Homeलेखवाद, संवाद आणि सुसंवाद !

वाद, संवाद आणि सुसंवाद !

वाद या शब्दाचा अर्थ सरळ अर्थ वैचारिक मतभेद असा आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याचे मत पटत नाही आणि या दोन व्यक्ती आपले वय, प्रतिष्ठा सगळे विसरून काही प्रमाणात जोराने पण तावातावाने बोलू लागतात. यास तात्विक मतभेद, भांडण, गैरसमज असेही म्हटल्या जाते. काही महिन्यापूर्वी मी हार्मोनियम न वाजवता, (पलंगा खालून जडपेटी काढावी लागते म्हणून कंटाळा केला) मुक्तकंठाने मला शास्त्रीय संगीताची आवड असल्यामुळे गाणं म्हणण्यास सुरुवात केली. काही वेळाने माझ्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या वांजळे मावशी अतिशय काळजीने माझ्या खोलीचा दरवाजापाशी आल्या व त्यांनी काय झाले असे विचारले. माझ्याबद्दल झालेला त्यांचा गैरसमज तत्क्षणी माझ्या लक्षात आला. मी अतिशय शांतपणे त्यांना म्हटले, “वांजळे मावशी मी गाणे म्हणत आहे.” ही घटना गंमत म्हणून डॉक्टर गोपाळ पौड रोड, यांना सांगितली असता गंभीर सर्व स्वभावाच्या डॉक्टरांना हसायला आले. वरील प्रसंगात मी वांजळे मावशींना जोरात ओरडून उत्तर दिले नाही. तर त्यांच्याशी अतिशय समजूतदारपणाने संवाद साधला. म्हणजेच संभाषण केले. तुम्हाला काही कळत आहे का हे शास्त्रीय संगीत आहे असे उर्मटपणाने म्हटले नाही. त्यामुळे आम्हा दोघांनाही मनाची शांती प्राप्त झाली. कारण हा पूर्णपणे संवाद आणि सुसंवाद होता.

मागच्या वर्षीची सत्य घटना ! मी एका सुशिला तयार करून विक्री करणाऱ्या दुकानात तुम्ही सुशिला कसा काय तयार करता ? मला सांगता का ? असे विचारले तर या सुशिला तयार करणाऱ्यांना फारच क्रोध उत्पन्न झाला व त्यांनी तुम्हाला जे लिहिता येत आहे ते लिहा, तुम्हाला सखोल विषय सांगणे म्हणजे फारच वेळेचे काम आहे. असे म्हंटल्यावर मी ठीक आहे एवढेच उत्तर दिले व वाद संपूर्णपणे टाळला.

वाद संवाद या संदर्भात काही दिवसापूर्वी व्हाट्सअप वर प्रसिद्ध झालेल्या संवाद या विषयासंबंधी काही ओळी लिहिणे योग्य वाटत आहे. संवाद कुठे हरवले ? तर ते मोबाईल मध्ये जाऊन बसले ! शब्द मुके झालेत. मोबाईल मध्ये लपून बसलेत. वेळच नाही येत आता दुसऱ्यांशी बोलण्याची ! या आभासी संवादाना मूर्त रूप कधी मिळेल का ? माणूस हृदयापासून संवाद करेल का ? मध्यंतरी मी माझ्या मैत्रिणीला एका पुण्यातील सोसायटी येथे येणार काय याप्रमाणे विचारणा केली होती. दोन तीन कारणे यामागे होती. एक म्हणजे अपवादात्मक घडत असलेली प्रत्यक्ष भेट ! त्यामुळे बऱ्यापैकी संवाद सुसंवाद साधण्याची संधी ! दैनंदिन जीवनक्रमात एक चांगला सकारात्मक बदलत आणि त्यापासून प्राप्त होणारा निर्मळ आनंद ! परंतु अतिशय उन्हामुळे पुणे येथील फिओसोफिकल सोसायटी येथे जाणेच राहून गेले आहे व राहून जात आहे.

खरेच सध्या तरी माणसातील संवाद – सुसंवाद हरवलेला आहे. आणखीन एका सत्य घटनेचा उल्लेख करण्याचा मोह होत आहे. मी काही वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले असताना तिचा साडेतीन वर्षाचा नातू शाळेतून आला. त्याला मैत्रिणीने थोडा भात, अर्धी पोळी भाजी असे जेवण आणले आणि टीव्ही सुरू केला व या छोट्या मुलाला ही माझी मैत्रीण “अरे अमोल टीव्ही बघ, टीव्ही कडे तोंड कर” असे सारखे म्हणत होती. यापेक्षा या माझ्या मैत्रिणीने तिच्या नातवाशी बोलत बोलत काय म्हणतो आहे, अमोल आज शाळेत मॅडमनी काय शिकवले ? ड्रॉइंगच्या तासाला कोणत्या पक्षाचे चित्र काढले ? आज कोणाचा वाढदिवस होता ? आपण तुझ्या वाढदिवसाला तुझा मित्रांना काय खाऊ वाटायचा ? एखादे पुस्तक सगळ्यांना द्यायचे का ? असा प्रेमाने संवाद साधला असता तर या छोट्या मुलाला मानसिक समाधान तर लाभलेच असते. याप्रमाणे मी वाद संवाद आणि सुसंवाद या विषयाबद्दल लिहायचा प्रयत्न केलेला आहे.

— लेखन : जयश्री शंकरन. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments