Homeलेखमाझी जीवन नौका : १५

माझी जीवन नौका : १५

“लोक पालक” : माझं पहिलं सेलिंग”

लोक पालकवर रोजच्यासारखी सकाळची कामांची धांदल उडाली होती. सगळे ऑफिसर्स, क्रू त्यांच्या त्यांच्या ड्युटीवरती हजर होते. लहानपणचा धडा आठवला.

सकाळ झाली
भैरू उठला
औत सोडले
बैल जोडले
शेत नांगरले

जहाजावरचे सगळे भैरू आपापल्या कामावर रुजू होते.

यंत्रांची तीच अंगवळणी पडत चाललेली धडधड, जहाजाची हलकीशी थरथर !
ब्रेकफास्ट करून मुकुंद इंजिन रूमला जायला निघाले. मला म्हणाले, गेले दहा-बारा दिवस कामाने अक्षरशः पिट्टा पडला. इतके रिपेअर्स, मेजर सर्वेज सुरू होते की दिवस रात्र कामं सुरू होती. तू घरी जाऊन आलीस हे बरं झालं. नाहीतर कंटाळली असतीस. पण आता सगळं छान तयार होऊन सेलिंग साठी जहाज एकदम तयार आहे.

जहाजावर रिपेअरच्या कामासाठी कलकत्त्यातून  workshop ची माणसे येत असत. श्री चक्रवर्ती नावाचे गृहस्थ या workshop चे मालक होते. ते साधारण मुकुंदाच्या वयाचे होते.
एक दोनदा त्यांच्याबरोबर  त्यांची बायको आणि साताठ महिन्यांची छोटी मुलगी पण आली होती. मिसेस चक्रवर्तीचं नाव होतं झूमुड ! सडसडीत, उंच, टपोऱ्या डोळ्यांची, गव्हाळ वर्णाची झूमुड खूप गोड होती. झूमुड  म्हणजे पायातले झांजर…. पैंजनियॉं, तिनेच मला हा अर्थ सांगितला होता. खरंच पैंजणासारखी गोड बोलणारी, हसरी हसरी झूमुड मला खूप आवडली.
जहाजावर मी एकटीच स्त्री होते. मला एक छान मैत्रीण मिळाली. ती आली की फार मस्त वाटायचं. माझ्याशी बोलताना ती बंगाली ढंगात हिंदी आणि इंग्लिश बोलायची.
मुकुंद आणि चक्रवर्ती यांचं इंजिनरूमचं काम सुरू असायचं. आम्ही दोघी आमच्या केबिनमध्ये बसायचो. स्नॅक्स खात, कॉफी पीत मस्त गप्पा चालायच्या. तिच्या छोट्या मुलीबरोबर खेळायला मजा यायची. झूमुड बरोबर बाळाच्या दुधाच्या बाटल्या, कपडे असं सामान भरलेली बास्केट असायची !

दुसऱ्या दिवशी मुकुंद आणि हरीची कामाची काही विशेष बोलणी सुरू होती.

दुपारी जेवताना मी घरून आणलेल्या बेसनाच्या लाडूचा समाचार घेताना हरी एकदम म्हणाला, “अभी तक तो कंपनी से कुछ प्रोग्राम आया नही है. शायद अँकरेज में जाकर खडा होना पडेगा ऐसा लगता है”.

जेवणं होत आलेली असतानाच हरीची भविष्यवाणी खरी ठरली.कंपनीचा मेसेज आलाच की आउटर अँकरेज मधे जहाजाला जाऊन उभे राहावं लागणार आहे. दुपारनंतर पायलट येतो आहे.

मी विचारलं, आउटर अँकरेज म्हणजे आता आपण कुठे जाणार आहोत ?
मुकुंद म्हणाले, “आता इथून जेट्टी वरचा मुक्काम हलवून लांब समुद्रात, किनाऱ्यापासून खूप दूर आपल्या जहाजाला जाऊन थांबावं लागेल”

“अहो मग गावात कसं जाणार? किनाऱ्यावर कसे येणार?”
हे हसून म्हणाले
“आपल्याला गावात जाता यावं याच्यासाठी जहाज जेट्टीवर थांबत नाही. तू बघितलंस ना रोज कितीतरी जहाजं जात येत असतात. मालाची ने-आण करतात. अशी माल घेऊन आलेली किंवा घेऊन जाणारी priority ships आली की सध्या काम नसणाऱ्या जहाजांना बाहेर मध्य समुद्रात उभं करतात. तिथे त्यांना काम मिळेपर्यंत वाट बघावी लागते. इथे बंदरात ही पार्किंगचा प्रॉब्लेम असतोच. त्यामुळे महत्त्वाच्या जहाजांना जेट्टी खाली करून द्यावी लागते. आपल्याला किनाऱ्यावर जाण्यासाठी किंवा तेथून जहाजावर येण्यासाठी लहान लॉन्चिसची म्हणजे पडावांची सोय असते. पायलट लॅडर वरून लॉन्च मध्ये उतरायचं. मग लॉन्च किनाऱ्याला जेट्टीला नेऊन सोडते. परत येताना पण लॉन्चनीच यायचं”

जेवणानंतर लगेच sailing ची तयारी सुरू झाली. हरी आणि मुकुंद  इंजिन रूम कडे गेले.

दुपारी चहा पीत होतो तेव्हाच pilot on board असा कॅप्टन कुठार यांचा फोन आला.

अर्थात पायलट म्हणजे काय ? माझा प्रश्न आलाच.
किनाऱ्याच्या जवळून बाहेर समुद्रात जहाज नेत असताना अगर बंदरात येत असताना कोणत्या मार्गाने जावे, वाटेत समुद्राच्या पाण्यात काय अडथळे आहेत या सगळ्याचे मार्गदर्शन करणारा तज्ञ प्रत्येक पोर्ट मध्ये असतो. त्या पोर्ट मध्ये येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या जहाजांना मोठ्या मोकळ्या समुद्रात जाईपर्यंत मार्गदर्शन करायचं काम तो करत असतो. आता त्याच्या सूचनेनुसार अँकरेज कडचा प्रवास सुरू होईल.

माझं जहाजाच्या बद्दलचं ज्ञान हळूहळू वाढत चाललं होतं.

जहाजाचा प्रवास सुरू होताना सेकंड साब (second engineer)इंजिन रूम मध्ये असणं आवश्यक असतंच. त्यामुळे मुकुंद इंजन रूम कडे निघाले. मला म्हणाले, सेलिंग बघायला तू डेकवर किंवा ब्रिजवर जाऊन उभी रहा तिथून तुला सगळं छान दिसेल.

– माझ्या आयुष्यातलं जहाजाचं हे पहिलं-वहिलं सेलिंग ! –
म्हणजे आपलं घर असलेली अख्खी ही बिल्डिंगच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन थांबणार की ! माझी उत्सुकता मनात मावत नव्हती.

केबिनची किल्ली घेतली आणि आधी डेक वर जाऊन उभी राहिले.
डेकवर ड्युटी ऑफिसर्स, क्रू मेंबर्स यांची धावपळ सुरू होती. हातातल्या कर्ण्यावरून आणि वॉकी-टॉकी वरून  सूचना दिल्या जात होत्या.जेट्टी वरच्या मंडळींची पण धावपळ सुरू होती.शिट्ट्या वाजत होत्या. गॅंग वे वर उचलला गेला.
जेट्टी वरच्या मोठ्या बोलार्डना बांधलेले जहाजाचे दोरखंड सोडले जात होते. ते शिप कडे फेकले गेले. ते शिपच्या डेकवरच्या यंत्रांनी खेचून घेऊन गुंडाळले जात होते.

मग ब्रिजवर जाऊन उभी राहिले. ब्रिजच्या डेकवर कॅप्टन कुठार आणि हरी बोलत होते. इतर सर्व ऑफिसर्स, क्रू त्यांच्या कामात गर्क होते. कॅप्टन कुठारनी माझं स्वागत केलं.
जहाजाच्या इंजिनच्या नेहमीच्या आवाजापेक्षा काहीतरी वेगळा घरघर असा आवाज यायला लागला. मी हरीला विचारल्यावर म्हणाला “अभी तुम मरीन इंजिनियर की परफेक्ट वाइफ बन गई | इंजिन की बदली हुई आवाज तू पहचान सकती है | बापू ने मेन इंजिन स्टार्ट किया  उसकी आवाज है.”

मी तर या डेक वरून त्या डेकवर, ब्रिज वरून परत खालच्या डेकवर, अगदी लहान मुलीसारखी कुतुहलानं जहाजाच्या हालचाली पहात फिरत होते. जहाजाचा अँकर उचलला गेला.
इशारे मिळाले आणि हळूहळू जहाज धक्क्यापासून लांब जाऊ लागले.
एवढी महाकाय शिप पण तिची होणारी मंद कमनीय हालचाल खरोखरंच पाहण्यासारखी असते.
समुद्र शांत होता. हळूहळू शिपने दिशा बदलली. पायलटच्या सूचना सुरू होत्या.
आस्ते कदम करत दिमाखात निघालेल्या शिपचा वेग हळूहळू वाढत चालला.  पहिल्यांदाच  अनुभवत असलेली ती शिपची हालचाल- गती, कापल्या जाणाऱ्या पाण्याचा सप् सप् आवाज, यंत्रांचे बदलते आवाज, उघड्या विस्तीर्ण समुद्रातला भळाळता वारा, त्याचा उग्र खारा गंध….. माझा रोम अन् रोम अनुभवत होता !
हे सगळंच फार वेगळं कल्पनेच्याही पलीकडचं होतं  !

या पहिल्या-वहिल्या सेलिंगचा अनुभव, उत्साह आणि कौतुक अपूर्व होतं माझ्यासाठी !

आता किनाऱ्यापासून शिप खूप दूर मोकळ्या समुद्रात आली. हळूहळू तिचा वेग मंदावत चालला. एका विशिष्ट ठिकाणी आल्यावर इंजिनचा आवाज बंद झाला. खळ….खणण आवाज झाला.

तिथे तीन साब (third officer) काम करत उभा होता. 23 / 24 वर्षाचा हा उत्साही प्राणी. त्याचं नाव राम.पण सगळे त्याला रामू म्हणायचे. तो तमिळ होता. म्हणाला, अभी अँकर डाला ना, उसकी आवाज है. अँकरेज में पहुॅंच गये हम

पुढचे दोन्ही अँकर टाकले गेले. जहाजाच्या जवळ खाली लॉंच उभी होती. मी वरून बघत होते. पायलट लॅडर… त्या दोरखंडाच्या गाठी मारलेल्या शिडीवरून  पायलट खाली उतरून गेले. त्यांनी त्या लॉन्च मध्ये उडी मारली आणि लॉन्च किनाऱ्याकडे निघून गेली.

आजूबाजूला क्षितिजापर्यंत पसरलेलं पाणीच पाणी. दूर दूर दृष्टीच्या पलीकडे राहिलेलं पोर्ट, जेट्टी आणि जमीन ! समुद्राच्या विशालतेचा हा पहिलाच अनुभव विलक्षण होता.

संध्याकाळ झाली होती. या मोकळ्या समुद्रात दूर दूर अंतरावर आमच्यासारख्याच काही शिप्स एकेकट्या उभ्या होत्या. शिप अँकरेजवर उभी आहे हे दाखवणारे दिवे लागले होते. मास्ट वरती ब्लॅक बॉल चढवला होता. दूर वर असलेल्या जहाजांवरचे दिवे लुकलुकायला लागले होते.

आता संध्याकाळ गडद होत चालली होती. आकाशातला लाल केशरी रंग पुसला जाऊन काळ्या-जांभळ्या  रंगांची  पूर्व-रात्र धरेवर उतरत होती. उगवणाऱ्या एकेका लखलखत्या चांदणीचं भरतकाम तिच्या गडद जांभळ्या ओढणीवर सुरू होतं. आकाशाची ती मुलायम, तलम, विलोल ओढणी साऱ्या पृथ्वी आणि समुद्रावर पसरून टाकली होती.
त्या विशाल शांततेला जहाजावर हलकेच येऊन आदळणाऱ्या लाटांचा आणि यंत्रांचा आवाज छेद देत होता…. बाकी सारं सामसूम !

या अनंत सागरात आणि अफाट शांततेत अजब एकाकीपण होतं ! आणि ते एकाकीपण असं अचानक समोर येऊन उभे राहिलं…..! नकळत आत खूप खोलवर ते अबोधपणे जाणवलं !

सांज ढले
गगन तले
हम कितने
अकेले  !

केबिनमध्ये आले. अंधार झाला होता. सगळीकडचे दिवे लावले. बेडरूम मध्ये देवाजवळ उदबत्ती लावली. त्या  सुगंधाने बेडरूम, डे रूम भरून गेल्या. केबिनला घराचा स्पर्श आल्यासारखं वाटलं. जमिनीची ओढ किती विलक्षण असते !

– अँकरेज वर –
जहाजाचं रोजचं काम सुरूच होतं. सगळ्यात अवघड होती ती प्रतिक्षा… पुढे कुठे जायचंय, काय प्रोग्राम आहे याची !

संध्याकाळी अचानक एक सर्क्युलर प्रत्येकाच्या केबिनमध्ये आलं. अँकरेजवर असताना recreation room मध्ये दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांची नावे आणि वेळापत्रक होतं. कामाचा ताण थोडा कमी होता. त्यामुळे फक्त ड्युटी ऑफिसर्स सोडून सगळे सिनेमाला हजर !
दोन-तीन दिवसांनी एखादा सिनेमा बघणं हे मस्त get together होतं. खूप मजा यायची.
राजेश खन्ना आणि हेमामालिनी यांचा मेहबूबा सिनेमा अनेकदा बघून झाला. आणखी दोन-तीन इंग्लिश, हिंदी सिनेमे पण होते.

कधी कधी आम्ही दोघंच संध्याकाळी डेकवर फिरायला जायचो. हॅचिसच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या सगळ्यात खालच्या डेकवर फिरताना समुद्र इतका जवळ दिसायचा की जसा तो भेटायलाच येतोय !
एकमेकांच्या हातात हात घालून न बोलताच बरेच बोलतोय असं वाटायचं.

दुपारच्या उन्हात डोळे दिपवत चमचमणारा, नाचरा, हसरा, समुद्र संध्याकाळ होईल तसा दाट निळा-सावळा, गंभीर व्हायला लागायचा. जहाजा जवळ येणाऱ्या आणि परत दूर दूर जाणाऱ्या लाटांच्या डोक्यावर चांदण्यांचे गजरे सजायचे. हवेत दमट उष्मा असायचा. समुद्राच्या लाटांवर जहाजाची वर-खाली होणारी हालचाल डोळ्यांना स्पष्ट जाणवायची.

– बंगालचा उपसागर –
ती जवळजवळ नोव्हेंबरची दहा-बारा तारीख  असावी. बंगालचा उपसागर मोठा खट्याळ आणि खोडकर. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तेथे वातावरण बदलतं. वादळांना सुरुवात होते. आतापर्यंत शांत असणारा समुद्र एकदम दंगेखोर व्हायला लागला. जहाज जोरात हलायला लागलं. एकदा डावीकडे मग उजवीकडे झुकत हळूहळू rolling सुरू झालं. अख्ख घरंच हालत होतं. फ्रिजवर टेबलवर ठेवलेले पदार्थ धडाधड खाली पडायला लागले.  पोर्टहोल मधून बाहेर पाहिलं तर आत्तापर्यंत शांत, प्रसन्न असलेला समुद्र मोठ्या लाटांनी फुगत चालला होता. गोजिरवाण्या लाटांनी रुद्र रूप धारण करायला सुरुवात केली होती.
माझ्या पोटात डचमळायला लागलं. उलटीची भावना व्हायला लागली……
एक दोनदा उलटी पण झाली ! जेवण जाईना.
बापरे ही तर नुसती सुरुवात होती. समुद्राच्या या घुसळणीत आपण कशी तग धरणार असं वाटायला लागलं.

मुकुंद म्हणाले, “तुझं लग्न जहाजवाल्याशी लागलं आहे. या सगळ्याला तोंड देऊन भक्कम उभे राहायला हवं. नाहीतर तू जहाजावर सेलिंग कसं करणार ?”

माझ्या पायाखालची जमीन इथे अक्षरशः सरकलीच होती. मुकुंदाना सोडून राहायची कल्पना असह्य होती.
मग निर्धार केला. वाटेल ते झालं तरी या रोलिंगला पुरून उरायचं. रोलिंगची हळूहळू सवय होत चालली.

पोर्ट होल मधून बाहेर पाहिलं तर शिप काल ज्या दिशेला होती त्यापेक्षा वेगळीकडेच तोंड करून उभी असायची. हा दिशा बदल अधूनमधून सुरूच असायचा.पाण्याचे प्रवाह आणि वादळांना होणारी सुरुवात त्यामुळे अँकर- नांगरा भोवतीचा शिपचा हा नाच सुरू व्हायचा.
मला आमच्या जुन्या घराच्या गोठ्यात चुलत सासरे प्रभाकाकांच्या गाईंची आठवण आली. त्या पाड्या ही दाव्याच्या भोवती अशाच नाचत राहायच्या.
गाय आणि शिप… कानात वारं शिरलं की सारख्याच !

मुकुंद, हरी यांना त्रास व्हायचा नाही. पण विशेषतः नव्या ऑफिसर्सना माझ्यासारखा त्रास जाणवायचा.
आमचे सगळे कुक्स, स्टुअर्ड्स, क्रू मेंबर्स बहुत दरिया देखे हुए होते. त्यामुळे ते सराईतपणे काम करायचे. जेवणखाण वगैरे सगळं व्यवस्थित सुरू होतं.
करवालो म्हणाला, मेमसाब ये तो कुछ भी नही है. ये तो खाली ट्रेलर है. अभी सच्चा दरिया देखने का है

खरोखर जमीन किती प्रेमळ आणि दर्या किती अवखळ !

किती अवघड, विपरीत परिस्थितीत घरदार, आई-वडील, पत्नी-मुला-लेकरां पासून, जमिनीपासून… दूर.. खूप दूर अखंड कामं करतात ही माणसं !
मुकुंद सकट जहाजावरच्या सर्वांबद्दल मनात प्रचंड आदर दाटून आला.

– लॉन्च मधली उडी –
आणि दोन-तीन दिवसांनी एका सहसातच उतरावं लागलं आम्हाला !

झालं असं की, दोन दिवसांनी माझी मासिक पाळी सुरू झाली. अचानक पोटात प्रचंड दुखायला लागलं आणि तुफान bleeding होऊ लागलं. हे असं bleeding मी कधी अनुभवलंच नव्हतं.
24 तास वाट पाहिली पण फरक पडेना. डॉक्टरांच्या कडे जाणं भाग होतं. मुकुंदाना ही काळजी वाटू लागली.
जहाज तर जमिनीपासून खूप दूर अँकरेज मध्ये ! त्यात सुरू झालेली वादळं, rolling करणारी शिप ! मी तर बेडरूम मध्ये अंथरुणावर नुसती पडून होते.

मुकुंदांनी परिस्थिती हरीला आणि कॅप्टनना सांगितली. त्यांनी ताबडतोब किनाऱ्यावर एजंटला मेसेज पाठवला. माझ्यासाठी gynecologist ची appointment ताबडतोब घेणं अत्यंत जरुरीचं होतं.
मला झूमुडची आठवण आली. ती तर कलकत्त्याचीच. छोटं बाळ असणारी. कोणत्या डॉक्टर कडे जावं तिला नक्की माहित असणार.  जाणाऱ्या लॉन्चबरोबर एजंटकडे कॅप्टननी चक्रवर्तीं साठी निरोप पाठवला. झूमुडने माझ्यासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली.

दुपारी जेवणानंतर किनाऱ्याकडे जाणाऱ्या लाँचमधून डॉक्टरकडे जायचं  ठरलं. कसंबसं थोडसं जेवलो. साडी बदलली. शिप साईडला लागून खाली समुद्रात लाँच उभी होती. मोकळा, उघडा समुद्र थयथय नाचत होता. लाटा जहाजाच्या कडांवर धडाडकन येऊन आदळत होत्या. खालच्या डेकवर आलो, पायलट लॅडर सोडली होती. ती दोन्ही बाजूला दोरखंड आणि मध्ये छोट्या फळ्यांच्या पायऱ्या असलेली शिडी वाऱ्यावर हेलकावे खात होती.
आता जहाजाच्या बाहेरून या लॅडर वरून दोन – तीन मजले इतकं अंतर खाली उतरायचं होतं. आमच्याबरोबर मदतीला कॅप्टननी  थर्ड ऑफिसर रामूला पाठवलं होतं.

मी पदर खोचला. भळाळत्या वाऱ्यात साडी सावरणं अवघड होतं. पर्स मधनं एक मोठी पिन काढून गुडघ्याजवळ साडीच्या पुढच्या निऱ्या आणि मागची बाजू एकत्र भक्कम टाचून टाकली, नऊवारीच्या कासोट्यासारखी!
हेलकावणारी पायलट लॅडर खाली लॉन्च मधल्या लोकांनी आणि वरती दोन क्रू मेंबरनी धरून ठेवली.
आधी मुकुंद दोन्ही बाजूच्या दोरखंडांना धरून त्या फळ्यांच्या शिडीवर उतरले. मागोमाग मी घट्ट पाय रोवला आणि दोन्ही बाजूचे दोरखंड गच्च पकडले.
खाली समुद्र उसळत होता. मुकुंद म्हणाले, पाण्याकडे बघू नको. एक एक पायरी शांतपणे उतर माझ्या मागोमाग रामू उतरला.
जहाज हालत होतं, शिडी हलत होती आणि शेवटी खाली समुद्रात जहाजाला चिकटून उभ्या असलेल्या लॉन्च पर्यंत पोहोचलो. लाटेच्या जोराबरोबर लॉन्च वर खाली होत होती. लॉन्च वर येताच दोरखंडाचे हात सोडून आत उडी घ्यायची होती. मुकुंद उडी मारून गेले. खाली माझा कॅच पकडायला लाँच मधले दोघं मुकुंदांच्या बरोबर उभे होते.

मुकुंद म्हणाले मी सांगितलं की दोरखंड सोड आणि उडी मार  लॉन्च वर येण्याचा क्षण गाठायचा होता. मुकुंदांची सूचना येताच दोरखंडाचे हात सोडून लॉन्च मध्ये उडी नि:शंक घातली ! मागोमाग रामू पण उतरला. जसा तो मला सांभाळणारा माझा पाठीराखा भाऊच होता. हे स्वर्गातून पाण्यात उतरणं भन्नाटच होतं.

आता आश्चर्य वाटतं, एरवी भित्री असणारी मी अचानक एवढी शूर कशी झाले ? मनाची ताकद अफाट असते आणि प्रसंग येताच खंबीरपण येतं.

किनाऱ्यावर स्वतःची कार घेऊन वर्कशॉपचे चक्रवर्ती स्वतः उभे होते. ही कारची व्यवस्था करणं हे एजंटचं काम. चक्रवर्तीं खरंतर वर्कशॉपवाले. पण मित्रासारखे धावून आले.

ताबडतोब gynecologist कडे गेलो. ती डॉक्टर खूप छान, प्रेमळ होती. तिनं मला व्यवस्थित तपासलं. मला खांद्यावर हळूच थोपटत म्हणाली,
“You are newly married. They are initial adjustments. Sometimes it happens. But no worries. You are absolutely fit and healthy. I am giving you some medicines and tonics. Take them regularly for next eight days. Take complete rest for next four days.You will be fine.”

आमच्या दोघांच्याही मनावरचं दडपण उतरलं. रामू पण खुश झाला. मला म्हणाला, मॅडम अभी कुछ प्रॉब्लेम नही है. आप आराम करो सब अच्छा होएगा
झूमुड आणि चक्रवर्ती यांचे आभार कसे मानावे समजत नव्हतं.

त्यानंतर आयुष्यात कधीच परत त्या दोघांची भेट झाली नाही. खरोखर ही माणसं कोण होती आमची ? कोणत्या जन्मीचे ऋणानुबंध होते हे ?

आमच्यासाठी परमेश्वराने ही इतकी चांगली माणसं जागोजागी पेरून ठेवली होती. गुरुमाऊलींचे किती आभार मानू तेवढे थोडे आहेत.

आलो तसेच परत लॉन्चनं आणि पायलट लॅडरनं चढून शिपवर पोहोचलो. मला तर पार गळून जायला झालं होतं. माझी ती अवस्था बघून मुकुंदांचा जीव कळवळत होता. उघडपणे बोलून दाखवायचा त्यांचा स्वभाव नाही. पण मला ते समजत होतं. त्यांनी मला फुलासारखं जपलं !
पण आता काळजी नव्हती.

हरी आणि कॅप्टन येऊन भेटून गेले. इतक्यात गरम कॉफी घेऊन करवालो आला. मेमसाब,थोडा लिजिए आपको अच्छा लगेगा
सगळेजण आपापल्या परीने काळजी घेत होते. मुकुंदांकडे हळूच चौकशी करत होते.

जहाजावर आपण एकटे नाही. हा सगळा आपला परिवारच आहे. आत आत मन खूप सुखावलं, आश्वस्त  झालं !
पुढे दोन-तीन दिवसात मी अगदी छान बरी झाले.

आता मात्र जहाज पुढे कुठे जाणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात शिगेला पोहोचली होती !
क्रमशः

वेदवती कुलकर्णी

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments