Homeलेख"माहिती"तील आठवणी"

“माहिती”तील आठवणी”

“रमेशचंद्र वाबगावकर”

“माहिती”तील आठवणी” या सदरात आज आपण वाचू या, जेष्ठ पत्रकार श्री कुमार कदम यांनी ताज्या केलेल्या दिवंगत माहिती संचालक श्री रमेशचंद्र वाबगावकर यांच्या आठवणी. कालच त्यांचा वाढदिवस होऊन गेला. त्यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

मी आज रमेशचंद्र वाबगावकर आणि त्यांची पत्नी इंद्रा गेहानी वाबगावकर या दिवंगत पती-पत्नीबद्दल लिहित आहे. माझ्या आजवरच्या आयुष्यात ज्या व्यक्तींबद्दल मला नितांत आदर वाटला, त्यापैकी हे एक दाम्पत्य आहे. ते दोघेही महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ पदावर कार्यरत होते.

रमेशचंद्र वाबगावकरांचा १८ नोव्हेंबर हा जन्मदिवस ! काल त्यांची ९५वी जयंती झाली. ते नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून ३० नोव्हेंबर १९८९ रोजी संचालक पदावरून निवृत्त झाले तर इंद्राने त्याच दिवशी सहाय्यक संचालकपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. यंदा या घटनेला ३७ वर्षे होतील. त्यामुळे सध्या मंत्रालयात कार्यरत असलेल्या पत्रकारांना आणि शासनातील अधिकाऱ्यांना वाबगावकर पती-पत्नींची फारशी माहिती असेलच असे नाही. अत्यंत हुशार असलेल्या या दाम्पत्याची शासकीय कारकिर्दीतील कार्यक्षमता आणि सचोटी वाखाणण्याजोगी होती. त्याचा अनुभव मला अनेकदा घेता आला.

रमेशचंद्र वाबगावकर हे अतिशय व्यासंगी, विद्वान व्यक्तिमत्त्व होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेवर प्रभुत्त्व असलेले रमेश वाबगावकर उत्तम लेखक व कवि देखील होते. दोघंही अत्यंत प्रेमळ आणि लाघवी स्वभावाचे होते. माझे त्यांचे खूप घरोब्याचे संबंध राहिले. किंबहूना माझ्या आयुष्यात आलेले हे अविस्मरीय जोडपे आहे.
इंद्रा खूप कडक स्वभावाची होती. त्यामुळे ती काही लोकांना फटकळ आणि आगाऊ वाटे. पण प्रत्यक्षात ती अत्यंत प्रेमळ, शिस्तप्रिय आणि लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारी होती. त्यामुळे माहिती आणि जनसंपर्क विभागातील कनिष्ठ विशेषत: चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून तिच्याबद्दल तिच्यामागे खूप चांगली प्रतिक्रिया ऐकायला मिळे.

सन १९६१ ते १९६५ हा माझा “एल्फिंस्टन टेक्निकल हायस्कूल” मधील शिक्षणाचा कालखंड. माझी शाळा मुंबईच्या धोबीतलाव भागात होती. मी दर शनिवारी सकाळी अकरा वाजता अर्ध्या दिवसानी शाळा सुटली की माझ्या मोठ्या भावाकडे; त्याच्या ऑफिसात जात असे. माझा हा मोठा भाऊ स्व. राममूर्ती हा त्यावेळच्या प्रसिध्दी खात्यात कामाला होता (त्यावेळी या विभागाचे नाव प्रसिध्दी आणि सांस्कृतिक कार्य खाते Publicity and Cultural Affairs Department असे होते, ते बदलून नंतर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय असे झाले). त्यावेळी आताच्या मंत्रालयाला सचिवालय असे म्हटले जाई. त्या काळी शासकीय कार्यालयांना देखील शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असे आणि दुपारी दोन वाजता ती बंद होत. भावाचे ऑफिस सुटले की, तो मला मुंबईतील विविध ठिकाणी फिरायला नेत असे.

इंग्रजी पत्रकारितेत नावारूपाला आलेले स्व. विनोद राव (ते त्यांच्या नावाचे स्पेलिंग Binod Rao असे करीत) हे त्या खात्याचे त्यावेळी संचालक होते. राव यांच्यानंतर दा. रा. सामंत हे संचालक झाले. माझा भाऊ आणि पै. आर. ए. खान तसेच स्व. इंद्रा गेहानी हे तिघे स्व. विनोद राव यांचे “पीए”म्हणून काम बघत असत. त्याचवेळी त्याच खात्यात रमेश वाबगावकर हे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याच ठिकाणी कु. आशालता नाईक नावाची एक तरूणी टायपिस्ट होती. तीसुध्दा माझ्याशी गप्पा मारीत असे.

इन्द्राला सहकाऱ्यांना विविध पदार्थ खाऊ घालण्यात आनंद वाटे. (ही तिची सवय तिच्या अखेरपर्यंत शाबूत होती). मी भावाच्या ऑफिसमध्ये गेलो की, ती मला देखील अनेक पदार्थ खाऊ घाली. विशेष म्हणजे ती दर शनिवारी माझी वाट पहात असे. ती माझी थट्टामस्करीसुध्दा करीत असे. हा तिचा स्वभाव मी ती खूप आजारी पडेपर्यंत सतत अनुभवला.

एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलच्या गणवेषाच्या पांढरा शर्ट आणि अर्ध्या निळ्या पॅन्टवर सचिवालयात जाणारा मी, पुढील काळात माझा भाऊ केंद्र सरकारच्या इंडियन इन्फर्मेशन सर्विसमध्ये गेल्यानंतरही, केवळ इन्द्राला भेटायला सचिवालयात जात असे. योगायोगाने पुढे पत्रकार म्हणून मला जवळपास ३५ वर्षे कामाचा भाग म्हणून मंत्रालयात जावे लागले. त्यामुळे वाबगावकर पती-पत्नी निवृत्त होईपर्यंत त्यांची माझी जवळपास रोजच भेट होई.

एकदा मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये मी वाबगावकर पती-पत्नीसोबत गप्पागोष्टी करीत असताना कोणत्या तरी विषयावरून इन्द्राची मस्करी केली, तेव्हा ती लटकेच चिडून पण गमतीने मला म्हणाली, “ये जादा हुशारी मत कर, एक लाफा देऊँगी”. नेमक्या त्याच वेळी ज्येष्ठ पत्रकार यशवंत उर्फ नाना मोने आमच्या बाजूने जात असताना त्यांनी इन्द्राचे ते बोलणे ऐकले. नाना मोने संतापानेच प्रेस रुममध्ये गेले आणि त्यांनी तेथे माझ्या नावाने मोठा गोंधळ घातला. नानांचे म्हणणे होते हा (म्हणजे मी) आपल्या संघटनेचा अध्यक्ष आहे, त्याला एक सरकारी अधिकारी “लाफा मारीन” असे बोलते आणि तो ते गुपचूप ऐकून घेतो हा सर्व पत्रकारांचा अपमान आहे. (त्यावेळी मी मुंबई मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष होतो. तसेच नाना मोने आणि इन्द्राचे फारसे जमतदेखील नव्हते !) त्यानंतर मी प्रेसरुममध्ये गेलो तेव्हा मला हे सर्व समजले. मग मी माझे आणि इन्द्राचे ऋणानुबंध कसे आहेत हे सर्वांना सांगितले. नानांनीही ते मान्य केले आणि प्रकरण संपविले.

रमेशचंद्र वाबगावकरांच्या “किसलय” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ त्यांच्या “कमलपुष्प” या वान्द्रे येथील सोसायटीच्या हॉलमध्ये मी आणि माझा सहकारी शिवाजी धुरी याने घडवून आणला होता. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भोगटे यांनी या काव्य संग्रहालयाची छपाई केली होती. ज्येष्ठ सहकारी पत्रकार प्रकाश बाळ जोशी याच्या हस्ते त्याचे प्रकाशन केले होते.

“वाबगावकर” यांच्या आठवणी जागवतांना आणखी एका घटनेचा उल्लेख करणे अपरिहार्य ठरते. ती घटना म्हणजे रमेशचंद्र यांचा आशालता नाईक यांच्याशी झालेला विवाह ! हा विवाह फार काळ टिकला नाही. तो त्या दोघांच्या आयुष्यातील जणू काही एक अपघात ठरला. त्यानंतर काही वर्षांनी रमेशचंद्र यांनी श्रीमती इंद्रा गेहानी हिच्याशी विवाह केला.त्यावेळी ल. के. गोरे या नावाचे माहिती आणि कला सांस्कृतिक खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रंथालयाचे प्रमुख ग्रंथपाल होते. हे गृहस्थ अत्यंत बुध्दीमान, शिस्तप्रिय पण त्याचबरोबर मिस्कील स्वभावाचेही होते. ते नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सांगत, “या वाबगावकराने आशालताशी लग्न करून आगीशी खेळ केला आहे”. याच “आगीत” पुढे कोणी एका नररक्षकाने तेल ओतले आणि त्याचा विस्फोट झाला. दोघांचाही काडीमोड झाला. पण आशालताच्या नावापुढे लागलेले वाबगावकर हे शब्द त्यांच्या अखेरपर्यंत चिकटून राहिले. त्यांनी ते काढण्याचा नाट्य आणि चित्रपट सृष्टीत खूप प्रयत्न केला पण ते मराठी रसिकांच्या मनातून आजही खोडले गेलेले नाहीत.

आशालता यांचे, २० सप्टेबर २०२० रोजी निधन झाले. त्यावेळी एका माध्यमातील एका तरूण पत्रकाराने नेहमीप्रमाणे बातमी देण्यापूर्वी मला आशालता यांच्या नावात “वाबगावकर” हा शब्द कुठून आला असा प्रश्न विचारला, तेव्हा “आशालता” आणि “वाबगावकर” या नावांच्या मागील हा सर्व इतिहास मी त्याला सांगितला. पण तो म्हणाला की, गुगलवर “Ashalata Wabgaonkar remained unmarried throughout her life and did not have a husband” असं म्हटलं आहे. तेव्हा मी ते चुकीचे असून मला अगदी विद्यार्थी दशेत त्या तिघांना अनेकदा भेटता आले, असे सांगताच त्याने, “तुम्ही हे सारे लिहीत का नाही” असा प्रश्न देखील उपस्थित केला.

आजही कुठेही “वाबगावकर” हे आडनाव उच्चारले गेले तर साऱ्या मराठी जनांसमोर उभी राहते ती “आशालता वाबगावकर” यांची प्रतिमा ! मात्र त्या आपले नाव आवर्जून “आशालता” असेच लावत असत. किंबहुना तसा त्यांचा आग्रह असे. “वाबगावकर” या आडनावाशी आपण कायमचा काडीमोड घेतला आहे, हीच त्यांची भूमिका होती. परंतु त्यांच्या हयातीत आणि निधनानंतरही फेसबुक, व्हॉटस्अप आदी विविध माध्यमांमध्ये बातम्या आणि लेखांमध्ये त्यांचा उल्लेख हा “आशालता वाबगावकर” असाच केला गेला. कारण मराठी प्रेक्षक, श्रोते यांच्या मनात “आशालता वाबगावकर” हेच नाव गेली अनेक वर्षे कोरले गेलेले आहे.

‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून तेव्हाच्या “आशालता नाईक” यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. मात्र “आशालता वाबगावकर” याच नावाने त्यांनी संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून व्यावसायिक नाटकांच्या यशस्वी शिखर गाठले. ‘गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ अशा नाटकांमध्ये त्यांनी त्यानंतर एकाहू एक सरस अशा प्रमुख भूमिका साकारल्या. मत्स्यगंधा हे नाटक आणि त्यातील “अर्थशून्य भासे मज हा कलह प्रीतीचा” आणि “गर्द सभोतीं रानपाखरे, तू तर चाफेकळी” या गाण्यांनी मराठी मनात एकोणीसशे चौसष्ठ साली जे स्थान मिळवले, ते आजही कायम आहे. त्यामुळे आजही त्यांचा उल्लेख हा “आशालता वाबगावकर” असाच होत असतो.
“वाबगावकर” कुटुंबियांशी जुळलेले हे नाते रमेशचंद्र वाबगावकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी शब्दात उतरविले आहेत.

कुमार कदम

— लेखन : कुमार कदम.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments