जेष्ठ वृत्त समीक्षक श्री अरुण दीक्षित यांनी आपल्या प्रेमामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या www.marathi.newsstorytoday.com या वेबपोर्टल वर प्रसिद्ध झालेल्या ,श्री श्रीनिवास बेलसरे यांनी लिहिलेल्या ” विद्यापिठातील विठ्ठल ” या लेखाचे भरभरून कौतुक केलं आहे. दीक्षित सरांचे मनःपूर्वक आभार. त्यांचे समीक्षण येथे देत आहे………… जेष्ठ पत्रकार श्रीनिवास बेलसरे (७२०८६३३००३) यांचा ‘एनएसटी टीमच्या लिंकवरील ” विद्यापीठातील विठ्ठल ” या शिर्षकाखालील लेख व्हाट्सएपच्या ग्रुपवर वाचण्याची संधी मिळाली. “तत्कालीन राज्यपाल डाॅ. पी.सी. अलेक्झांडर,यांचे विशेष कार्यकारी अधिकारी ,माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले जेष्ठ अभ्यासू पत्रकार श्रीनिवास बेलसरे यांनी,” आपल्याकडून पत्रकारितेचे धडे गिरवून घेणारे,जीवनात येऊन अलगदपणे मोठे ज्ञानदान करणारे, मराठवाडा विद्यापीठातील ‘विठ्ठल’ म्हणून सर्वदूर परिचित असलेले, वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डाॅ. सुधाकर पवार ” यांच्या विद्यादानातील महतीवर भाष्य करणार्या या लेखाचा गोषवारा असा:—
साधारण देहयष्टी, साधे कपडे,कातडी चपला,आणि जुन्या पद्धतीच्या चष्म्यातून किलकिल करीत पाहणारे पण अतिशय चाणाक्ष डोळे असलेले, डाॅ. सुधाकर पवार, तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातील तथा आताच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख होते.डाॅ.पवार यांनी अनेक वर्षे नाशिक व कोल्हापूरला पत्रकारिता केली होती. पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत बहुमान संपादन करणार्या डाॅ.सुधाकर पवार यांचे वाचन अफाट होते.विकत घेऊन,वाचून संपविलेल्या पुस्तकांची खचाखच भरलेली त्यांची एक खोली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख असताना, ‘मास्टर ऑफ मास कम्युनिकेशनला डाॅ.सुधाकर पवार ‘संपादन’ आणि ‘समीक्षालेखन’ हा विषय शिकावायचे. तसा त्यांचा वृत्तपत्रविद्येच्या सर्वच विषयांचा जबरदस्त अभ्यास होता.सरांचा तास म्हणजे अगदी हसत खेळत, मजेत जाणारा ज्ञानवर्धनाचा तास असे.मूळ टाॅपीकला हात घालण्यापूर्वी आणि नंतर ते अनेक विषयांवरच्या गप्पा मारत असतं.सर कधी कधी आल्या आल्याच विद्यार्थ्यांना एखादा प्रश्र्न विचारायचे.कुणीच उत्तर देऊ शकले नाही,तर न रागावता स्वतःच उत्तर देत.त्यांच्या तासाला मनाला कोणताही ताण येत नसे.सरांच्या तासाला विद्यार्थी,’बोअर होणे’ हे क्रियापद विसरत असत, उलट तो तास तसाच पुढे सुरू रहावा असे सर्व विद्यार्थ्यांना वाटत असे. सहजगत्या शिकवून, मनात बिंबवलेली त्यांची अनेक वाक्ये,आजही त्यांच्या विद्यार्थ्यांना जशीच्या तशी आठवतात. ‘नोज फाॅर न्यूज’ही त्यांची आवडती फ्रेज होती.पत्रकाराला नुसत्या वासावरून बातमी कळाली पाहिजे,तिचा वास आला पाहिजे, त्या बातमीसाठीचे “नाक” विकसित करायचे आहे असे सांगून,पत्रकारांना मज्जाव असलेल्या, भारत-पाक युद्धातील सिमला येथे आयोजित केलेल्या ‘सिमला करार’ बैठकीचे मथळा वृत्त बाहेर थांबलेले पत्रकार कसे प्राप्त करत होते या उदाहरणाबरोबरच, नित्य व्यवहारातील अनेक छोटी छोटी उदाहरणे देऊन ते “नोज फाॅर न्यूज” म्हणजे नेमके काय असते हे स्पष्ट करत असत .तेव्हा विद्यार्थ्यीही अवाक होत . अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत,डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून डुकाकिस निवडणूक रिंगणात उभे असताना, अमेरिकेतील एका खेडेगावात, एक व्यक्ती सायकलवरून फिरत असताना, अचानक खाली कोसळली. योगायोगाने त्या व्यक्तीचे नाव ‘मायकेल डुकाकिस’ निघाले. त्यामुळे। ” न्यूयार्क टाईम्स” मध्ये ही बातमी का व कशी छापून येणार यावर भाष्य करताना, ‘प्रत्येक वेळी फक्त त्या घटनेतील भाष्य महत्वाचे नसते तर कधी कधी ती घटना कुणाबाबत घडली आहे तेही महत्वाचे ठरते’ हा मुद्दा,ते विद्यार्थ्यांना अवघ्या तीन मिनिटात समजावून सांगत असत . त्यांच्या हाताखाली वृत्तपत्रविद्येचे अक्षरशः शेकडो विद्यार्थी तयार झाले. सरांच्या विद्यार्थ्यांना मराठवाड्यातच नाही तर पुण्यामुंबईत मोठमोठ्या वृत्तपत्रात,टीव्ही वाहिन्यात नोकर्या मिळाल्या परंतु पवारसरांनी कधी या गोष्टीचा थोडासुद्धा गर्व बाळगला नव्हता.एखाद्या वारकर्यासारखी मनाची ठेवण असलेले पवारसर, वंचित घटकातील अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान म्हणूनच ओळखले जात .गरीब विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरूनच पवार तर हा विद्यार्थी उपाशी आहे ओळखायचे, त्याला गुपचूप घरी नेऊन जेऊ घालायचे.विद्यार्थ्यांना सुट्टीत घरी जायला पैसे देणारे,त्यांना नोकरी मिळावी म्हणून दहा ठिकाणी शब्द टाकणारे , डाॅ.सुधाकर पवारसर फक्त शिक्षक नव्हतेच तर ते मुलांचे पालकच होते.
डाॅ.सुधाकर पवार सर पुरोगामी विचारांचे होते.तरीही ते देवभक्त होते.त्यांची विठ्ठल भक्ती अगदी बावनकशी होती.आषाढी एकादशीचे त्यांचे उपवास कधी चुकले नाहीत. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शेकडो एकर जमिनीवर एक छोटेसेच पण टुमदार विठ्ठलाचे एक मंदिर अगदी एका बाजूला होते. जिथे हे एकाकी मंदिर होते तिथे कधीच वर्दळ नसे त्या मंदिरात फक्त डाॅ.सुधाकर पवारसर नित्यदिनी आढळत असत. विद्यार्थीसुद्धा प्रसंगी त्यांना भेटण्यासाठी विद्यापीठातील विठ्ठल मंदिरातच जात असतं. अलिकडे काॅलेजच्या दिवसांचा नाॅस्टॅल्जिक विचार येतो तेव्हा अनेकदा गावाबाहेरचा विद्यापीठाचा तो शांत परिसर आठवतो. संध्याकाळच्या फिकट तांबूस-सोनेरी किरणात विठ्ठल मंदिराकडून हळूहळू घराकडे परत निघालेली पवारसरांची ती लांबलेली सावली आठवते.त्यांच्या चेहर्यावरचे काहीसे संकोचलेले मंद स्मित आठवले की डोळे नकळत ओले होतात. जेष्ठ पत्रकार श्रीनिवास बेलसरे यांनी लेखात विद्यापीठातील विठ्ठलाच्या अर्थात गुरूवर्य डाॅ.सुधाकर पवार यांच्या संस्मरणीय जीवनपटावर टाकलेला हा प्रकाशझोत खरोखरच उल्लेखनीय ठरतो हे मात्र तितकेच खरे !
—————पत्रकार अरूण दीक्षित. ७/८/२०२० (९४२२६९४६६६/८१६०१०५९४०)