मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी १ जानेवारी ते १५ जानेवारी हा पंधरवडा महाराष्ट्रात शासनाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. बँकेत अधिकारी असलेल्या प्रीती कोटीयन बँकेप्रमाणे शासकीय कामकाजात आणि दैनंदीत जीवनातही मराठीचा छान वापर करतात . मराठी भाषा अवगत केल्यामुळे होणारे फायदे त्यांनी आत्मीयतेने सांगितले. प्रीती दिनेश कोटियन यांचे घराणे मूळचे कर्नाटकातील उडपी येथील ; परंतु वडील जयशंकर नोकरीनिमित्त १९५७ साली मुंबईत आले आणि पक्के मुंबईकर झाले.बँक ऑफ इंडियात त्यांची जवळपास ४१ वर्ष सेवा झाली. २००० साली ते सेवानिवृत्त झाले. आई – वडील मुंबईतच असल्यामुळे प्रीतीचा जन्म मुंबईतच झाला. त्यांचे बालपण मुंबईतील गोरेगाव भागात गेले . शालेय शिक्षण गोरेगाव मधीलच सेंट थॉमस हायस्कूल मध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण विवेक कॉलेज मध्ये झाले.तिथून त्यांनी बी.कॉम.ची पदवी मिळवली. त्यानंतर मुबई विद्यपीठातून एम.कॉम. ची पदवी मिळवली. २००० साली दि ग्रेटर बॉम्बे को.ओपरेटिव्ह बँकेत क्लार्क म्हणून त्यांची निवड झाली.त्यांच्या कार्यक्षमतेमुळे ७ वर्षातच अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली .
त्यांचा विवाह २००४ साली श्री.दिनेश कोटीयन ह्यांच्याशी झाला. तेही जन्माने मुंबईकर असल्याने त्यांनाही मराठी आवडते.तेही कॅनेरा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे.प्रीती मातृभाषा उत्कृष्ट बोलतात ,कॉव्हेंट मध्ये शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी, हिंदीही बोलतातच; पण त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मराठीही छान बोलतात .
तुम्ही मराठी भाषा इतकी छान कशी बोलता ? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या , शाळेत दहावीपर्यंत मराठी विषय होताच; पण मराठी विषय आवडीचा असल्याने मी मराठी पुस्तकं खुप वाचायची आणि अजूनही वाचते.दुसरी गोष्ट म्हणजे, मला मराठी चित्रपट ही खूप आवडतात.त्यातही गाजलेली मराठी पुस्तके वाचायला आणि गाजलेले मराठी चित्रपट पहायला खूप आवडतात.त्यामुळे आपोआपच मला मराठी भाषा सहजपणे अवगत होत गेली. मराठी भाषा अवगत असल्यामुळे त्यांना बँकेच्या सेवेत खूपच उपयोग होतो. बँकेत येणाऱ्या मराठी ग्राहकांशी त्या मराठीतच बोलतात .कुठल्याही व्यक्तीला तिच्या मातृभाषेत बोलले तर आवडतेच आणि शिवाय कामातही मोकळेपणा येतो ; त्यामुळे मराठीतून बोलण्याचा ग्राहकांसाठी आणि पर्यायाने बँकेसाठी चांगलाच उपयोग होतो. पण बँकेत येणाऱ्या मराठी ग्राहकांशी आपण जरी मराठीत बोलायला जातो तरी बरेच ग्राहक मात्र इंग्रजीत किंव्हा हिंदीत बोलतात याचे प्रीतीला आश्चर्य वाटते. बँकेच्या कामकाजानिमित्त त्यांचा विविध शासकीय कार्यालयांशी सातत्याने संबंध येत असतो.कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी मराठीतच बोलल्याने त्यांनाही आपलेपणा जाणवतो आणि कामकाजाच्या दृष्टीने ते फार उपयुक्त ठरते.त्याचबरोबर दैनंदीत व्यवहारातही प्रीती मराठी बोलतात .आपण जेथे जन्मलो,राहतो तिथली भाषा आपल्याला आलीच पाहिजे असे प्रीती मानतात. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्याने सर्वानीच मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे असे त्यांना मनापासून वाटते.
मराठी भाषेमुळे इतिहास, संस्कृती, साहित्य,समाजजीवन याची ओळख झाल्याने, आपलेही जीवन अधिकच समृद्ध झाल्याचे प्रीती मानतात. प्रत्येकानेच असे मराठीवर प्रेम केले तर मराठी निश्चितच अधिक समृद्ध होईल.
– रश्मी हेडे