“अनोखा प्रवास”
रोहित चा स्वतःच्या मोठा बंगला होता. अनेक चार चाकी गाड्या दिमतीला होत्या. घरात भरपूर नोकर चाकर. हे सर्व कोणालाही हेवा वाटावा, असेच होते.
पण…..सत्य काही वेगळेच होते….
एवढ्या मोठया घरात तो मात्र एकटा. हा निवांतपणा नव्हता…हवा हवासा एकांत ही नव्हता…. होता तो फक्त एकटेपणा..
मला काय मिळाले व इतकी वर्षे काय गमावलं ते सांगण्यासाठी त्याने स्वतःची गोष्ट लिहायला सुरुवात केली…..
मी आयुष्यभर खूप कष्ट केले. बँकेत अनेक एफडी देखील आहेत. भरपूर संपत्ती, सोन, जमिनी, अनेक ठिकाणी फार्म हाऊस. मात्र हे सर्व करता करता वय कधी गेले हे कळलेच नाही.
तेव्हा नुसते धावत होतो पैसे कमवत होतो सतत उद्याचा विचार त्यामुळे वर्तमानात जगायचे राहून गेले. एक झाली की दुसरी प्रॉपर्टी एवढेच केले. मिळवण्याचा अतिरेक…
मीच किती हुशार, मीच बरोबर, माझेच खरे, मी केले…सतत मी आणि मी….
समजूतदार बायको व दोन मुले होती.
मात्र ! कुटुंबासाठी वेळ दिला नाही. मित्र परिवार जोडला नाही फक्त काम एके काम. सतत धावाधाव, पळापळ व चढा ओढ.
फक्त बचत आणि बचत. उद्या जाऊ नंतर कधीतरी असे म्हणत सगळ्या गोष्टी टाळायचा. कधी फिरायला जावे, एखादी सहल देखील केली नाही. सतत नकार घरातील मंडळी मागे लागायचे मुले हट्ट करायचे वेळ नाही असे म्हणायचा. मुलांनी अपेक्षा सोडून दिल्या कंटाळले होते माझ्या वागण्याला. घाबरत असल्याने कधी बोलले नाही.
मी घरात आलो की निरव शांतता जे ते आपल्या खोलीत कधी एकत्र जेवण नाही गप्पा गोष्टी नाही. संवाद हरवला होता त्याबरोबर कुटुंबाचे सुख देखील.
मित्र मंडळी देखील अनेक वेळा बोलवायचे. उगाच वेळ वाया जाईल खूप खर्च होईल म्हणून कधीच गेलो नाही. ते ही बोलवायचे बंद झाले.
माझ्या कामात इतका व्यस्त होतो कोणाकडे गेलो नाही कधी कोणाला बोलावले नाही. घराला घरपण राहिले नाही.
कोणाच्या भावनांची कदर केली नाही माझे विश्व हेच माझे जीवन. माणसं जोडता आली नाही पैस्याचा गर्व होतो पैस्याने सर्व विकत घेता येते हा खूप मोठा गैरसमज.
खरे तर दोष माझा होता. सतत मी, माझे काम, माझा वेळ किती मौल्यवान आहे असे सांगायचो, सतत मीटिंग ते टार्गेट्स, माझे स्वप्न मोठेपणा या मध्येच राहिलो.
आज चूक कळाली…. पण वेळ निघून गेली. बचत पाहिजे उद्याचा विचार ही केला पाहिजे. नाही का…? पण किती त्याचा अतिरेक केला. शेवटी अती तेथे माती म्हणतो ना तेच झाले. मात्र कोणी अशी चूक करू नये असे वाटते.
प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे तो साजरा करता आला पाहिजे. थोडा वेळ कुटुंबासाठी, मित्र परिवारासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी देता आला पाहिजे हे कधी कळालेच नाही.
खूप मोठ्या कंपनीत कार्यरत होतो. खूप मोठे पद देखील होते. मी म्हणेल तेच खरे म्हणून मुलं दुखावली गेली. बायको नेहमी सांगायची असे करू नका…पण तिला नेहमी गप्प केलं. ती तरी बिचारी काय करणार….घरातील कोणाचे मत कधी जाणून घेतले नाही त्यांना समजून घेतले नाही.
मुलं जसजशी मोठी झाली आमचे वाद होऊ लागले ते मला सोडून दूर गेले. त्यावेळी माझा अहंकार मला कमीपणा घेऊन देत नव्हता. हे सगळं मी कुटुंबासाठी तर करतो ना…..त्यांच्या उज्वल भविष्यासाठी. माझी काय चूक….?
बचत व खर्च याचा समतोल साधता आला नाही.
उत्पनाचा किमान थोडा भाग आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी खर्च केला पाहिजे हे लक्षात आले नाही. बायको नाईलाज म्हणून माझ्या सोबत राहिली सामाजिक प्रतिष्ठा लोक काय बोलतील म्हणून….
लग्न समारंभात जाणे, सहलीला जाणे, सिनेमा पाहणे म्हणजे रिकाम्या लोकांची काम असे माझे ठाम मत. सण वार असताना देखील अनेक वेळा बाहेरगावी असायचो.
फक्त प्रोमोशन यातच सदैव गुंतून राहिलो. आता बायकोने देखील स्वतःचे सामाजिक विश्व निर्माण केले. स्वतःला कामात गुंतून ठेवले. आज तिच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही.
शेवटी काय मी जे दिले तेच मला मिळाले. सगळं आहे पण सोबत कोणाची नाही.
खूप पैसे कमावले पण त्याचा उपभोग घेता आला नाही याची आज खंत वाटते. मी खरे तर जगलोच नाही.
जीवनात खूप गोष्टी गमावल्या मुलांसोबतच्या आठवणी ते क्षण माझ्या वाटेला आले नाही माझ्या हट्टी स्वभावामुळे.
हे सगळं गेलेलं पैस्याने नाही विकत घेता येत.
खूप उशीर झाला पण जायच्या आधी कोणती खंत नको….. म्हणून मी एक निर्णय घेतला. आज मुलांना बोलवून घेतले आईसाठी ते आले देखील सर्वांची माफी मागितली माझी चूक कबूल केली.
आईसाठी मुलांनी सगळं विसरून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आज बायकोचा चेहरा फुलला होता आनंदाश्रू वाहत होते एकत्रित राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. ते समाधान पैस्यात मोजता येत नाही याची जाणीव झाली.
मुलांनी व सुनांनी व्यवसाय चालू केला ते त्यांचे स्वप्न होते. आज मी भक्कमपणे त्यांच्या सोबत होतो. जेव्हा पाहिजे तेव्हा मार्गदर्शन करत होतो. आज त्यांचा व्यवसाय छान चालत आहे.
आज मी व माझे कुटुंब सिनेमा पहायला जातो, सहलीला जातो सामाजिक कार्य देखील करतो. आज खरा आनंद कळला होता. आपल्या माणसांवर खर्च करताना त्यांना मिळणारा आनंद मी अनुभवत होतो.
अनेक गोष्टी मिळवण्यासाठी पैसा लागतो हे खरे असले तरी पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे लक्षात आले आहे. आज नव्याने जगण्याची सुरवात केली होती. या संधीचा सोने केले उशिरा का असेना पण जगतो एक सुंदर आयुष्य.
मनुष्य जन्म म्हणजे परमेश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. जीवन भरभरून जगता आले पाहिजे. आनंद घेता व देता आला पाहिजे. सर्व गोष्टींचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे हे अनुभवाने शिकवले होते.
खूप उशीर झाले पण….आज सुना व नातवंडांसोबत रमत आहे. सर्व दुखणी कमी झाले नवे मित्र जोडले आम्ही दोघे योगाला जातो तेथे आमचा छान परिवार झाला आहे.
आज आमच्या कुटुंबाची एक ट्रस्ट चालू केली आहे जेथे वृद्धाश्रम चालवत आहे. त्यांची उत्तम व्यवस्था करत आहोत त्यांच्यासोबत सहलीचा आनंद घेत अहो. आज जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
आज जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला जणू जगण्याला एक दिशा मिळाली.
चुकलो तर माफी मागतो माफ ही करतो, लोकांचे आभार मानतो स्वभावातल्या या परिवर्तनामुळे अनेकांशी जोडले गेलो.
आज रोहितने नात्यांना प्राधान्य देऊन सर्व गोष्टींचा जणू समतोल साधला होता जणू जीवनाचे त्याला सूर गवसले.
हा प्रवास होता मीपणापासून ते आपलेपणाचा व स्वार्थपासून तो माणुसकीचा.

— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
