Friday, November 22, 2024
Homeलेखसार्थकी आयुष्याचे दुसरे नाव : दिगंबर काका

सार्थकी आयुष्याचे दुसरे नाव : दिगंबर काका

एकत्र कुटुंबाची आदर्श संकल्पना मनामनात कोरून ठेवणारे, श्रद्धा व प्रेरणेचे मूर्तिमंत उदाहरण असणारे, कर्म व मेहनतीचे बीज रुजवून त्याचा वटवृक्ष करणारे, कृतार्थतेचे प्रतिबिंब असणारे, अविरत कर्तव्यासाठी सतत झटणारे, चिरतरूण व्यक्तीमत्वालाही लाजवणारे दानशुर, उदारतेचे प्रतीक असणारे, मुर्ती लहान पण किर्ती महान असलेले, आश्वासक डोळ्यातून रडणाऱ्यांनाही धीर देणारे, दिनदुबळ्यांना सदैव मदतीचा हात समोर करणारे 92 व्या वर्षापर्यंतही शिस्त व वेळेचे काटेकोरपणाने पालन करणारे.

कुठल्याही गरजू माणसासाठी लगेच धावून जाणारे, मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावातुन जग जिंकून घेणारे, जुन्या विचारातुनही आधुनिक विचार व कृती स्विकारणारे, सर्वांचे हित बघून त्याप्रमाणे कार्याचे नियोजन करणारे, व्यवसायात अतिदक्षता व प्रामाणिकपणाचे धडे गिरवणारे, साधी राहणीमान व उच्च विचारसरणीला खतपाणी घालणारे, उन्नतीचे उंच शिखर संघर्षाने चढणारे, शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची क्षमता ठेवणारे, निस्वार्थ भावनेने राजकारणातही सहभाग घेणारे, युवकांच्या मनात प्रेरणा व प्रगतीचा ठसा उमटवणारे, लहान असो की मोठा सर्वांना हृदयात सामावून घेणारे, दयाभाव व सतशिलतेचे विचार हृदयी जपणारे, दिनचर्येत कुठेही तडजोड न करणारे, निष्काम सेवेने समाज सेवेचे व्रत अंगिकारणारे, प्रत्येक काळजाची काळजी करणारे सर्वांचे काका आता आमच्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. चारधामाची यात्रा करणाऱ्या ह्या कर्मवीराने चारधामानंतर पाचवे धाम हे स्वतःचे घर बनविले होते आणि स्वतःचे प्रगल्भ विचार परिवारामध्येही खोलवर रुजवले होते.

अशा या दिगंबर गणपतराव गंगमवार यांनी दिनांक 3 ऑगस्ट 2020 ला वयाच्या 92 व्या वर्षी त्यांच्या कृतार्थ जीवनाला पूर्ण विराम दिला असला तरी त्यांनी रुजविलेल्या आदर्श विचांराना मात्र स्वल्पविरामाच राहील. काही माणसे विचारांनी अमर असतात. त्यातलेच हे काका…

त्यांच्या अनेक कार्याचे फळ म्हणुनच कुठलाही मोठा आजार नसताना वार्धक्यानी 92 व्या वर्षी त्यांनी सहजतेने जग सोडून जाणे म्हणजे मी तर म्हणते खूप सत्कर्म केल्यावरच मनुष्याला असे मरण येते व त्याच्यासाठी मुक्ततेचा मार्ग सहज मोकळा होतो. काकांच्या कितीतरी आठवणी मनाच्या कोपऱ्यात अशाच जपून रहाणार आहेत. म्हणतात ना, काही माणसे पिंपळाच्या पानासारखी असतात. त्यांच्या आठवणी पुस्तकात जपून ठेवाव्या व हवे तेव्हा स्मरणात आणाव्यात. काकांच्या आठवणी अशाच झुलत राहणार कित्येकांच्या, मनांच्या हिंदोळ्यावर…..

जयंती विशेष- आदरणीय आबा – Click here

दिगंबर काका हे असे व्यक्तिमत्व होते की, त्यांच्या कार्याबद्दल लिहीतांना लेखणीही कृतार्थ होईल. माझे अनुभव त्यांचा जीवनालेख लिहायलाही कमी पडतील. काकांच्या वैयक्तीक जीवनाबद्दल सांगायचे म्हणजे माझी बायको, माझी मुले एवढेच विश्व असावे व स्वतःच्याच विश्वात सुखी रहावे एव्हढाच विचार त्यांनी कधी केला नव्हता.

काकांनी स्वतःचे विश्व असे मोठे केले होते की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही ! त्यांनी त्यांच्या दोन भावाचे व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे शिक्षण, लग्न इतर सगळ्या गोष्टी केल्या. भावाची मुले, विजय व दिलीप भाऊजींना त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणेच वागणुक दिली आणि ते दोघेही त्यांच्या आज्ञेत रहायचे. त्यांच्या सल्ल्याशिवाय ते कुठलेही कार्य करीत नव्हते. आज आपल्याला सख्या बापलेकाचेही असे संबंध क्वचितच दिसतील. त्यांना एकच मुलगी पण स्वतःच्या दोन भावांच्या कुटुंबाला सुद्धा सामावुन त्यांना वडिलांचे छत्र देवुन, त्यांच्यावर वडीलापेक्षाही जास्त माया करुन, त्यांना आधार देण्याची, स्वतःच्या सुखदुःखात भावांच्या मुलांनाही सामावून घेण्याचे विचार ठेवणारे व्यक्तिमत्व माझ्या बघण्यात फक्त काकांचेच होते.

काकांचे यवतमाळ आर्य वैश्य समाजाच्या कन्यका माता मंदिराच्या स्थापनेत खूप मोलाचे योगदान होते. आर्य वैश्य समाजात निरनिराळ्या पदावर व विवाह मेळाव्यात अनेक महत्वाच्या प्रसंगी निर्णय घेण्यात त्यांचा पुढाकार असे.
ते कन्यका बिगर सहकारी शेती पतसंस्थेचे अध्यक्ष, श्री संतसेना चौक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, विश्व हिंदू परिषदेचे कॅशियर, यवतमाळ अर्बन को.बँकेचे संचालक होते. सहकार भारती मध्ये त्यांनी भरीव काम केले. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाच्या बांधकामात त्यांचे मोलाचे सहकार्य आहे.

यवतमाळात राम नवमी शोभायात्रा सुरू करण्यामागे काकांचा मोठा हात आहे. यवतमाळ शहराच्या मध्य भागात असलेल्या केदारेश्वर मंदिराचे ते 15 वर्षे अध्यक्ष होते. आणीबाणीत ते पंधरा दिवस जेलमध्ये होते. त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजे अनुभवाची गाथा व सगळ्यांसाठी एक आदर्श आहे. प्रामाणिकपणा, मेहनत व संघाचे विचार या त्रिसूत्रीवरच आजचे यश आलेले आहे असे ते नेहमी म्हणत. काकांचे आयुष्य श्याम टॉकीज जवळच्या घरात गेले. याच चौकात त्यांचं एक छोटसं पुस्तकाचं दुकान होतं. यवतमाळ शहरात तीनच थिएटर होते. त्यापैकी एक श्याम टॉकीज. श्याम टाॅकीजचे उदघाटन ज्या दिवशी झाले, त्याच दिवसापासून त्यांच्या पुस्तकाच्या दुकानाचा व्यवसाय सुरू झाला, असे ते सांगत. आज श्याम टॉकीज मोडकळीस आली पण गंगमवारांचा व्यवसाय रुपी वृक्ष अजूनही बहरत आहे.

‘नैराश्य येता मनी, करा सद्विचारांची पेरणी’ – Click here

त्यांनी आयुष्य भर अतिशय यशस्वीपणे प्रामाणिकपणे कष्ट ऊपसून व्यवसाय केला. त्यांना या व्यवसायात 80 किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्षे झाली होती. घरातील कठीण परीस्थितीमुळे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना व्यवसाय करावा लागला. फार पूर्वी ज्यावेळेस कुठलीही प्रसारमाध्यमे नव्हती, त्यावेळी श्याम टॉकीज समोर ते सिनेमाच्या गाण्याची पुस्तके विकत. एका आण्यात चार पुस्तके विकुन, अंग मेहनत करून अत्यंत विपरीत परिस्थितीत ते जीवन जगले. या आजच्या युगातही ते एकत्र कुटुंब पद्धतीने राहिले. वडीलोपार्जीत कुठलीही स्थावर मालमत्ता त्यांना मिळाली नव्हती. 1962 ते 1968 या काळात शाम टाॅकीज जवळील दुकानात त्यांनी व्यवसाय केला. 1968 मध्ये दत्त चौकात भाड्याचे दुकान घेऊन तिथे हाच पुस्तकाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. त्यानंतर हीच जागा 1987 मध्ये त्यांनी मूळ मालकापासून विकत घेऊन 2000 मध्ये त्या जागेवर बांधकाम केले. आज यवतमाळात ते श्री गणेश पुस्तकालय या नावाने प्रसिद्ध आहे. दत्त चौकातच असलेले विजय बुक डेपो हेही त्यांचंच प्रतिष्ठान आहे.

आपल्या हयातीनंतर कुटुंबातील सदस्यामधे कुठल्याही मालमत्तेवरून वाद होऊ नये म्हणून त्यांनी सर्वासाठी सर्व तजवीज करून ठेवली. सर्व एकत्रित गुण्यागोविंदाने नांदावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी पुस्तक विक्रीत ऊच्चांक निर्माण केला होता. महाराष्ट्रातील लोकप्रिय राजंदेकर यांचे पंचाग व दिगंबरकाका यांचे श्री गणेश पुस्तकालय यांचा अनेक दशकाचा संबंध आहे. या लोकप्रिय महाराष्ट्रीय पंचांगाचे हे शताब्दी वर्ष आहे. शके १९४२ च्या पंचागात पंचांगकर्त्यानी श्री गणेश पुस्तकालयचा गौरवपूर्ण ऊल्लेख केला आहे. एवढी त्यांची कामगिरी एकनिष्ठ व महान होती.

एकाच व्यवसायात 1942 पासुन आजपर्यंत टिकून राहण्यात त्यांची अढळ निष्ठा दिसुन येते. यवतमाळात धार्मिक पुस्तके विकण्याचे त्यांचे एकमेव पुस्तकालय आहे. म्हणूनच ते नेहमी म्हणत असत, “धार्मिक पुस्तकानेच माझ्या जीवनात क्रांती घडवून आणली व त्याच भगवंताच्या कृपेमुळेच मी व्यवसायात गरुड झेप घेवुन भरभराट करु शकलो”. काका रामाचे व गणपतीचे खुप मोठे भक्त होते. गंगमवारांच्या घरकुलाचे नाव सुद्धा “पितांबर” आहे. यवतमाळ जिल्ह्याचे आराध्य दैवत कळंबच्या श्री चिंतामणी देवालयात संकष्टी चतुर्थीला 45 वर्षापासून वयाच्या 91 वर्षापर्यंत ते न चुकता दर्शनाला जायचे. काकांचा, पाच भाऊ आणि एक बहीण असा परिवार होता. गंगमवाराचे जुने आडनाव कळंबकर होते. एका भावाचे अजूनही कळंबकर आडनावच सुरू आहे.

काका फार धाडसी, धीर गंभीर व्यक्तिमत्त्वाचे होते. सुरुवातीचा त्यांचा संघर्ष सोडता मी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रचंड आत्मविश्वास आणि समाधान बघितले आहे. त्यांचा हात नेहमीच दुसऱ्यांना देण्यासाठी पुढे असलेला बघितलेला आहे.

काका यवतमाळच्या म्यून्सीपल हायस्कूलमध्ये फक्त ८ वी पर्यंत शिकले. बरेच वेळा काकांशी गप्पा मारताना मला त्यांच्या शिक्षणाचं फार नवल वाटायचं. कारण मला काका सुशिक्षितापेक्षा जास्त शिकलेले वाटायचे. काकांना आधुनिक तंत्रज्ञान, संगणकाचे ज्ञान नसूनही ते स्वतः एक अनुभवांचा संगणक वाटायचे. रोजचा न्यूज पेपर वाचण्याचे व दुरदर्शनवरच्या बातम्या पाहण्याचे त्यांनी कधीच चुकवले नाही. शिक्षण शाळेतच मिळत नसून अनुभवातून, सुसंस्कारातुन मिळते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले होते.

ते सर्वांचे काका होते. घरी सुद्धा सर्व त्यांना काका म्हणत. हे त्यांच्या मुलीच्या, (ज्योती ताई) बालमनाने टिपले व तीही वडिलांना बालपणीपासुन काकाच म्हणू लागली आणि खरंच ते सर्वांचे “काका” (काळजांची काळजी करणारे) होते.

काकांची मुलगी ज्योतीताई पण प्रेमळ व मनमिळाऊ आहे. काका व काकूंचे संस्कार व मोठ्या मनाचा वारसा तिने पुरेपूर चालवला आहे. एवढेच नव्हे तर काकांचे जावई, श्री.प्रमोद व्यवहारे हे काकांसाठी मुळी जावई नव्हतेच. ते काकांची मुलाप्रमाणेच काळजी घेत. यवतमाळलाच राहत असल्यामुळे त्यांना काकांकडे सतत लक्ष देण्याचे व काकांच्या सावलीत सदैव रहाण्याचे भाग्य लाभले होते.

अंध सुजाताची डोळस कहाणी – click here

काकांच्या बोलण्यात, वागण्यात काकूंबद्दल (सुशिला काकु) खुप मान असायचा आणि का नसावा ? काकांबरोबर तिनेही थोर कामाचा जणू वसाच घेतला होता. काकांच्या विचारांच्या व शब्दांच्या बाहेर ती कधीच जायची नाही. तिने काकांच्या प्रत्येक पावलावर योग्य ती साथ दिली. स्त्रीला सदैव मान देणाऱ्या पुरुषांबद्दल मला लहानपणापासूनच आदर वाटत आला आहे.

काका आणि काकू

त्याबद्दल माझ्या मनात काकांनी केव्हाच घर केले होते. माझे स्पष्ट मत आहे की जिथे घरच्या स्त्रीचा मान असतो, तिथे लक्ष्मी समाधानाने वास करते आणि म्हणुनच काका यशाच्या उंच शिखरावर चढतच राहीले, हे मी त्यांच्या संसाराकडे बघून निश्चितच ठामपणे सांगू शकते. काकांचे जीवन हे आदर्श जीवनाचे एक ज्वलंत उदाहरण होते.
ताईच्या लग्नाची गोष्ट सुरू असताना त्यांच्या घराण्याची बोलली जाणारी कहाणी माझ्या कानात अजूनही रेंगाळत असते.
कुठल्याही दुसऱ्या व्यवसायात पडून फक्त पैशाची उभारणी करायची अशा मताचे ते बिल्कुल नव्हते.

पैशाच्या मागे धावून स्वतःला आपण विसरतो व स्वतःच्या जीवनाचा मुळ उद्देश आपण सार्थ करु शकत नाही या मताचे काका होते. मला बरेच वेळा त्यांनी देशात परत येण्याचे सल्ले दिले. पण परदेशात राहण्याची विविध कारणे असतात हे मी त्यांना कधीच पटवून देवु शकले नाही. असे असले तरी त्यांनी मला प्रत्येक वेळी दिलेला दिलासा व केव्हाही पडु शकणाऱ्या मदतीचे वचन म्हणजे माझ्या पाठीवर असणारा एक मायेचा हात होता आणि तो मला नेहमी नवनवीन आव्हाने स्वीकारून यशस्वी करीत होता.

माझ्या ताईंच्या सासुबाईंसाठी, पुष्पा मामींना तर काका म्हणजे हरवलेल्या नौकेला दिसलेला एक दिपस्तंभ होता. त्या म्हणाल्या, “4 पोरं ओटीत असताना अचानक नवऱ्याच्या निधनाने, देवाने घेतलेल्या क्रुर निर्णयातुनही पुन्हा उभे रहाण्याची ताकत आम्हाला काकांनीच दिली. काकांनी दिलेली साथ म्हणजे आम्हाला दिलेले जीवनदान होते.”
(पदराने अश्रू पुसत मामींनी सांगितलेल्या त्यांच्या भावना मात्र माझे काळीज चिरत होत्या). त्याचप्रमाणे पित्याचे छत्र गेलेल्या विजयभाऊंचा सुद्धा संसार थाटून त्यांना शोभेल अशीच शांत सहचारिणी, शोभाताई काकांनीच बघून दिली. त्यांनाही स्वतःच्या छायेखाली ठेवले.

एकेकाळी काकांची परिस्थिती जेमतेम होती. बाराव्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या काकांनी फक्त स्वतःच्याच नव्हे तर दोन भावांच्या संसाराची जबाबदारीही आनंदाने स्वीकारली.

“इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी” ही उक्ती सार्थकी करणाऱ्या काकांनी, विजय व दिलीप या भावांच्या मुलांनाही त्यांचे स्वतंत्र व्यवसाय उभारून दिले. आज तुम्हाला दत्त चौकात श्री गणेश पुस्तकालय व विजय बुक डेपो मोठ्या थाटात उभे असलेले दिसेल.

कविवर्य बा.भ.बोरकरांच्या ओळीं त्यांना लागू पडतात- “दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती”
खूप कमी लोक असे जन्माला येतात की ते असामान्य, थोर कृती करून जातात अन सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करतात. म्हणतात ना, एका हाताने केलेले कर्म दुसऱ्या हातालाही कळू देवु नये अशा विचारात ते जगले. असामान्य आयुष्यातही सामान्य वाटणारे हे काका समाजासाठी “कोहिनूर” होते.

म्हणतात, “लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळल्या जातात” पण या कित्येक लग्नाच्या गाठी काकांनी जुळवलेल्या मी बघितल्या व ऐकलेल्या आहेत. त्यांच्या हातात खूप यश होते. काकांनी जमवलेलं व मध्यस्थी असलेलं प्रत्येक जोडपे “Made for each other” वाटायचे. त्यात काकांचा हातखंडा होता. त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती. उदाहरणादाखल म्हणजे माझेही लग्न जमवण्यात माझ्या वडिलांच्या बरोबरीने काकांचा सहभाग होता. म्हणूनच म्हणते, “कुणाला ना परमेश्वराने देणगीच दिली असते. ते देवदूतच होते. हे मी मला आलेल्या अनेक अनुभवातून ठामपणे सांगू शकते.” ताईच्या दोघी मुली, दिव्या व ईशा ह्या घराण्यातील पहिल्या इंजिनियर मुली म्हणून काकांना त्यांचा खुप अभिमान होता. लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढलेल्या या आधुनिक सुसंस्कारीत मुलींसाठीही काकांनीच जोडीदार निवडुन देण्याचे ताईचे स्वप्न मात्र काळाने पूर्ण केले नसले तरी त्यांचे आशिर्वाद सतत सोबत असतील.

विद्यापीठातील विठ्ठल – click here

काका स्वभावाने अतिशय शिस्तप्रिय होते. त्यांच्यासमोर कोणताही सदस्य बोलत नसे, त्यांना प्रत्युत्तर देत नसे. माझा स्वभाव मात्र काकांच्या शिस्तशीर जुन्या वळणाच्या अगदी विरोधात होता. पण त्यांनी माझ्याशी नेहमीच बोलताना तो कधी दाखवला नाही. कारण स्वभावामधल्या तऱ्हा समजायला काका खूप खोलवर पोहोचले होते. त्यांच्यामधले ते अनुभवी व्यक्तिमत्व मला सतत त्यांच्याशी बोलताना दिसायचे. माझ्याबद्दलचा आदर व अभिमान नेहमीच त्यांच्या कृतीतून दिसायचा. त्यामुळेच मी नेहमीच त्यांच्याशी बिनधास्त व मनमोकळ्या मनाने बोलायची.

दिलीप गंगमवारांची पत्नी दिपिका म्हणजे माझी मोठी ताई आणि गंगमवार यांची सून, हिने अशा थोर काकांचे मन सुरुवातीलाच जिंकून घेतले होते. तिचे कौतुक घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्याजवळ काका करायचे व म्हणायचे की, “आमच्या दिपीकाने आमच्या घराची जबाबदारी पुरेपूर पार पाडली. तिच्या पावलाने आमच्या घरी लक्ष्मी आली. आमच्या कार्याला यश प्राप्ती झाली. ही सर्व प्रगती आम्ही तिच्याच शालीन व सुसंस्कृत स्वभावामुळे पाहू शकलो.”
काकांच्या वृद्धापकाळात ताईने त्यांची केलेली सेवा तिला सतत आशीर्वादच देत राहील. तिचे कौतुक करणारे काका तिच्या अवतीभोवती नसले तरी तिच्या मनात व हृदयात मात्र ते नेहमीसाठीच राहिल. गंगमवार घराण्याच्या सुनेने नेहमीच छानशी साडी घालावी हा त्यांचा नियम तिने काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पाळला. त्यामुळेच ती काकांसारख्या थोर विचारवंत माणसाच्या हृदयातही सहजतेने मानाचे व प्रेमाचे घर करून बसली होती. तिच्या त्या त्याग व समर्पणाला माझा सलाम.

ती खुप हळव्या मनाची आहे हे माहिती असुनही, माझ्या नंतरही त्याच धिटाईने माझे कार्य ती सुरू ठेवेल, हा त्यांचा विश्वास तिला येणाऱ्या प्रत्येक सत्कर्मासाठी मनोबल देत राहील. ती म्हणते, “माझे काका” माया करणारे व्यक्तिमत्व होते. बोलताना शब्द जरी कडक असले तरी सर्वांशी मनमिळावू व ममतेने वागणारे धार्मिक वृत्तीचे होते. गरजूंना सदैव सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती होती. सासरे मला “तू माझी आई आहे, आईसारखी माझी काळजी घेते” असे म्हणायचे. इतकं मुलीप्रमाणे ते प्रेम करायचे. परक्यांना आपलसं करणारा असा त्यांचा प्रेमळ स्वभाव होता. त्यांचे कष्ट, त्यांची साधना, जगण्याचं नवं बळ देणाऱा त्यांचा उत्साह कौतुकाचा होता. व्यावहारीक ज्ञान, अनुभव, सुसंस्कृतपणा, सद्सद्विवेक, एकत्रित करणारा त्यांचा प्रगल्भ विचार होता. या अफाट विश्वात सर्वस्व देवुन, देतच राहणे हे आम्ही क्षणाक्षणात त्यांच्यासोबत अनुभवले. त्यांच्या संपर्कात राहणे म्हणजे संस्काराचे धडे गिरवणे होते. “चित्त शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि तोंड गोड असेल तर माणसं तुटत नाही” ही त्यांची शिकवण कायम लक्षात राहील.

चालणाऱ्या पावलातुनच वाटा घडत असतात हे आपल्या कृतीतून सिद्ध करणाऱ्या काकांनी वागण्यातून सामाजिक भान जपले व त्यासाठी ते आयुष्यभर झटले. हीच शिकवण आजच्या पिढीला त्यांनी दिली. स्वतःचे विश्व घेवून प्रत्येक जण जगतो पण सर्वांना घेऊन आपलं विश्व निर्माण करणारी कृती ही काकांची होती. असे सखोल विचार हेच त्यांच्या कर्तृत्वाचे पारितोषिक होते. त्यांच्या आशीर्वादाचा हात, त्यांचे स्नेह, कौतुक, त्यांचा धाक, त्यांची शिस्त सतत पुढेही स्मरणात राहील.
कुठलेही नाते हे निस्वार्थी हवे, जपता व टिकविताही यायला हवे, असं ते नेहमी सांगत.

दिलीप व विजय भाऊजी त्यांच्या स्मरणात म्हणाले, त्यांनी कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक, राजकीय जबाबदारी वयाच्या 12 व्या वर्षापासून तर वयाच्या 91 वर्षापर्यंत इतकी समर्थपणे व प्रामाणिकतेने पेलली की, काकांनी त्यांना सांगितले होते, “आयुष्यात मी काही जगण्याचे राहुन गेले असे मला वाटत नाही. माझ्या आयुष्याचे सार्थक व उद्देश मी सफल केला याचे मला समाधान आहे” हेच समाधान त्यांना नक्कीच मुक्ती देईल.

काकांनी केलेला मोठा प्रपंच, मुले मुली, सुना,जावई, नात, नाती व पणतु पणती त्यांच्या आशिर्वादात सदैव फुलतच राहील यात मात्र कुठले दुमत नाही. त्यांच्या अविरत कार्याला व त्यांनी चालवलेला हा जीवनरथ त्याच गतीने व त्यांच शुद्ध भावनेने सर्व परिवाराने चालवावा, हीच त्यांच्यासाठी वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या कृतार्थ आत्म्यास शांती, सदगती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

“स्मरा हो दिगंबरा ची स्मरा, कृतार्थ करण्या जन्म आपुला, दिगंबराची स्मरा”.. त्यांच्या स्मरणार्थ गीताच्या या ओळी सदैव सर्वांच्या कानात गुंजत राहील.
लक्ष्मी सरस्वती व गणपतीचा अधिवास असलेले गंगमवारांचे हे घर, काका नसले तरीही त्यांच्या आशीर्वादात व त्यांच्या पेरलेल्या विचारात असेच फुलतच राहील यात मात्र तीळमात्र शंका नाही.

शिल्पा तगलपल्लेवार

— लेखन : शिल्पा संदीप तगलपल्लेवार. कॅमन आयलंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments