जंगल मंगल विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमता !
जेव्हा जगात सारीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला सुरू आहे, तेव्हा जंगल मंगल विद्यापीठ कृत्रिम बुद्धिमत्तेत मागे राहणं शक्यच नव्हतं. त्यातही दोन पायांच्या जनावरांना चार पायांच्या प्राण्यांनी धडा शिकविण्याच्या जिद्दीतून हे विद्यापीठ सर्व प्राण्यांनी, पशू पक्षांनी जिद्दीने सुरू केलं होतं. इथे परीक्षा नव्हत्या, म्हणून घोटाळे नव्हते. आरक्षण नव्हतं. फसवणूक नव्हती. सर्वांना सर्व अधिकार, सर्वांना सामावून घेणारं शैक्षणिक धोरण यावर भर असल्याने इथे नीट, सी बी एस सी सारखे घोटाळे नव्हते. प्रवेश परीक्षेसाठी कोचिंग सेंटरची महागडी भानगड नव्हती. स्पर्धाच नव्हत्या. त्यामुळे ताण तणाव, आत्महत्या नव्हत्या. एक आदर्श विद्यापीठ म्हणून हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, एम आय टी, केंब्रिज सारख्या विद्यापीठांपर्यंत या जंगल मंगल विद्यापीठाची ख्याती पोहोचली होती.
म्हणूनच प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्याने चान्सलर हत्ती यांनी कुलगुरू वाघ, प्र कुलगुरू सिंहीण, कुलसचिव गाय, अधिष्ठाता म्हैस यांना तातडीने बोलावून घेतलं.
“सगळं जग आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायला लागलं आहे. चीन, अमेरिका, जपान, कोरिया अशा सर्वच राष्ट्रांत प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. आपल्याला मागे राहून चालणार नाही. आपण जंगलात सी सी टी व्ही कॅमेरे लावून डेटा गोळा करायला सुरुवात केलीच आहे. पण तेव्हढ पुरेसं नाही आता. आपल्याला ए आय धोरणच आखाव लागेल.”
चांसलर महोदयांच्या प्रास्ताविकानंतर कुलगुरूंनी आपले मुद्दे मांडले.. “महोदय, आपण याबाबतीत मागे राहण्याचा प्रश्नच नाही. बाजूची विद्यापीठं नव्या धोरणाच्या नावाने फक्त चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करण्यातच धन्यता मानतात. मोठमोठे अहवाल तयार करण्यात च धन्यता मानतात. पैसे, वेळ खर्च करतात. आपलं तसं नाही. आपण आर एफ टॅग चा उपयोग केव्हाच सुरू केलाय. त्यामुळे प्रत्येक प्राण्याच्या हालचालीची नोंद आपल्याकडे असते.
आजकाल काही प्राणी उदा हत्ती, बिबटे, माकडं आजुबाजूच्या गावात, शेतात जाऊन धुमाकूळ घालतात अशा तक्रारी येताहेत. यात काही मुलांचे जीव गेले आहेत. काहींना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे विनाकारण आपली बदनामी होते. नाव खराब होते विद्यापीठा चे. मिडियाला तर निमित्त च हवे असते बातमी चघळण्यासाठी. म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे. आता आपण प्रत्येकाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकतो. एव्हढेच नाही तर आपण काही नव्या योजना ऑलरेडी आखल्या आहेत. डीन त्याबद्दल माहिती देतील”
कुलगुरू वाघ यांनी अधिष्ठाता म्हशीला निर्देश दिले. म्हशीने चक्क पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुरू केले..
“आपण जमिनीवरच नव्हे तर आकाशात देखील आपल्या संचार प्रणाली सुरू केल्या आहेत. यासाठी मिनिएचर द्रोण चा उपयोग आपण सुरू करणार आहोत. गरुड, कावळे, चिमण्या यांच्या पंखावर आपण सेन्सर लावणार आहोत. त्यात मिनी कॅमेरे असतील. ते वरून जंगल मंगल विद्यापीठातील प्राण्याच्या हालचाली टिपतील. यातून प्राणी गणना देखील आपोआप होईल. यात आपण ए आय चा उपयोग करून जेंडर, वय सगळी माहिती घेऊ शकतो विश्लेषण करून. यासाठी आपण बायो नॅनो इन्फो अशा तिन्ही प्रणाली एकत्र वापरणार आहोत. कारण आपल्याला फक्त हालचालींवर लक्ष ठेवायचे नाही. फक्त हेरगिरी करायची नाही. आपल्याला प्राण्याच्या अवयवाच्या हालचाली, त्यांच्या भावना, मानसिक गरजा, त्यांचे आरोग्य यावर देखील लक्ष केंद्रित करायचे आहे.

आजूबाजूला सध्या जे युद्धजन्य वातावरण निर्माण झाले आहे,एक देश दुसऱ्या देशाचे लचके तोडतो आहे, मुलाबाळांचे जीव जाताहेत विनाकारण, घरे उध्वस्त होताहेत.. ही परिस्थिती आपल्याकडे यायला नको. अशा दुष्ट प्रवृत्ती या संसर्गजन्य रोगासारख्या, त्या भयंकर करोना सारख्या असतात.त्यापासून आपण आधीच सावध असायला हवे. असे काही आपल्या जंगल मंगल विद्यापीठात घडू नये यासाठी काळजी घ्यायला हवी. रोग झाल्यावर मग उपाय शोधण्यापेक्षा रोग होताच कामा नये अशी दक्षता घेणारी संगणक विश्लेषण ए आय प्रणाली काही गुहेत, काही बिळात आपल्या साथीदारांनी विकसित केली आहे. या सगळ्या स्टार्ट अप योजना आहेत ज्याला आपण सारखे प्रोत्साहन देत असतो. आम्हाला सांगण्यात आनंद होतो की यात आपल्या जंगल मंगल विद्यापीठातील जेन झी चा फार मोठा सहभाग आहे.
“जेव्हा आजुबाजूच्या विद्यापीठातील जेन झी क्लासेस बायकोट, आंदोलने, उपोषणे यातच व्यस्त आहे, आपला अमूल्य वेळ खर्चत आहेत, तेव्हा आपल्याकडील सर्व स्तरातील प्राणी पक्षी यांनी केवळ विकसित यंत्र तंत्र यावर अवलंबून न राहता परमेश्वराने आपल्याला जे नैसर्गिक सेन्सर्स दिले आहेत, त्याचाही उपयोग आपण करीत आहोत.हा माणसात अन् जनावरात फार मोठा फरक आहे. माणूस आपली बुद्धी गहाण ठेवल्या सारखा वागतो आहे. तिथे शहाणपणाची टंचाई आहे.
बुद्धिवंताना बाजूला ठेऊन, लोकशाहीचा आव आणून, मन मानेल तसे वागण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य घेतले जात आहे. हातात सत्ता आली की मग वाटेल ते बोलायचे, करायचे, कायदा हातात घेऊन मनमानी करायची हा लोकशाहीचा नवा अर्थ लावला जात आहे. कुठेही विवेकाला जागा नाही. भविष्याचा, सर्वांना बरोबर घेऊन सलोख्याने वाटचाल करण्याचा विचार नाही. खरी संस्कृती, खरी नीतिमत्ता, खरे स्वातंत्र्य तर आपल्या जंगल मंगल विद्यापीठातील शिक्षा प्रणालीत आहे. आपल्या मूलभूत धोरणात आहे.”
म्हशीने इथे पोज घेतला. गायीने मान डोलावून शेपटी हलवत कौतुक केले. त्याचवेळी सरपटत आलेल्या मगरीने शेपटी वर केली. वाघाने बोलण्याची परवानगी दिली.
“आपले ए आय तंत्र फक्त जमिनी पुरते, आकाशा पुरते मर्यादित राहणार नाही. त्याचा उपयोग जलचर प्राण्यांसाठी देखील होणार आहे. मासे, मगरी, साप असे अनेक जलचर आहेत, शिवाय हंस बगळे सारखे पक्षी आहेत ज्यांचे सेन्सर जबरदस्त काम करतात. अनेकाना वास आला की सर्व समजते. काहीना पाण्याच्या हालचाली, लहरी यातील बदलातून चाहूल लागते काय होणार याची.. त्यांना आवाजावरून देखील अवती भवतीच्या वातावरणाची, संकटाची कल्पना येते. मी तर म्हणेन की आपल्या एकूणच जंगल मंगल विद्यापीठातील भविष्य कालीन ए आय क्षमता ही माणसाला मागे टाकील अशी आहे. चीन अमेरिका यांचा धसका आपल्या देशाने घ्यावा. जमिनीवरील माणसांनी घ्यावा. आपण या सर्वांच्या पुढे आहोत. याचे मुख्य कारण हे की आपण निसर्गाशी खेळ करत नाही. आपण निसर्ग ओरबाडत नाही. आपण जंगलतोड करत नाही. नद्या, नाले समुद्र प्रदूषित करत नाही. उलट आपण पर्यावरण सांभाळून जगतो. निसर्गाच्या हातात हात घालून वाटचाल करतो. हा मुख्य फरक आहे जंगल मंगल विद्यापीठातील धोरणात अन् मानव निर्मित व्यवस्थेत..!” वाघांनी पुढे येत मगरीचे कौतुक केले. तिची शेपटीने पाठ थोपटली. सिंहीणीने देखील आपल्या आयाळीने आनंद व्यक्त केला.
एकूणच जंगल मंगल विद्यापीठातील ए आय धोरण हे बरेच पुढे गेल्याच्या बातम्या दुसऱ्या दिवशी सर्व मीडियातून व्हायरल झाल्या. त्या बघून ट्रम्पच्या पोटात देखील गोळा आला. रशिया, चीन सुद्धा मनातल्या मनात घाबरले. यावर एक तातडीची आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याचे ठरले. माणसे परिषदा घेण्याशिवाय दुसरे करणार तरी काय म्हणा ?

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
