निसर्गरम्य धनश्री रिसोर्ट वरील नाश्ता उरकून रस्त्यालगतच्या चहा मळ्यात मनसोक्त फोटो सेशन व रील तयार करत साऱ्यांनी धमाल केली. नंतर सहलीच्या अंतिम टप्प्यात अरुणाचल प्रदेशाकडे वाटचाल सुरु झाली. प्रथम सीमेवर भालुकपोंग येथे राज्य पर्यटनासाठी परवाना घेऊन भोजन केले. वाटेत टीप्पी येथील केंद्रीय ऑर्किड संशोधन केंद्रास भेट दिली. येथून पुढे सारा घाट माथ्याच्या प्रवास सुरू झाला. सुमारे सात तासाच्या प्रवासानंतर दिरांग येथील रिगसेल हॉटेल मध्ये मुक्कामी राहिलो. हे प्रशस्त हॉटेल मुख्यमंत्री खांडू यांच्या भागीदारीत असल्याचे समजले. येथेच सकाळी भरपेट अल्पोपहार आटोपून आमच्या सहप्रवासी सौ.कोळपे यांचा वाढदिवस साजरा केला.

त्यानंतर जसवंतगड कडे निघालो. रस्त्याच्या दुतर्फा बर्फाचे साम्राज्य होते. चीनने १९६२ मध्ये केलेल्या युद्धात जसवंतसिंह रावत यांनी या ठिकाणी जिवाची बाजी लावून लढा दिल्याने जसवंतसिंह वॉर मेमोरियल उभारले आहे. तेथे जसवंतसिंह यांच्या वस्तू जतन केल्या आहेत. तेथे त्याची शौर्य कथा चित्रफित दाखवली जाते. आजही त्यांचे बेड दररोज लावले जाते. अगदी नेमाने वेळेवर भोजन, चहा देखील ठेवले जाते. आजतागायत त्यांना हयात आहेत असे समजून पदोन्नती दिली जाते. जब्बा,जूनून, त्याग, हिंमत, बलिदान याची जाणीव येथे होते.येथे मिलिटरी कॅन्टीन मध्ये थंडी प्रतिबंधक कपडे वस्तू रास्त भावात मिळतात. येथील उत्पन्न थेट सैन्य दलास मिळत असल्याने पर्यटक येथे आवर्जून खरेदी करतात. रात्री आम्ही तवांग येथील किटमो हॉटेल मध्ये तीन दिवसासाठी मुक्कामी राहिलो.
दुसऱ्या दिवशी पाऊस, धुके अन् भुरभुरनारा बर्फ अशा वातावरणात वाय जंक्शन येथून चीन सीमेच्या दिशेने कूच केली. येथे सैनिकांसाठी सर्वात उंचीवरचे स्टेट बँकेचे ATM बघून खरेच अभिमान वाटला. जीव गारठून गेला असला तरी युरोप देशाला फिके पाडेल असे ते सौंदर्य दिसत होते. प्रथम आम्ही १३,७०० फूट उंचीवरील माधुरी लेक कडे पोहोचलो. येथे कोयला चित्रपटात माधुरी दीक्षितने ‘तनहाई तनहाई ‘… या गाण्याचे चित्रीकरण झाले होते. त्यामुळेच तिचे नाव या गोठलेल्या लेकला देण्यात आल्याचे समजले. येथे सैन्य दलामार्फत कॅन्टीन सुविधा आहे. यानंतर १५,०००फूट उंचीवरील चीन सीमेवर बूमला पास कडे रवाना झालो. पण बर्फ वृष्टीमुळे वाहतूक बंद झाल्याने माघारी परतलो.
तवांग येथे परतल्यावर दलाई लामा यांनी धर्म प्रसारासाठी निर्माण केलेल्या सर्वात मोठ्या मॉनेस्ट्रीचे दर्शन घेतले.येथे मॉनेस्ट्री मार्फत सर्व पर्यटकांना गरमागरम चहा दिला जात होता. पाऊस वाढल्याने सायंकाळचे सर्व कार्यक्रम रद्द करून हॉटेल वर विश्रांती घेतली.

सकाळी मॉनेस्ट्री स्वरूपात बनवलेल्या तवांग वॉर मेमोरियल पाहिले. चीन युध्दात शहीद झालेल्या सर्व सैनिकांचे हे स्मारक आहे. तदनंतर सात मजली डॉन बॉस्को म्युझियम मध्ये अरुणाचल प्रदेशाची सांस्कृतिक, सामाजिक अन् कृषी क्षेत्रातील प्रगती बघितली. या म्युझियम वर तवांग शहर दर्शनासाठी स्काय वॉक आहे.

तेथून घाट माथ्याच्या रस्ता उतरून हॉटेल समझाना येथे भोजन केले. परत येताना रूपा या गावात हॉटेल किटमो मध्ये मुक्काम केला. सेला नुरा या दोन बहिणींनी चीन आक्रमण वेळी दिलेले योगदान प्रेरणादायी होते. त्यांचीच नावे सेला पास, सेला टनेल, नूरा फॉल यांना देण्यात आली आहेत. चीन सिमेलगतचेठीकठिकाणी कोसळणारे धबधबे अन् बर्फाच्छादित डोंगराचा हा नजारा जणू स्वित्झर्लंडला फिका पाडणारा होता. यानंतर गुहाटीस मार्गस्थ झालो. सायंकाळी लवकर पोहोचल्याने साऱ्या महिला आसामी साडी खरेदीसाठी गेल्या.

शेवटच्या दिवशी ब्रह्मपुत्रा नदीवरील रोप वे ने डोल गोविंदा मंदिर दर्शनासाठी गेलो. सुमारे दोन किमी विस्तीर्ण पात्रावरचा हा प्रवास छान होता. सायंकाळी ब्रह्मपुत्रा नदीत अल्फ्रेस्को ग्रँड या क्रुझ मधून गरमागरम कांदाभजीचा आस्वाद घेत फेरफटका मारला. सोबतीला गायकाने सादर केलेल्या सुमधुर गाण्याची साथ होती. पण खरी रंगत आली ती डीजे वरील गाण्याच्या तालावर आम्ही ज्येष्ठांनी केलेल्या बेफाम नाचामुळेच. सैराटच्या गाण्यावर सारेजण वयाचे बंधन न पाळता चांगलेच थिरकले. रात्री श्री व सौ.उकरांडे उभयतांचा लग्नाचा वाढदिवस साऱ्यांनी समर्पक गाणी म्हणत साजरा करण्यात आला.
गाईड सुबोध भिसे याने आम्हा सर्व ज्येष्ठांची छान काळजी घेतली.संपूर्ण प्रवासात चालक गौरी शंकर व बिपीन यांनी जबाबदारीने कुशलतेने ड्रायव्हिंग केले. रात्रीचे भोजन करून चालक व सुबोध यांना खुशाली देऊन त्यांना निरोप घेऊन विमानतळ गाठले.

थ्री सिस्टर सहलीस येणाऱ्यानी मेघालय, विशेषतः अरुणाचल साठी सोबत गरम कपडे, हातमोजे,कानटोपी, रेनकोट किंवा छत्री,भीमसेन कापूर, कोरडा खाऊ,चटणी सोबत असणे गरजेचे आहे. प्रवासात जेथे उपलब्ध असेल तिथे हॉटेल मध्ये जेवण उरकून घेणे आवश्यक आहे. पर्यटन परवान्यासाठी आधार कार्ड जवळ ठेवावे लागते. नेटवर्क समस्या असल्याने जवळ रोख रक्कम बाळगावी. शहरातील रस्ते अरुंद व तीव्र चढ उताराचे असून चालक हॉर्न विरहित हमरी तुमरीवर न येता कुशलतेने वाहने चालवतात. येथील लोकात सेवाभावी वृत्ती आढळते.येथील भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीमुळेच जनतेला संयम व शहाणपण आले असावे असे वाटते.
भर उन्हाळ्यात आमच्या जीवाला थंडावा देणारी सहल अविस्मरणीय ठरली.
समाप्त.

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
