंडिशनिंग सुरू होतं. परत छानदार गार हवा खेळायला लागली.
मुकुंदांना मी हळूच विचारलं, “तुम्ही सिगरेट ओढलेलं मी कधीच पाहिलं नाही. इथे तर नुसतं अग्निहोत्र सुरू आहे. तुम्ही जहाजावर पण कधी सिगारेट ओढलेली नाही ?”
मुकुंद पटकन म्हणाले छे गं! मी तर सिगरेटची चव सुद्धा कधी पाहिली नाही.कॉलेजमधले मित्र वगैरे ओढायचे. पण मला त्याची कधी जरूरच वाटली नाही. No smoking, not even once. I don’t know how people relish it so much. Let them enjoy. But I don’t like it. I really hate it
एवढ्यात ग्लासांची किणकिण सुरू झाली. पहिली पार्टी म्हणून शॅम्पेन फोडली गेली. बाटली जोरात हलवून बुच उघडल्याबरोबर दिवाळीचे झाड उडावं तसे पांढऱ्या शुभ्र फेसाचं कारंजे सगळीकडे उडाले. टाळ्यांचा गजर झाला. चिऊने बावरून सगळ्यांच्याकडे बघितलं. मग तिची खेळणी देऊन आम्हा दोघींच्या मध्ये तिला सोफ्यावर बसवलं. लगेच ती हसायला लागली. इतकी सगळी माणसं बघून तिला गंमत वाटत होती.
आम्हा दोघी बायकांना वाईन ऑफर केली गेली. पण आम्ही दोघीही फक्त ज्यूस पिणाऱ्या निघालो. मग आम्हाला ॲपल ज्यूस, ऑरेंज ज्यूस, मिक्स फ्रूट ज्यूस ऑफर करण्यात आले. सर्वांनी ग्लास हातात घेऊन cheers चा घोष केला.
मुकुंनी पण ड्रिंकचा एक ग्लास हातात घेतला. ऑं ! हे तर माझ्यासाठी फारच अजब होतं. माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे गोंधळलेले भाव बघून मुकुंदना हसू आलं. हरीचं लक्ष गेलं. म्हणाला, प्रज्ञा डरो मत | बापू हररोज पीने वाला नाही है |
आजूबाजूला खसखस पिकली. माझा कावरा-बावरा चेहरा बघून मुकुंदनी मला खांद्यावर हलकेच थोपटलं !
सुचित्राने सर्वांना ग्लास उंचावून चिअर्स केलं. तिला या वातावरणाची सवय होती. कारण ती लग्नानंतर जहाजावर सेलिंग करून आलेली होती. सुचित्राच्या हातातला ग्लास चिऊला हवा होता. तिची ती धडपड बघून खूप मजा वाटत होती.एका हातात ग्लास आणि दुसऱ्या हाताने छोट्या चळवळ्या चिऊला सांभाळणं यात आम्हा दोघींची तारांबळ उडत होती.
मुकुंद मला हळूच म्हणाले, तू पण ग्लास वर करून चिअर्स म्हण.अगं प्रथा असते ती. तो पार्टीतल्या सगळ्यांचा सन्मान असतो मी ही आज्ञाधारकपणे माझा ज्यूस भरलेला ग्लास उंचावून cheers च्या घोषात सामील झाले.
चिअर्स म्हटल्यानंतर एक घोट तरी प्यायचा. त्याशिवाय ग्लास खाली ठेवायचा नाही ही पण माझ्या ज्ञानात भर पडली.
दारू म्हणजे काय रे भाऊ ? पु.लं.च्या वाऱ्या वरच्या वरातीतल्या मुलासारखं माझं ही शंका निरसन झालं होतं.
पिण्याला, गप्पांना रंग चढायला लागला. गरम कुरकुरीत पकोडे, मसाला काजू, अननसाच्या कापावर लावलेले टूथपिकवर खोचलेले चीजचे तुकडे यांनी सजलेल्या डिश सगळीकडे फिरवल्या जात होत्या. विनोद, गप्पा सुरू होत्या. ग्लास परत भरले जात होते.
मग कोणालातरी गाणं म्हणायचा आग्रह झाला. हिंदी सिनेमातलं कुठलंसं मस्तपैकी गाणं एका बत्तीसाब – इलेक्ट्रिकल ऑफिसरने म्हटलं. एका कॅडेटनं निशा म्हणजे चिऊला कडेवर घेतलं आणि डान्स सुरू केला. त्याच्या कडेवर बसून नाचायला तिला मजा आली. टाळ्या वाजवून खिदळत होती.
एक दीड तास ही धमाल सुरू होती. मग सगळे जेवणाकडे वळले. आज पार्टीसाठी खास बडाखाना होता. समारंभासाठी केल्या जाणाऱ्या या खास स्वयंपाकाला जहाजाच्या भाषेत बडाखाना म्हणतात. नेहमीचा नियम मोडून रात्र असूनही बिर्याणी केली होती. पराठे,मटर पनीर रस्सा, फिश फ्राय,चिकन रस्सा, सलाड असा बेत होता. स्वीट डिश होती गुलाबजाम !
हळूहळू निशाची कुरकुर सुरू झाली. सुचित्राने तिला भाताची पेज, तिची नेस्टम पावडर वगैरे भरवली. आता ती खुशीत आली होती. मग तिचा डॅडी अजित कल्याणपूर आणि मुकुंद अंकल यांनी तिचा ताबा घेतला. दोघांच्या कडेवर बसून ती हॉलमध्ये फिरून आली. तोपर्यंत आम्हा दोघी बायकांना जेवण्यासाठी उदार मनाने सुट्टी देण्यात आली होती. आम्ही दोघी पटापट जेवलो. मग निशाचं पार्सल आमच्याकडे सोपवून ते दोघेही व्यवस्थित जेवले. तोपर्यंत निशा ही पेंगुळली आणि सुचित्राच्या मांडीवर गाढ झोपून गेली. जेवण झाल्यावर आम्ही दोघं, अजित सुचित्रा झोपलेल्या निशाला घेऊन केबिन कडे निघालो.
हे सगळं वातावरण माझ्यासाठी नवं आणि फारच वेगळं होतं. पहिलीच पार्टी…..! माझं हळूहळू शिक्षण होत होतं.
केबिनमध्ये आल्यावर अजूनही खालच्या रिक्रिएशन रूम मधले गाण्याचे, नाचण्याचे, हसायचे आवाज ऐकू येत होते. मी यांना विचारलं, पार्टी संपली तरी ही मंडळी अजूनही खालीच आहेत ?
त्यावर डोळे मिचकावून मुकुंद मिश्किलपणे म्हणाले, तू आणि सुचित्रा होता ना म्हणून सगळे नियमात होते. आता खरी पार्टी खाली सुरू झाली आहे.
देवदर्शन
तुतीकोरीनला Unloading ला एक आठवडा लागायचा. डिसेंबर संपत आला होता. हवा खूप छान होती. मुकुंदांनी जहाजाच्या सर्व कामाचा आढावा घेतला. मुकुंदना सवड मिळू शकत होती. शिपचे एजंट मचॅडो यांच्या कडे रामेश्वरला कसं जाता येईल याची चौकशी केली. हरी म्हणाला, मै हूं ना | तुम दोनो जाके, भगवान का दर्शन करके आओ |
कॅप्टन कुठारनी परवानगी दिली.
अजित सुचित्रा यांनी चिऊला घेऊन एवढ्यात बाहेर गावाला जायला नको असं ठरवलं होतं. मग आम्ही दोघं आणि रेडिओ ऑफिसर जडे असे तिघं रामेश्वर आणि मदुराईला जायचं ठरवलं.
मुकुंदांची दिवसभरची कामे आटोपल्यावर आम्ही शिप वरून संध्याकाळी पाच वाजता निघालो. चार तासांचा प्रवास होता. बस पकडून रामेश्वरला रात्री पोहोचलो.आयत्या वेळेला हॉटेल मिळणेही अवघड होतं. पण एका लहानशा हॉटेलमध्ये एकच खोली मिळाली. ते हॉटेल रामेश्वर देवळाच्या बऱ्यापैकी जवळ होतं.
आम्ही दोघं आणि जडे, तिघांसाठी एकच खोली ? आता काय करायचं ? पण हॉटेल मालक भला माणूस होता. त्याने जडेंसाठी दुसऱ्या एका खोलीमध्ये आणखी एक कॉट शेअरिंग मध्ये टाकून दिली. केळीच्या पानावर त्या लहानशा हॉटेलात सांबार भात पोटभर जेवलो. त्याने कच्च्या केळ्याची भजी पण केली होती. एकदम चविष्ट होती.
साप…..साप !
दमून गेलो होतो. कॉटवर आडवे होणार इतक्यात मला दारात काहीतरी हालचाल दिसली. बघितलं तर एक फूटभर लांबीचा साप तिथे वळवळत होता. बापरे ! माझी घाबरगुंडीच उडाली.साप दरवाजातच बसलेला. मी घाबरून ओरडले साप साप !
मुकुंद म्हणाले “तू कॉटवरून उतरू नको.” जवळ एक केरसुणी होती. ती हातात घेऊन त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. तो जोरात भिंतीच्या कडेने सरकला. चपळाई करून मुकुंदनी हळूच दार उघडले.
साप माझ्यासमोरच्या भिंतीवरती चढायचा प्रयत्न करत होता. बाहेर नोकर होते. त्यांना हिंदी इंग्लिश मध्ये आत साप आहे असं सांगितलं. लगेच काठी घेऊन दोन नोकर धावले. पुढच्या दोन-तीन क्षणात साप निजधामाला गेला होता. त्याची उत्तर क्रिया करायला तो मेलेला साप घेऊन ते नोकर बाहेर पडले.
पुढे बराच वेळ मला झोप येईना. वाटलं या प्राण्यांना आपण त्यांचे भाऊबंद वाटतो की काय? चक्क कुठेही भेटायला येतात ते ! तिथे तो हल्दियात नाग, तर इथे हा साप…..!
रामेश्वर दर्शन
देवळात कसं जायचं, आत पूजेचे साहित्य मिळेल का याची हॉटेल वाल्याकडे चौकशी केली. त्याने सांगितलं की, आधी अग्नितिर्थ आणि मग मंदिराच्या आतल्या सर्व तीर्थात स्नान करून मगच मंदिरात रामनाथ स्वामींच्या दर्शनाला जायचे. बदलायचे कपडे, अंगाचा साबण वगैरे सगळं घेऊन निघालो. मुकुंद आणि जडे यांनी टी-शर्ट आणि शॉर्टस् घातल्या. मी एक कॉटनचा गाऊन घातला.
प्रथम अग्नीतीर्थावर म्हणजे मंदिरा बाहेरच्या समुद्रावरती डुबकी मारून स्नान केलं. अग्नितीर्थम् म्हणजे मुख्य मंदिराच्या पूर्व बाजूला असलेला समुद्र. बावीस कुंडांच्या स्नानाची सुरुवात नेहमी याच अग्नितीर्थात पहिली डुबकी मारून होते. मंदिराच्या बाहेर असलेले हे एकमेव प्रमुख तीर्थ आहे.
माता सीतेने आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा दिली, तेव्हा अग्निदेवतेला सीतामाईला स्पर्श केल्यामुळे पाप लागले होते. ते पाप धुण्यासाठी स्वतः अग्निदेवतेने या समुद्रात स्नान करून भगवान शिवाची प्रार्थना केली, म्हणूनच याला ‘अग्नितीर्थम्’ म्हणतात. समुद्राजवळ रामसेतूचे अवशेषही दिसतात. तिथल्या या खडकांची रचना लाकडाचे ओंडके ठेवावेत तशी वाटते.
चमत्कार :- नंतर मंदिराच्या आतल्या एका मागोमाग एक बावीस कुंडांचं स्नान सुरू झालं. कुठेही घाण कचरा नाही. सर्वत्र प्रसन्न स्वच्छता. तीर्थांच्या बांधून काढलेल्या विहिरींच्या बाहेर पाणी वाहून जाण्यासाठी पक्के काँक्रीटचे बांधलेले पाट होते. लोकांच्या डोक्यावर ओतलेलं पाणी परस्पर त्या पाटात वाहून जात होतं. त्यामुळे तीर्थाच्या विहिरीच्या पाण्यात बाहेरचं पाणी कधीही मिसळत नव्हतं. त्याचं पावित्र्य स्वच्छता कायम राखली जात होती. तिथले नोकर बादलीने प्रत्येक तीर्थातील पाणी ओळीने प्रत्येकाच्या डोक्यावर ओतत होते. पळत पळत एका मागोमाग एक बावीस ही तीर्थांचं स्नान झाले. या तीर्थांचं पाणी अतिशय पवित्र तसेच औषधीही मानलं जातं. शेवटच्या तीर्थातून स्नान करून आम्ही बाहेर पडलो आणि एक चमत्कारच घडला.
झालं होतं असं की, चार-पाच महिन्यापूर्वी माझ्या डाव्या गालावर एक पुळी आली होती. चामकिळ असावी तशी ती घट्ट झाली होती. मला दुखत अगर खाजत नव्हतं. किंवा ती पुळी ओली ही नव्हती. पण ती तिथे आहे याची सारखी जाणीव होत होती. मुंबईत डॉक्टरना दाखवलं होतं. विशेष काही नाही. हे क्रीम लाव. ती निघून जाईल असं डॉक्टरनी सांगितलं होतं. त्यांनी दिलेलं क्रीम मी रोज दोन वेळेला लावतही होते. तरीही ती घट्ट बारीक खडा असावी तशी पुळी गालावर कायमच होती.
शेवटच्या कुंडातून आम्ही स्नान करून बाहेर पडलो. चेहरा धुण्यासाठी मी चेहऱ्यावरून हात फिरवला आणि आश्चर्य म्हणजे फळातून बी बाहेर पडावी तशी ती कठीण दगडासारखी टणक पुळी चटकन उघडली आणि खड्यासारखं काहीतरी काळसर त्यातून निघून गेलं. मला थोडंसं चुरचुरलं. पण रक्त वगैरे काही आलं नाही. पाणी मारून तोंड धुतले. तर गालावर कुठलीही खूण सुद्धा शिल्लक राहिली नव्हती. खरोखर आश्चर्याचा धक्काच बसला. हा त्या तीर्थांच्या औषधी पाण्याचा तर परिणाम नव्हता ?
जवळ कपडे बदलण्यासाठी असलेल्या खोलीत जाऊन छान पैकी जरीची साडी नेसून बाहेर आले. देवळाच्या बाहेर दुकानात पूजेचे सामान घेतलं. मनसोक्त गजरे घेऊन केसात माळले. पुरुष मंडळी लुंगी आणि बनियन घालून तयार झाली. त्यावेळी तरी देवळात जाताना पुरुषांना लुंगी घालायचं बंधन होतं.
रामेश्वरम् अर्थात रामनाथ स्वामी
लंकाधिपती रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याचा वध केल्यानंतर, लागलेल्या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी प्रभू श्रीरामांनी भगवान शिवांची पूजा करण्याचे ठरवले.
श्रीरामांनी मारुतीला कैलास पर्वतावरून शिवलिंग आणण्यासाठी पाठवले होते. पूजेचा शुभ मुहूर्त टळत चालला. तरीही मारुती आला नाही. मग सीतामाईंनी समुद्रकिनाऱ्यावरील रेतीपासून एक शिवलिंग तयार केले. श्रीरामांनी याच शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली. तेच हे रामलिंग किंवा रामनाथ स्वामी शिवलिंग, रामेश्वरम्.

तेवढ्यात हनुमान कैलासवरून शिवलिंग घेऊन परतला. पण इथे दुसऱ्याच शिवलिंगाची स्थापना व पूजा झालेली पाहून तो निराश झाला. आपल्याला उशीर झाला याबद्दल त्याला अपराधी वाटू लागलं. त्याची निराशा दूर करण्यासाठी श्रीरामांनी त्याने आणलेले शिवलिंगही तिथेच शेजारी स्थापन केले. त्याला ‘विश्वलिंग’ किंवा ‘हनुमान लिंग’ म्हणतात.
पारंपारिक प्रथेनुसार, रामेश्वरम् मंदिरात आजही आधी मारुतीने आणलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते आणि त्यानंतर सीतामाईनी बनवलेल्या मुख्य शिवलिंगाची म्हणजे रामेश्वराची पूजा होते.
हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग. रामेश्वरम् हे आपल्या पवित्र चारधामां पैकी हे एक महत्त्वपूर्ण धाम आहे.
हे मंदिर त्याच्या भव्य आणि अद्भुत द्रविड स्थापत्यरचनेसाठी जगप्रसिद्ध आहे. मंदिराच्या आतील कोरीव, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण कॉरिडॉर हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर मानला जातो. हा सुमारे ३८५० फूट लांब आहे. कोरीव कामाने आणि सुंदर नक्षीने सजलेले शेकडो खांब आणि छतावर ही सुंदर नक्षीकाम, ‘याली’ म्हणजे पौराणिक प्राण्यांची शिल्पे, आणि रंगीबेरंगी मंदला कलेतील रचना बघून थक्क व्हायला झालं.
समयांच्या उजेडात उजळून निघालेल्या त्या पवित्र शिवलिंगाला पाहता मन प्रसन्न झालं. आनंदानं भरून आलं. दर्शन घेऊन, प्रसाद घेऊन बाहेर पडलो. पुजाऱ्यांनी ओटीमध्ये घातलेला नारळ आणि केळी बरोबर होतीच. हॉटेलवर येऊन जेवण केलं आणि बॅगा उचलून निघालो पुढची बस पकडून मदुराईला.
रामेश्वरला जात असताना आमचा प्रवास संध्याकाळी आणि तसा रात्रीच झाला. पण मदुराईला निघालो तेव्हा तामिळनाडूच्या त्या बहरलेल्या निसर्गसौंदर्याच्या दर्शनाने चकित व्हायला झालं.
फेसाळणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरच्या नारळीच्या बागा, ताडवृक्षांच्या राई, समृद्ध जंगले, हिरवीगार भाताची झुलणारी शेते यांनी नटलेला हा तामिळनाडू प्रदेश केवढा विलोभनीय आहे.
मदुराई – मीनाक्षी मंदिर
सुमारे तीन तासाचा प्रवास करून मदुराईला मीनाक्षी मातेच्या मंदिरात पोहोचलो. मीनाक्षी अम्मन मंदिर हे सोळाव्या शतकातील प्रसिद्ध मंदिर शहराच्या मध्यभागी आहे. येथे पार्वतीचे रूप असलेल्या मीनाक्षी आणि शंकराचे रूप असलेल्या सुंदरेश्वर यांची पूजा केली जाते. या मंदिरात चौदा भव्य गोपुरे आणि हजार खांबांचा सुंदर मंडप आहे. हे मंदिर द्रविड स्थापत्य आणि चित्रकलेचा अद्भुत अविष्कार आहे.

या मंदिराची कथा फारच सुंदर आहे. पांड्य राजा मलयध्वज आणि राणी कांचनमाला यांनी अपत्य प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाच्या अग्नीतून तीन वर्षांलची कन्या जन्माला आली, तिचे डोळे माशासारखे सुंदर होते. म्हणून तिचं नाव मीनाक्षी ठेवले.
पण तिला जन्मतःच तीन स्तन होते. ते पाहून राजा राणीला चिंता वाटू लागली. तेव्हा आकाशवाणी झाली की जेव्हा मीनाक्षी विवाहयोग्य वयाची होईल आणि तिला तिचा भावी पती भेटेल, तेव्हा तिचा तिसरा स्तन आपोआप नाहीसा होईल. मोठी झाल्यावर राजकन्या मीनाक्षीने पराक्रमाने राज्य विस्तारले. विजय मिळवण्यासाठी ती हिमालयाकडे गेली असता तिची भेट भगवान शंकराशी (सुंदरेश्वर) झाली. शंकराचे दर्शन होताच तिचा तिसरा स्तन नाहीसा झाला. तिला भावी पतीची ओळख पटली. त्यानंतर त्यांचा विवाह मदुराई येथे थाटामाटात पार पडला. भाऊ या नात्याने तिचे कन्यादान करायला भगवान विष्णू आले अशी कथा सांगितली जाते. या ठिकाणी विष्णूना, अलगर असे नाव आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात मीनाक्षी रूपातली पार्वती आणि सुंदरेश्वर शंकर यांचा विवाह सोहळा संपन्न होतो.

मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात अत्यंत सुंदर, लावण्यावती अशा मीनाक्षी अम्मनची श्यामवर्णाची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. सोन्याच्या, हिऱ्या-मोत्यांच्या दागिन्यांनी मूर्ती सजली आहे. समयांच्या उजेडात तिचं दैवी सौंदर्य डोळ्यात मावत नाही.
पौराणिक संदर्भानुसार देवी मीनाक्षी ही ‘हरित वर्णा’ (हिरव्या रंगाची) आहे. हिरवा रंग हे संपन्नतेचे प्रतीक आहे. तिच्या उजव्या हातावर एक लहान पोपट बसलेला असतो, जो प्रेम आणि बुद्धीचे प्रतीक मानला जातो. ‘माशासारखे सुंदर आणि तीक्ष्ण डोळे असलेली’ म्हणून या देवीचं नाव मीनाक्षी ! तसेच मासा कधीही डोळे बंद करत नाही. त्याचप्रमाणे मीनाक्षी देवी आपल्या अखंड उघड्या असणाऱ्या नेत्रांनी भक्तांवर मायेची नजर ठेवते.
या मंदिरातील हजार स्तंभ असलेला देखणा मंडप हे शिल्प आणि चित्रकलेचं एक महान दालनच आहे. इथेच सुंदरेश्वर म्हणजे भगवान शंकराचे मंदिर आहे. तिथली नटराजाची मूर्ती अप्रतिम सुंदर आहे. मीनाक्षी मातेची ओटी भरली. इथेही प्रसादाचे कुंकू, नारळ, केळी पुजाऱ्यांनी ओटीत घातली. रामेश्वरम् आणि मदुराईचं मीनाक्षी मातेचे दर्शन हा योगच अपूर्व होता.
रामेश्वराची, शिवपार्वतीच्या लग्नाची कथा फार गोड आहे. मानवी व्यवहार, भावभावना रीतीरिवाज यांनाही समांतर जाणाऱ्या या गोष्टी आहेत. आपल्या देवी देवतांच्या या साऱ्या पौराणिक कथा मला नेहमीच भुरळ घालतात.
या मंदिरांचं सौंदर्य, भव्यता डोळ्यात किती साठवू आणि नको असं झालं होतं. आपली प्राचीन शिल्पं, चित्रकला, स्थापत्य यातील विविधता, अचूकपणा, सौंदर्य हे सारं बघून दिपून जायला झाले. पुराणांनी जतन केलेला आपला इतिहास, श्रद्धा, अद्भुत कथा यांनी नटलेली आपली समृद्ध संस्कृतीच या भव्य वास्तू आणि शिल्पं-चित्रं यातून साकारलेली आहे. हे सारं पाहून आपल्या पूर्वजांबद्दल मनात अभिमान आणि आदर दाटून आला.
समयांच्या उजेडात उजळून निघालेलं ते रामेश्वराचं आणि मीनाक्षी देवीचं दर्शन मनावर कायमचं कोरलं गेलं.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले (पूर्व), मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
