अँकरेजवर आमची लोकपालक पुढच्या संदेशाची वाट पहात सेलिंग साठी तयार होऊन उभी होती. माझे स्वयंपाकाचे प्रयोग हळूहळू सुरूच होते. कधी थोडी भाजी कर किंवा भाताचा प्रकार कर ! मुख्य म्हणजे पॅंट्रीमधे कुक्सनी तयार केलेल्या भाज्यांचा कायाकल्प करून आपल्या आवडीने त्या नव्या बनवणे !
मला जहाजाच्या जेवणाची सवय होत नव्हती. त्यात मी शाकाहारी, त्यामुळे फार पंचाईत व्हायची. कारण आमचे सगळे कुक्स नॉनव्हेज बनवण्यात एकदम माहीर. त्यामुळे माझ्यासारख्या घासफूस खाणाऱ्यांचा फारच प्रॉब्लेम !
रोलिंग सुरू असताना मला स्वयंपाक करणे अशक्यच असायचे. कुक्सच्या भाज्या तर जायच्या नाहीत. नीट पोटभर जेवण व्हायचं नाही. मग एक दिवस मुकुंदनी सांगितलं, “आज चिकन फार मस्त बनवलं आहे. तू पोळीला लावून थोडासा नुसता रस्सा खाऊन बघ.” तो चिकनचा रस्सा खाणं हे माझ्यासाठी एक दिव्यच होतं. पण जहाजावर तगून राहण्यासाठी पोटात जेवण जाणं तर गरजेचं होतं.
शेवटी एकदा मन घट्ट करून एक चमचाभर रस्सा आरखून-पारखून घेतला. कुठे चिकनचा कण येत नाही ना….! त्या बरोबर पोळी खाल्ली. वाटलं
“अरेच्या आपल्याला वाटतं तितकं काही वाईट नाहीये बर का हे”
मग पुढे हळूहळू जेवणाबरोबर लहानसा चिकन पीस असा माझा नॉनव्हेज खाण्याचा दीक्षांत समारंभ पार पडला.
पुढच्या प्रवासाची सगळेजणच आतुरतेने वाट बघत होतो. मग तोच तोच सिनेमा परत पाहणे, मुकुंदना वेळ मिळेल तेव्हा कधी कधी टेबल टेनिस खेळून यायचो. संध्याकाळी खालच्या डेकवर फेरी मारायची.
रिक्रिएशनरूम मध्ये थोडीशी पुस्तकं होती, अशीच कोणीतरी आणून टाकलेली ! त्यात पर्ल बकची प्यूनी नावाची कादंबरी मिळाली. मी ती आधाशा सारखी वाचून काढली. वयाच्या आठव्या वर्षी दासी म्हणून एका धनाढ्य ज्यू घरात विकली गेलेली एक चिनी अनाथ गरीब मुलगी… प्यूनी !
तिचं हळूहळू मोठं होणं, वयात येणं, समंजसपण, त्याच श्रीमंत घराच्या एकुलत्या एका डेव्हिड नावाच्या वारसावर तिचं बसणारं प्रेम, ते असफल होणं अपरिहार्यच ! त्या प्रेमासाठी तिनं केलेला अलौकिक त्याग, बौद्ध भिक्षुणी बनून सर्वापासून स्वखुशीने दूर होणं !
पर्ल बकचं चित्रमय वर्णन, सोपी हृदयाचा ठाव घेणारी भाषा, आणि माणसं वाचायची अलौकिक प्रतिभा सारंच भारावून टाकणारं होतं. ती प्यूनी अजूनही माझ्या मनात घर करून आहे.
अधून मधून समुद्र शांत असायचा. डेक वरून दिवसा बाहेर पाहिलं की सूर्याच्या किरणात झळाळणारा समुद्र चहू बाजूला पसरलेला असायचा. रात्रीच्या शांततेत यंत्रांच्या आणि लाटांच्या आवाजाची लय लागलेली असायची. सर्वत्र पसरलेलं चांदणं बेडरूमच्या पोर्टहोलमधून आत डोकावायचं आणि बिछान्यावर नाचत राहायचं !
चार दिवसांनी अचानक कंपनीचा हुकूम आला की लोक पालकची नेमणूक हल्दिया आणि तुतीकोरिन या run वर झालेली आहे. ही दोन्ही बंदरं भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात आहेत.

लोकपालक नेहमीच परदेशात असायची. पण यावेळी मात्र तिच्या आणि माझ्या ही नशिबात आणि माझ्या पहिल्याच जहाजाच्या प्रवासात कोळसा वाहण्याचं काम करायचं होतं. हा सगळ्यात बेकार रन होता.
हंsssss ! आलिया भोगासी असावे सादर.
तर आता हल्दियाला प्रयाण करायचं होतं. मनात गाणं वाजायला लागलं….
हलदीया ! दर्द लिया
बंगाल-बिहार इथे दगडी कोळशाच्या – कोलच्या मोठमोठ्या खाणी आहेत. त्यातून कोलचे प्रचंड उत्पादन होतं.
हल्दिया हे बंदर कोलकात्यापासून सुमारे १०५ किलोमीटरवर हुगळी आणि हल्दी नद्यांच्या संगमाजवळ वसलेले आहे. प्राचीन ताम्रलिप्त बंदराचा हा एक भाग आहे असं समजलं जातं.
इथे समुद्राची खोली भरपूर आहे. त्यामुळे मोठ्या जहाजांना (Deep-draft vessels) येथे येणे सोपे जाते. आजूबाजूच्या खाणीतून येणारा कोल व इतर खनिज संपत्ती या बंदरातून जहाजावर भरणं सोपं होतं.
बोटीने नांगर उचलले आणि हल्दियाकडे प्रयाण सुरू झालं. ताबडतोब pilot on board चा हुकूम आला. Sailing सुरू झालं, कुठे…..तर कधी नावही न ऐकलेल्या हल्दिया नावाच्या एका लहानशा बंदराच्या दिशेने !
हल्दियात तिथे पोहोचलो. आता मात्र बंदरात जेट्टीला जहाजाला डायरेक्ट प्रवेश मिळाला.
किनाऱ्याला लागताच एजंट जहाजावर आला. त्याच्या हातात पत्रांचा गठ्ठा होता. सगळ्यांच्या घरून आलेली पत्रं !
घरची पत्रं घ्यायला सगळेच जण अधीर होते. पत्र मिळाल्याबरोबर दोन मिनिटं काम थांबवून आधी घरची ख्याली-खुशाली प्रत्येकाने पाहिली. घरच्या बातम्या एकमेकाला सांगितल्या.
आम्हाला ही घरून आई-बाबा वृंदा यांची पत्र आलेली होती. किनाऱ्यावर येताच घरची पत्रं मिळणं हा जहाजावर फार मोठा सोहळाच असतो.
दुसऱ्या दिवशी सकाळपासून loading – दगडी कोळसा – कोल – जहाजाच्या हॅचीस मध्ये भरायचं काम सुरू होणार होतं. पोचल्याबरोबर डेक ऑफिसर्सची खूपच धावपळ सुरू झाली. सर्व हॅचिसची अजस्त्र सरकती झाकणं उघडली गेली. त्याची परत तपासणी होऊन सर्व ठीक ठाक आहे ना ते पाहिले जात होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी हॅचीस भरण्याचं काम सुरू झालं.
Coal loading हा खूप जोखमीचा कार्यक्रम असतो. बाहेर जेट्टीवर थोड्या अंतरावर उंचावर महाकाय coal depot उभा होता. त्यात खाणी मधून ट्रकांनी भरभरून आणलेला कोल ओतला जात होता. त्यातून तो सरकत्या पट्ट्यां वरून conveyor belts वरून ‘शिप लोडर’ नावाच्या मोठ्या यंत्रात टाकला जात होता. त्यातून कोलचे ढीग हॅच मध्ये टाकले जात होते.

आपण डब्यात तांदूळ भरताना शिगोशीग झाली की डब्यात हात फिरवून तांदुळाची लेव्हल एकसारखी, सपाट करतो.
इथे हे एवढे मोठे कोलचे डोंगर कोण आणि कसे सारखे…..सपाट करणार ?
त्यासाठी या यंत्राला एक लांब क्रेनसारखा हात होता. तो हॅचीसच्या अंतर्गत भागांपर्यंत पोहोचणारा. कोल जहाजात टाकताना तो एकाच ठिकाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाते. शिप लोडरचा पाईप फिरवून तो सर्व बाजूंनी समान पद्धतीने पसरवला जात होता – Trimming केलं जात होतं.
त्या – conveyor belt चे सटक-फटक आवाज आणि धड-धड-धड असा गडगडाट करत हॅच मध्ये ओतले जाणारे ते कोलचे अजस्त्र ढीग !
एक महाकाय अजबखानाच होता.
कोल हा ज्वालाग्रही पदार्थ. इथे तर त्याचे हजारो टन दगड. त्यातले काही एकमेकांवर घासून, अगर कोलच्या साठ्यात उष्णता निर्माण होऊन ठिणगी पडली तर अग्नी तांडवच व्हायचं. त्यामुळे कोल ओला राहावा, तसेच त्याची धूळ उडून हवेचे प्रदूषण होऊ नये म्हणून कन्व्हेअर बेल्टवर अखंड पाण्याचे फवारे मारले जात होते. तरीही त्याची काळी धूळ वातावरणात भरून राहिलेली होती. स्वच्छ रंगवलेली जहाजाची डेक्स त्या धुळीनं काळी होऊन गेली होती.
हे loading चं काम पाच-सात दिवस सुरू होतं. हल्दियाला पोचल्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावात चक्कर टाकायला गेलो. जेट्टी पासून गाव लांब होतं. सायकल रिक्षानी जावं लागत होतं.
आम्ही दोघं, हरी, एक कॅडेट, इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणजे बत्तीसाब आणि नवा आलेला पंजाबी फिफ्त इंजिनियर अनिल मदान असे सगळेजण गावात गेलो.
गावात जायच्या वाटेवर दोन्ही बाजूला झुलणारी हिरवीकंच शेतं, झाडांच्या राया, मधे-मधे लहानशा झोपड्यांच्या वस्त्या. भरपूर तळी आणि त्यात उमललेली कमळं. हे सारं वनश्रीचं संपन्न विशाल साम्राज्य !
बंगालचा हा सगळा भाग दलदलीचा. भात आणि मासे हे यांचं मुख्य अन्न. त्यामुळे भात शेती आणि मासेमारी हे मुख्य व्यवसाय. हा प्राचीन ऐश्वर्याशाली मगधाच्या साम्राज्याचा श्रीमंत भाग.
म्हणतात की जगात असं एकही खनिज नाही जे मगधात मिळत नाही. अत्यंत उपजावू माती. म्हणे मुठीत धान्य घेऊन नुसतं फेकलं तर पोतभर धान्य त्यातून सहज उगवतं इथे. काहीच मशागत न करता !
हल्दिया गावात पोहोचलो. अगदी खास भारतीय छोटासं खेडं.गरीब वस्ती. मातीची शाकारलेली घरं, गोठे ,कोंबड्या, वाळत घातलेले किंवा टोपल्यात भरलेले मासे, उंच-सखल मातीचे रस्ते. काही थोड्याच ठिकाणी डांबरीकरण झालेलं. बंगाली पद्धतीने साड्या नेसलेल्या बायका. विड्या ओढत बसलेले पुरुष, उघडी बागडी लहान मुलं ! ते सारे आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते.
ते १९७९ साल ! त्यावेळी हल्दिया बंदराचा विकास आणि औद्योगिक प्रगतीची नुकतीच सुरुवात होत होती. तिथे येणारी जहाजं आणि गावात जहाजावरून येणारे लोक हा त्या मंडळींसाठी आकर्षणाचा, उत्सुकतेचा विषय होता. गावात वीज होती. दुकानात मिणमिणते बल्ब लागलेले. पत्र्याची शेड मारून उभारलेली मातीच्या भिंतीची दोन-तीन लहानशी दुकानं होती.
आठ दहा दिवसांनी जहाजाच्या पत्र्याच्या डेक वरून आपल्या जमिनीवर उतरलो होतो. तो जमिनीचा स्पर्श किती मायेचा होता. धरणीमायला मनोमन नमस्कार केला आणि म्हटलं
पाद : स्पर्शम् क्षमस्व मे |
गावात लहानशी चक्कर टाकून जहाजावर परत आलो.
पुढच्या सहा सात दिवसात चारही हॅचेसचं loading चं काम पूर्ण झालं. हॅचिसची सरकती दारं घट्ट बंद झाली आणि जहाजाचं सुकाणू तुतीकोरीनच्या दिशेने वळलं. सुमारे साडेतीन दिवसांचा प्रवास !
बंगालच्या उपसागरात भारताच्या पूर्व किनाऱ्यावर दक्षिणेकडच्या एका टोकाला असलेलं हे एक महत्त्वाचं बंदर !

तुतीकोरीन खरंतर पूर्व किनाऱ्यावरचंच बंदर ! पण तिथे सरळ पोहोचता येत नाही. कारण भारताचे दक्षिण टोक आणि श्रीलंका यात रामरायाने बांधलेला पूल आहे. चुनखडीचे खडक आहेत. तिथून जहाजे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे श्रीलंकेला पूर्ण वळसा घालून परत उजवीकडे वळून मन्नारच्या आखातात पाल्कच्या सामुद्रधुनीच्या खाली पूर्व किनाऱ्यावरच्या या बंदरात यावं लागतं. यालाच कदाचित द्राविडी प्राणायाम म्हणत असावेत !
सेलिंग सुरू झालं. माझ्या आयुष्यातलं पहिलं मोठं सेलिंग… साडेतीन दिवसांचं ! सेलिंगच्या सुरुवातीचे सर्व सोहळे पार पडले आणि अँकरेज पेक्षाही मोठ्या अफाट समुद्रात शिप शिरली.
मुकुंदांचं पहाटे चार ते सकाळी आठ संध्याकाळी चार ते रात्री आठ असं Engine – room मधलं watch keeping सुरू झालं. त्या बाहेरही इंजन रूम मध्ये काम असायचंच.
आता समुद्रात दूर लुकलुकणारे दिवे असलेली जहाजं पण दिसायची नाहीत. आमच्यासारखी एकाकी प्रवास करणारी एखादी शिप क्वचित लांबवर दिसायची आणि पाहता पाहता क्षितिजाच्या पार अदृश्य व्हायची. अधून मधून समुद्र दंगा करायचा. Rolling व्हायचं. पण त्याची सवय होत चालली होती.
केबिनमध्ये एक ट्रांजिस्टर होता. संध्याकाळी मुकुंद इंजिन रूम मध्ये गेले की स्वयंपाक करताना मी जवळच्या पोर्टहोलमध्ये तो ठेवायची. रेडिओ सिलोन थोडा वेळ तरी व्यवस्थित मिळायचं. कधी विविध भारतीची गाणी मिळायची.
संध्याकाळी सातची वेळ असावी. मी त्या रेडिओची बटनं फिरवत होते. त्यावेळी आम्ही श्रीलंकेला वळसा घालून लंकेची राजधानी कोलंबो क्रॉस करत होतो.
अचानक कानावर शब्द आले :
आकाशवाणी सांगली केंद्र.आता सादर करीत आहोत पुणे केंद्रावरच्या मराठी बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत
कानावर गुलाब पाणी शिंपडावं असे ते गोड शब्द ….. मन आनंदानं थुई थुई नाचायला लागलं. आकाशवाणी सांगली केंद्र!
माझ्या गावाहून, माझ्या माहेराहून आलेले ते शब्द….. जिवंत शब्द ! कोणीतरी ते शब्द तिथं या क्षणी उच्चारत आहे, ते माझ्यापर्यंत येत आहेत….
मध्य समुद्रात क्षणात माहेरचं कोणीतरी भेटावं असं झालं आणि डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या !
मी रेडिओकडे वेड्यासारखी बघतच राहिले…. जशी काही जादूच घडली होती.
जहाज पुढे पुढे जात राहिलं, सांगली केंद्राचा आवाज क्षीण होत गेला आणि काही क्षण मिळालेलं ते माहेरपण हळूहळू विरून गेलं !
कधीही बातम्या न ऐकणारी मी आता रोज संध्याकाळी रेडिओ त्या दिशेला ठेवून “आकाशवाणी सांगली केंद्र” एवढे शब्द ऐकण्यासाठी तळमळायची !
खरंच माहेरची ओढ किती विलक्षण असते, किती वेडं करते ती !
या सांगली केंद्राच्या लहरी फक्त श्रीलंकेतील कोलंबोला वळसा घालतानाच थोडा वेळ मिळायच्या.
— तुतीकोरीन ऊर्फ थूथुकुडी :–
तुतिकोरीनला पोहोचलो. पांड्य, चोळ या प्रसिद्ध प्राचीन साम्राज्यातलं महत्त्वाचं बंदर. मन्नारच्या आखातावर वसलेल्या या शहरात समुद्रकिनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात मोत्याचे उत्पादन घेतलं जायचं. त्यामुळे याला मोत्यांचे शहर – pearl City – म्हणून ओळखलं जातं. कोळसा वाहतूक आणि श्रीलंके बरोबर व्यापार यांचं हे मोठं केंद्र.
इथेही आमच्या लोकपालकाची जेट्टी वरती लगेच वर्णी लागली. जेट्टीच्या जवळ शिप हळूच जाऊन सफाईदारपणे उभी राहिली. पहिले सर्व सोपस्कार पूर्ण करून जहाजाचा गॅंग वे खाली सोडला गेला. मार्गदर्शनासाठी आलेला पायलट गाडीत बसून निघून गेला. संध्याकाळ होऊन गेली होती. सर्वच ऑफिसर्स दमले होते.
आता उत्सुकता होती तुतीकोरीन शहर बघायची ! त्यासाठी उद्यापर्यंत थांबावं लागणार होतं.
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
