मॅकॉलेच्या 1835 च्या “Minute on Education” पासून आपल्या शिक्षणाची सुरुवात झाली. त्याचा उद्देश स्पष्ट होता – “भारतीय रक्त आणि रंग, पण इंग्रजी विचार आणि बुद्धी असलेला वर्ग तयार करणे.”नाम्हणजेच प्रशासनासाठी “एजंट” तयार करणे.
या व्यवस्थेमुळे आपल्याला एक मोठा फायदा झाला. आज जगात इंग्लंड,अमेरिका, ऑस्ट्रेलिया या सर्व देशांपेक्षा जास्त लोक इंग्रजी बोलणारे, लिहिणारे आपल्याकडे आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारत “अपरिहार्य” झाला. यासाठी मॅकॉलेचे आभारही मानावे लागतील.
पण याबरोबरच एक मोठी किंमतही मोजली. भाषा आली, पण बरोबर “एथॉस” म्हणजे वेळेची शिस्त, सार्वजनिक वर्तनाची शिस्त, कामाची प्रतिष्ठा ही संकल्पनाही आली. आपल्या पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीत शास्त्र होते, नीती होती, पण ती सर्वांसाठी नव्हती. शेतकरी, बलुतेदारांसाठी घरगुती प्रशिक्षण होते जे त्या काळाला पुरेसे होते. पण राष्ट्र-स्तरावरील उद्योग, कायदा, रेल्वे या नव्या व्यवस्थेसाठी ती अपुरी पडली.
आज आपली समस्या नेमकी काय आहे ? विषय शाळेत घातल्याने संस्कार होत नाहीत. कारण संस्कार घरातून, समाजातून आणि उदाहरणातून येतात. परदेशात गेलेला भारतीय भिंती खराब करत नाही, सिग्नल तोडत नाही. भारतात परत आल्यावर मात्र “पकडणार कोण?” या भावनेने सर्व नियम तोडतो. याचा अर्थ स्पष्ट आहे – संस्कार एकटे अपुरे आहेत. दंड आणि डंडा याची भीती असेल तरच माणूस शिस्त पाळतो. आपली लोकसंख्या प्रचंड आणि नियामक यंत्रणा तुटपुंजी असल्याने ही भीतीच निर्माण होत नाही.
मग उपाय काय? माझे ठाम मत आहे की भारतीय मानसिकता ही “उत्कृष्ट फॉलोवर” ची आहे. आम्हाला योग्य नेता मिळाला तर आम्ही देशाचे सोने करू. महात्मा गांधी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. बंदूक नव्हती, फक्त सत्य होते. तरी 40 कोटी लोक त्यांच्या मागे गेले.
आज जग पुन्हा त्याच वळणावर आहे. कृत्रिम करार, खोटेपणा आणि सत्तेच्या राजकारणाने जग थकले आहे. जगाला आता उत्तर हवे आहे – “मी कोण आहे ? या विश्वात माझे स्थान काय ? आनंदाने सहजीवन कसे जगायचे ?” या प्रश्नांचे उत्तर तंत्रज्ञानात नाही, ते भारतीय तत्त्वज्ञानात आहे – “वसुधैव कुटुंबकम्”.

म्हणूनच आज भारताकडे केवळ अर्थव्यवस्था म्हणून नव्हे, तर “जीवनशैली” देणारा देश म्हणून जग बघत आहे. जर नेतृत्वाने स्वतःच्या आचरणातून प्रेम, शिस्त, सेवा आणि सत्य हे दाखवले, तर 140 कोटी भारतीय 6 महिन्यात बदलतील. कारण आम्ही फॉलो करायला तयार आहोत.

शेवटी निष्कर्ष एकच: आधी डंडा आणि आदर्श, मग संस्कार. इंग्रजांनी आम्हाला शिस्त दिली पण आत्मा दिला नाही. आमच्याकडे आत्मा आहे. आता दोन्हीची जोड झाली पाहिजे. तरच भारत केवळ महासत्ता नाही, तर “विश्वगुरु” होऊ शकेल असे मला वाटते. याबद्दल आपल्याला काय वाटते? हे जरूर कळवा.
जय हिंद.

— लेखन : निवृत्त विंग कमांडर, शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

माननीय शशिकांत ओक सर ह्यांचा लेख खूप प्रगल्भ आहे, ह्यावर विचार होणे खूप गरजेचे आहे