सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन सुरू आहे. आपणच आपल्या घरात बंदिस्त होऊन बसलोय. काही व्यक्ती मात्र अशाही परिस्थितीत गप्प न बसता क्रियाशील झाल्या, दुसऱ्यांना आनंद देत राहिल्या. प्रिया रामटेककर आणि नरेश खापरे या उभयतांची कहाणी, त्यांच्या जुबानी…
काही वेळा आपत्ती सुद्धा इष्टापत्ती ठरते असा माझा अनुभव आहे. कोरोनामुळे खरे तर हवालदिल व्हायला झाले होते. चार भिंतीत रोज वावरायचे. तेच ते रुटीन. त्याच खिडक्या. बंद दार. खिडकीतून बाहेर डोकावून पहावे तर जिकडे तिकडे सामसूम.. निर्मनुष्य रस्ते. शांत परिसर. धावपळ नाही. लगबग नाही. अशात खिडकीशी एक मैना आली आणि सुरेल काहीतरी गुणगुणली. आतल्या खोलीत नरेशरावांचा रियाज चालूच होता. YouTube वर त्यांनी १३ एप्रिल २०२० रोजी नरेश खापरे कराओके सुरु केलेले. लाॅकडाऊनमध्ये काय करावे हा प्रश्नच त्यांना पडला नाही. आपला माईक आणि जादूचा चौकोनी छोटेखानी स्पीकर. बस हा सुरांचा बादशाह त्या सुरेल राज्यात, सुरेल जगात अगदी रंगून गेला.
पाहता पाहता १०० दिवसात १०० गाणी पूर्ण झाली. किशोरकुमार, मुकेश, मोहमद रफी, एस. पी. बालसुब्राहम, हेमंतकुमार, कुमार सानु अशा एकेक गायकाची त्यांनी अगदी हुबेहुब गाणी गायली. डोळे झाकून ही गाणी कोणीही ऐकली तर मूळ गायकच गातोय की काय इतकी हुबेहुब आहेत ही गाणी. प्रत्येक गाण्याचा मूड वेगळा. स्वर वेगळा. गाण्यातील, स्वरातील बारकावे व हरकती त्यांनी बेखुबी आत्मसात केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे गाणे कृत्रिम न वाटता नैसर्गिक वाटत राहते. त्यांना गाणे गाताना पाहिल्यास ते कोणतेही गाणे किती समरसून गातात याचा प्रत्यय येईल.
नरेशराव आयकर विभागात आहेत. कामाचा व्याप आहे. प्रसंगी रात्री उशीरापर्यंत कामांचा निपटारा करावा लागतो. एवढ्या व्यस्त दिनक्रमातून गाण्यासाठी त्यांनी मुद्दाम वेळ काढला आहे. मुंबई – कल्याण या येण्या जाण्याच्या वेळेत रेल्वेत मिळणारा वेळ आणि घरी मिळणारा वेळ त्यांनी आपल्या छंदाला दिला आहे .
लाॅक डाऊन सुरु झाले, तसे रेल्वे लोकल बंद झाल्या व अप डाॅऊनही थांबले. पण नरेश मात्र थांबला नाही.लाॅकडाऊन सुरु झाले तरी नरेशरावांच्या गाण्याच्या साधनेत बिल्कुल खंड पडलेला नाही. घरात राहूनही लोकांचे मनोरंजन करण्याचे त्याने ठरवले. यु-ट्युबर त्याने ‘नरेश खापरे कराओके स्टेशन’ सुरु केले आणि एकसे बढकर एक गाणी सादर केली. अल्पावधीतच त्याच्या या युट्यूब चॅनलला प्रचंड लोकप्रियता मिळाली.या YouTube channel ला आज ९९३ subscribers, ३८८७४ views मिळालेले आहेत. १०० दिवसात १०० गाणी पूर्ण केलीआहेत. १४५७ तासांचा वाॅच टाईम पूर्ण झालेला आहे. YouTube वर” १०० दिवसात १०० गाणी” हा टप्पा म्हणजे या गायन प्रवासात आम्हा उभयतांची पहिलीच यशस्वी पायरी आहे.
रसिकांचा प्रतिसाद व पसंती हीच आमच्या गायन प्रवासासाठी शिदोरी आहे. रसिकांनी भरभरुन दिलेली दाद आमचे मनोबल वाढवणारी आहे. “छंद लागला असा जीवाला की तोच मंत्र झाला जगण्याला “अशी आमची भावना आहे. या चॅनलवर आपल्या सेवेत अधिकाधिक गाणी सादर करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आपले भरभरुन प्रेम, प्रतिसाद व दाद मिळावी हीच प्रार्थना आहे.
-निवेदन: प्रिया रामटेककर. शब्दांकन: विलास कुडके.
Good…
गाता रहे मेरा दिल ही स्टोरी आजच्या लाॅकडाऊनच्या काळात छंद जोपासणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आहे. आपत्तीमध्ये हताश न होता तिचे रुपांतर आनंदात करण्याची किमया आपल्या छंदात आहे हेच या स्टोरीतून अधोरेखित होते.