Sunday, September 14, 2025
Homeलेख'नैराश्य येता मनी, करा सद्विचारांची पेरणी'

‘नैराश्य येता मनी, करा सद्विचारांची पेरणी’

प्रोब्लेम्स नसतात कुणाला ? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो.
-पु. ल. देशपांडे

किती थोड्या परंतु मार्मिक शब्दात आपल्या भाईंनी मोलाचा संदेश दिला आहे. खरेच वेळ, पैसा आणि सोबतीला माणसं असूनही काही माणसं आत्महत्येसारखा पर्याय का स्वीकारत असतील ? स्वतःची सुटका करून स्वतःवर अवलंबून असलेल्या, सान्निध्यात असलेल्या व्यक्तिंना का घनघोर संकटात टाकत असतील?

 

आत्महत्या हा एकमेव आणि अंतिम उपाय नाही- 

आत्महत्या मानवी जीवनातील एक अत्यंत निषेधार्ह, लाजीरवाणी घटना आहे परंतु ती अनुकरणीय नाही ! आत्यंतिक प्रमाणात आलेली नैराश्यता, अपयश अशी एक ना अनेक कारणे सांगितली जातात. कारणे भलेही भरपूर असतील. परंतु आत्महत्या हा एकमेव आणि अंतिम उपाय निश्चितच नाही. ज्यावेळी एखाद्या व्यक्तिमागे फार मोठा जन समुदाय असतो, समाजात ज्याची एक वेगळी प्रतिमा असते त्यावेळी त्यांनी उचललेल्या पावलाचा निश्चितपणे विचार करण्याची परिस्थिती असते . कारण अशा समाजप्रिय मानवांचे अनुकरण करण्यासाठी समाजातील अनेक तथाकथित भक्त पुढे येतात.

विचारी माणूस जेव्हा स्वतःची विचार क्षमता गमावून बसतो त्यावेळी तो ह्या लाजीरवाण्या, निंदनीय गोष्टीला कवटाळतो त्यावेळी चिंताजनक परिस्थिती निर्माण होते. होय ! आत्महत्या ही बाब निश्चितच लाजीरवाणी आहे. कारण जी व्यक्ती या मार्गाने स्वतःचे जीवन संपवून टाकते त्यावेळी त्याच्या कुटुंबाकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन हा वेगळा, संशयित असतो. सामाजिक दृष्टी ही कधी वासनांकित, कधी किळसवाणी, कधी निषेध करणारी, तिरस्काराची असते आणि ही सारी परिस्थिती त्या कुटुंबासाठी लाजीरवाणी असते, क्लेशदायक असते.

आत्महत्येशिवाय जीवनात आलेले नैराश्य, औदासिन्य संपविण्याचा इतर मार्ग, उपाय नसतोच का? निश्चित असतो. आजच्या या तांत्रिक, तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात अशक्य असे काही नाही. उलट शेकडो मार्ग समोर असतात. एखादी नैराश्यमय परिस्थिती उद्भवली आणि स्वतःची विचार आणि निर्णय क्षमता संपली असे वाटत असेल तर याचा अर्थ सारे संपले असे नाही. हीच ती वेळ असते मनाला दृढ, बलवान करण्याची किंबहूना प्रत्येकाचे मन पुरेसे कणखर आणि शक्तिशाली असते. आपल्या मनाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ आणि तसे खाद्य दिले पाहिजे. कारण या कालावधीत मन कमकुवत झालेले असते, मनाला नकारात्मक विचारांनी पुरते अंकित केलेले असते.

सकारात्मक विचार

अशा वेळी सकारात्मक विचाराची पेरणी मनात करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एकांतवास, अबोलपणा टाळायलाच हवा. समाजात मिसळल्याने अनेक चांगल्या गोष्टी, चांगले विचार पाहायला, ऐकायला मिळतात. चांगल्या माणसांच्या संपर्कात आल्याने मनाची मलीनता जाऊन शालीनता येते. विचार प्रगल्भ होतात.

प्रत्येक माणसाला असा एक मित्र, अशी एक व्यक्ती असते ज्या व्यक्तिजवळ आपण मनमोकळेपणाने कोणतीही गोष्ट सांगू शकतो. अशा जवळच्या माणसाला आपली कथा नि व्यथा सांगितली की, मनावरील ओझे, ताण काही प्रमाणात नाहीसा होतो. हीच ती व्यक्ती असते आपल्याला नकारात्मक आणि त्यातही आत्महत्येच्या विचारापासून दूर नेऊ शकते, परावृत्त करू शकते. तो क्षण एकच क्षण असतो, जो टाळता आला पाहिजे.

फक्त एकदाच या विचारांपासून दूर जायला हवे. त्यासाठी आपल्या आवडत्या नानाविध छंदांच्या कवेत शिरायला हवे. असे छंद जोपासले, त्यामध्ये आपण स्वतःला गुरफटून घेतले की, मग मनावर आलेले मळभ दूर होते. एकदा का कुविचारांचे आवरण बाजूला व्हायला सुरुवात झाली की, मग ढगाआडून बाहेर पडलेल्या चंद्र-सूर्याच्या दर्शनाप्रमाणे एक आल्हाददायक, हवीहवीशी परिस्थिती निर्माण होते. जगण्याची अस्ताला जाऊ पाहणारी उमेद एका नव्या प्रेरणेने, स्फूर्तीने, चैतन्याने भरून येते.

महत्त्वाचे म्हणजे अशा नकारात्मक बातम्यांना किती प्राधान्य आणि महत्त्व द्यायचे हा प्रश्न आहे. कारण आजकाल प्रसार माध्यमातून अशा बातम्यांचे अक्षरशः चोवीस तास रवंथ चालू असते. हा प्रकार आवश्यक की अनावश्यक हा संशोधनाचा आहे. कारण यातून अनेकांच्या मनात एक वेगळीच भूमिका तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः जी माणसं या विचारांमध्ये गुरफटलेली असतात त्यांना एकप्रकारे पाठबळ देण्यासारखे होते. मानवाला त्याच्या आवडत्या खाद्य पदार्थाचे अजीर्ण होते हा नैसर्गिक नियम बातम्यांसाठीही असू शकतो.

त्यामुळे ‘नैराश्य येता मनी, करा सद्विचारांची पेरणी’ हा मंत्र प्रसार माध्यमांसह, समाजानेही आचरणात आणणे आवश्यक आहे.जीवन सुंदर आहे, त्याचा आस्वाद घेत आपण जगलं पाहिजे !

Written By –

जेष्ठ साहित्यीक नागेश सू. शेवाळकर, पुणे, ९४२३१३९०७१.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा