Homeलेखखिडकी : 7

खिडकी : 7

“आखरी कश…”

कॉलेजला असताना तो चेन स्मोकर होता. किती सिगरेट ओढायचा, मला आठवतं, तो आम्हा मित्रांकडून एक-एक रुपया गोळा करून सिगारेट घ्यायचा. तेव्हा साधारण दोन-तीन रुपयाला एक सिगरेट असायची आणि हा कॉलेजचा ब्रेक झाला की गेटवर एकेकाला अडवून, ‘एक रुपये है क्या ?’ असा प्रश्न विचारून कसेबसे पैसे गोळा करायचा.
काही आर्थिक परिस्थिती चांगली असलेले शौकीन मुलं सिगारेटची पाकिटे विकत घ्यायची. कॉलेजच्या मैदानात कोपऱ्यात कुठेतरी उभे राहून यांचा यज्ञ सुरू व्हायचा. हा तिथे जाऊन त्या मुलांची सिगरेट संपायची वाट बघायचा आणि त्यांना त्या सिगरेटचा ‘आखरी कश’ मागायचा.

‘आखरी कश’ म्हणजे जेव्हा ती मुलं सिगरेट फेकायला जायचे तेव्हा हा त्यांना अडवायचा. आणि ‘फेक मत मुझे दे, उसमे एक आखरी कश होता है’ असे म्हणून ती सिगरेट घ्यायचा. त्यामागचे त्याचे शास्त्र असे होते की ज्याप्रमाणे दारू पिताना ही पिणारी मंडळी दारूची बाटली संपली की झाकण लावून ती बाटली उलटी ठेवतात व मग काही वेळाने त्या बाटलीच्या झाकणात दारूचे शेवटचे काही थेंब जमा होतात तो एक शेवटचा सिप ते मारतात, ज्याला ‘लव ड्रॉप्स’ असे एक नाव देखील आहे. त्या लव ड्रॉप्समध्ये म्हणे वेगळीच नशा असते, म्हणजे अख्खी बाटली पिऊन जे सुख मिळत नाही ते म्हणे या लव्ह ड्रॉप्समध्ये असतात. अगदी तसेच संपूर्ण सिगारेट मध्ये जी किक बसत नाही, ती किक म्हणे त्या शेवटच्या एका कश मध्ये असते.
अर्थात हे आखरी कश त्याला फुकटात मिळत असल्याने ते तो घ्यायचा हे आम्हाला सगळ्यांना माहीत होते. बाकी तो सांगत असलेली थेअरी निव्वळ बहाणा होता. रोज-रोज याला कोण पैसे देणार? त्यामुळे मग या आखरी कशाचा फंडा त्याने सुरू केला होता.

हा मुलगा स्वभावाने खरोखर चांगला होता. मात्र केवळ हे एक व्यसन त्याच्या सर्व चांगुलपणावर पाणी फेरत होते. त्याला आम्ही बरेचदा समजावून सांगायचा प्रयत्न केला, मात्र आज सोडतो, उद्यापासून बंद, ही आजची एकच शेवटची असे म्हणत त्याने स्मोकिंग सुरूच ठेवले. आमचे त्याला समजावणे आणि त्याचे तरीही स्मोक करणे हे एक रुटीन झाले होते. आम्ही देखील त्याकडे फारसे गांभीर्याने कधी पाहिले नाही. तोंड देखले समजावायचे म्हणून समजावायचे, आणि त्यानेही कधी हे समजावणे फारसे गांभीर्याने घेतले नाही.
आमचे शेवटचे वर्ष सुरू होण्याआधी जवळपास महिना-दोन महिन्यांच्या वार्षिक सुट्ट्या लागल्या होत्या. प्रत्येक जण आपापल्या घरी निघून गेले, तोही गेला. मग जेव्हा पुन्हा कॉलेज सुरू झाले आणि तो परत आला तेव्हा आम्हा सर्वांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला! त्याने स्मोकिंग पूर्णपणे बंद केले होते, हे काहीतरी नवीनच होते.

आम्ही त्याला मुद्दाम कॉलेजच्या गेटवर गाठून ‘एक रुपया हवा का?’ असा प्रश्न करायचो. मात्र तो, ‘नही यार अब नही चाहिये’ असं म्हणायचा. झाला तो बदल नक्कीच चांगला होता त्यात वाद नाही, पण तरी हे घडलं कसं ही उत्सुकता होती. कॉलेज ग्राउंड वरील मुलं देखील यार आजकल तुम आखरी कश लेने नाही आते, असं विचारायची. पण तो ‘अब जरूरत नाही’ असं काहीसं उत्तर देऊन निघून जायचा. काही दिवसांनी इतरांनी हा विषय सोडून दिला. मला मात्र हे नेमकं कसं घडलं याची उत्सुकता कायम होती. म्हणून मी त्याला एकट्याला गाठून विचारले, आणि त्यावर त्यांनी जी हकीकत सांगितली ती सुन्न करणारी होती.

मुळात त्याची घरची परिस्थिती ही हालाखीची होती. हा अभ्यासात बरा असल्याने त्याच्या वडिलांनी चार ठिकाणी पैसे मागून याला शिकायला इथे परगावला पाठवलं होतं. त्याचे वडील रिक्षा चालवायचे. एक मोठा भाऊ मजुरी करायचा, बहीण घरकाम करायची, त्याची आई वारली होती. अशा परिस्थितीत हा मुलगा शिकेल आणि घरची परिस्थिती बदलेल असे वडिलांना वाटत होते. अर्थात हा त्याला जमेल, झेपेल इतका अभ्यास नक्कीच करायचा. कधी नापास वगैरे झाला नाही. फक्त हे सिगारेटच व्यसन मात्र काही केल्या सुटत नव्हतं. जे पैसे त्याला खर्चाला मिळायचे त्यात हा शौक होण्यासारखा नव्हता. म्हणून मग इतरांच्या सिगारेट मधील ‘आखरी कश’ ही शक्कल त्याने लढवली होती.

यावेळी सुट्टीत घरी गेल्यावर तिथे गावी त्याची पंचायत झाली. याला दोन कारणं होती, एक म्हणजे पैसे. कारण इथे त्याला कॉलेज प्रमाणे कुणाकडून एक-एक रुपया गोळा करता येणार नव्हता, की कोणी आखरी कश सुद्धा देणारा नव्हता. दुसरे म्हणजे गाव छोटे असल्याने नेमकी कुठे जाऊन सिगारेट घ्यावी? हा प्रश्न होता. कारण इथे त्याला ओळखणारे भरपूर होते. पण यावर त्याला एक मार्ग सापडला त्याच्या गावातील त्याचा एक मित्र होता जो शेजारच्या गावात कामाला जायचा. हा त्याच्यासोबत जाऊन तिथे काहीतरी सोय करून एखादी सिगरेट मिळवायचा. मग रात्री सर्व झोपल्यावर ती ओढायचा. एका रात्री त्याच्या वडिलांनी त्याला सिगारेट ओढताना बघितले.

दुसऱ्या दिवशी जेव्हा हा त्याच्या मित्रासोबत जायला निघाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला अडवले व, ‘केवळ एका सिगारेटसाठी का त्या मित्राची मदत घेतोय?’ म्हणून त्याला थांबवले. ‘अशा कामांसाठी उगाच कुणाचे उपकार का घेतोस? तुला हवे तर मी रात्री एक पाकीटच तुला आणून देतो’ असं म्हणून ते रिक्षावर निघून गेले. वडिलांना हा प्रकार समजल्याने तो तसाही थोडा भांबावला होता. त्यातच एक वेगळीच आणि भयंकर घटना घडली. त्याच्या वडिलांचा त्याच दिवशी एक्सीडेंट झाला व ते वारले…
सकाळीच अशा कामांसाठी कुणाची मदत घेऊ नको सांगणारे वडील परतच आले नाही… त्यांच्या खिशात एक सिगारेटच पाकीट होतं ते त्याच्यासाठीच घेतलं होतं.

आपल्याला शिकायला मिळावं म्हणून मेहनत घेणारे वडील, भाऊ, आणि बहीण…. जर मदत मागायची तर योग्य कामासाठी मागावी नाही तर माणसाची इज्जत राहत नाही ही शिकवण त्यांनी दिलेली. माझ्यासाठी चार ठिकाणाहून पैसे गोळा करून ते मला शिकवत होते, मी मात्र केवळ माझ्या चैनीसाठी धडपडत होतो…
त्यादिवशी वडिलांच्या चितेवर मी ते पाकीट फेकून दिले. आता यापुढे ‘आखरी कश’ बंद. अशी प्रतिज्ञा केली. तो हे सर्व सांगत होता आणि मी सुन्न होऊन ऐकत होतो. कधी-कधी अगदी साध्या सरळ वाटणाऱ्या आयुष्यात, किंवा घटनांमध्ये किती वेगवेगळे पैलू असतात. घरातील शिकू शकणाऱ्या मुलाला शिकवण्यासाठी धडपड करणारे वडील, भाऊ व बहीण. त्यांची ती तळमळ. आणि याला असलेले हे व्यसन. आपण बऱ्याच गोष्टी छोट्या म्हणून दुर्लक्षित करतो, पण जेव्हा वर्मावर घाव बसतो तेव्हा मात्र अशा छोट्या-छोट्या गोष्टी अधोरेखित होतात.
‘आखरी कश’ माझ्या बापापेक्षा, माझ्या भावा आणि बहिणी पेक्षा मोठा आणि महत्त्वाचा नाही, असं म्हणणारा तो आज वेगळाच भासत होता…. जबाबदारीची जाणीव माणसाला पूर्णपणे बदलून टाकते. ‘एक रुपया है क्या?’, ‘आखरी कश देना.’ म्हणणारा हा तो उरलाच नाही.

क्रमशः

— लेखन : किरण आचार्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on सुभाषित विवेचन : 2
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on शिक्षण : भारतीय मानसिकतेचा शोध