देवी पार्वती ही शक्ती मानली जाते. अखंड जगताची ती माता … विश्वरूप जननी. ईश्वराने आपले कौशल्य पणाला लाऊन नारी रूप घडवले आहे म्हणुनच ती आपल्या ऊदरी एक जीव वाढवते…. जन्म देते… महत्वाचे म्हणजे त्याचे पोषणही करू शकते. तिच्या काळजातील मातृर्हदय ही ईश्वराची सर्वात मोठी देणगी आहे. जीव कोणताही असो ,कूठेही असो, पण तो आपल्या अपत्यांचे जिवापाड मायेने पालन पोषण करू शकतो असे ते कोमल, भावस्पर्शी असे मातृर्हदय आहे. करूणेचा सागर आहे. ही आदी माया, आदीशक्ती निरनिराळ्या रूपात जिथे जिथे अन्याय, अधर्म होता तिथे तो नष्ट करायला विविध रूपे घेत साक्षात्कार देऊ लागली. वैदिक काळात स्त्री घरातच कोंडलेली होती. जाचक अन्यायकारक रूढी परंपरा अवहेलना सहन करत होती.
पण त्याही काळात मैत्रेयी व गार्गी महान अशा ऋषीमुनींइतकेच किंवा कणभर अधिकच असे ज्ञान मिळवत लेखन करत. भर सभामंडपात मोठ्या महंतांबरोबर वाद संवाद करत भाषणात सभा जिंकून घेत. वेद म्हणत. यज्ञ विधीनुसार करत. या दोन स्त्रीया अत्यंत बुद्धिवान म्हणुन किर्तीवंत होत्या.
पुढे रामायणात कैकयीने राजा दशरथाला युद्धात मदत केलेली ऐकतो. कौसल्येपोटी राम जन्म घेतो, सुमित्रेपोटी लक्ष्मणासारखा भाऊ जन्म घेतो तर भरताचे कौतुक किती करावे ? असे पुत्र जन्माला घालणे हे स्वत: शक्ती देवीचीच अनुभूती असावी.
जानकीचा जन्म, रामाशी स्वयंवर, वनवास व चारित्र्यासाठी अग्नी प्रवेश हे शक्ती शिवाय शक्य नाही. ही शक्तीच हे घडवुन आणते.
महाभारतातही द्रौपदी बंधुप्रेमात इतकी निर्मळ होती की, तिच्या प्रत्येक संकटात स्वत: जगजेठी तिच्या पाठी भावाचे कर्तव्य पार पाडत होता. अशा प्रत्येक वेळी नारीने आपली शक्ती बुद्धीमत्ता यावर ते काळ गाजवलेत.
मोघलांनी आपली अत्याचारी कारकिर्द गाजवली. त्यातही आपल्या धर्माचे रक्षण करणार्या अनेक स्त्रिया प्राणपणाने लढल्या. जिजाई, हिरकणी, झांसीची राणी, पद्मिनी, दुर्गावती, अशा अनेकींनी धर्म रक्षणासाठी स्वराज्यासाठी लढाया लढल्या आहेत. हिरकणी तर बाळासाठी रात्रीचा रायगड चढुन गेली. किती हा शक्तीचा साक्षात्कार.
संत साहित्यातही मुक्तेचे ताटीचे अभंग, जनाईचे जात्यावरचे अभंग ओव्या, कान्होपात्रा, यांचे लेखन व अशिक्षीत बहिणाबाईंची काव्ये आजही अभ्यासाचा विषय आहेत.

ऊदासीन, मरगळलेल्या समाजाशी भिडत जिजाई, सावित्री लक्ष्मीबाई फातिमाबाई अशांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. अनेक लेकी समाजाशी झगडत शिकल्या आणि इथेच मोठी क्रांती झाली. स्त्रीला स्वत:ची ओळख पटली.
ऊंबरठ्याच्या आतली, धाकातली, जाचक परंपरेत अडकलेली स्त्री मुक्त झाली. बाहेरच्या विश्वात मोकळा श्वास घेऊ लागली आणि ख-या अर्थाने नारीशक्ती जागृत झाली. तिची महती विश्वाला पटली.
आज हीच नारीशक्ती आपली बूद्धी, शक्ती आणि पावित्र्य यासह बाहेरच्या जगात पुरूषांबरोबरीने कांकणभर सरसच ठरत आहे. सर्वच क्षेत्रात तिने यशस्वी भरारी घेतली आहे. याबरोबरच आपले घरपण, गृहिणी म्हणून कर्त्वव्ये, नातेसंबंध, मातृत्व कूळाचार, नातेसंबंध, सणवार, आवडीनिवडी, सहली पोषाख यातही ती मनपसंद स्वातंत्र्य अनुभवते. या परंपरेने आलेल्या जपलेल्या नारीशक्तीचा जागर करूया. त्यांचा सन्मान राखूया.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
