Homeलेखसंगती रंग : २३

संगती रंग : २३

लाखात एक

रुपयाची किंमत कमी होते आहे, ही सगळ्यांचीच तक्रार असते. ती वस्तुस्थितीदेखील आहेच ना. पण लाखात एक असे म्हणतो आपण, त्या लाखाची किंमत मात्र आहे तीच आहे अजूनही. लाखात एक अशी देखणी असते. माणूस भला लाखात एक असतो. आमच्या गावी भल्या माणसाला लाख माणूस असेही म्हणत.

सांगायला एक मजेशीर गोष्ट आहे माझ्याकडे, ती अशी की मी आहे लाखात एक. नुकतेच कळते आहे हे मला ! किस्साच आहे तो…
नमुनेदार डॉक्टर, त्यांची पेशंट्स हॅण्डल करण्याची घाई, पेशंट माणूस असतो ही गोष्ट विसरण्याची (!)
मोठी चूक, पेशंट्सना अक्कल नसते हा समज असे अनुभव नवीन नाहीत. आम्हाला आयुष्यात सगळे म्हणजे सग्गळेच डॉक्टर उत्तम भेटले, असे म्हणणारा विरळाच ! नयेच म्हणू, कारण खोटे कधी बोलू नये !

मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. रेग्युलर चेकअप साठी.
एक आठवड्यापूर्वीचे रिपोर्ट होते. प्लेटलेट् काउंट होता, ३३००० !
“काही होतं का तुम्हाला ? चक्कर किंवा पोटदुखी ?” नव्हते तसे काही.
परत रिपोर्ट काढले ४७००० !
१५०००० हव्या असतात प्लेटलेट्स. कोरोना काळात प्लेटलेट्, अँटीबॉडीज हे शब्द जास्तच ठाऊक झाले आहेत.
मी धाडस करून म्हटले, “खालच्या ओळीवर लिहिले आहे मॅन्यूअल काऊंट १८०००० !” (मी ते पाहिल्याने निर्धास्त होते.)

“मशीन काऊंट बघायचा. थोडे दिवस मॉनिटर करत रहा.”

मॉनिटर करत राहिले. रिपोर्ट मध्ये प्लेटलेट्स काउंट एक लाखाच्या वर कधी जातच नसे ! जो कमीत कमी १५०००० हवा.
मग डॉक्टरांनी लिहून ठेवले खूप मोठे रोगाचे नाव.
“म्हणजे काय ?“
“तुमच्या प्लेटलेट्स कुणीतरी ‘शत्रू’ खातो आहे ! ताप नाही काही लक्षण नाही. तुमचे ब्लड क्लॉट होते आहे. हा प्रॉब्लेम असतो काहीना !“
डॉक्टर म्हणाले स्प्लिन सोनोग्राफी करा. स्प्लिन म्हणजे मराठीत प्लीहा. सोनोग्राफीमध्ये काही दोष आढळला नाही.
मग डॉक्टर म्हणाले, “स्टिरॉइड्स चालू करा.” स्टिरॉइड्स म्हटल्यावर मला धडकी भरली. केमिस्ट ओळखीचे असल्याने म्हणाले, ”नका घेऊ स्टिरॉइड्स. तुम्हाला होत तर नाही काही.”
डॉक्टरांनी सांगितलं आहे, ”असिम्टोमॅटिक प्रॉब्लेम आहे. समजणार नाही, पडाल चक्कर येऊन.”

स्टिरॉइड्स घेण्याआधी मी वेगळ्या लॅब मध्ये टेस्ट केली. वाढल्या होत्या प्लेटलेट्स !
पुन्हा एकदा भेट घेऊन ही प्रगती डॉक्टरांना सांगितलीच.
“अशी लॅब हवी का तुम्हाला जी रिपोर्ट मनासारखा देईल ? कधीतरी वाढतात त्या. बदलू नका लॅब. ग्राफ कळला पाहिजे. स्टिरॉइड्स घेणे टाळू नका.”

मग काय ! स्टिरॉइड्स घेतल्या, प्रचंड साइड इफेक्ट्स झाले. प्लेटलेट्स काउंट मात्र जैसे थे.

डॉक्टर म्हणाले होते, आता आपल्याला नाही म्हणजे बोन मॅरो करावी लागेल. त्यामुळे आता काय वाढून ठेवलं आहे, ह्या भीतीच्या छायेत मी सतत जगत असे. पपई खा, किवी खा ! शिवाय अधून मधून रिपोर्ट काढायचे आणि आता मध्यंतरी ब्लड काउंट चेक केला ! २४००० ! मला पूर्ण नॉर्मल वाटते आहे. पण रिपोर्ट डेंजर !
पुन्हा स्टिरॉइड्स ? की आता बोन मॅरो ?
मी धीर धरून दुसऱ्या दिवशी, वेगळ्या लॅब मध्ये टेस्ट केली. टेस्ट साठी ब्लड घेणाऱ्या टेक्निशियनपाशी २४००० हा स्कोअर मी सांगितला ! (ह्याच लॅबमध्ये माझे रिपोर्ट चांगले आले होते पण डॉक्टर लॅब बदलू नका म्हणाले होते.)
तातडीचा रिपोर्ट मागवला. काऊंट १८०००० ! ग्रेट.

मी लॅबमध्ये फोन करून बोलले. ते म्हणाले संध्याकाळी भेटायला येऊ शकता. मी इतके वर्षांची रिपोर्टची भेंडोळी घेऊन गेले. पॅथॉलॉजिस्टना भेटले. त्यांनी ग्राफ काढून ठेवला होता. “हे बघा रिपोर्ट सकाळी १८०००० हा काउन्ट कमी होत होत संध्याकाळ पर्यंत १२००० झालेला आहे. तुमचे रक्त लगेच साकळते. ताबडतोब स्लाईड बनवली की नॉर्मल रिपोर्ट येणार.
काही एक प्रॉब्लेम नाही ! एक पॅटर्न आहे. खूप दुर्मिळ असा फिनॉमिना आहे. ज्यात प्लेटलेट्स लगेच एकत्र जमा होतात. प्लेटलेट्सचा रंगसुद्धा वेगळा असतो ! लाखात एक अशी केस असते ! हा प्रॉब्लेम नाही.”
मी तर खूशच झाले.

“वा ! प्रॉब्लेम नाही, शिवाय मी लाखात एक !”

“EDTA फिनॉमिना म्हणतात. खूपच दुर्मिळ. आधीच्या लॅबने EDTA फिनॉमिना असे लिहिले सुद्धा आहे !”
“त्या डॉक्टरांना ठाऊक नसेल ?”
काय बोलणार अशा अर्थी, पॅथॉलॉजिस्ट फक्त हळूच हसले.

मी खात्रीने सांगते डॉक्टरांचे लॅबशी काही नाते नाही. दोन्ही लॅब मीच निवडल्या होत्या. पण लॅब बदलून तुम्हाला रिझल्ट चांगले हवे का म्हणणे, हे अज्ञान टू मच आहे. हा इगो सुद्धा असावा. मॅन्यूअल काऊंट आणि मशीन काऊंटमधला ठळक फरक दिसत असताना, पेशंट स्वतःहून ते लक्षात आणून देत असताना विचार न करणे हे काही चांगले लक्षण नाही ! दुर्मिळ केस किंवा अपवाद अभ्यास करताना ठसतो, तसे का झाले नाही ? हे अभ्यास करताना झालेले दुर्लक्ष आहे !

थोडक्यात लॅब नाही तर, डॉक्टर बदलायला पाहिजे ! तसा तो बदलला.
तब्बल सात वर्षे ह्या दडपणात होते मी. सुटल्यासारखे वाटले मला. हा आनंद आणि अनुभव शेयर करावा असे फार वाटले.
आता नवीन डॉक्टर शोधले. त्यांनी EDTA असे वाचले मात्र. बेल वाजवून त्यांच्या दोन असिस्टंटना बोलावून घेतले, ”ही केस बघून ठेवा ! रेअर केस ! लाखात एक असते ही.”

तर एकूण, क्लिनिकली प्रूव्हड मी लाखात एक आहे !
क्रमशः

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments