Homeसाहित्यपुस्तक परीक्षण

पुस्तक परीक्षण

“काॅमा“

सौ अलका भुजबळ लिखित “काॅमा” हे पुस्तक नुकतंच वाचनात आले. अलका भुजबळ हे नांव तसे सर्व परिचित आहे. त्या आरोग्य संवादक, काही दूरदर्शन मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्याने आणि गेली काही वर्षे ‘न्यूज स्टोरी टुडे’ या लोकप्रिय ‘वेबपोर्टल’च्या निर्मात्या, प्रकाशिका, यूट्यूबर आहेत.

अलकाताईनी लिहिलेले, ‘काॅमा’ हे पुस्तक पाहून मनात कुतूहल जागृत झाले. पुस्तक चाळत असताना अर्पण पत्रिकेने लक्ष वेधून घेतले. अर्पण पत्रिकेत लेखिका लिहिते, “माझ्या प्रकृतीबद्दल नेहमी सतर्क राहूनही अचानक उद्भवलेल्या कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचे लागलीच निदान जिच्यामुळे झाले आणि या आजारपणात मला लढण्याचे बळ देणारी माझी कन्या देवश्री, मानसिक बळ देणारे माझे पती देवेंद्र, भाऊ विजय, अजय, भावजया मंदा, राजश्री, डॉ.डेलीवाला, डॉ.रेखा डावर, डॉ.परेश, डॉ.मोहन मेनन, सिस्टर्स, माझ्या मैत्रिणी, तसेच ज्ञात अज्ञात व्यक्तींना मन:पूर्वक अर्पण….” या शब्दात सर्वांच्या प्रती कृतज्ञतेची भावना लेखिका व्यक्त करते. हे ही लक्षात येते की, काॅमा हे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावरील स्वानुभवावर आधारित आत्मकथन आहे.

अलकाताईवर शस्त्रक्रिया, उपचार करणार्‍या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ तथा डॉ.रेखा डावर ; सर.एच्.एन.रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय, मुंबई यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ समर्पक, अर्थपूर्ण आणि लक्षवेधी असून डिंपल पब्लिकेशन यांनी ते प्रकाशित केले आहे.

वास्तविक आज माणसाचं जगणं मोठं आव्हानात्मक झाले आहे. जीवावर बेतणारे प्रसंग जीवनात येत असतात. अशावेळी खचून न जाता धैर्याने व खंबीर मनाने सामोरे गेल्यास त्यावर सहजतेने मात करता येते हेच लेखिका इथे सांगते आहे. लेखिकेला जेव्हा गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले तेव्हा खचून न जाता डाॅक्टरांचा सल्ला, उपचार, औषधं, पथ्यपाणी,
कुटुंबाचे सहकार्य या जोरावर तिने स्वतःचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. सजगतेने, सतर्कतेने स्वतः ची काळजी घेत गेल्याने त्यावर यशस्वीपणे मात करता आली. यावरच लेखिका थांबत नाही तर केमोथेरपी चालू असतानाच पती, कन्या व मैत्रिणींच्या आग्रहाखातर स्वानुभव लिहिण्यास सुरुवात केली. जबरदस्त इच्छाशक्तीमुळे हे प्रेरणादायी आत्मकथन
प्रत्ययास आले. “काॅमा” हे पुस्तकास दिलेले शिर्षक वाचकांचे लक्ष वेधून घेते. कॅन्सरसारखा दुर्धर आजार होणे म्हणजे जीवनातला फुलस्टाॅप नव्हे, तर तो असतो स्वल्पविराम ! अर्थात काॅमा !!!

हे आत्मकथन वाचकांस अंतर्मुख करते. विचार करण्यास भाग पाडते. अशा आजारपणात येणाऱ्या अडचणी, समस्या, समाजाची बघण्याची मानसिकता, स्वतः वर झालेल्या आघातातून सावरताना मनाची घालमेल, वैद्यकीय उपचार घेतानाच्या अडचणी, वेदना, डाॅक्टरां वरील विश्वास, नात्यांची जपणूक, नोकरीतील ताण अशा अनेकविध गोष्टींना सामोरे जातानाची मानसिक आंदोलनं या बाबी सविस्तर, सहज, साध्या, सोप्या ओघवत्या शैलीत मांडण्यात आल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे. आपण आपल्या आरोग्याविषयी सतत जागरुक असले पाहिजे. नशिबाला दोष न देता जैव प्रक्रियेतून निर्माण झालेले शारीरिक भोग म्हणून पाहणे उचित ठरते, हे ही अधोरेखित होते.

कॅन्सर म्हंटले की, माणूस घाबरुन जातो. संबंधित रुग्ण आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकते. अशा भयंकर परिस्थितीत न डगमगता, धीराने तोंड दिल्यास लढण्याचे बळ प्राप्त होते, हेच लेखिका आपल्या अनुभवातून सांगते.

अलिकडच्या काळात स्त्रियांमध्ये स्तनांच्या आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण ‘द लॅन्सेट आॅन्कोलाॅजी’ या नियतकालिकात (04 : 03 : 2026 लोकसत्ता) त्याविषयीचा अहवाल प्रसिध्द झाला आहे. 1990 ते 2023 पर्यंतच्या काळात भारतात या आजाराच्या रुग्ण संख्येत 477 % ची वाढ झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे स्त्रियांचे आरोग्य आज कळीचा मुद्दा बनला आहे.

‘काॅमा’ हे आत्मकथन वाचत असताना नकळत माझं मन थबकलं. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी मुकाबला करताना त्यांनी शब्दबद्ध केलेला अनुभव हा केवळ लेखिका अलका भुजबळ यांचा रहात नाही तर माझ्या भवताली या रोगाशी झुंज देणाऱ्या मैत्रिणी डोळ्यासमोर येतात. दोघींनी कडवी झुंज देऊन त्या पुन्हा पूर्वी सारख्याच समरसून जगत आहेत. दोघींच्या केमोथेरपी चालू आहे. पण त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले नाही तर त्या आमच्या योग हास्य क्लबमध्ये येऊन मनसोक्त हसून मोकळ्या होतात. काॅमा पुस्तक वाचून ती मैत्रिण म्हणाली, ‘ही तर माझीच कहाणी आहे !! ‘

ही आत्मकथा जीवनाकडे पाहण्याची एक संवेदनशील दृष्टी देऊन जाते. प्रत्येक लढाई उमदेपणानेच लढायची असते, ही जाणीव लेखिका देऊन जाते. लेखिकेच्या मनाचा प्रांजळपणा पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतो. कॅन्सरचे निदान झाल्यापासून मार्च 2018 पर्यंतचा उपचाराचा संपूर्ण प्रवास अगदी बारीक सारीक तपशिलाने नमूद केला आहे. सर्व रिपोर्ट्स नाॅर्मल आल्याचं पाहून जणू पुनर्जन्म मिळाल्याचा सहजसुलभ भाव लेखिका नमूद करते. हे ही आवर्जून सांगते की, हे आत्मकथन केवळ एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पुस्तक रुपाने समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. चौथ्या केमोनंतर हाताचे सेन्शेसन पूर्णपणे गेल्याने हाती पेन पकडून लिहिणे कठीण झालेले असताना देखील समाजाचा विचार करुन त्यांनी लेखनिकची मदत घेतली अन् आत्मकथन पूर्णत्वास नेले. लेखिकेच्या इच्छाशक्ती आणि सामाजिक बांधिलकीला माझा सलाम …!!

अशा आजारात प्रचंड आर्थिक खर्चाला तोंड द्यावे लागते. त्यासाठी वैद्यकीय विम्याची मेडिकल सुविधा अशा आजारात जरुर घ्यावी हे देखील सुचवितात.

लेखिका “कॉमा” हे पुस्तक अन्य भारतीय भाषेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माय मेडिकल मंत्रा वेब पोर्टल, आकाशवाणी, दूरदर्शन, अन्य वाहिन्यांवर लेखिकेच्या प्रेरक मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. शिवाय प्रसिध्द लेखक दिग्दर्शक आशिष निनगुरकर यांनी त्यांच्या जीवनावर ‘काॅमा’ या नावानेच प्रभावी लघुपट निर्माण केला आहे. त्यांचे पती, माध्यम कर्मी श्री देवेंद्र भुजबळ यांच्या संकल्पनेतून ‘काॅमा’ संवाद उपक्रम साकार झाला. या उपक्रमात लेखिका हिरीरीने सहभागी होत आपला स्वानुभव कथन करीत प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन ही करतात.

सुरुवातीला नमूद केलेल्या उपक्रमांशिवाय अलकाताई कर्करोगग्रस्त आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी त्या समुपदेशन करीत असतात. त्यांच्या या कार्याला, निरोगी स्वास्थ्याला भरभरुन शुभेच्छा.

डाॅ. प्रभा वाडकर

— परीक्षण : प्रभा वाडकर. लातूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments