आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संध्या सामंत यांनी अत्यन्त पोट तिडकीने लिहिलेला “पुन्हा एकदा पर्यावरण दिन”! हा लेख प्रसिद्ध करीत आहोत.
उच्च शिक्षित असलेल्या संध्या सामंत यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील बारा वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी स्थापन केलेल्या मातृसेवा फाऊंडेशन च्या मार्फत त्या विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. अनेक वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक आणि अन्य प्रकाशनांमधून त्यांचे लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. त्यांचे दोन मराठी बाल कथासंग्रह तर अमेझॉन वर इंग्रजीत पुस्तक प्रकाशित झाले आहे. स्व आवाजात कुकुफम आणि रेडिओ मिर्ची वर मिळून 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. न्युज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
– संपादक
होय.. आज पुन्हा एकदा ५ जून ! पर्यावरणाचे माणसाच्या जीवनातील महत्व समजून सांगण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पुन्हा तोच एक दिवसीय सोहळा.पुन्हा त्याच घोषणा आणि पुन्हा ते रोपां सोबतचे सेल्फी !
आजच्या दिवशी “पर्यावरण वाचवा”, “झाडे लावा”, ही घोषवाक्ये प्रत्येक शाळेत, प्रत्येक कार्यालयात आणि प्रत्येक सरकारी कार्यक्रमात दरवर्षी ऐकायला मिळतात. पण निसर्ग हा केवळ पर्यावरणदिनी आठवण्याचा विषय नाही. तो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घेण्याची वेळ येण्यापूर्वी, सावली शोधण्यासाठी कृत्रिम छत्र्या उभारण्याची वेळ येण्यापूर्वी, आणि पक्ष्यांचे आवाज फक्त मोबाईलच्या रिंगटोनमध्ये ऐकण्याची वेळ येण्यापूर्वी आपण जागे व्हायला हवे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक प्रयत्न केले पाहिजेत, हे शंभर टक्के सत्य आहे.
पण एक प्रश्न मनाला सतावत राहतो…“आम्ही झाडे लावायची, पाणी घालायचे, वर्षानुवर्षे जपायचे, आणि मग एखाद्या विकास प्रकल्पाच्या नावाखाली त्यांच्यावर सरकारी कुऱ्हाड चालायची ? “ आमच्या प्रयत्नांचे काय? तेव्हा आम्हाला विचारले जात नाही? अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून वृक्षारोपण करतात. उन्हातान्हात झाडे जगवतात. मुलांना निसर्गप्रेमाचे धडे देतात. पण दुसऱ्याच दिवशी एखादा रस्ता रुंदीकरण प्रकल्प, एखादी इमारत किंवा एखादी योजना त्याचा बळी घेते. वृक्षतोड थांबवण्यासाठी ‘चिपको आंदोलन’ किंवा मानवी साखळीच्या माध्यमातून नागरिक एकत्र येऊन दबाव निर्माण करत आहेत. नाशिकमधील ‘तपोवन’ असो किंवा नागपूरमधील ‘लंडन स्ट्रीट’ प्रकल्प, मुंबई पुण्यातील मेट्रोमुळे झाडांच्या कत्तली असोत वा ठाणे/ सिंधुदुर्गातील कांदळवनांची कत्तल, संजय गांधी जंगल बचाव मोहीम अशी असंख्य उदाहरणे केवळ महाराष्ट्रातलीच देता येतील. सगळीकडे सामान्य जनता आणि पर्यावरणप्रेमीच विरोध करताना दिसतात. अशा वेळी हरित लवाद देखील कुठच्या छायेत दडलेले असते कोण जाणे !

पर्यावरण’ म्हणजेच परि + आवरण आपल्या अवतीभवती असलेले डोंगर, दऱ्या, वनस्पती, प्राणी, पाणी, आकाश, भूमी, ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संबंधित घटकांनी एकत्रितरीत्या जे आवरण निर्माण केले जाते ते पर्यावरण आहे.
पर्यावरण रक्षण ही फक्त नागरिकांची जबाबदारी नाही. जर कामांचे कारण नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून पुढे केले जाते तर नागरिकांनी जपलेल्या पर्यावरणाचा सन्मान करणे ही सरकारचीही तितकीच मोठी जबाबदारी आहे. पण त्याना मात्र काँक्रीटचे जंगल उभारण्यातच रस आहे . वृक्षतोड टाळण्यासाठी नवीन झाडे लावण्याचे दावे प्रशासनाकडून केले जातात पण ती केवळ कागदोपत्रीच असतात. एके ठिकाणी पाऊस कमी पडणार ह्या स्वतःच्याच भविष्यवाणीवर पाणी कपातीचे नियोजन केले जाते..पण नवीन येणारे लोकांचे लोंढेच्या लोंढे थांबवले का जात नाहीत? उलट त्यांच्या सोयीसाठी डोंगर पोखरून आणि खाडी बुजवून वस्त्या बनवल्या जातात. आधीच पाणी कमी पडत असलेल्या वस्तीत त्यांच्यासाठी पाण्याची सोय कुठून करणार?
मोठ्या प्रमाणात झाडं तोडणं हे फार चिंताजनक आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर दयामाया दाखवू नये. बेकायदेशीरपणे कापलेल्या प्रत्येक झाडासाठी 1 लाख रुपये दंड आकारण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली होती. कुठे गेले ते नियम/ निकाल? कोणी मागितलाय हा विकास? सामान्य नागरिकांना ही वृक्षतोड / जंगलतोड करून केलेला विकास नको आहे. नागरिकांची मते जर विचारात घेतली जात नाहीत तर हा विकास पुढील पिढीला विनाशाकडेच नेणारा ठरेल.

पर्यावरण म्हणजे आपल्या जवळ असलेला निसर्गाचा भाग. आणि आपण म्हणजे मानव ह्या विराट व अनंत पसरलेल्या व्यवस्थेमधील एक छोटे कणमात्र आहोत ह्याचा विसर मानवाला पडलेला दिसतो. निसर्गाचे घटक अनेक आहेत पण मानवाला केवळ आपणच जगावे..आपलाच विकास व्हावा असे वाटले तर संतुलन टिकणारच नाही . संतुलन टिकवून ठेवण्यासाठी अलिखित निसर्ग नियमांच्या चौकटीत राहणे आवश्यक आहे. म्हणजेच इतर प्राण्यांप्रमाणेच आपण एक छोटा भाग आहोत आणि पृथ्वीवरील जीवन टिकवण्यासाठी संतुलन आवश्यक आहे. जर मानव त्याच्या बुद्धीमुळे त्या चौकटीचे उल्लंघन करत असेल, तर त्यामुळे पूर्ण संतुलन बाधित होईल. रस्ते होतील पण त्यावर पेट्रोल पंपासोबत ऑक्सिजनचे पंप उभारावे लागतील.
आपण मुलांना सांगतो, “वृक्ष आपले मित्र आहेत.” पण भविष्यात चित्र असे दिसेल, “बघा बाळांनो, अशी झाडे असायची एकेकाळी. ह्यावर पक्षी घरटी बांधायचे. पावसाचे ढग यांच्यामुळे थांबायचे.” हे आपण स्क्रीनवर दाखवत असू ! असे होऊ द्यायचे नसेल तर आपण काय करणार आहोत ?

— लेखन : संध्या सामंत. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
