लॉक डाऊनच्या काळात दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. त्यास पारंपरिक प्रकाशन व्यवसायही अपवाद नाही. पण अशा कठीण परिस्थितीत गप्प न बसता भरारी प्रकाशनाच्या लता गुठे यांनी डिजिटल माध्यमाची कास धरून या काळात अनेक ई पुस्तके प्रकाशित करून आपले वेगळेपण सिद्ध केले. जाणून घेऊ या भरारीच्या लता गुठे यांची भरारी…..
मूळ ग्रामीण भागातून येऊन मुंबईत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या लता गुठे उत्तम साहित्यिका, सर्जनशील कवयित्री, कुशल संपादिका आणि प्रकाशिका म्हणून परिचित आहेत. त्याचबरोबर विविध अभिनव उपक्रमांद्वारे सामाजिक, शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
सिंगापूरच्या मोहना – Click here to read this
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव ही त्यांची जन्मभूमी.या छोट्याशा गावात एका सधन शेतकरी कुटुंबात राजाभाऊ खेडकर व आई कमलाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला . याच निसर्गरम्य गावात त्यांचे बालपण गेले. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे त्यांच्यावर आजीकडून अध्यात्मिक संस्काराची रुजवण झाली. वडील राजकारणी असल्यामुळे घरात सतत पाहुण्यांचा राबता असायचा. आजी रूढार्थाने अशिक्षित होती पण तिला शिक्षणाचे महत्त्व पटले होते. म्हणून तिने घरातील सर्वांना शिकवले. घरात वैष्णव धर्माचे पिढ्यानपिढ्या पालन होत असल्यामुळे तेच सात्विक संस्कार घरातील सर्व मुलांवर रुजले. लहानपणापासूनच आई, काकूने स्वावलंबनाचे धडे दिले. शाळेतील आदर्श शिक्षकांमुळे वाचनाची आणि अभ्यासाची आवड निर्माण झाली. येथेच त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा पाया घातला गेला. पण नववी झाल्यानंतर शिक्षणाला फुलस्टॉप मिळाला. त्याला कारण ठरलं त्यांचं लग्न !
माध्यमिक शिक्षण पूर्ण करून लग्नानंतर लताताई पती वाल्मिक गुठे यांच्यासमवेत मुंबईला आल्या. श्री वाल्मिक गुठे हे पोलीस सब इंस्पेक्टर म्हणून मुंबईला रुजू झाले आणि त्यांनी कुर्ला साकीनाका येथे एका छोट्याशा घरात आपला संसार थाटला. पुढे दोन मुलं झाल्यानंतर पाच वर्षांच्या गॅपनंतर साकीनाका येथे राम मनोहर लोहिया या रात्रशाळेत लताताईंनी दहावीला प्रवेश घेऊन दहावी ते बारावी शिक्षण पूर्ण केले. याच काळात गुठे साहेब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देत होते.पोलीस सब इन्स्पेक्टरची धावपळीची नोकरी सांभाळून केलेल्या अभ्यासाला यश येऊन ते विक्रीकर विभागात क्लास वन ऑफिसर म्हणून निवडल्या गेले. तिथे रुजू झाल्यानंतर त्यांना वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील क्वार्टर मिळाले. त्यामुळे तेथून जवळच असलेल्या चेतना कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन लताताईंनी बी एड्ची पदवी संपादन केली.
पण केवळ पदवी मिळवून न थांबता स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे , आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करायची असे त्यांचे स्वप्न होते. शिक्षक होऊन मुलांना चांगले संस्कार द्यायचे हे त्यांनी ठरविले. त्यासाठी उल्हासनगर येथील नॅशनल कॉलेजमध्ये बी एडला ऍडमिशन घेतली. रोज वांद्रे ते उल्हासनगर असा बस आणि रेल्वेचा चार तासाचा प्रवास, कॉलेज, अभ्यास आणि घर अशी तारेवरची कसरत करत त्या बी एड् झाल्या .
पुढे वांद्रे येथीलच शाळेत नोकरी करून मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम. ए. पूर्ण केले. खरं तर संसार, घर, मुलांचा अभ्यास सांभाळून, आयुष्यात येणारे चढ उतार यामुळे दहावी ते एम. ए. हा प्रवास करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. परंतु मनात जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि मोठी स्वप्नं होती म्हणूनच हा प्रवास त्यांना शक्य झाला.
पण ज्या विचारातून बी. एड.ला ऍडमिशन घेतले तो विचार प्रत्यक्षात उतरवता न आल्यामुळे काही वर्षांनंतर लताताईंनी शाळेतील नोकरी सोडून वांद्रे येथेच पाचवी ते दहावी पर्यंत स्वतःचे ट्युशन क्लासेस सुरू केले. क्लासचा जमही चांगला बसला होता. परंतु नंतर विलेपार्लेत राहायला गेल्यामुळे क्लास बंद करावा लागला.
‘नैराश्य येता मनी, करा सद्विचारांची पेरणी – Click here to read this
मुळातच हुशार, मेहनती आणि सतत काहीतरी करण्याची धडपड यामुळे लताताई शांत बसतील तर नवलच ! वाचनाची आवड असल्यामुळे वाचनालयाचा शोध घेत त्या लोकमान्य सेवा संघात पोहोचल्या. तेथेच कथाकथन कार्यशाळेची जाहिरात त्यांनी वाचली. आधीपासूनच कविता, लेख, कथा लिहिण्याचा छंद होताच. सात दिवसाच्या कथाकथन कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे व चारुशीला ओक यांची ओळख झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे लिखाणाला दिशा मिळाली आणि येथेच त्यांच्यातील लेखिकेचा जन्म झाला.
– लेखन प्रवास –
लताताईंचा ‘जीवनवेल’ हा पहिला काव्यसंग्रह २०१२ मध्ये प्रकाशित झाला. नंतर कथा क्लबच्या लेखकांच्या कथांचा मिळून ‘जिची तिची कथा’ नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहाला सुप्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांची प्रस्तावना लाभली. त्यामध्ये त्यांची ‘पहिली संक्रांत’ नावाची ग्रामीण कथा निवडल्या गेली. हमोंनी या कथेचे खूप कौतुक केले आणि प्रकाशनाच्या वेळेला “तू चांगली कथा लिहितेस” असे ते म्हणाले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन लिहिलेल्या कथा अनेक दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. ‘शोध अस्तित्वाचा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्या कथासंग्रहाला पुरस्कारही मिळाले आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर त्यांचा लिखाणाचा वेग सातत्याने वाढत राहिला. जे काम करायचं ते दर्जेदारच या हेतूने त्यांचे साहित्य वाचकांच्या मनापर्यंत पोहोचत होते. विविध मान्यवरांच्या मुलाखती, आनंदघन, झपुरझा, चारचौघी, आरती, जाणीव व इतर बऱ्याच दिवाळी अंकांमध्ये आणि मासिकात त्यांच्या कथा, लेख, कविता, मुलाखती, छापून येऊ लागल्या. गीत लेखन, बाल साहित्य, प्रवासवर्णन आणि चित्रपट लेखन, पुस्तकांना प्रस्तावना,हिंदी काव्यलेखन, साम मराठी टी.व्ही. वाहिनीवरील ‘रुणुझुणू’ मालिकेसाठी गीत लेखन असे बरेच लेखन प्रकार त्यांनी लिलया हाताळले.
बाल साहित्यापासून ते वैचारिक, आध्यात्मिक पुस्तकांपर्यंत त्यांच्या नावावर एकूण १३ ग्रंथ आहेत. चार संपादित पुस्तके आणि सातत्याने दहा वर्ष ‘धमाल मस्ती’ ताऱ्यांचे जग दिवाळी अंकांची निर्मिती त्यांनी केली आहे.
– प्रकाशित पुस्तके – जीवनवेल, मी आहे तिथे, पुन्हा नव्याने, जगण्याच्या आरपार (कवितासंग्रह ), मोहक युरोप (प्रवास वर्णन), शोध अस्तित्वाचा, (कथासंग्रह), बिनभिंतीची शाळ,(कुमारकथासंग्रह), इटुकले पिटुकले , चांदण बाग (बाल काव्यसंग्रह), माझे प्रेरणास्रोत (मुलाखतींचे पुस्तक), संत चैतन्याचा मेळा (लेख संग्रह) मना मना दार उघड (वैचारिक) अशी त्यांची पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत.
– संपादित पुस्तके – लताताईंनी ऋतुरंग कवितांचे, आहार आणि निरोगी जीवन , भारतीय कला आणि मानवी जीवन, प्रवास नोबल विजेत्यांचा या पुस्तकांचे संपादन केले आहे. ‘स्वप्नकळ्या’ व ‘माझं प्रेम’ या ध्वनिमुद्रिकांची निर्मितीही त्यांनी केली आहे.’ताऱ्यांचे जग’ या दिवाळी अंकाचे, चेरी लँड या बाल मासिकाचे एक वर्षभर त्यांनी संपादन केले आहे.
– प्रकाशन व्यवसायात भरारी – स्वतःच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी आलेल्या कटू अनुभवामुळे त्यांनी प्रकाशन व्यवसायाकडे वळायचे ठरवले. आजही प्रकाशन व्यवसायात स्त्रिया मोठया प्रमाणात नाहीत. पण अंगभूत धडाडीने त्यांनी या व्यवसायात अल्पावधीतच नाव मिळविले.
त्यांच्या भरारी प्रकाशनने आतापर्यंत १२० पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. यामध्ये दिग्गज लेखकांपासून नवोदित लेखकांपर्यंत आणि प्रिंटिंग पुस्तकापासून ई-बुक , टॉकी बुक पर्यंत पुस्तकांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध लेखिका शिरीष पै, गिरिजा कीर, यशवंत देव, माधवी कुंटे, सुरेश खरे, स्मिता भागवत, महेश घाटपांडे, रेखा नार्वेकर , सीमा होळकर अशा दिग्गज लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्याचबरोबर नवोदितांना योग्य मार्गदर्शन करून अतिशय पारदर्शक पद्धतीने,सामाजिक बांधिलकीतुन त्यांची पुस्तके कमीत कमी खर्चामध्ये प्रकाशित केली आहेत . त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक पुस्तकांना नामांकित संस्थांचे पुरस्कार मिळाले. काही पुस्तकांचे प्रकाशन परदेशातील व्यासपीठावर झाले आहे .
मुलखावेगळा छंद – Click here to read this
माझ्याच गगनभरारी या पुस्तकाचे प्रकाशन ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलनात २०१७ मध्ये झाले . मलेशियात झालेल्या शब्दच्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनात माझ्या प्रेरणेचे प्रवासी या पुस्तकासह आणखी दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. अमेरिकेच्या वाचनालयालात भरारी प्रकाशनची पुस्तके पोहोचली आहेत. काळाची गरज ओळखून त्यांनी डिजिटल माध्यमांद्वारे पुस्तकांची विक्री व वितरण व्यवस्था सुरू केली आहे. यामध्ये इंडियामार्ट, अमेझॉन व बुकगंगा येथून पुस्तके वितरित होतात व वाचकांना घरपोच मिळतात. सध्याच्या लॉकडाउनच्या काळामध्ये बाहेर वितरकांकडे पुस्तके पाठवू शकत नाहीत व वाचक ते खरेदी करू शकत नाहीत , अशा काळामध्ये किंडल अमेझॉनवर त्यांनी त्यांच्या प्रकाशनांची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. ती जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. या सर्व उपक्रमांमुळेच प्रकाशन व्यवसायामध्ये त्यांनी उंच भरारी घेतली आहे.
– पुरस्कार व सन्मान-
लताताईंना आतापर्यंत ‘पुन्हा नव्याने’ कविता संग्रहासाठी नाशिक कवी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार , शांता शेळके साहित्य प्रतिष्ठान मंचरचा – शांता शेळके पुरस्कार, धमाल मस्ती दिवाळी अंकासाठी अखिल भारतीय प्रकाशक संघाचा उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, ‘जीवनवेल’ काव्यसंग्रहाला को.म.सा.प.चा वसंत सावंत विशेष पुरस्कार, इटुकले पिटुकलेला कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट बाल वाड्मय पुरस्कार, ताऱ्यांचे जग दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार , सामाजिक व साहित्यिक कार्यासाठी ठाणे पत्रकार संघाचा पुरस्कार, बिनभिंतीची शाळा पुस्तकाला शिवचरण उज्जैन फाऊंडेशन मुक्ताईनगरचा ,दत्तात्रय सांडू प्रतिष्ठान पुरस्कार , मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचा पुरस्कार , ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंड्रस्ट्रिज तर्फे उत्कृष्ट प्रकाशिकेसाठी पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी अवॉर्ड,ओबीसी फाऊंडेशनचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी रणरागिणी पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
– निर्मिती – लताताईंनी त्यांच्या भरारी क्रिएशनतर्फे संगीताच्या ऑडिओ , व्हीडीओ सिडींची निर्मितीही केली आहे . याशिवाय लताताई भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका, कोकण मराठी साहित्य परिषद विले पार्ले शाखा अध्यक्ष ,युवा साहित्य प्रतिष्ठान संस्थेवर सल्लागार म्हणून कार्यरत आहत .
महिला राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन, तसेच अनेक साहित्यिक उपक्रम त्यांनी आयोजित केले आहेत.
आजच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन त्या सातत्याने करत असतात. भरारी प्रकाशनच्या वतीने नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळण्यासाठी कार्यशाळाही त्यांनी घेतल्या आहेत .
परदेशातही अनेक साहित्यिक कार्यक्रमातून व साहित्य संमेलनातून चर्चासत्र, परिसंवाद, काव्य सादरीकरण त्यांनी केले आहे. यामध्ये सिंगापूर, शब्द साहित्य परिवाराच्यावतीने घेण्यात आलेल्या मलेशिया, बाली , बँकॉक येथील साहित्य संमेलनात त्यांनी सहभाग घेतला आहे.
अंध सुजाताची डोळस कहाणी – Click here to read
दूरदर्शन सह्याद्रीवर एक तासाची मुलाखत व महिला दिनाच्या निमित्ताने मंत्रालयात त्यांची मुलाखत झाली आहे . वेगवेगळ्या संस्थांमधून विविध विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. तसेच ‘मना मना दार उघड’ वैचारिक विषयावर अनेक शाळांमधून, जेष्ठ नागरिक संस्थांमधून व्याख्यानाचे अनेक कार्यक्रम घेऊन त्या सातत्याने प्रबोधन करत आहेत.
प्रत्येक वर्षी आदिवासी शाळांमध्ये जाऊन तेथे पुस्तकांचे वाटप व मुलांना वाचन, लेखनाची गोडी लागण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन त्या करतात. साहित्य क्षेत्रामध्ये मुशाफिरी करणाऱ्याना लता गुठे हे नाव परिचित झाले आहे.
त्यांच्या यशस्वी वाटचालीचे रहस्य जाणून घेताना काही गोष्टी आढळतात. त्या अशा… “यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी, आत्मशोध घेऊन आपल्यामध्ये काय कमी व जास्त आहे याचा शोध घेऊन त्या वाटचाल करतात. स्पर्धा ही स्वतःचीच असावी , आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे तिच्यावर लक्ष केंद्रित करून अभ्यासपूर्ण पद्धतीने त्याचे नियोजन केले तर ते काम लवकर आणि यशस्वी होते. सतत सकारात्मक विचार करून बदलत्या काळाबरोबर स्वतःमध्ये बदल घडवून यशाच्या दिशेने वाटचाल त्या करतात. अभ्यास, जिद्द आणि चिकाटी, सकारात्मक विचार या गोष्टीं ज्या व्यक्तींकडे असतात त्याच व्यक्ती यशस्वी होतात, हे लताताईंकडे पाहून दिसून येते. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ.9869484800.
Exellent
I am proud of You and Her
More she is wife of S.T. O. Of my S.T. Dept.🙏👍👌💐
स्वतः ची ओळख पटेपर्यंतचा हा जितका खडतर
तितकाच विलोभनीय प्रवास..
लता गुठे ताईंना सलाम.
देवेंद्रजी Great !
Thank you..
इवल्याश्या लताचे वटवृक्षातील भावस्पर्शी वर्णन 👌👍🏻
माननीय देवेंद्रजी भुजबळ सर
खरोखरच आपले खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा !
महाराष्ट्र सरकारचा माहिती जनसंपर्क संचालनालयात आपण संचालक म्हणून भूषविलेली जबाबदारी फार मोठी होती हे मी अत्यंत जवळून पाहिले आहे.
आपली काम करण्याची पद्धत काम वाखाणण्यासारखी होतीव आहे.
न्यूज स्टोरी टुडे च्या माध्यमातून आपण निवृत्तीनंतर चा नवीन उपक्रम सर्वांपुढे घेऊन आलात ही ही कौतुकाची बाब आहे.
आपल्या कार्याचा… आपल्या अनुभवाचा व आपल्या नजरेतून टिपलेले अनेक विषय जनतेला वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारे आहे .
परमेश्वर आपणास निरोगी आयुष्य देवो .
आपल्या हातून अशीच देशसेवा घडो.
पुन्हा एकदा आपणास खूप खूप शुभेच्छा ! 💐💐
Thank a lot. Keep reading 👍🤟
Great
Great.
सर सुंदर शब्दांकन, सुरेख मांडणी.. अभिनंदन
Thank you