थोर शास्त्रीय गायक पंडित जसराजजी यांचं नुकतंच अमेरिकेत निधन झालं. त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत. दूरदर्शनचे निवृत्त संचालक, लेखक चंद्रकांत बर्वे यांनी……..
मी १९७७ साली आकाशवाणीत निर्माता म्हणून लागल्यावर अनेक बड्या हस्तींना जवळून भेटण्याचा योग आला, त्यातले एक पंडीत जसराज. पुढे १९९२ साली दूरदर्शन मध्ये ASD म्हणून काम करीत असताना काही दिवसांनी शैलेश पंडित, मुळचा हिंदीचा प्राध्यापक दूरदर्शनमध्ये UPSC तर्फे सिलेक्शन होऊन ASD म्हणून नोकरीला लागला. आमची चांगली मैत्री जमली. मीनाक्षी नावाच्या आमच्या एका संगीत विभाग पाहणाऱ्या निर्मातीचेही ASD चे प्रमोशन आले. ती स्वतः संगीताची जाणकार होतीच शिवाय तिचा सर्वच संगीत श्रेष्ठींशी चांगला स्नेह होता.
जयंती विशेष- आदरणीय आबा Click here
तर एक दिवस पं जसराज रेकॉर्डिंगसाठी आले होते. रेकॉर्डिंग झाल्यावर ते मीनाक्षीच्या केबिन मध्ये गप्पा मारत होते. शैलेश पंडित मात्र माध्यमाला नवा आणि बाहेरून आलेला, तो पंडितजींना बघून फारच एक्साईट झाला. त्याला त्यांच्याशी ओळख करून घेऊन बोलायची तीव्र इच्छा झाली. तो माझ्याकडे आला अन म्हणाला , त्याला जसराजजींशी परिचय करून घ्यायला आवडेल. मग मी म्हटले जा अन त्यांना भेट. तो म्हणाला चला तुम्ही पण चला. मी म्हटलं , माझा अन त्यांचा पूर्वी एकदा परिचय झालेला आहे. तू जा, भेट. त्याला एकट्याला , का कोण जाणे पण प्रशस्त वाटेना. तो मला म्हणू लागला तुमची जर ओळख झालीये तर त्यांना भेटू या ना. मी म्हटले, भेटून काय बोलणार ? ते शास्त्रीय संगीतातले ऋषी आहेत अन मला त्यातलं ओ की ठो कळत नाही. तू जा , भेट. पण त्याला एकट्याला काही जाववेना. मग नाईलाज म्हणून त्याच्या बरोबर मीही मीनाक्षीच्या केबिनमध्ये गेलो.
मीनाक्षीने चहा मागवला. तिने इन्फोर्मली शैलेशचे फक्त नाव सांगून ओळख करून दिली. म्हणजे हे ASD आहेत वगैरे, असली नाही. एक्साईट झालेला शैलेश त्यांच्याशी बोलू लागला. मला त्याचे बोलणे ऐकताना त्याच्या नवख्यापणाची गम्मत वाटली. पूर्वी १९७७ साली पुणे आकाशवाणीत असताना मी १५ सप्टेंबर १९७७ रोजी जेव्हा पुलंना भेटलो होतो तेव्हाचे माझे बोलणे ऐकून पुरुषोत्तम जोशींना कदाचीत तसेच वाटले असेल!..असो. पण पुढे मात्र एकदम वेगळेच घडले. त्याला कुठे तरी आपणही दूरदर्शनमध्ये वरीष्ठ अधिकारी आहे असे सांगावेसे वाटले अन तो बोलून गेला ‘“मै और बर्वेसाब हमभी यहां ASD है’. बापरे ! मला अगदी मेल्याहून मेल्यासारखे वाटले.
शेक्सपिअर अमर का आहे ? Click here
बाहेर आल्या आल्या मी त्याला झापले, म्हटलं , अरे त्यांना आपल्या पोस्टची काय ओळख करून देतो आहेस, दूरदर्शनचा DG देखील अशी ओळख करून देणार नाही. त्यावर तो मला म्हणाला की मी यात काही चुकीचे बोललो आहे का ? मी त्याला म्हटले, आपल्याला रस्त्यावर पोलीसने अडवल्यावर किंवा कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याशी हुज्जत घालताना जर तू हमभी यहां दूरदर्शन के ASD है “class 1 gazetted officer ” है असे म्हणालास तर ते योग्य होईल. पण अशा थोर गायकाला ‘ मीही तुमच्या संगीत मैफलींना अवर्जून उपस्थित असतो ’ असे खोटे बोलला असतास तरी क्षम्य होते, पण त्यांना आपली पोस्ट काय किंवा बेसिक पगार किती हे सांगणे मूर्खपणाचे आहे. असो. मी त्याला जास्त बोललो नाही, म्हटले अभी वो नया है ! त्याचे नवेपणाचे दिवस लवकरच संपले.
( ‘मु पो दूरदर्शन’ या पुस्तकातील भाग )
– चंद्रकांत बर्वे , निवृत्त दूरदर्शन संचालक.