“मन कल्लोळ”
माकड पाहिलंय ना? एक मिनिटही शांत बसत नाही! काही ना काही चाळा हवाच त्याला! आपल्या मनाचेही तसेच आहे, जरा म्हणून शांत बसत नाही. भूत-भविष्य, सत्य-कल्पना अशा नाना प्रांतात त्याची भटकंती सुरूच असते! क्षणात इकडे, तर क्षणात तिकडे!
एकवेळ प्रकाशाचा मागोवा घेता येईल. पृथ्वीवरून सूर्यापर्यंत पोहोचायला त्याला म्हणे आठ मिनिटे लागतात. आणि आपले मन? त्याला एक सेकंदही लागणार नाही. ‘सूर्य’ हा शब्द, चित्र किंवा विचार समोर आला की ते तत्क्षणी तिथे पोहोचलेच म्हणून समजा. बरं, पोहोचले तर पोहोचले, पण तिथे जरा थांबून काही नीट समजून घेईल याचीही शाश्वती नाही; सेकंदाच्या आठव्या भागात त्याने तिथे काल्पनिक मनोराज्य उभारलेले असते.
मी, माझी समजूत, माझ्या अपेक्षा… यातच आपण गुरफटलेले असतो. त्याचा वास्तवाशी काही संबंध असेलच याची कोणतीच खात्री नसते, किंबहुना आपण तसा प्रयत्नही करत नाही. सततच्या या भटकंतीने आपणच दमून जातो… कारण नसताना थकून जातो… म्हणूनच मुक्ताई सांगतात –
सांडी कल्पना उपाधी ।
तीच साधूला समाधी ॥
मनाला जर शांती हवी असेल तर हे भटकणे थांबवायला हवे. आपले सगळे भ्रम, पूर्वग्रह आणि आसक्ती सोडून द्यायला हवी. जग हे एक मायाजाल आहे असे म्हणतात, पण ही माया बाहेर नाही, आपल्या आतच आहे. आपणच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरात गुरफटलो आहोत. या षड्रिपूंना ओळखून त्यांच्यापासून अंतर ठेवणे हीच खरी समाधी आहे. नुसते डोळे मिटून बसण्याने काहीच साधणार नाही आणि हट्टाग्रह करूनही उपयोग नाही.
वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥
आपलंच मन आणि आपलीच बुद्धी, मग वाद घालायचा तरी कोणाशी? आपण सामान्य माणसे; हटयोग्याची स्थितप्रज्ञता आपल्या अंगी असण्याची शक्यता नाहीच. काळ-वेळपरत्वे विचारांची वावटळ आपल्याला घुसळून काढणारच. भावनांचा झोका या टोकाकडून त्या टोकाकडे हिंदोळत राहणार, फक्त विवेकाची खुंटी तेवढी स्थिर राहिली म्हणजे झाले. जीवनात असे अनेक प्रसंग येतील, जेव्हा आपले अस्तित्व ढवळून निघेल, होत्याचे नव्हते होऊन जाईल. नजरेसमोरची वाट अंधारात हरवून जाईल. मन कोलमडून पडेल, हार मानेल; पण तेव्हाही मुक्ताई सोबत असेल. ती सांगेल –
पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥
पुढे काय होणार आहे, हे कधीच कोणाला माहीत नसते. आकाशात उडणाऱ्या पाखराचे पायसुद्धा खालीच असतात, त्यालाही पुन्हा जमिनीवर यावेच लागते. मग आपण नेमके दुःख कशाचे करतोय? सुखाच्या क्षणांतही पुढचा क्षण अतर्क्यच होता आणि आजही तसेच आहे. फक्त तेव्हा आपण उन्मादात होतो म्हणून ते जाणवले नाही; आज मनाने कच खाल्लीय, म्हणून त्याच गोष्टीचे अवडंबर माजलंय. काल आणि आज काहीच फरक नाही.
एक मन चेष्टा करी ।
भूतें बापुंडी शेजारी ॥
चांगले-वाईट, सुख-दुःख या सगळ्या मनाच्या कल्पना; अंधारात भिंतीवर दिसणाऱ्या सावल्यांसारख्या. त्यांचे स्वतःचे काही अस्तित्व नसते; आपण उगाच त्यांना घाबरून दडून बसलो आहोत. बिचाऱ्या नसलेल्या भुताला आपणच बोकांडी बसवून घेतले आहे, ते बिचारे तरी काय करणार? जग त्याच्या नियत क्रमाने चालले आहे, ते आपल्यासाठी थांबणार नाही. कदाचित आपण त्याच्या खिजगणतीतही नाही; जो-तो आपापला गाडा ओढत चाललाय. पण आपण मात्र भूतकाळ घट्ट धरून बसलो आहोत, तिथल्या वाईट गोष्टी आपल्याला पुसायच्या आहेत. हा असा वागला, त्याने तसे केले…
अरे, पण कशाला?
अवघी ईश्वराची करणी । काय तेथें केलें कोणीं ॥

कर्मधर्मसिद्धांताने जे व्हायचे ते घडून गेले, आपण कितीही आक्रोश केला, तरी यातील काहीही बदलणार नाही. घड्याळाचे काटे उलटे फिरणार नाहीत, मग कशाला हवा नसता अट्टाहास?
पुन्हा शुद्ध मार्ग धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
त्यापेक्षा जे चुकले-मुकले ते मागे सोडून नव्याने उभे राहणे जास्त श्रेयस्कर! जंजाळाच्या गाठी सोडवत बसण्यापेक्षा, त्यातून बाहेर पडून पुढे सरकणे बेहत्तर! जुने अनुभव पुसता येत नाहीत हे खरेच, पण त्यातून तावून सुलाखून निघताना आपली चमक निश्चितच वाढलेली असते. आयुष्याच्या अनेक कंगोऱ्यांची नव्याने समज आलेली असते. मग हे शिक्षण वाया का जाऊ द्यायचे?
लोक नावे ठेवतील, वाग्बाणांनी घायाळ करतील; पण आपण ते फार मनावर घ्यायचे नसते. उलट, याच दगडांचा पूल बांधून पल्याड निघून जायचे. मुक्तीचा मार्ग याहून वेगळा काय असतो ?
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
