“पार्लेकरांचा डंका !”
गुरुवारचा ‘बिझनेस कनेक्ट’ विभाग पूर्णपणे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयाला वाहिलेला होता. या सत्रात आमचा पार्लेकर आणि पार्ले टिळकचा माजी विद्यार्थी केदार महाडेश्वर याचे प्रमुख भाषण (Keynote Speech) विशेष उठून दिसले. केदारने आपल्या भाषणाची सुरुवात पु. ल. देशपांडे यांच्या ‘म्हैस’ या अजरामर कथेतून केली. त्यातील दोन परिच्छेद वाचून दाखवत, त्याने ‘म्हैस’ आणि ‘AI’ यांची केलेली तुलना रसिकांना भुरळ पाडणारी होती—”बसचे प्रवासी काहीही कमेंट्स करोत, म्हैस जोपर्यंत प्रभाव पाडत नाही तोपर्यंत तिथून हलणार नाही !”
एवढेच नाही, तर AI व्हाईस तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पु. ल. देशपांडे यांच्याच आवाजात आणि विनोदी शैलीत सिएटलच्या अधिवेशनात उपस्थितांचे स्वागत केले तर कसे वाटेल, ह्याच्या प्रात्यक्षिकाची त्याने कल्पना मांडली तेव्हा प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. साहित्य असो, विज्ञान असो, कायदा असो वा कला—प्रत्येक क्षेत्रातील तरुण पिढीने तंत्रज्ञान शिकून, आत्मसात करून स्वतःला सक्षम कसे करावे, याचे मौलिक मार्गदर्शन त्याने केले. बीएमएम तर्फे ट्रॉफी देऊन श्री केदार चे आभार मानण्यात आले. संपूर्ण अधिवेशनात पार्ले टिळकच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे योगदान खरोखरच उल्लेखनीय होते:
न्यू जर्सीत ॲनेस्थेशिया तज्ज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि ीडॉ. मनोज शहाणे याने “सुखी माणसाचा सदरा” या नाटकातील आपल्या हलक्या-फुलक्या अभिनयाने सर्वांना हसवून लोटपोट केले.
सिएटलमध्ये नृत्यशाळा चालवणाऱ्या ललिता गौरी आणि तिच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या बहारदार नृत्यविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

सिएटलचे आयोजक व स्वयंसेवक: सिएटलस्थित अद्वैत साठे, मेघना साठे, प्रज्ञा सहस्रबुद्धे, अनिल भागवत आणि प्राजक्ता आपटे या पार्लेकरांनी अखंड मेहनत घेऊन हा सोहळा यशस्वी केला.
यंदाही पार्ले टिळकच्या २५ हून अधिक आजी-माजी विद्यार्थ्यांचा एक स्नेहमेळावा पार पडला. यात १९६५ च्या SSC बॅचपासून ते late 90s च्या बॅचचे राजेंद्र सप्रे, बीना दळवी-देशपांडे, राज लाड, मदन नातू , जय नाडकर्णी, सोनाली भागवत, निलेश ओक, मेधा गोडबोले यांच्यासह अनेक पार्लेकर आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आले होते.
या सोहळ्यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे नॉर्थ कॅरोलिनामध्ये गेली अनेक वर्षे निःस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या आमचा पार्लेकर ललित महाडेश्वर याला BMM च्या विशेष पुरस्कार आणि ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.
इंग्रजी माध्यमात शिकलेल्या श्रध्दा देवधर ह्यांनी सियाटल BMM च्या वेळी स्वयंसेवक म्हणून खूप मोठी जबाबदारी उचलली होती .
तिथे रांगोळी काढायला परवानगी नव्हती, ग्लिटर पेपरच्या दोन सारख्या रांगोळ्या (पारंपारिक ठिपक्यांच्या सारख्या) आणि १ अष्ट विनायक असलेली … अशा ३ अप्रतिम रांगोळ्या तिथे मी काढल्या होत्या.
तिथे असलेल्या गणपती समोरच्या तबकात ठेवायला तिने क्रेप पेपरची फुलं केली होती. रांगोळी आणि हाताने बनवलेल्या फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
या BMM मध्ये ज्या ८ लेखकांच्या मराठी पुस्तकांचे प्रकाशन झाले, त्यात माझ्या का (चित्रा मेहेंदळे) “जिचे तिचे आकाश” या पुस्तकाचाही समावेश होता.
तिथल्या सभागृहांना प्रसिध्द महिलांची नांव लिहीली होती. ती ६ चित्राने काढली होती. मग त्यांची प्रिंट काढून वापरली होती.

BMM मध्ये कलास्पंदन नावानी चित्रांसाठी विषय देऊन स्पर्धा होती आणि सिलेक्ट केलेली चित्रं प्रदर्शनात होती. महाराष्ट्राचे रंग ह्यात निसर्ग, व्यक्ती, संस्कार ह्या विषयावर चित्रं काढायची होती. त्यातील कोकणातील निसर्ग ह्या तिच्या ॲाईल पेस्टलनी काढलेल्या चित्राला तिसरे बक्षिस मिळाले आहे.
पार्ले टिळक विद्यालयाची मुले नेहमीच, मोठ्या कुठेही असली तरी एकत्र येतात !
तर असे होते ४ मंतरलेले दिवस ! कला, ज्ञान, मित्र मेळाव्यात रमलेले !
क्रमशः

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +9198694 84800
