Homeलेखनिसर्गाशी नाते जपु या !

निसर्गाशी नाते जपु या !

आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिन. या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नेहमी एक प्रश्न मनात येत असतो तो म्हणजे आपण विकासाच्या शर्यतीत निसर्गाशी असलेले आपले नाते तर गमावून बसलो नाही ना? एकेकाळी ऋतूंची चाहूल, मृदगंधाचा सुगंध आणि पक्ष्यांची किलबिल यांमधून निसर्गाशी संवाद साधणारा मानव आज हवामान बदलाच्या संकटासमोर उभा आहे, हे त्रिवार सत्य सगळ्यांना उमजलेले आहे. त्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत तरीसुद्धा त्यावर रोखठोक उपाययोजना करण्याचे संकेत अपुरेच वाटतात.

ह्या वर्षीचा उन्हाळ्यातील उकाडा हा अधिक दाहक होता. संपूर्ण भारतात विविध शहरात तापमानाने रेकॉर्ड नोंदविले. ऋतू बदलाची चाहूल देणारा आपला निसर्ग आता पूर्णपणे बदलला आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यांच्यातील सीमा धूसर होत चालल्या आहेत.

आज आपण ज्या हवामान बदलाचा अनुभव घेत आहोत, तो केवळ नैसर्गिक बदल नसून मानवनिर्मित क्रियाकलापांचा परिणाम आहे. औद्योगिक क्रांतीनंतर कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या अतिवापरामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सुमारे 280 ppm वरून 425 ppm पेक्षा जास्त झाले आहे. यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत सुमारे 1.3°C ते 1.5°C ने वाढले आहे.

पूर्वी निसर्ग ऋतू बदलाची चाहूल स्पष्टपणे देत असे. बहावा फुलला की उन्हाळा, मोगऱ्याचा सुगंध दरवळला की पावसाची चाहूल आणि स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले की ऋतू बदलल्याची जाणीव होत असे. आज निसर्गाचे जीवन चक्र पूर्णतः बिघडलेले आहे. उष्णतेच्या लाटा, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळ यांचे प्रमाण वाढले आहे.

एकेकाळी गावोगावी बहावा, पलाश, जांभूळ, करवंद, आंबा आणि उंबर यांची रेलचेल होती. आज वाढत्या शहरीकरणामुळे आणि जंगलतोडीमुळे नैसर्गिक परिसंस्था धोक्यात आल्या आहेत.सर्वत्र काँक्रीटचे आच्छादन वाढल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. भूजलसाठे कमी होत आहेत. एकीकडे पूर तर दुसरीकडे पाणीटंचाई अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण होत आहे

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार जगात दरवर्षी सुमारे 1 कोटी हेक्टर जंगलांचा ऱ्हास होत आहे. जंगलांचा नाश म्हणजे केवळ वृक्षतोड नव्हे, तर पृथ्वीच्या कार्बन शोषून घेणाऱ्या नैसर्गिक यंत्रणेचे कमकुवत होणे होय.

पक्ष्यांची किलबिल, फुलपाखरांची चहल पहल आणि जैवविविधतेची समृद्धता हे पर्यावरणाच्या स्वास्थ्याचे लक्षण आहे. परंतु वैज्ञानिकांच्या मते सुमारे 10 लाख वनस्पती व प्राणी प्रजाती नामशेष होण्याच्या धोक्यात आहेत. जैवविविधतेचा हा ऱ्हास अन्नसाखळी आणि पर्यावरणीय संतुलनासाठी गंभीर धोका आहे.

जागतिक स्तरावर प्रयत्न होताना दिसत आहेत परंतु त्यामधील सातत्याचा अभाव पर्यावरण ऱ्हासाकडे नेत आहे. असे असले तरी आज पर्यावरण संरक्षणासाठी सर्व देश सरसावले आहेत ही अतिशय समाधानाची बाब आहे.

पर्यावरण रक्षणाच्या विविध उपाय योजनांचा भाग म्हणजे युनायटेड राष्ट्रांनी 2015 मध्ये झालेला पॅरिस मसुद्यांतर्गत जवळपास सर्व देशांनी पृथ्वीच्या तापमानवाढीला 2°C च्या खाली आणि शक्यतो 1.5°C पर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट स्वीकारले आहे.

त्याचाच एक भाग म्हणजे, दरवर्षी आयोजित होणाऱ्या Conference of the Parties (COP) परिषदांमध्ये हवामान बदलाविरोधी उपायांवर चर्चा आणि निर्णय घेतले जातात. अनेक देशांनी Net Zero Emissions चे उद्दिष्ट जाहीर केले आहे. भारताने 2070 पर्यंत नेट-झिरो साध्य करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या वैज्ञानिक गटाच्या मते, जागतिक तापमानवाढ 1.5°C पर्यंत मर्यादित ठेवायची असेल तर 2030 पर्यंत जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात सुमारे 43% घट करणे आवश्यक आहे.
आज जगभरातून दरवर्षी सुमारे 37 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडली जाते. ऊर्जा उत्पादन, वाहतूक, उद्योग, शेती आणि जंगलतोड ही त्याची प्रमुख कारणे आहेत.

पूर्वी ऋतूनुसार घरातील कामे, सण, उत्सव, शेती आणि जीवनशैली बदलत असे. आज तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे माणूस निसर्गापासून दूर जात आहे. परिणामी निसर्गातील बदल समजून घेण्याची क्षमता कमी होत आहे.वाढते तापमान, पाण्याची टंचाई, अन्नसुरक्षेचे प्रश्न, नैसर्गिक आपत्तींची वाढती तीव्रता आणि जैवविविधतेचा ऱ्हास हे सर्व या तुटलेल्या नात्याचे दुष्परिणाम आहेत.

देशात तसेच जागतिक स्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, विद्युत वाहने, ऊर्जा कार्यक्षमता आणि वृक्षारोपण यांवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे असे असले तरी पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारांची जबाबदारी म्हणून न पाहता प्रत्येक नागरिकाने त्यास बळ देणे आवश्यक आहे.

वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, ऊर्जेचा संयमी वापर, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि स्थानिक जैवविविधतेचे जतन यांसारख्या छोट्या कृतींचा मोठा परिणाम होऊ शकतो. पर्यावरण संरक्षण ही केवळ मोहीम नाही तर ती एक जीवन पद्धती आहे. आपण लावलेले प्रत्येक झाड, आपण वाचवलेला पाण्याचा एक एक थेंब आणि कमी केलेला कार्बन उत्सर्जनाचा प्रत्येक कण पृथ्वीच्या भविष्यासाठी मोलाचा आहे. आज गरज केवळ विकासाची नाही, तर शाश्वत विकासाची. कारण निसर्ग वाचला तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील. ऋतूंची चाहूल, मृदगंध, पक्ष्यांची किलबिल आणि निसर्गाचा समतोल टिकवून ठेवणे हीच पुढील पिढ्यांसाठी सर्वात मोठी देणगी ठरेल.

सुधीर थोरवे.

— लेखन : सुधीर थोरवे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments