Sunday, July 20, 2025
Homeलेख"आषाढस्य प्रथम दिवसे"

“आषाढस्य प्रथम दिवसे”

आज आषाढाचा पहिला दिवस आहे आणि मला महाकवी कालीदासांच्या या ओळी आठवत आहेत…

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।
महाकवि कालिदास (मेघदूतम्)

महाकवी कालिदासाने जेव्हा आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात दाटून आलेले काळे मेघ बघितले तेव्हा त्यांच्यातील प्रतिभेने भरारी घेतली आणि मेघदूत या महाकाव्याच्या रूपाने त्यांनी यक्ष आणि मेघ यांच्या माध्यमातून विरहामुळे वाट्याला येणारी व्यथा सुंदर रीतीने मांडली.

महाकवी कालिदासांनी रचलेल्या ‘मेघदूतम्’ या महाकाव्यात याचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे.

पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी डोंगराच्या शिखरावर वाकलेल्या मेघाला पाहून पत्नीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाला असे वाटले, जणू एखादा हत्ती क्रीडेमध्ये रममाण आहे.

मेघदूत या महाकाव्याचा नायक (यक्ष) हा अलकानगरीत राहणाऱ्या यक्षराज कुबेराचा एक सेवक होता. यक्षाला कुबेराने पूजेसाठी सूर्योदयापूर्वी हजार कमळं आणून देण्याची जबाबदारी दिलेली. आधीच हिमालय त्यात पहाटेची वेळ आणि यक्षाचं नवीन लग्न झालेलं. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्यामुळे त्याला नेमून दिलेल्या कामात त्याच्याकडून हलगर्जीपणा झाला. त्यामुळे त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला ‘रामगिरी’ पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्‍नीपासून दूर राहिला असताना वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून आल्या आणि त्याला पत्नीची तीव्रतेने आठवण होऊ लागली.

त्या निर्जन प्रदेशात यक्षाला सजीव आणि निर्जीव याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पिले आणि आपल्या पत्‍नीला निरोप सांगण्याचे काम त्याच्यावर सोपविले. प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणार्‍या मार्गाचे रसभरित वर्णन त्याने केले. त्या मार्गात जे जे पर्वत येणार आहेत, त्यांचे वर्णन करून त्या पर्वतांवर थोडी विश्रांती घेऊन पुढे जातांना ज्या नद्या मार्गामध्ये येणार आहेत त्यांचे वर्णन केले आणि त्या नद्यांचे पाणी प्राशन करून पुढील मार्गक्रमण करायला त्या यक्षाने त्या मेघाला सांगितले. मार्गामध्ये येणाऱ्या गावांचे आणि शहरांचे वर्णन करून त्या गावांवर आणि शहरांवर थंड पाण्याचा शिडकावा करण्याचेसुद्धा त्या मेघाला सांगितले. उज्जयिनी, विदिशा, दशपूर इत्यादी शहरे; ब्रह्मावर्त, कनखल इत्यादी तीर्थ तसेच वेत्रवती, गम्भीरा इत्यादी नद्या पार करून मेघाने हिमालय आणि त्यावर वसलेल्या अलका नगरीपर्यंत पोहचण्याची कल्पना यक्षाने केली. करुणरसाने ओथंबलेला असा संदेश प्रियेस सांगून “प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन सांग” असे त्या मेघास सांगून यक्षाने मेघाची अलकानगरीकडे रवानगी केली.

उत्तरमेघामध्ये अलकानगरी, यक्षाचे घर, त्याची प्रिय पत्नी आणि प्रियेसाठी त्याचा संदेश ही विषयवस्तु येते.

— लेखन : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?