Friday, November 22, 2024
Homeलेखआज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन...

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन…

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते . त्यामुळे निजामाच्या सत्तेतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता.

Click here to readहिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी रामदासांचे योगदान : लेखिकेचं मनोगत

मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. या संग्रामाचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू , गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा , बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी , मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला .

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदीसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही.

निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली . मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले . चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बिदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणागती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला. या दिनाची आठवण म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

-संजीव वेलणकर , पुणे

Click here to readचला करू या,कैलास मानस सरोवर यात्रा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments