Homeलेखगीता उपदेश

गीता उपदेश

उ‌द्धरेदात्मनाSSत्मानम्..”

उ‌द्धरेदात्मनाSSत्मानम् नात्मानमवसादयेत्…
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः …
(श्री गीता, ६ वा अध्याय, ५ वा श्लोक )

मनुष्याने आपण होऊन आपला उद्धार करावा. आपण आपल्या स्वतःला कधीही खचवू नये. कारण प्रत्येक मनुष्य आपणच आपल्या स्वतःचा बंधू म्हणजे मदत करणारा किंवा आपणच शत्रू आहे असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे.

समाजात आपल्याला तीन प्रकारच्या व्यक्तींचा विचार करता येईल.

एक :- एकाकी, एकटी असणारी व्यक्ती. अनेकविध कारणांनी एकटी पडलेली व राहणारी व्यक्ती. यात अविवाहित, विवाहविच्छेद झालेली आणि तरुणपणीच वैधव्य आलेल्या स्त्रीचा विचार करता येईल.

दोन :- आपले एकुलते एक अपत्य अमेरिकेत म्हणजे परदेशी स्थित झालेले व कधीतरी पाहुणा म्हणून भेटायला येणारा मुलगा-मुलगी अशी जोडपी.

तीन :- परिपूर्ण संसारात रमलेली, नातवंडे-पतवंडांनीही समृद्ध, आर्थिक व्यवस्था चांगली.

प्रथम एकाकी राहणाऱ्या व्यक्तीने वस्तुस्थितीचा विचार करून आपला आत्मसन्मान जपणे, आर्थिक स्वातंत्र्य, दिवसभर मन एखा‌द्या सक्रिय गोष्टीत रमवणे, याकरता भूतकाळात न रमता योग्य मार्ग निवडावा. माझ्या परिचयातील अनेक तरुण मुली (घटस्फोटित) सुरक्षित अशा स्त्रियांच्याच संस्थेत किंवा सुरक्षित ठिकाणी दुःख विसरुन कार्यरत आहेत. त्यांचा परत विवाहाचा विचार नाही.

कित्येक अतिशय संपन्न घराण्यांतील एकुलते एक अपत्य अमेरिकेत जाऊन राहिलेले आहे! या दांपत्यांना याची सल, दुःख असणारच. पण मुलाने ऐकलेच नाही तर काय करणार? माझे परिचित एकजण म्हणाले,” माझी बायको नोकरी करत होती, हेच बरे म्हणायचे. कारण निवृत्तीनंतर तिच्यामागे एवढे उद्योग लावून घेतलेले आहेत.” तसे पाहिले तर, “रिकामे मन, सैतानाचे घर”. हे नको असेल तर आता आपल्याला हे काम करायचे आहे, हे पुस्तक वाचायचे आहे, पत्र लिहायचे आहे, खोली, घर आवरायचे आहे, कुणाला सहज किंवा कामानिमित्त फोन करायचा आहे; असे मनात राहणे केव्हांही चांगलेच नाही का ?

नातवंडांना शाळेतून आणणे, त्यांना शाळेत सोडणे, कुणा नातेवाईकांना भेटणे, तरुणपणी एखादा छंद- उदा. चित्रकला, गायन, हार्मोनियम शिकणे- राहून गेला असल्यास, ती कला शिकण्याचे बघणे, असं काही करता येतं. माझ्याकडे श्री. अनिल ठोंबरे एम.एस. ई. बी. मधून निवृत्त झाल्यानतर हार्मोनियम, शास्त्रीय संगीत शिकण्यास २००५-२००६ च्या दरम्यान येत असत. त्यांनी मनापासून हे शिक्षण घेऊन नंतर स्वतःचा कार्यक्रम करण्याइतकी प्रग‌ती केलेली आहे. तसेच त्यांनी, (अनिल ठोंबरे यांनी) निवृत्तीनंतर एम ए. ला इग्रजी, मराठी विषय घेऊन अभ्यास केलेला आहे व त्यात पदवी संपादन केलेली आहे.
काही ज्येष्ठ नागरिक जमेल तेव्हा मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये स्वयंसेवकाचे काम करतात . हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या व्यक्तीला नातेवाईक किंवा कुणाची मदत कमी, अथवा बेताने असल्यास अशा सहकार्याचा फार उपयोग असतो.

एकंदरीत आता काय, आपले वय झाले आहे. शांतपणे जपमाळ ओढत बसावे किंवा पोथी वाचन चालू ठेवावे. येथे एक सत्य घटना लिहिण्याचा मोह होत आहे. मध्यंतरी मी माझ्या एका कॉलेजमधल्या मैत्रिणीला फोन केला तर त्यांच्या घरी कुणी तो उचलला व मला निरोप दिला… “तुम्ही पाचनंतर फोन कराल का? मानसी एका स्वामींची पोथी वाचत आहे.” अर्थातच प्रत्येकाचे विचार वेगळे असायचे. दूरचित्रवाणी पाहून वेळ घालवणे, समवयस्कांबरोबर गतकाळातील आठवणी व आत्ताच्या जीवनाबद्दल निरर्थक बोलत रहाणे, यापेक्षा काहीतरी स्वतःच्या क्षमतेप्रमाणे सकारात्मक करण्याचा, दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करावा. एखादे वाचनालय सुरु करावे किंवा श्री गीता, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, याचा अभ्यास करण्याचे पहावे. मुलांचे संस्कार वर्ग चालवावेत, ज्येष्ठ नागरिक मंडळात एखा‌द्या विषयाची चर्चा करावी, एखा‌द्यावेळी कुणा मित्रमंडळींना भेटायला बोलवावे, आपण स्वतः जावे.

थोडक्यात आपला विकास आपण स्वतःच करायला हवा. कोणीही दुसरा आपल्या विकासाच्या आड येत नाही. आहे त्याच ठिकाणी पडून रहाणे हे प्रगतीचे लक्षण नाही. ज्या क्षेत्रात वावरत असू, त्या क्षेत्राचे तर उत्तम ज्ञान प्राप्त करून घ्यावेच. परंतु त्याचबरोबर इतर कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान व अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा, स्वभावात हळूहळू परिवर्तन झाले पाहिजे. विचारपूर्वक एक-एक दुर्गुण दूर करण्याचा व सद्‌गुण बाणवण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या विषयाचा सखोल व्यासंग करावा, अहंकार विकार दूर करण्याचा प्रयत्न करावा.

जयश्री शंकरन.

— लेखन : जयश्री शंकरन. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on सुभाषित विवेचन : 2
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on शिक्षण : भारतीय मानसिकतेचा शोध