“शिंपल्यातील मोती”
अथांग सागराच्या निळ्याशार गर्भात, एक इवलासा शिंपला शांत पहुडलेला असतो. जिथे समुद्राच्या अजस्र लाटाही शांत होतात, अशा तळात निवांत जगण्याचे स्वप्न पाहतो; अगदी आपल्यासारखेच. आपण नाही का बाहेरच्या उठाठेवींपासून दूर, आपले छोटेसे विश्व जपण्याचा प्रयत्न करत असतो, अगदी तसेच.
पण प्रत्येक वेळी गोष्टी ठरवल्यासारख्या घडतीलच असे नाही. कधी समुद्राच्या तळाशीच खळबळ माजते आणि एखादा वाळूचा कण त्या इवल्या शिंपल्यात येऊन पडतो; तर कधी एखादा परजीवी मुद्दाम त्या शिंपल्याचे कवच भेदून आत घुसण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणून काही तो इवला कोवळा जीव, तिरमिरीने बाहेर येत नाही किंवा स्वतःचा निवांतपणा सोडत नाही. जणू मुक्ताईंचा अभंग आपल्याआधी त्याला कळलेला असतो!
सुखसागरी वास झाला । उंच नीच काय त्याला ॥
अहो आपण जैंसे व्हावें । देवें तैसेंचि करावें ॥
दिवस सरतात, ऋतू बदलतात; पण इवलासा तो जीव आपली सोशिकता सोडत नाही किंवा त्या परकणाचा द्वेषही करत नाही. उलट मोठ्या मायेने त्या परकणाभोवती प्रेमाचा स्निग्ध थर गुंफत जातो. आणि फलस्वरूप, त्या अपार बोचऱ्या वेदनेचे आणि धैर्याचे एका नितळ, तेजस्वी मोत्यात रूपांतर होते. एक शुल्लक बोचरा कण, पण शांतीने त्याचीही अमर कहाणी होते.
ऐसा नटनाटय खेळ । स्थिर नाही एकवेळ ॥
काळाचा महिमा म्हणतात ते याहून दुसरे काय? ज्या नियंत्याने हे विश्व घडवले त्यावर श्रद्धा ठेवून सत्कर्म करीत जाणे, हाच इथल्या प्रत्येक समस्येवरचा उपाय. आता कल्पना करून बघा; तो एक कण आत घुसताच शिंपल्याने सताड तोंड उघडून त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न चालवला असता, तर? एकाच्या जागी हजार कण आत घुसले असते ना? आपल्या बरोबर जेव्हा काही अनुचित घडते आणि आपण थयथयाट मांडतो, तेव्हाही असेच होते! एका गोष्टीवर राग करता करता अनेक गोष्टी हातून निसटून जातात. नंतर उरतो केवळ पश्चाताप
एकापासून अनेक । त्यांत आपपर लोक ।।
असल्या विवंचनेत अडकण्यापेक्षा स्वतःलाच शून्य समजावे. नियत क्रमाने पुढे सरावे, हेच योग्य नाही का? शेवटी हे विश्व, इथले कायदेकानून, ज्ञान-विज्ञान आहे तरी काय?
शून्य साक्षित्वें समजावें । वेद ओंकाराच्या नावें ।।
हे मोठमोठे ग्रंथ, वेद, पुराणे; बाहेरून जेवढे जड अवडंबर दिसते, त्याचे मूळ स्वरूप काय… तर केवळ एक ओंकार नाद! जो ब्रह्मांडातही गुंजतो आणि आपल्यातही. मग कशाला हवेत ते विकार? पाहिले तर सगळेच शून्य आणि उमजले तर चैतन्य. याहून अधिक कशाला हवाय बडिवार?

ज्यांनी पालख्या मिरवण्यात आयुष्य खर्ची केले, त्यांनी तरी आजवर काय साधले?
एकें उंचपण केले । घर अभिमानें गेलें ॥
सैन्यबळावर जग जिंकायला निघालेला नेपोलियनसुद्धा शेवटी रिकाम्या हातानेच गेला ना! त्यापेक्षा ज्ञानाचा आणि आत्मशुद्धीचा मार्ग केव्हाही बरा. म्हणूनच मुक्ताई सांगतात –
द्वैत टाकुनी शांती धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
