Homeलेखखिडकी : 13

खिडकी : 13

प्रत्येक गावाचे एक काहीतरी वैशिष्ट्य असते. याआधी मी प्रवासाबद्दल लिहिले आहे, हा भाग देखील त्यातच येतो. प्रवासात ज्या गावी आपण जातो ते गाव व प्रवासादरम्यान जी इतर गावे आपल्याला लागतात ती गावे, यांच्या काही खास आठवणी त्यांच्या वैशिष्ट्यांमुळेच आपल्या लक्षात राहतात.

अकोला-देऊळगाव हा प्रवास आम्ही दोन टप्प्यात करायचो. यात पातुरपर्यंत भरपूर गाड्यांचा पर्याय असायचा. खुद्द अकोला-पातुर बस होत्या. त्याशिवाय वाशीम, मालेगाव कडे जाणाऱ्या सर्व बसेस पातुरहून जायच्या. त्याकाळी पातुर-बाळापूर-अकोला असा एक त्रिकोण होता. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या आजही तो त्रिकोण तसाच आहे. पण तेव्हा त्या वयात, त्या काळात, मला या त्रिकोणाचे वेगळेच आश्चर्य वाटायचे. मला आठवतं बाळापूरला एकदा मी एका तिठ्यावर एक बोर्ड बघितला. ज्यावर अकोला आणि पातुर दोन्ही परस्पर विरुद्ध दिशेला मात्र समान अंतरावर होते. फारच गंमत वाटली होती तेव्हा मला.

बसच्या प्रवासात काही गोष्टी त्यावेळी मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्यातील अकोला-देऊळगाव प्रवासातील पातुरला ब्रेक घेऊन मग पातुर-बाळापूर बसने देऊळगाव ला जाणे हा प्रवास आहे. कारण यात आम्ही सकाळी लवकर निघालेलो असायचो. आणि अकोला-पातुर हा प्रवास केवळ अर्धा पाऊण तासाचा आहे. हा प्रवास झाला की पातुरला बाळापुर फाट्यावर मस्त सकाळी-सकाळी शेवपापडी मिळायची. पातुरला खास रस्त्याच्या कडेला असले हॉटेल होते, जिथे बाहेर मोठ्या परातीसारख्या ताटात गरमागरम शेवपापडी, चिवडा, कचोरी, समोसा, असे एक से बढकर एक चटपटीत पदार्थ काढलेले असायचे. ज्यांना गोड खायची इच्छा असायची त्यांच्यासाठी सुद्धा मस्त जिलेबी असायची. मला गोड आवडत नाही, त्यामुळे माझे लक्ष शेवपापडीकडे असायचे. सकाळी घरातून निघताना फार तर केवळ चहा घेतलेला असायचा. आणि निघतानाच ठरलेले असायचे की पातुरला काहीतरी खाऊन घेऊ मग पुढे देऊळगाव ला जाऊ. त्या एका वाक्याने अकोला-पातुर प्रवासाचा आनंद द्विगुणीत व्हायचा.

अकोल्याची बस पातुर बसस्टॉपवर वर थांबायची. मग कंडक्टरला विचारावे लागायचे की पुढे बाळापुर फाट्यावर बस थांबेल की नाही. कारण मालेगाव किंवा वाशिम या दिशेने जाणाऱ्या काही बसेसला एक्सप्रेस चा दर्जा दिलेला असायचा, मग या बसेस केवळ अधिकृत स्टाॅप वरच थांबत असत. लोकांच्या सोयीसाठी कुठल्याही फाट्यावर त्या थांबत नसत. जर कंडक्टरने होकार दिला, की पुढे फाट्यावर बस थांबणार आहे, तर आम्ही बसमध्येच बसून राहायचो. मग पाच एक मिनिटात पातुर स्टॅन्ड वरून बस पुढे निघायची, आणि पाचच मिनिटात बाळापुर फाट्यावर आम्हाला सोडायची. मात्र जर बस फाट्यावर थांबणार नसेल, तर मग साधारण पंधरा-वीस मिनिटांची पायपीट ठरलेली असायची. मात्र आम्ही ती पायपीट आनंदाने करायचो, कारण फाट्यावर मस्त हॉटेलात बसून शेवपापडी, चिवडा, असा नाश्ता आम्हाला मिळणार असायचा.

पातुरच्या त्या हॉटेलातील लाकडी बाकड्यावर बसून, वर्तमानपत्रात दिलेल्या त्या शेवपापडी आणि सोबत हिरवी मिरची या नाष्ट्याची चव आजही जिभेवर रेंगाळते. ती एक वेगळीच टिपिकल चव होती. आता शेवपापडी देखील ब्रँडेड झाली आहे. अगदी छान हवाबंद पाकिटातून शेवपापडी मिळू लागली आहे. आपण आज अचानक जास्तच हेल्थकॉन्शस झालोय. आता रस्त्याच्या कडेला असलेले हे पदार्थ अचानक अनहेल्दी वाटू लागलेत. मात्र खरं सांगू, बाकी काहीही असो पण त्या काळात त्या बाकड्यावर बसून हा नाश्ता करण्यात जी मजा यायची ती आता चांगल्या महागड्या हॉटेलातही येत नाही.

गरमागरम शेव पापडी खाल्ली, मग कोळशाच्या शेगडीवर उकळत असलेला वाफाळणारा चहा घेतला, की आमचा पुढील प्रवास सुरू व्हायचा. तो म्हणजे पातुर-देऊळगाव. आता यात ट्विस्ट असा होता की, देऊळगाव ला जायला दोन पर्याय असायचे. एक म्हणजे काली-पिली म्हणजेच एक जीप. जिला मुंबईत असलेल्या टॅक्सी प्रमाणे काळा आणि पिवळा रंग दिलेला असायचा. याला इथे काली-पिली म्हणतात. अगदी आजही हा शब्द प्रचलित आहे. दुसरा पर्याय म्हणजे बस, बसच्या बाबतीत असे होते की जर पातुर-बाळापूर अशी बस मिळाली तर बसून जायला मिळायचे. आणि जर ती बस आली नसेल, किंवा नुकतीच निघून गेलेली असेल, तर मग वाशिम, मालेगाव, या बाजूने बाळापूरला जाणारी बस पकडावी लागायची. मात्र या बसेस मध्ये तुफान गर्दी असायची. त्यामुळे आम्ही मग पातुर-बाळापूर बस ची वाट बघत बसायचो.

खरंतर यात आम्ही बसने गेलो काय, किंवा काली-पिलीने गेलो काय, दोन्ही ठिकाणी सारखाच खर्च होता. दोन्ही वाहनांचे देऊळगाव चे दर सारखेच होते. आणि दोन्ही ठिकाणी सगळ्यात शेवटी देऊळगाव चे प्रवासी घेतले जायचे. बसने जायचे म्हटले तरी, आधी वडगाव, बाळापुर, असे लांबच्या गावचे प्रवासी ते घ्यायचे. मग बस निघताना देऊळगाव वाल्यांना, चढा आता म्हणून सांगितले जायचे. तोच प्रकार काली-पिलीचा. इथेही आधी वडगाव, बाळापुर, वाल्यांच्या सीटा भरल्या जायच्या. मग अगदी निघताना देऊळगावचे असल्यास त्यांना कोंबले जायचे.

आम्ही सर्व 14,15 जण असल्याने काली-पिलीवाले नकारच द्यायचे. कारण त्यांना ते परवडायचे नाही. पातुर-देऊळगाव साधारण दहा एक किलोमीटरचे अंतर असल्याने त्यांना लांबची सवारी हवी असायची. आणि त्याकाळी जास्तीचे भाडे देऊन ती टॅक्सी देऊळगाव ला नेण्याची आमची ताकद नव्हती. त्यामुळे एक-दोन वेळा वडील, काका, या टॅक्सीवाल्यांना विनंती करून बघायचे, पण त्याचा काही फायदा व्हायचा नाही. ते एकच मार्ग सांगायचे की, जमेल तसे एक-दोन, एक-दोन जण वेगवेगळ्या टॅक्सीने देऊळगाव कडे निघा. मात्र वडिलांना ते मान्य नसायचे. मग पर्याय एकच उरायचा, तो म्हणजे जी बस मिळेल त्यात बसायचे, आणि देऊळगाव गाठायचे.

आज याच ठिकाणी जेव्हा मी माझी स्वतःची कार घेऊन जातो, तेव्हा हे सगळे आठवते. कारच्या खिडकीतून बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या बस आणि काली-पिली आजही दिसतात. आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये परातीतील शिवपापडी देखील असते….
क्रमशः

किरण आचार्य

— लेखन : किरण आचार्य.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झेप : 30

झेप : 29

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments