राखी पोर्णिमा अथवा रक्षाबंधन हा श्रावण महिन्यात पौर्णिमेला येणारा बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण. आपल्या हिंदी चित्रपटातून या सणाला गाण्यांच्या स्वरूपात महत्व दिलेले आहे. त्यातील ही काही लोकप्रिय गाणी खास तुमच्यासाठी….
हमखासपणे राखी पोर्णिमेदरम्यान एकदा तरी ऐकावयास व पहावयास मिळणारे एक सुरेख गीत छोटी बहना या चित्रपटातील आहे. ” भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना “ सहजतेने आठवतेच असे हे गीत लता दिदी यांनी गायले असून गीतकार शैलेंद्र आहेत. या गीताच्या लोकप्रियतेबद्दल नव्याने काही सांगणे नको.
लता दिदी व मुकेश यांच्या आवाजातील “ये राखी बंधन है ऐसा , जैसे चंदा और किरण का, जैसा बदरी और पवन का, जैसे धरती और गगन का ” मनोज कुमार अभिनीत बेईमान या १९७२ यावर्षी प्रदर्शित चित्रपटातील हे गीत आहे. या गीताची पहिली ओळ ऐकली तरी डोळे भरुन येतात .
बहिण भावाच्या प्रेमाची अनुभूती देणारे एक गीत १९७४ ला प्रदर्शित झालेल्या ” रेशम की डोरी” या चित्रपटात आहे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील ” बहेना ने भाई की कलाई से प्यार बांधा है “ हे हद्यस्पर्शी गीत धर्मेंद्र व कुमूद चुगणी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले आहे. गीतकार इंदिवर यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ ही बहिण भावाच्या प्रेमाची महती स्पष्ट करते.
“अनपढ ” या चित्रपटातून सामुहिक नृत्याद्वारे रक्षाबंधन साजरे केलेले दाखविलेले आहे. आपल्या मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिण किती उत्सुक असते , याचे अचूक वर्णन असलेले लता दिदीच्या आवाजातील “रंग बिरंगी राखी लेकर आयी बहना, ओ राखी बंधवाले रे मेरे वीर” हे मनाला प्रसन्न करणारे असे गीत आहे.
राखी पोर्णिमेचा हा महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आमच्या आयुष्यात प्रतिवर्षी एकदाच येतो. त्यामुळे भविष्यात मी जरी कुठेही असले तरी तु मात्र राखी बांधण्यासाठी माझ्याकडे ये. अशा आशयाचे ” अंजाना ” चित्रपटातील हे एक गीत.
यात बहिण भावाला म्हणते की, “हम बहनो के लिए मेरे भैय्या, आता है एक दिन साल मे” गायिका लता दिदी. आनंद बक्षी यांच्या वैशिष्ट्यानुसार साधी व सोपी शब्द रचना या गीतात आहे.
“राखी के दिन वादा करो, वादा निभावोगे, अपनी प्यारी बहना की लजा बचाओगे” सुरेख गीत आहे. अनपढ चित्रपटातील गीतासारखे राखीच्या सणाला काहीसे सामुहिक स्वरुप या चित्रपटात आहे. तन्वी आझमी आणि पद्मीनी कोल्हापुरे हे या गीतात मुख्य आहेत. गायिका आशा भोसले, इंद्राणी मुखर्जी तर संगीत बप्पी लाहिरी यांचं आहे .
अजय देवगण यांनी यात मिथुन चक्रवर्तीच्या बालपणीची भूमिका केली आहे.

“अंधा कानून” या हिट चित्रपटातील हिट झालेले
“मेरी बहना, ओ मेरी बहना दिवानी है, पर वो समजती है, सबसे वो सयानी है” हे गीत. राखी पोर्णिमेच्या दिवशी रजनीकांत आणि हेमा मालिनी या बहिण भावाची प्रेमळ छेडछाड अशी सिच्यूएशन आहे. चित्रपटाचे कथानक जरी थोडेसे वेगळे असले तरी हे गीत चित्रपटात व्यवस्थित सेट झालेले आहे. गायक आशा भोसले, किशोर कुमार, गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे आहेत.
भाऊ जितेंद्र तर बहिण फरिदा जलाल. त्यांच्यावर चित्रीत “ओ मेरी मैना जैसी बहना, नयनो से दुर ना रहना, चाहे सारी दुनिया रुठे, तु मुझसे रुठेना” हे अप्रतिम असे “कसम खून की” या चित्रपटातील रक्षा बंधनाचे गीत आहे. वर्मा मालिक यांनी केलेली शब्द रचना कल्याणजी-आनंदजी यांचे संगीत व त्यास मिळालेला किशोरदाचा भावूक स्वर ! आपल्या डोळे पाणावल्याशिवाय रहात नाही.
राजकुमार आणि नाना पाटेकर असे काँम्बिनेशन असलेला तिरंगा हा हिट चित्रपट १९९३ यावर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राखीचे सुरेख गीत आहे. “इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया” हे त्या गीताचे बोल आहेत. गीतकार संतोष आनंद यांची ही रचना साधना सरगम यांनी सुरेखरित्या सादर केली आहे. त्यास लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीताची जोड देऊन ते अधिक मधूर केले आहे.
“घरद्वार” या नावाने १९८५ यावर्षी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात सचिन, राजकिरण, डॉ.श्रीराम लागू, तनूजा, कादर खान, जयश्री टी आदी कलावंत होते. या चित्रपटात
“मेरी बहेना ये राखी की लाज तेरा भैया निभायेगा” हे राखीचे महत्व असलेले गीत आहे. गायक सुरेश वाडकर, मोहंम्मद अजीज, मनहर उदास आहेत. बहिण भावाच्या प्रेमाचे एक सुरेख चित्रीकरण असलेल्या या गाण्याचे गीतकार अंजान तर संगीतकार चित्रगुप्त आहेत .
” राखी” या चित्रपटातील “राखी धागो का त्योहार, बंधा हुआ इक इक धागे मे भाई बहेन का प्यार” , “काजल ” मधील “मेरे भैया मेरे चंदा, मेरे अनमोल रतन, तेरे बदले मै जमाने की कोई चिज ना लु”, “फरिश्ते” तील “इस संसार मे सबसे प्यारा भाई बहेन का प्यार है”, “परख” मधील “कहेते है राखी के ये धागे”,” जलवा” तील “दिदी मेरी बहना मेरी करदे क्षमा” अशी अनेक सुरेल गाणी आहेत.
यावर्षी कोरोनामुळे एकाच गावातील बहीण-भाऊ सोडले तर बाहेर गावातील बहीण-भावांची प्रत्यक्ष भेट होणे काहीशी अवघडच आहे . त्यामुळे बहीण भावाची ही गोड प्रेमळ राखी गीते ऐकून रक्षाबंधन साजरा करू या …
– डॉ.राजू पाटोदकर, 9892108365
Very Nice