काही दिवसांपूर्वी आम्ही मैत्रिणी एका निसर्गरम्य ठिकाणी ट्रिपला गेलो होतो. रिमझिम पाऊस चालूच होता.पावसात मस्त भिजण्याचा आनंद घेत असतानाच फोटो, सेल्फीचा नुसता धुमाकूळ चालू होता. मनसोक्त फिरणं, पाण्यात खेळणं, कुत्र्या मांजरांशी खेळणं अशी मौज मस्ती करण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. सपाटून भूक लागल्याची जाणीव होताच
तेथील किचनकडे आलो. बऱ्यापैकी पर्यटकांची गर्दी होती. जेवणाचा बेत अगदी घरगुती, साधा आणि हेल्दी होता. स्वादिष्ट, रुचकर जेवणाचा मस्त आस्वाद घेतला. जठराग्नी शांत शांत झाला.
जेवणानंतर फेरफटका मारत असताना एक छानस् दृष्य नजरेस पडले. तेथील क्लब हाऊसमध्ये जेन झी तरुणाई मोठ्या संख्येने जमली होती. काही जण कॅरम खेळण्यात दंग होती. काहींनी पत्यांचा डाव मांडला होता.काही बुध्दिबळ, टेबल टेनिस खेळण्यात मशगुल होती तर काही जण कानात वायरचे इअरफोन लावून गाणी ऐकत होते. काही जण गप्पा मारण्यात हरवून गेली होती. तरुणाईचे ते देखणं रुप पाहून मी अचंबित झाले.डिजिटल युगात जन्मलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढलेली ही पिढी पारंपारिक खेळांकडे वळताना पाहून मनस्वी आनंद झाला. एका तरुणीला सहज बोलतं केल्यानंतर तिने माझ्याशी मनमोकळा संवाद साधला.महिन्यातून दोनदा आम्ही सारेच एकत्र जमून एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी मजा करायला येत असतो. रोजच्या दगदगीपासून मुक्त होऊन अशा निसर्गात शांत, स्वच्छ, गर्दीपासून दूर आल्याने सारा शीण निघून जातो. फ्रेश, ताजेतवाने होऊन पुन्हा आपापल्या दुनियेत परत जातो. हे सगळं ठिक आहे पण तुमच्या पैकी एकाच्या ही हाती स्मार्टफोन नाही हे कसं काय ? मी स्वतः ला चिमटा काढून याची खात्री केली. ‘हो आन्टी, हे खरं आहे. मोबाईल, आॅन लाईन, नोटीफिकेशन्स, समाज माध्यमं यापासून दोन दिवस दूर राहायचं, वेगाच्या जगण्याला लगाम देत शांत जगायचं हे ठरवूनच आम्ही अशा ठिकाणी येत असतो.’ तिच्या सकारात्मक विचाराला, जगण्याला भरभरुन शुभेच्छा देत तिचा निरोप घेतला. मला ही तरुणाई स्वतः च्या विचारावर ठाम असल्याचे दिसून आले. तिची देहबोली खूपच आश्वासक जाणवली. ही पिढी बदलते आहे याचं समाधान वाटलं. एक वेगळा हटके विचार सोबत घेऊन आम्ही ही तेथून परतलो.
एक बदलता विचार घेऊन माझी दैनंदिनी सुरु झाली असली तरी मला स्वस्थ बसवेना. माझा भवताल मला खुणावू लागला. माझ्या सोसायटीत, आजूबाजूच्या तरुणी नेमकं काय करतात, त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा आहे हे जाणण्याची जिज्ञासा सुरू झाली. या पिढीतल्या तरुणी वेल एज्युकेटेड आहेत. आय टी क्षेत्र किंवा बॅंकेत काम करणाऱ्या तरुणी त्यांची
तारेवरची कसरत अनुभवत होते. पण काही जणी मुलं लहान असल्याने नोकरी सोडून घरी बसलेल्या मोठ्या संख्येने पाहावयास मिळाल्या. काही जणी मदतनीस ठेवून जाॅब करीत होत्या.

काही जणी बक्कळ पगाराची नोकरी सोडून मुलांसाठी एखाद्या स्कूलमध्ये, ट्यूशन क्लासेस जाॅईन केल्या होत्या. घरात केवळ लहान मुलंच असतात असं नाही तर बऱ्याच ठिकाणी जेष्ठ नागरिक ही असतात. घराची अशी संपुर्ण जबाबदारी स्वीकारुन नोकरी किंवा करिअरच्या मागे न लागता स्वतः चा एखादा हटका छंद जोपासत असलेल्या दिसून आल्या. त्यांच्याशी संवाद साधताना असं लक्षात आले की, दुपारचा फावला वेळ स्मार्टफोन, समाज माध्यमात व्यस्त राहण्यापेक्षा वेगवेगळा बिझनेस करतांना दिसून आल्या. काहींना वेगवेगळे पदार्थ बनवून खाणे आणि खाऊ घालणे यात आवड असते. अशा तरुणींनी स्वतःचं आधुनिक, स्मार्ट किचन सुरु केलं आहे. जसं की, केकच्या ऑर्डर घेऊन मागणीनुसार वेगवेगळ्या फ्लेवरच्या केक बनवून पार्सल करणे, गायत्री किचन, हेल्दी फूड, डायट प्लेट, (अर्थात वेट कमी करण्यासाठी तयार केलेला आहार) अशा नावांनी वर्षभरासाठी नोंदणी केली जाते.
ऑर्डर प्रमाणे पुरणपोळी, पिठलं, हिरव्या मिरचीचा ठेचा अन् भाकरी, खमंग कांदापोहे, पुलाव दहा ते पंधरा मिनिटांत तयार करणे, गिग वर्कर येताच त्याला पार्सल देणे, अर्ध्या तासात आपल्या अकाऊंटला पैसे जमा…!!
किती छान..! घरबसल्या बिन भांडवली व्यवसाय. काही जणी शेअर मार्केटमध्ये आपल्या बजेटनुसार उलाढाल करताना दिसल्या. सर्व सामान्य कुटुंबातील तरुणी ज्येष्ठांना मदतनीस म्हणून किंवा लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी गिग वर्कर म्हणून खेड्यापाड्यातून येताना दिसतात. तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता. त्यावेळी आर्थिक जबाबदारी ही फार मोठी गोष्ट होती होती. त्यामुळे नोकरी करणं, पैसा कमावणं खूप महत्वाचं आहे, हे मनावर बिंवलेलं असायचं. पण आताची पिढी बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या वातावरणात जन्माला आली आणि वाढली आहे. त्यामुळे जगण्यासाठी प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे याची त्यांना गरज वाटत नाही.
त्यांचे उद्दिष्टे स्वच्छ आहेत. ते जोपर्यंत साध्य होत नाही, तोपर्यंत त्यांची कार्य करण्याची इच्छा होत नाही. या पिढीची मतं ही ठाम आणि स्वच्छ आहेत. करोना महामारीला जेन झी आणि जेन अल्फा पिढीने जवळून अनुभवलं आहे. नाकळत्या वयात या पिढीच्या हाती शिक्षणासाठी स्मार्ट फोन आला. ऑनलाईन शिक्षणाचा गणेशा याच काळात त्यांच्या वाटेस आला.
करोनामुळे ‘वर्कफ्रॉम होम’ ची कार्यपध्दत अनुसरावी लागल्याने जेन झी ची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यामुळे ही पिढी काम आणि वैयक्तिक आयुष्यातील बॅलन्सला महत्व देताना दिसते. अल्फा पिढीतील बच्चे कंपनी ही स्मार्ट फोन सोबतच मोठी झाल्याने त्याचाच वापर करीत विविध कौशल्ये आत्मसात करते आहे. स्मार्ट फोनच्या साह्याने पेंटिंग, क्रोशा, विणकाम, ओरीगामी, पाॅटरी, हस्तचित्रकला अशा कौशल्यांना आत्मसात करते आहे. आतापर्यंत या सर्व बाबींकडे आई किंवा आजीचे छंद म्हणून पाहिले जात असे. पण आता मुला- मुलींचा कल बदलतो आहे. या पारंपारिक हस्तकलांकडे ही पिढी नव्या दृष्टीने पाहते आहे. एक ‘नवा ट्रेंड’ म्हणून उदयास येत आहे.
हा ट्रेंड केवळ शहरी भागापुरता मर्यादित नसून त्याचे लोण ग्रामीण भागात ही पोहोचले आहे. खेड्यापाड्यात, निम शहरी भागात गृहिणी चूलमूल या पुरत्या मर्यादित न राहता ब्यूटीपार्लर, शिलाई काम, मर्यादित स्वरूपात साड्यांचा व्यवसाय, हस्तकला रांगोळी, स्कूलबॅगा, टिफीनबॅग, शेवया, पापड लोणची अशा अनेक छोट्या छोट्या व्यवसायातून त्या स्वतः ची ओळख निर्माण करीत आहेत.
हस्तकला रांगोळीतून अनेकांना रोजगार मिळतो आहे. लग्नकार्यासारखे मंगल प्रसंग, सार्वजनिक उत्सव प्रसंगी, वारी, पालखी सोहळा सरकारी कार्यक्रम, परिषदा, राजकीय इव्हेंट अशा प्रसंगी हस्तकला रांगोळी लोकांचे लक्ष वेधून घेत असते. हजारो रुपयांची उलाढाल यातून होत असते. गौरी गणपतीच्या वेळी सजावट, रोषणाई, रांगोळी, मिठाई, मोदक यात ही पिढी उत्साहाने सहभागी होत असते. या पिढीला क्रिएटिव्ह वर्कमध्ये रममाण व्हायला आवडते. स्वत: च्या घर सजावटीतून तयार केलेल्या वस्तूंना पुढे चालून चांगली बाजारपेठ मिळते आहे. छंदाचे रुपांतर मोठ्या व्यवसायात होताना दिसते आहे. सद्याची पिढी तंत्रज्ञानाशी जुळवून घेत प्रत्येक टुल्सचा खुबीने वापर करते आहे. खरंच हे सारं खूपच कौतुकास्पद आहे. असे विविध अंगाने तरुणी व्यवसायात उतरत असताना जाहिरातीचा प्रश्न सहजच मनात येतो. परंतु सोशल मिडिया इतका प्रभावी आहे की, घरबसल्या आपल्या ठराविक ग्रुपवर मेसेज टाकला की तो लगेच व्हायरल होतो. आपल्या कामाची पब्लिसिटी झाल्याने विश्वासाने लोक प्रतिसाद देतात.
आतापर्यंत आम्ही या पिढीला खूप नावे ठेवत होतो. आधुनिक तंत्रज्ञानात जन्मलेली पिढी सतत मोबाईल फोन, नेटवर्क, नोटीफिकेशन अन् समाज माध्यमात व्यस्त असते. वाया गेलेली पिढी म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते. परंतु नीट पेपर फुटीच्या प्रश्नावरुन काक्रोच जनता पार्टीने केलेले आंदोलन, दिलेला लढा सरकारला घाम फोडण्यास कारणीभूत ठरला. तेव्हा पासून जेन झी आणि जेन अल्फा पिढीकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. तिचं वास्तव रुप पाहून जगण्याला जो अवास्तव वेग प्राप्त झाला होता त्याला कुठं तरी बॅलन्स प्राप्त होईल असा आशावाद बळावतो आहे. ही पिढी शांतपणे आपल्या आयुष्याचा वेध घेतांना दिसते आहे.
या पिढीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. या पिढीच्या आजी आजोबांनी मुलांना संस्कार संस्कृती, शिस्त, मेहनत आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये दिली. यांच्या आईवडिलांनी कुटुंब, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने, स्वबळावर उभं राहण्याची ताकद आणि नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची जिद्द दिली. सद्याची पिढी एक पाऊल पुढे टाकत व्यक्ती स्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि नवं ते हवं म्हणत नव्याची कास घेऊन खंबीरपणे पुढे येत आहे. पण तिने जुन्याची साथ सोडलेली नाही.जुन्याला नवा ट्रेंड बनवून हो..! आम्ही बदलतोय…!! म्हणत दमदार पाऊल टाकत आहे. याचा आपण ही सहर्ष मनाने स्वीकार करु यात.

— लेखन : डॉ. प्रभा वाडकर. लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
