Homeलेखताटी उघडा ज्ञानेश्वरा : १०

ताटी उघडा ज्ञानेश्वरा : १०

“अनंतातून अनंताकडे”

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥

बृहदारण्यक उपनिषदामधील हा शांती मंत्र माहीत आहे ना? अनेकदा म्हटलाही असेल, पण कधी अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का ? जे अव्यक्त आहे ते पूर्ण आहे, आणि जे व्यक्त आहे तेही पूर्णच आहे. पूर्णातूनच पूर्णाची उत्पत्ती झाली आहे. आणि पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच राहणार आहे. काहीतरी गणितीय कूट वाटतंय ना ? आता याला ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमाशी (Law of Conservation of Energy) जोडून बघा. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते. त्यामुळे या विश्वातील एकूण ऊर्जा कायम स्थिरच राहते.

विश्वाच्या निर्मितीपूर्वी जी मूळ अव्यक्त ऊर्जा होती, ती ‘पूर्ण’ (१००%) होती. जेव्हा विश्वाची निर्मिती झाली (उदा. बिग बँग), तेव्हा त्या सुप्त ऊर्जेमधूनच हे सर्व ग्रह, तारे आणि भौतिक सृष्टी निर्माण झाली. हे ‘पूर्ण’ भौतिक जग प्रकट झाले. येथे काहीही नवीन निर्माण झाले नाही, तर मूळ ऊर्जेचे दृश्य रूपात रूपांतर झाले. जर आपण इथली एखादी गोष्ट नष्ट केली, तरी ती प्रत्यक्षात नष्ट होणार नाही; तिचे फक्त दुसऱ्या ऊर्जेत किंवा स्वरूपात रूपांतर होईल (उदा. लाकूड जळल्यावर त्याचे राख आणि उष्णतेत रूपांतर होते). त्यामुळे मूळ ऊर्जेमधून कितीही ऊर्जा वापरली किंवा वजा केली, तरी विश्वातील एकूण ऊर्जा नेहमी ‘पूर्ण’ म्हणजेच स्थिरच राहील.

आता गंमत बघा, गणित आणि ज्ञानातील या सिद्धांताला आपण शांतिमंत्र का म्हणतो ? सांज-सकाळ प्रार्थना म्हणून का उच्चारतो? कुणी ठरवले हे नियम कशासाठी? तर ते आहेत, आपल्याला आपल्याच अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी !

आपण त्या पूर्ण ऊर्जेचे पूर्ण स्वरूप आहोत… तेवढीच अनंत ऊर्जा आपल्यातही आहे. ही ऊर्जा नष्ट होणारी नाही मात्र परिवर्तनीय जरूर आहे; तेव्हा तिला चिंता-क्रोधात गुंतवायचे की शांतीच्या सागरात हा निर्णय आपला आहे. मुक्ताई मात्र ज्ञानेश्वरांना आणि त्यायोगे आपल्यालाही ‘सुखसागर’ व्हायला सांगतात –

“सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥”

समुद्र जसा अथांग-अनंत आहे, तसेच आपले मनही. या मनाला आपण शांत करावे आणि स्वतःच सुखी व्हावे. लाटा येतील-जातील, अंतरंगातून मात्र आपण स्थिर व्हावे. आणि इतरांनाही स्थिरावण्यास यथाशक्ती मदत करावी. आपल्याकडे जे काही हितकर आहे, ते मुक्तहस्ते वाटून द्यावे. त्याने आपले काहीच कमी होणार नाही. एकदा पूर्ण शांतीचा अनुभव घेतला की मग आपल्यातून काहीच उणावणार नाही.

“बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥”

पूर्णत्वाच्या या बोधापासून आपले मन आणि बुद्धी कधीही दूर होऊ नये, यासाठी आपल्याला सतत सजग राहायला हवे. आपल्यातील शांती ढळू नये यासाठी अद्वैताची कास धरायला हवी. उगाच आप-पर भेद जागायला नको. कुणी आपल्याशी कितीही दुर्व्यवहार केला तरी, मनातील वेदनेच्या- क्रोधाच्या लाटेला आपल्याच मार्गात भिंत बनून उभे राहू द्यायचे नाही… जितक्या वेगाने ती उसळून वर आली, तितक्याच सहजतेने आपणच तिला शांत करून पुढे निघून जायचं.

“जीव जीवासी पैं दयावा । मग करुं नये हेवा”

समोरचा कसाही असो; आपल्या हृदयातील दया आणि प्रेमावर त्याचा परिणाम व्हायला नको. कुणाच्या तरी चुकांसाठी आपण आपले मन आकसून घेऊ नये. राग, लोभ, हेवा, मत्सरापासून जितक्या दूर राहता येईल तेवढे चांगले. लोकांच्या चुका विसरून त्यांच्यावर दयेचा वर्षाव करणे, हे संतांचे लक्षण आहे. आपण त्यांच्याइतके विशालहृदयी होऊ शकलो तर उत्तमच, अन्यथा किमान माफ करून पुढे जायला हवं. स्वतःलाच मनोमन जाळत राहण्यात काहीच अर्थ नाही.

“तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥”

या संसारातून तरून जाण्याचा हाच एक उपाय आहे. दुःखाच्या गर्द डोहातून बाहेर काढणारा हाच एक प्रकाशपथ आहे. दयाभावना मनात जागवण्यातच उद्धार आहे. ती जसजशी आपल्या अंतरात रुजेल, तसतसे ताटीचे दरवाजे उघडत जातील. अनंत अडचणींतून अनंत शांतीकडे प्रवास सुरू होईल.आपल्याही नकळत!
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments