Homeयशकथाझेप : 30

झेप : 30

“प्राची पाटील”

नमस्कार वाचक हो🙏🏻
मातीच्या गोळ्याला आकार देऊ तसा तो घडत जातो. एकदा का योग्य आकार घडायला सुरुवात झाली की मग कलात्मक निर्मिती होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या झेपमध्ये आपल्या भेटीला आलेली सुंदर युवती कु. प्राची प्रवीण पाटील.

प्राचीच्या प्रवासाची कथाही अगदी अशीच आहे. ज्या वयात मुले चालायला, पळायला शिकतात त्या वयात म्हणजे अगदी चार वर्षाचीच असताना प्राचीचे स्केटिंग शिकणे सुरू झाले. अभ्यासासोबत खेळ हवाच, ही आईने दिलेली प्रेरणा प्राचीसाठी दिशा दर्शक ठरली. तिला मनापासून स्केटिंग आवडू लागले. अगदी अंगणवाडीत असताना लागलेली चक्राची ओढ आज प्राचीची ओळख बनली आहे.

सध्या पुण्यामध्ये शंभरहून अधिक मुले प्राचीकडे स्केटिंगचे शिक्षण घेतात. ती त्यांना फक्त स्केटिंग शिकवत नाही तर जीवनावश्यक बाबीही शिकवत असते. खेळताना पडले, लागले तरी तिकडे दुर्लक्ष करून पुन्हा नव्याने उभे राहून सुरुवात करणे मजबूत बनवते. पाया भक्कम झाल्यावरच निर्मिती उत्कृष्ट होते.

प्राची म्हणते, प्रत्येक मूल खास असते. जीवनात नेहमी एकाच प्रकारचे, विचारांचे लोक भेटू शकत नाहीत. कधीही बरे वाईट अनुभव येऊ शकतात. अशा स्थितीवर मात करणे, विचाराने वागण्याचे धडेही ती मुलांना देत असते.
कोणतीही नवीन गोष्ट शिकताना वेळ जातो, धडपड होतेच पण आत्मविश्वास ठेवला तर ध्येय साध्य होऊ शकते. आचार विचारातील संतुलन, संयम बाळगणे, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेणे, वेळेची कदर आणि नियोजन अशा बाबीही दैनंदिन जीवनात फार महत्वाच्या असतात.. नाही का ?

प्राचीचे स्केटिंग वरील प्रेम तिच्या खेळातून, मुलांना शिकवण्यातून दिसून येते. गेल्या १५ ऑगस्टला; आपल्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जागतिक विक्रम करण्यासाठी अविरत ८० मिनिटे स्केटिंग करण्याचे ठरले होते. त्यात तिच्या चाळीस विद्यार्थ्यांपैकी अडतीस विद्यार्थ्यांनी न थांबता पूर्ण ८० मिनिटे स्केटिंग करण्याचा विक्रम केला.
त्यातील एक मुलगा चालताना जरा अडखळायचा. पण हा ८० मिनिटांचा जागतिक विक्रम करण्यात त्याचाही सहभाग आहे. अजिबात न अडखळता त्याने अगदी व्यवस्थित स्केटिंग केले. हे पाहून त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू बोलके होतात. शिक्षक म्हणून प्राचीला वाटणारा अभिमान सार्थ ठरतो. हा प्रसंग ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते मग प्रत्यक्ष गुरू, शिष्य आणि पालकांची अनुभूती काय असेल ! तारे जमीन पर.. मधील आमीर खान हेच सांगतो. प्रत्येक मूल खास असते. प्राचीच्या कृतीतून ते आपल्याला सहज उमगते. शिक्षकांचे सर्व गुण आपल्याला प्राचीमध्ये पाहण्यास मिळतात . बोलण्यातून, विश्वासातून, शिकवण्याच्या पद्धतीतून प्राची तिच्या विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करत असते.

पहिल्यांदा नववीत प्राचीने राष्ट्रीय स्तरावर स्केटिंग स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत ती अठरा वेळा राष्ट्रीय स्तरावर स्केटिंग खेळली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत असताना तिच्या हाताचे हाड सात वेळा मोडले होते. तेव्हा हाताची मोठी शस्त्रक्रियाही करावी लागली. तरीही प्राचीचे चाकांवरील प्रेम जराही कमी झाले नाही. उलट वाढतच गेले.
फक्त स्केटिंगचीच चाके नाही तर गाड्यांच्या चाकांचेही तिला प्रचंड वेड आहे. चाकांवर फिरण्याचा छंदच प्राचीला जडला आहे.. मग ती चाके स्केटिंग असो वा गाडीची.

लहानपणी शाळेत असताना उन्हाळ्यात सुट्टीला गावी गेल्यावर आजोबा नातवंडांना गाड्या चालवायला शिकवायचे. प्राची दुचाकी शिकली त्यावेळी ती चौथीत होती. सहावीत असताना चार चाकी शिकली. सायकल शिकायच्या वयात प्राची व्यवस्थित गाड्या चालवायला शिकली होती. त्यावेळी तिला जाणवायचे आपण काही तरी वेगळे करतोय. बालपणीचा हा छंद पुढे कुठे नेणार याची त्या लहान वयात काय कल्पना असणार ?
पण आज त्याचे फलित दिसून येते. वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्यावर लगेच तिच्या १९ साव्या वाढदिवसाला प्राचीच्या काकांनी दिल्ली – खार्दुंग ला – दिल्ली अशी बाईक रायडिंगसाठी फेरी आयोजित केली. या बाईक रायडिंगची परिणती म्हणजे प्राचीला जागतिक स्तरावर “Youngest female biker of India” म्हणून पुरस्कार मिळाला.

मोठे चुलते नि भावंडांसह केलेल्या या रोमांचित यात्रेने प्राचीला बाईक रायडिंगसाठी विश्वास दिला. खार्दुंग ला जाताना वापरलेली भाड्याची बाईक आपल्यासाठीच बनली आहे असे तिला वाटले. तिच बाईक तिने विकत घेतली नि तिचा बाईक रायडर म्हणून नवीन प्रवास सुरू झाला.
प्राची पुढील झेप घेण्यास तयार झाली होती. २०२५ मध्ये पुणे – स्पिती व्हॅली – पुणे अशी फेरी मारून बाईक रायडर प्राचीने अजून एक टप्पा यशस्वीपणे पार पाडला.

गाड्या सगळेच चालवतात पण त्यातही कौशल्य, प्रशिक्षण, सराव, सातत्य, शिस्त सारख्या गोष्टी आवश्यक असतात. बाईक रायडरच्या पुढे जाऊन प्राचीला बाईक रायडिंग शिकण्यास इच्छुक असणाऱ्या मुली, महिलांसाठी प्रशिक्षक बनण्याची इच्छा आहे. तिचे हे स्वप्नही लवकरच पूर्ण होईल. ती म्हणते, जीवनात फक्त सुखच असणार नाही. चढ उतार येत राहणारच. तेव्हा आलेल्या परिस्थितीला न भिता तुम्ही कसे सामोरे जाता हे पाहण्यासाठीही दैव तुमची परीक्षा घेऊ शकते. कदाचित तुमच्याकडे तशी शक्ति असते म्हणूनच अडचणी येत असतात ज्या तुम्हाला अजून मजबूत बनवतात.

प्राचीने माऊंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प केला आहे. Nasa florida मधून astronaut चे ट्रेनिंगही पूर्ण केले आहे. तिला Sky diving, Scooba diving वगैरे रोमांचक साहसी खेळ आवडतात. हे सर्व खेळ ती खेळली आहे.

प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी नवीन करण्याचा प्राचीचा प्रयत्न असतो. शिवाय भूतानला एकटीने केलेली बाईक रायडिंगही तिच्यासाठी खूप खास आहे. कायम स्वरूपी हे करत राहण्याची तिची इच्छा आहे. शाळेच्या पुस्तकातून जीवन दर्शन नाही घडू शकत. घराच्या बाहेर पडल्यावरच आयुष्य म्हणजे काय ते उमगते. असे तिचे स्पष्ट मत आहे आणि ते खरेही आहे.
जगात वावरताना, निसर्गात फिरताना, लोकांना भेटून आत्मविश्वास मिळतो. नवीन गोष्टी शिकायला, करायला उभारी मिळते. स्वप्नांना, विचारांना गती मिळते.

शिक्षण झाल्यावर प्राची कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करत होती. भरभक्कम पगार, पाच दिवसांचा आठवडा वगैरे ठीक होते पण तिचे मन नोकरीत रमत नव्हते. ती नोकरीसाठी बनलीच नव्हती असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही. एक वेळ अशी होती की नोकरी करणे तिला पसंत नव्हते नि दुसरे काय करायचे हे ही माहित नव्हते. ज्या पद्धतीने घरातल्यांनी प्राचीला पाठिंबा दिला, समजून घेतले तसे प्रत्येक मुलीला घरातून सकारात्मक प्रतिसाद मिळतोच असे नाही. मुलींना शिक्षण वगैरे तर सगळेच पालक देतात पण समाजाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मुलींना परिस्थितीला सामोरे जाणे, योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे, मुला मुलीत भेद न करता मुलींच्या आवडीप्रमाणे त्यांना नोकरी, व्यवसाय किंवा इतर बाबी करून देणे गरजेचे ठरते. पण आपला समाज.. काहीही केले तरी समाजातील लोकं बोलतच असतात.. मग ते कार्य चांगले असो वा वाईट आणि फक्त बोलणारी लोकं एखाद्याला गरजेच्या वेळेस किती मदत करतात ते उघडच असते. पण तिच्या बाबांनी तिला स्पष्ट सांगितले होते तुला जे करायचे ते तू कर. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करायला मी समर्थ आहे. हा भरवसा प्राचीला बळ देणारा ठरला. तिच्या छंदाला आकार मिळाला.

प्राचीने आपल्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले. इथून मग तिचे सारे विश्वच बदलून गेले. नोकरीत शनिवार, रविवार सुट्टी असूनही काम करायला नकोसे वाटायचे तिथे तिच्या आवडीच्या कामात आठवड्यातून एकही सुट्टी मिळाली नाही तरी आता काही फरक पडत नाही. कंटाळा येत नाही .जेव्हा आवडलेले निवडले जाते तेव्हा आपोआप सवड मिळते. याचीच प्रचिती म्हणजे ऑगस्ट २०२६ मध्ये कायनेटिक होंडाच्या Kinectic’s electric energy या नावाजलेल्या पुस्तकात तिचे छायाचित्र प्रकाशित केले गेले. प्राचीने लहान वयात केलेल्या कर्तृत्वाची, घेतलेल्या यशस्वी झेपेची ही गौरवास्पद पोच तिला अशी मिळाली जी फक्त प्राचीसाठीच नाही तर तिच्या घरातील सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे.

प्राचीचा यशाच्या प्रवासात, या उपलब्ध्यामागे तिचे कष्ट, जिद्द, चिकाटी, सातत्य, वेळेचे व्यवस्थापन, सकारात्मकता तर आहेच पण तिच्या आई वडिलांची खंबीर साथ, त्यांनी तिला दिलेला आणि तिच्यावर ठेवलेला विश्वास सुद्धा फार महत्वाचा आहे. त्यामुळेच प्राचीला आईबाबांचा खूप अभिमान वाटतो नि त्यांचे आभार पण मानते. एकत्र कुटुंबातील पोषक वातावरणात वाढलेल्या प्राचीच्या वागण्या बोलण्यातून संस्कार उठून दिसतात. आपला पूर्ण वेळ तिच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी देते. विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणशिवाय अशा खेळांतही प्राविण्य मिळवावे असे मनापासून वाटते. या माध्यमातून प्राचीला भारतातील उत्कृष्ट शिक्षिका व्हायची इच्छा आहे त्यासाठी तिचे प्रयत्न, तयारी, मेहनत चालू आहे.

तेजस्वी किरणांचा फेर घालत स्वप्नांमध्ये रंग भरण्यासाठी रोज नव्याने आशा घेऊन येते ती प्राची.. ही प्राचीही अशीच आहे.
चाकांवर माया करत, निष्ठेने आपल्या कार्यात मग्न होत निरागस मुलांना योग्य दिशा आणि उद्देश प्राप्त करून देत त्यांनी जीवन पथावर यशस्वीपणे चालण्यासाठी बोलण्यापेक्षा कृतीला प्राधान्य देत मनमुराद आयुष्याचा आनंद घेत रंग उधळणारी. स्केटिंग आणि बाइक रायडिंग म्हणजे प्राची साठी सुखाची पाऊलवाटच.
मोकळ्या आकाशाखाली बिनधास्तपणे चाकांवर झेप घेण्याचा हर्ष शब्दांत काय मांडावा. तिची चक्रांवर असणारी श्रद्धा गौरवास्पद आहे. प्राचीच्या आवडत्या क्षेत्रात तिच्याकडून लक्षणीय कामगिरी होत राहो . त्यासाठी तिला मनापासून शुभेच्छा.

मनिषा पाटील

— लेखन : सौ. मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

झेप : 29

झेप : 28

झेप : 27

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments