Homeपर्यटनमाझी जीवन नौका : २३

माझी जीवन नौका : २३

मद्रास

मद्रासला पोहोचलो. शिप सरळ धक्क्यालाच लागली. मद्रास शहर पहायची खूप उत्सुकता होतीच.

जेट्टीला पोहोचलं की जहाजाचे छोटे-मोठे रिपेअर्स, जहाजाच्या drinking water tank मधे प्यायचं पाणी भरून  घेणं, त्याच्या जोडीला bunkers घेणं ही कामे चालत असंत. Bunkers म्हणजे जहाज चालवण्यासाठी इंधन म्हणून लागणारे oil, तसेच इंजिन मशीन्स या साठी लागणारे निरनिराळ्या प्रकारचं oil घेणे. मुकुंद त्यात बिझी राहायचे.

कुठल्याही जेट्टीला पोहोचल्यानंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांना त्या गावात फिरण्यासाठी परवानगी असते. त्याला shore leave असे म्हणतात. पहिले दोन दिवस खूपच कामाच्या गडबडीत गेले. त्यामुळे मद्रास शहरात फारसं जाता आलं नाही. इथे कोलच्या unloading ला आठवडा लागणार होताच.

मद्रास पासून महाबलीपुरम्, कांचीपुरम्, तिरुपती ही देवालये जवळ होती. नेहमीप्रमाणे रजेची वगैरे सोय झाली आणि आम्ही दोघांनी दोन दिवस या देवदर्शनाला जाऊन यायचं ठरलं.
आमच्या प्रमाणे इतरही ऑफिसर्स एकमेकांच्या ड्युटी सांभाळून अशा तऱ्हेने जवळच्या छान स्थळांना जाऊन यायचे.

खरोखरच आमच्या भाग्यातले ते सारे दिवस विलक्षण होते. या प्राचीन देवस्थानांना भेट देण्यासारखी सगळी अनुकूल परिस्थिती सुदैवाने आम्हाला लाभत गेली.
समजून घेणारे कॅप्टन आणि हरीसारखा चीफ इंजिनियर असल्यामुळे ते शक्य झालं. अर्थात मुकुंद कामात चोख होते. त्यामुळे तर कधीच काही प्रश्न आला नाही.

मग सगळी आयत्यावेळची तयारी ! यावेळी आम्ही दोघेच जाणार होतो.
आधी महाबलीपुरम् म्हणजे मामलापुरम् येथे जायचं ठरलं. मद्रास पासून सुमारे  ५० ते ६० किलोमीटर अंतरावर महाबलीपुरम् आहे.

महाबलीपुरम्
समुद्रकिनाऱ्यालगत शिव आणि विष्णू यांसाठी उभारले गेलेले मंदिर – shore temple ! इथे प्रथम गेलो.

समुद्रकिनाऱ्यावरील मंदिर – Shore temple व भोवतीचे दगडी ग्रॅनाईट मधले कोरलेले नंदी

दोन शिवमंदिरे आणि एक विष्णू मंदिर असा तीन मंदिरांचा हा समूह. आत जाऊन देवांचे दर्शन घेतले. ही देवळे द्रविडी स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना आहे. पल्लव राजा नरसिंहवर्मन दुसरा यांच्या काळात या मंदिरांची निर्मिती झाली. ग्रॅनाईटचे महाप्रचंड दगड एकमेकांवर रचून या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.

महाबलीपुरम मंदिराभोवती असलेली नंदीची रांग

माझ्या आजही अगदी स्पष्टपणे लक्षात आहेत ते मंदिराच्या चारही बाजूंना ग्रॅनाईट दगडात सुबकपणे कोरून काढलेले नंदी !
जशा काही या नंदींच्या संरक्षक रांगाच या मंदिराच्या चारही बाजूंना उभ्या केल्या आहेत. सर्वच नंदी इतके घाटदार आणि गोंडस आहेत की ते पाहतच राहावे असे वाटतात.
शेकडो वर्षे खारे-वारे आणि खारे-पाणी यांचा वर्षाव सोसूनही या मूर्तींची भव्यता आणि सुबकपणा अजूनही टिकून आहे.

पांडव रथ
जवळच पाच पांडव, द्रौपदी यांचे रथही पाहिले. ‌हे पांडव रथ किंवा पंचरथ गुलाबी ग्रॅनाइटचा एकच मोठा खडक वरून खाली कोरत येऊन बनवले गेले आहेत.
या रथ-शिल्पांची निर्मिती प्रामुख्याने पल्लव राजा नरसिंहवर्मन प्रथम  यांच्या कारकिर्दीत झाली. राजाच्या निधनानंतर हे काम अर्धवट राहिले, त्यामुळे या मंदिरांमध्ये कधीही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा पूजा झाली नाही.
भव्यता आणि सुबकपणा यांचा विलक्षण मिलाफ या सर्वच मंदिर शिल्पांच्यात दिसतो.

नगरेषु कांची
कामाक्षी देवीचे प्रसिद्ध मंदिर असलेल्या कांचीपुरमला जायला फारच उत्सुक होतो. नगरेषु कांची असं वर्णन केलेली ही महानगरी ! पल्लव राजांची राजधानी, प्राचीन काळातील शिक्षण, व्यापार आणि संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र.
नगरेषु कांची असं तिचं वर्णन भारवी या कवीने केले आहे. पण हे वचन कालिदासाचे आहे असा लोकांचा समज आहे. अर्थात रघुवंशम् या महाकाव्यात महाकवी कालिदासाने या वैभवशाली कांची नगरीचा पृथ्वीची मेखला असा सुंदर उल्लेख केला आहे.

कांची कामाक्षी
पूजा साहित्य  घेऊन कामाक्षी देवीच्या देवळात प्रवेश केला. श्री कामाक्षी मंदिराचे सोन्याचे कळस संध्याकाळच्या उतरत्या उन्हात तळपत होते. ललिता – त्रिपुर – सुंदरी, भंडासुरखंडीनी, देवी पार्वती म्हणजेच कामाक्षी.
पंचाग्नी साधन करून सुईच्या आग्रावर एका पायावर उभी राहून तपश्चर्या करणारी आणि शिवांना पती म्हणून प्राप्त करून घेणारी कामाक्षी, शंकरांनी जाळून भस्म केलेल्या मदनाला केवळ आपल्या कटाक्षाने परत जिवंत करणारी म्हणून कामाक्षी ! जिच्या डोळ्यात – अक्षांमध्ये ‘का’ म्हणजे सरस्वती ‘मा’ म्हणजे लक्ष्मी यांचा निवास आहे ती कामाक्षी. भक्तांच्या कामना पूर्ण करणारी ती कामाक्षी अशी तिची विविध रूपातली ओळख आहे.

गाभाऱ्यात तेलाच्या समयांचा प्रकाश भरून राहिला होता. पद्मासनात बसलेल्या रूप सुंदर कांची कामाक्षीचं दर्शन घेतलं.
देवीच्या चार हातात उसाचे धनुष्य, पाच फुलांचा गुच्छ, पाश अंकुश आणि कमळ आहे.
मंदिरात देवीचे तीन स्वरूपात पूजन केले जाते: स्थूल, सूक्ष्म आणि शून्य.
देवीची ओटी भरली. परत प्रसादाचे नारळ आणि केळी ओटीत मिळाली.

शंकराचार्यांचे श्री चक्र
कामाक्षी अम्मन मंदिरात जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी श्री चक्राची (किंवा श्री यंत्राची) स्थापना केली आहे. त्याचे दर्शन घेतले. श्रीविद्या परंपरेनुसार हे श्री चक्र ब्रह्मांडातील सर्वोच्च शक्तीचे – ललिता त्रिपुरसुंदरीचे – भौमितिक प्रतीक मानले जाते.

श्री शंकराचार्य मठ कामकोटी
आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या कामकोटी मठात दर्शन घ्यायला गेलो. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हा मठ आदि शंकराचार्यांनी स्थापन केला.
हे अद्वैत वेदांत आणि वैदिक शिक्षणाचा प्रचार करण्याचे प्रमुख केंद्र आहे. आपल्या हिंदू धर्माच्या त्या महान पवित्र क्षेत्राला वंदन केलं.

सा रम्या नगरी…
कांची नगरीचा इतिहास, तिची प्राचीन काळातील प्रसिद्धी, तिचं वैभव याबद्दल ऐकून असं वाटलं कधीकाळी ही सगळी वैभवशाली भव्य देवालये पल्लव राजांनी केलेल्या पूजाअर्चांनी कशी झगमगत असतील, सारी नगरी त्यांच्या पराक्रमाने, मिरवणुकांनी दुमदुमून गेली असेल. विद्वानांच्या सभांनी गाजत असेल. कधी इथेच महाकवी कालिदासांसारखे अलौकिक प्रतिभावंत वावरले असतील ! संस्कृती आणि कलांचा अपूर्व मेळ इथे झाला असेल.
– आज त्याच देवालयांच्या भोवती पसरलेली आपली आधुनिक शहर संस्कृती, विजेच्या दिव्यांचा चमचमट, हॉटेलं, गाड्या मोटारी, सिमेंट काँक्रीटच्या वस्त्या हे सगळं बघून भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे *कालाय तस्मै नमः* असं म्हणावंसं वाटतं.

ही सारी देवळं, शिल्पे पाहताना आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केवढा मोठा सांस्कृतिक ठेवा निर्माण करून ठेवला आहे हे पाहून स्तिमित व्हायला होतं. मान आदराने झुकते.
आपल्या या प्राचीन परंपरा आणि समृद्ध संस्कृती याचे आपण वारसदार आहोत या विचारानेच धन्य वाटते.

त्या रात्री कांचीतच एका लहानशा हॉटेलमध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून निघालो ते बालाजी तिरुपतीला.

तिरुपती बालाजी
तिरूमलाच्या सप्तगिरीतल्या, सर्वात उंच शेषाद्रि पर्वतावर विराजमान असलेले तिरुपती बालाजी हे अत्यंत वैभवशाली मंदिर ! भारतातल्या अतिशय श्रीमंत देवालयांपैकी एक.

आपल्यावर रुसून निघून गेलेल्या लक्ष्मीदेवीच्या प्राप्तीसाठी महाविष्णुंनी तप केले. पुढे आकाश राजाच्या पोटी पद्मावती या नावाने तिचा जन्म झाला. पद्मावतीशी तिरुपती रूपातल्या विष्णूंचा या ठिकाणी विवाह झाला, अशी कथा आहे.

इच्छित पत्नीच्या प्राप्तीसाठी कोणा देवाने अगर पुरुषाने तप केलेले हे आपल्या इतिहासातील आणि पुराणातील बहुधा एकमेव उदाहरण असावे. बाकी इच्छित पतीच्या प्राप्तीसाठी अखंड तप करणाऱ्या देवींची आणि स्त्रियांचीच परंपरा आपल्याकडे आहे.

आता राजकन्येशी लग्न करायचे तर प्रचंड खर्च ! भरपूर पैसे हवेत म्हणून कुबेराकडून श्रीनिवास – तिरुपतीने कर्ज घेतले. घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची परतफेड तिरुपती त्याच्या हुंडीत भक्तांनी अर्पण केलेल्या संपत्तीतून करत असतो, त्या बदल्यात भक्तांची दुःखे संकटे तो निवारण करतो. अशी अख्यायिका आहे.
देवाचं देवत्व सोडून मानवी पातळीवर उतरून व्यवहार सांभाळणाऱ्या देवाची ही कथा फारच गोड आहे.

तिरुपती मंदिर

गोविंदा….गोविंदा ! या गजरात तिरुपतीच्या पायऱ्या चढून हजारो भाविक दर्शनाला येत होते. आम्ही बसमधून मंदिरापर्यंत पोहोचलो. वर चढत जावं तशी हवा थंड होत चालली होती.
प्रवेशद्वाराशी असलेल्या झुळझुळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात पाय धुऊनच आत प्रवेश केला. त्या वेळेला मंदिराच्या गाभाऱ्याच्या खूप जवळ जाऊन दर्शन घेता येत होतं. गाभाऱ्यात कुठेही विजेचे दिवे नव्हते. शेकडो समयांच्या सोनेरी उजेडात गाभारा उजळून निघाला होता.

तिरुपती बालाजी

तिरुपतीची, वैकुंठीच्या सुकुमाराची काळ्या पाषाणातली ती स्वरूप सुंदर मूर्ती इतकी गोड, इतकी कमालीची मोहक आहे की वाटलं, एक गोजिरवाणं, हसरं बाळंच समोर उभं आहे.. की त्याला पटकन उचलून कडेवरच घ्यावं ! हाच तो बालाजी.
डोळे भरून ती मूर्ती मनात साठवून घेतली. सोन्या मोत्यांच्या, हिऱ्या रत्नांच्या दागिन्यांनी नखशिखांत नटलेली ती मूर्ती… पण त्या साऱ्या वैभवावर मात करून उरणारे ते त्याच्या चेहऱ्याचं विलक्षण लोभस, निरागस हास्य केवळ अविस्मरणीय !

लाखो भाविक हुंडीत अर्पण करत असलेले अपार धन मापट्याने मोजायचे काम गोविंदरायकडे होते. मोजता मोजता तो दमून गेला आणि तेच मापटे म्हणजे कोलगा उशाशी घेऊन आडवा झाला. त्याची मूर्ती ही पाहिली.

मंदिरातून बाहेर पडलो तर दुपार झाली होती. प्रसाद वाटप सुरू होतं. एक मोठा द्रोण भरून गरमागरम गव्हाच्या खिरीचा प्रसाद मिळाला. केशर वेलची आणि सुकामेवा घातलेली ती खीर अमृता समान गोड होती. पोट अगदी तुडुंब भरलं.

मग शिपवर सर्वांना देण्यासाठी मनोहर नावाचे प्रसादाचे बुंदीचे लाडू विकत घेतले. ओंजळभर मावेल असा एकेक अगडबंब लाडू होता. सर्वांसाठी लाडू घेतले आणि बसने परत खाली निघालो‌.

देवी पद्मावती मंदिर

खाली आल्यावर पद्मावती देवीच्या मंदिरात दर्शन घेतले. पद्मावती देवी कमळाच्या आसनावर विराजमान असून तिच्या दोन्ही वरच्या हातांमध्ये कमळाची पुष्पे आहेत. दागिन्याने नखशिखांत नटलेल्या, भरजरी शालू नेसलेल्या पद्मावती देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती स्वरूप सुंदर आहे. देवीचे दर्शन घेऊन ओटी भरली. प्रसादाच्या केळ्यात आणि नारळात भर पडली. संध्याकाळी जहाजावर परत पोहोचलो.

देवी पद्मावती

एकूण दक्षिणेची यात्रा घडली. मी मुकुंदांना म्हटलं, “आपल्या लग्नाला एक वर्ष व्हायच्या आधीच आपल्या बऱ्याच तीर्थयात्रा झाल्या.” त्यावर ताबडतोब मुकुंद म्हणाले, “म्हणजे आता पापं करायला हरकत नाही.”

वड्यांचे प्रयोग
अगदी घडलं ही तसंच ! दुसऱ्या दिवशीच मी एक गोडसे पाप करायला हातात घेतलं. प्रसादाचे एक पिशवी भरून नारळ आणि दुसरी लहान पिशवी भरून केळी घेऊन जहाजावर पोचलो होतो. आता माझ्यातली सुगरण अचानक जागी झाली. त्यातले चार नारळ मी केबिनमध्येच मुकुंदांच्याकडून फोडून घेतले. ते बसून खोवले. प्रसादाची केळी घालून त्याच्या वड्या करायचं ठरवलं. मग जरा एक मोठ्या कढई सारखं पातेलं करवालो कडून आणून घेतलं. त्यात बटर, खोबरं, खवलेला नारळ, साखर, आणि बारीक चिरून कुस्करून केळी असं सगळं घालून ढवळत बसले. बराच वेळ झाला तरी मिश्रण घट्ट होईना. मग मिल्क पावडर घातली. मागच्या साखरेच्या अनुभवातून कंडेस्न्ड मिल्क जरा बेतानेच घातलं. मी आपली ढवळतेय ढवळतेय. पण गोळा घट्ट व्हायचं काही नावच घेईना. पाहता पाहता सोनेरी रंगाचं मिश्रण ब्राऊन व्हायला लागलं. खोलीभर त्याचा वास पसरला होता. आता काय करावं ? अगदी रडकुंडीला यायला झालं.
शेवटी काय होईल ते होऊ दे म्हणून काचेच्या सात-आठ मोठ्या डिशमध्ये ते सगळं मिश्रण ओतलं आणि गार करत ठेवलं. खोलीभर त्या डिश मांडून ठेवलेल्या होत्या. तेवढ्यात हरी आणि हे आत आले. तो डे – रुमभर पसारा बघून थक्क झाले.
माझे वड्या करायचे प्रयोग बघून त्यांनी मला कोपरापासून नमस्कारच घातला.
मी म्हटलं, “केव्हाची ढवळते आहे. या वड्या घट्टच होत नाही आहेत. अजून जेलीच राहिली आहे.” हे वैतागून म्हणाले, “असले उपदव्याप कशाला करत बसली आहेस ? आता सगळ्यांना ती जेलीच खायला घाल.”
मला अगदी हुश्य वाटलं. वड्यांचा सर्व पसारा जेलीच्या गोळ्यात समर्पित झाला. थोडी जेली एका बाऊल मध्ये सुचित्राला पाठवली थोडी केबिनमध्ये ठेवली. बाकी सगळी खाली डायनिंग रूम मध्ये वाटायला पाठवून दिली.
आणि परत कधीही वड्या करायच्या नाहीत अशी शपथ घेऊन टाकली.

नेहमी हल्दियाकडून तुतीकोरीनला जाणारी आमची शिप यावेळी अचानक मद्रास कडे पाठवण्यात आली होती. घरून आलेली सर्व पत्रे तुतिकोरीनच्या ऑफिसमध्ये येऊन पडलेली होती.
मद्रासहून घरी मुंबईला फोन लावायचा प्रयत्न केला. पण फोन होऊ शकला नाही. घरच्या कोणाशीच बोलता ही आलं नाही की कोणाचं पत्रही मिळालं  नाही.

Unloading संपत आलं होतं. बोटीने नांगर उचलला. हल्दियाच्या दिशेने प्रयाण झाले. तेथे नेहमीप्रमाणे जहाजात कोल भरून झाला. निघण्यासाठी जहाज सज्ज झाले.
हल्दियाच्या रहिवासात बिहारी पाणीपुरी म्हणजे फुचका मात्र मनसोक्त खाऊन घेतला.
या वेळेला पण परत मद्रासकडेच जायचे ठरले. मद्रासला पोहोचलो.
या वेळेला जहाजावर बरेच repair work निघाले. shore workshop ची माणसे आणि इंजनरूम मधलं अखंड काम यात मुकुंद बुडून गेले होते. मद्रास शहरात पण एक दोनदाच संध्याकाळी जाता आलं. तिथे फारसं फिरायला मिळालं नाही.

मद्रासहून निघायच्या आदल्या दिवशी अचानक मेलचा मोठा गठ्ठा तिथल्या एजंट कडे पोहोचला. तुतीकोरीनच्या ऑफिसने तो पाठवून दिला होता. जवळजवळ तीन आठवड्यांनी घरची पत्रे सर्वांना मिळाली. अर्थात आम्हालाही पत्रे मिळाली. पत्रे उघडून वाचायची उत्सुकता नेहमीच शिगेला पोहोचलेली असायची. पत्रे मिळाली तेव्हा हे इंजिनरूम मध्ये गेले होते.

अव्वा गेली !
घरून वृंदाचे खुशालीचे पत्र वाचले. छान वाटलं. त्यात बाबांचं ही एक पत्र मिळालं. पत्र उघडलं आणि मला रडूच कोसळलं. पत्रात लिहिलं होतं, आमची अव्वा गेली. अव्वा गेल्यानंतर सुमारे वीस दिवसांनी मला ही बातमी समजत होती.

अव्वा म्हणजे माझी आजी, बाबांची आई. तिचं पोटाच्या कॅन्सरचं ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं. तब्येत सुधारत होती. पण अचानक तब्येत बिघडली आणि उपचारांना दाद न देता २८ मार्च रोजी ती देवाघरी गेली.
मला रडू आवरेना.
केबिनमध्ये मी एकटीच होते. मुकुंदना इंजिनरूम मध्ये फोन करावा याचेही भान मला राहीले नाही. इतक्यात निशाला कडेवर घेऊन सुचित्रा आली. मला हमसा-हमशी रडताना पाहून ती घाबरली. तिला मी सारी हकीकत सांगितली. तिने प्रेमाने पाठीवर हात फिरवला. माझे डोळे पुसले. इतक्यात अजित कल्याणपूर आले. त्यांना सुचित्राने सांगितलं. त्यांनी इंजिनरूमला फोन करून मुकुंदांच्या कानावर हाकीकत घातली. मुकुंद केबिनमध्ये आले.
त्यांनी मला जवळ घेतलं. शांत केलं. म्हणाले,“हे बघ, आणखी खूप   जास्त त्रास होण्याच्या आधी अव्वांची त्यातून सुटका झाली. त्यांचं वयही बरंच झालेलं होतं. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे चांगलं झालं. आपलं माणूस आपल्याला हवं असतं. पण या गोष्टींना इलाज असत नाही” ते माझी समजूत काढत होते.
सारं मनाला पटत होतं पण ती माझी आजी होती. घरापासून, सर्वांच्या पासून दूर आपल्याच माणसाचा झालेला मृत्यू पचवणं फार अवघड होत होतं. अतिशय समजूतदार आणि प्रेमळ साथ होती ती मुकुंदांची !

अव्वाच्या असंख्य आठवणींनी मन आणि डोळे भरून येत होते. तिनेच मला तिरुपती आणि पद्मावती यांच्या परीणयाची गोष्ट सांगितली होती.
कुशध्वजाची कन्या वेदवती ही लक्ष्मीचा अवतार. तिची कथा ही तिने सांगितली होती. म्हणूनच तिने माझं नाव वेदवती ठेवलं होतं.

अचानक मला माझं ते स्वप्न आठवलं… अव्वा स्वप्नात आलेली होती…. ते स्वप्न ! आणि मला धक्काच बसला. मला स्वप्न पडलं होतं ती तारीख होती २७ मार्च आणि अव्वा गेली ती तारीख होती २८ मार्च !
जणू काही स्वप्नात येऊन तिच्या निधनाचे संकेतच ती मला देऊन गेली होती.
विश्वास ठेवावा न ठेवावा ! सारं काही अतर्क्य होतं एवढं मात्र खरं !

वेदवती कुलकर्णी

— लेखन : वेदवती मुकुंद कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन :  देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments