Homeलेखया "मोबाईल"चे करायचे काय ?

या “मोबाईल”चे करायचे काय ?

परवा पिंपळे गुरवच्या सृष्टी चौकात एक तरुण पाहिला. खिसे चाचपत होता, चेहरा घामेजलेला, डोळ्यात कसली तरी भीती. पाकीट हरवलं नव्हतं, चावी हरवली नव्हती. हरवला होता त्याचा मोबाईल. तो क्षण पाहिला आणि वाटलं, हे दुसरं-तिसरं काही नसून आपणच विकत घेतलेलं दुखणं आहे.

मोबाईल आला तो संपर्कासाठी. कुठूनही, केव्हाही बोलता यावं म्हणून. सुरुवातीला तो प्रतिष्ठेचा होता. नंतर तो गरजेचा झाला आणि आज ? आज तो अबाल-वृद्धांच्या हातातला खेळ झाला आहे. त्याने बरंच दिलं, हे खरं. पण त्याने आपल्याकडून बरंच काही हिरावूनही घेतलंय.

आठवून पहा. दारातलं ते काळं-पिवळं डायलचं टेलिफोन युनिट – ते घराच्या प्रतिष्ठेचं प्रतीक होतं. एक रुपयात जगाशी बोलायला लावणारे PCO चे पिवळे बोर्ड – जेवढ्या वेगाने आले, त्यापेक्षा वेगाने गायब झाले. पोस्टमनच्या सायकलची घंटी आणि आंतरदेशीय पत्रातला मायेचा ओलावा – तोही मोडीत निघाला.

रात्री शेतात जाताना हातातली तीन सेलची बॅटरी आताची टॉर्च झाली. लग्नात फोटोग्राफरला ‘एक फोटो काढा हो’ म्हणणारी गर्दी आता स्वतःच फोटोग्राफर झाली. फोटो धुण्याचा व्यवसाय संपला, पण प्रत्येकाच्या हातात स्टुडिओ आला.

पूर्वी घराबाहेर पडताना आपण खिसा चाचपायचो – सुट्टे पैसे आहेत का ? आता खिसा चाचपतो – मोबाईल आहे का ? खिशात दमडी नसली तरी चालते, मोबाईल असेल तर अख्खं मार्केट खिशात असतं.

पण खरी किंमत आपण काय मोजली?माझ्या सोसायटीतले एक आजोबापूर्वी रोज संध्याकाळी बसून निवांत गावाच्या गप्पा मारायचे. परवा पाहिलं, पारावरच बसले होते. पण एकटेच. मान खाली घालून, मोबाईलवर रील बघत. आजूबाजूला माणसं आहेत, पण संवाद नाही. आपुलकीने विचारपूस नाही. सगळे आपापल्या स्क्रीनच्या विश्वात गुरफटलेले.

वृत्तपत्राचा वास, पुस्तकाची पानं, पत्रातलं अक्षर – सारं दुर्मिळ झालं. त्याजागी आलेत GN, GM, TY च्या शुभेच्छा. मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठी लिहिणारी ही नवी भाषा पाहिली की वाटतं, उद्या विद्यार्थी परीक्षेतही हेच लिहितील की काय ? मोबाईलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान, दारूसारखंच हे व्यसन, चिडचिड, झोप, विश्रांतीचे वाटोळे हे नशिबी येऊ पाहत आहे.या संकटातून नव्या पिढीला बाहेर कसे काढावे हा यक्ष प्रश्न पालक गुरुजनांस भेडसावतोय.

आज मोबाईलशिवाय लहान मुलाच्या घशात घास उतरत नाही. मोठ्यांचा घासही मोबाईलशिवाय गोड लागत नाही.बस चुकण्यापासून ते संसार तुटण्यापर्यंत, आणि किरकोळ वादापासून ते सायबर फसवणुकीपर्यंत – या छोट्याशा यंत्राने किती मोठी किंमत वसूल करायला सुरुवात केली आहे आणि तरीही, दर महिन्याला कंपन्या नवा, अधिक महागडा, अधिक चमकदार फोन बाजारात आणतात. आपण रांगेत उभे राहून तो विकत घेतो. नेटवर्क कंपन्या गबरगंड होतात.

खरं सांगा – पूर्वी आपण मोबाईल विकत घेतला होता, सोयीसाठी.आज मोबाईलने आपल्याला विकत घेतलं आहे, त्याच्या सोयीसाठी. हे विकतचं दुखणं आता सुटायचं तरी कसं ?

संजय फडतरे

— लेखन : संजय फडतरे. पिंपळे गुरव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments