(वृत्त-वंशमणी मात्रा- ८ +८ +४)
भास आजही घरात असते आई
श्वास थांबता त्रिकाल उरते आई
दूर जाउनी लबाड लपतो कान्हा
साद ऐकुनी खट्याळ हसते आई
दिवे लागता म्हणा परवचा सारे
रोज नेमक्या चुका पकडते आई
द्रृष्ट काढते मलूल दिसता कोणी
तीट लावुनी पुन्हा हसवते आई
हात पोळुनी तुपात वळते लाडू
भूक आणखी तहान भरते आई
दूर चालली खुशीत मुलगी नांदो
बेल अर्चना शिवास करते आई
सांग मला ती इथेच दिसते ना रे
हाक मारता कुठे हरवते आई !

— रचना : डाॅ.आनंद प्र.महाजन. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
