पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
आदर्श राजा म्हटलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप डोळ्यासमोर येतं, तर आदर्श राज्यकर्त्या म्हटलं की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव पुढं येतं.
आदर्श कन्या, सुशील भार्या, सर्वगुणसंपन्न माता अन् प्रजाहितदक्ष शासक अशा वैविध्यपूर्ण भूमिकेतून अहिल्यादेवींनी आजीवन जनसेवा केली. इतकेच नव्हे तर, सर्वधर्मियांना विश्वासात घेऊन उत्तम राज्यकारभार केला. त्यांच्या कारकिर्दीत हिंदू-मुस्लिम हे गुण्यागोविंदाने नांदलेत. राजकारणातून समाजकारण करून धर्मपरायणात सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या अहिल्यादेवींना हिंदू संस्कृतीतील “पुण्यश्लोक” ही उपाधी बहाल करण्यात आली. ही गोष्ट मराठी जनमानसाच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची आहे.

अहिल्यादेवींनी आपल्या कारकीर्दीत हिंदू देवळांच्या व तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धारासाठी ठोस उपाययोजना करताना मशिदी, दर्गे यांचा विसर पडू दिला नाही. त्यांच्यासाठी देखील राजकोषात आर्थिक तरतूद केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तसेच बदरीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून सोमनाथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून त्यांनी खऱ्या अर्थानं दातृत्वाची भूमिका बजावली. नर्मदा, गंगा, गोदावरी या नद्यांवर घाट बांधल्याने, त्या कालखंडापासून पुढच्या काळातही नद्यांवर घाट बांधण्याचा पायंडा अखंडपणे चालत राहिला आहे.
ह्या राजमाता राज्यातल्या गोरगरीब लोकांना नित्यनेमाने अन्नदान, वस्त्रदान अन् सणासुदीला दानधर्मही करीत असत. चारित्र्यसंपन्नता अन् स्त्रीत्वाचे वैभव जतन करून प्रपंच व परमार्थाची सांगड घालत या महान मातेनं गतकाळातील दुःखद घटनांना पाठीमागे टाकत, आपल्या जीवनाची सुव्यवस्थित घडी बसवली. या पार्श्वभूमीवरच अहिल्यादेवी होळकर यांचा “आदर्श राजमाता” म्हणून नावलौकिक होता अन् आजही आहे.
अहिल्यादेवी होळकर ह्या अहमदनगर जिल्ह्यामधील चौंडी गावातल्या धनगर समाजाचे माणकोजी शिंदे-पाटील यांच्या कन्या. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला.परंतु काळाने घात केला अन् दुर्दैवाने १७६६ साली खंडेरावांचे आकस्मिक निधन झाले. तथापि स्वतःला मोठ्या धैर्याने सावरून, मल्हारराव होळकर या पित्यासमान सासऱ्याची आज्ञा शिरसावंद्य मानत त्यांनी आपले उर्वरित आयुष्य लोकसेवेत व्यतित केलं.
स्वकर्तृत्वाच्या बळावर या राजमातेने होळकरांच्या राज्याची धुरा समर्थपणे सांभाळून सर्व जाती- धर्मातील लोकांना समान न्याय दिला. वैधव्याच्या दुःखानं अन् पुत्रशोकानं व्यथित झालेल्या या कर्तृत्ववान व धाडसी मातेनं धिरोदत्तपणे पुनश्च खंबीरपणे उभं राहून होळकर साम्राज्याचा क्रांतीसूर्य तळपत ठेवला.
अहिल्यादेवींनी “मरावे परी कीर्तीरूपे उरावे” ही उक्ती आदर्श राज्यकारभार करून खरी करून दाखविली. अशा महान मातेला आम्ही सर्वजण विनम्र अभिवादन करतो.
पुरोगामी विचारसरणी असलेल्या अहिल्यादेवींनी कालबाह्य झालेल्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये काळानुरूप सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. विधवांचे धन जप्त करून ते राजकोषात जमा करण्याची जुलमी प्रथा त्यांनी बंद केली. विधवेला मुल दत्तक घेण्याची इच्छा असल्यास तिला तशी कायद्याने मुभा देण्यात आली. न्यायप्रक्रियेत आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याचे अहिल्यादेवींनी फर्मान काढले होते. त्या उत्तम लढवैया होत्या. त्या राजकारणा बरोबर अर्थकारणातही पारंगत होत्या. गावोगावी लोकांसाठी जागीच न्यायनिवडा व्हावा,vयासाठी त्यांनी पंचाधिकारी नेमले होते. भिल, गोंड जमातीतील लोकांकडून पडीक जमिनीवर लागवड करून घेतली.त्याद्वारे अहिल्यादेवींनी मल्हाररावांच्या काळापेक्षा अनेक पटीने राजकोषात वृद्धी केली. प्रजेकडून कररूपात प्राप्त झालेल्या धनराशीतून जनहिताचे विविध उपक्रम राबवून प्रजेला सुखी व आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. जनसामान्यांबद्दल त्यांच्या अंत:करणात अपार करुणा होती.
उल्लेखनीय बाब म्हणजे अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात शिक्षणावर अधिक भर दिला. होळकरांची राजधानी “महेश्वर” हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. मराठी, हिंदी पाठशाळेतून संस्कृत भाषेचेही शिक्षण दिले जायचे. याशिवाय वेद-पुराण, शास्त्रे, वेदांत, व्याकरणाचे शिक्षण हे विद्वान, पंडितांमार्फत देण्याची व्यवस्था त्यांच्या कारकीर्दीत करण्यात आली होती. त्यांच्या राजदरबारात शिल्पकार, साहित्यिक, कलाकार, विद्वान-पंडित यांना विशेष मानसन्मान मिळत असे.कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांना सरकारदरबारी मानाचे स्थान होते.
अहिल्यादेवींनी स्वतः सैनिकी शिक्षण घेतले होते. त्या जाबांज लढवैय्या होत्या. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य टिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने त्या आपल्या सैन्यदलाला वेळोवेळी भेटी देत असत.विशेष म्हणजे अहिल्यादेवींनी आपल्या सैन्यदलात महिलांची विशेष तुकडी तयार केली होती.
अभिमानाची गोष्ट म्हणजे मोगल, टिपू, निजाम, पेशवे यांच्यावर अहिल्यादेवींच्या कर्तबगारीची मोठी छाप होती. परधर्माविषयी त्यांच्या मनात नितांत आदर व सहिष्णुता होती. “राजा हा विश्वस्ता सारखा असावा अन् प्रजेचे कल्याण चिंतणारा असावा”,हा आदर्श त्यांनी आपल्या राज्यकारभारात घालून दिला होता. त्यामुळेच त्यांना एक आदर्श शासनकर्त्या म्हणून रयतेकडून सन्मान मिळायचा.अहिल्यादेवी ह्या प्रजाहितदक्ष राजमाता म्हणून साऱ्या राज्यात कीर्तीमान होत्या.
आदर्श राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पावलावर पाऊल टाकत, त्यांचासारखा राज्यकारभार हाकण्यास राज्यातले फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेना-बीजेपी महायुती ही जनसामन्यांचे सरकार म्हणून लोकहिताचे निर्णय घेत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्याचा राज्य सरकारचा मानस असून, त्याचाच एक भाग म्हणून महिलांना एस.टी. प्रवासात सरसकट ५० टक्के सूट देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत गोरगरीब महिलांना माहे १५०० रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येत आहे. राज्यातील कोट्यवधी माता-भगिनींना या योजनेमुळे आर्थिक आधार मिळून त्याद्वारे त्या छोटाखानी उद्योग करून कुटुंबाला हातभार लावत आहेत. विशेष म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहताहेत.याशिवाय राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत वयोवृद्ध महिला-पुरुषांना मोफत वैद्यकीय सुविधा व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष मोहिमेत महिलांना आरोग्य तपासणी, हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका, औषधं उपलब्ध करून देणे, यासाठी दोन कोटींचा निधी निर्धारित केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन लोककल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून ते अहिल्यानगर असे केले आहे. या जिल्ह्यातील चौंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनची अशी ही पहिलीच बैठक होय.या बैठकीत चौंडीच्या सर्वंकष विकासाचा आराखडा तयार करून त्यासाठी ६८१ कोटी ३२ लाखाची तरतूद करून तिला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टींचे येथे जाणाऱ्या नागरिकांना दर्शन होईल. इतकेच नव्हे तर गत होळकर साम्राज्याची अन् अहिल्यादेवींच्या आदर्श राज्यकारभाराची जाणीव होईल. अन् त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल. सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अर्पण केलेली ही खरी आदरांजली होय.

बंधू भगिनींनो, अल्पवयात विधवा झालेल्या एका स्त्रीनं सर्वधर्मसमभावाची कास धरून सन १७६५ ते १७९५ अशी तब्बल ३० वर्षे इंदूर संस्थानावर अधिराज्य करून भारतीय इतिहासात जणू एक विक्रमच नोंदविला.राजमातेचा मानवतावादी दृष्टिकोन सर्वधर्मीयांना प्रिय होता. मुस्लिम समाजाचे लोक तर अहिल्यादेवींच्या इंदूर संस्थानच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मशिदीत नमाज अदा करून दुवा मागत असत. म्हणूनच सकल जनमानसात पुण्यश्लोक अहिल्यादेवी असे सन्मानाने म्हटले जात असे.
अहिल्यादेवी म्हणजे मानवी जीवनातला अज्ञान, अंध:कार, दुःख दूर करून त्यास प्रकाशमान करणारी दिव्यज्योत होती. राज्यातील सर्वधर्मीय जनतेच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली अन् त्रिवार वंदन ! जय नारी शक्ती !
“देश तेव्हाच होई महान,
जेव्हा स्त्रीचा होईल सन्मान”
जय🇨🇮हिंद!
जय🚩महाराष्ट्र

— लेखन : रणवीर राजपूत.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800