Monday, February 17, 2025
Homeयशकथाउद्योगरत्न : बनसोड काका, काकू

उद्योगरत्न : बनसोड काका, काकू

संसार पथावर चालताना पती पत्नी दोघांनांही एकसारखेच महत्व असते. एकमेकांची साथ, विश्वास, सामंजस्य या गोष्टी जितक्या संसाराला परिपूर्ण बनवतात तेवढेच निर्णयक्षमता आणि घेतलेल्या निर्णयावर चालण्याची प्रामाणिक जबाबदारी हे सुद्धा गरजेचे असते. हातात हात घेऊन संसारवेलीची पायवाट पार करताना कधी दूर राहावे लागले तरी ओढ, जिव्हाळा वाढतच राहतो. अल्प काळाच्या विरहाने प्रितीची रेशमी गाठ अजूनच दृढ होते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना.. आज हे काय नवीन काढले ? सांगते..
तर आजचा आपला विषय प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणे हा आहे. प्रस्तावना वाचून तुमच्या लक्षात आले असेलच की आजचे आपले उत्सव मूर्ती दोघे जण आहेत. अमरावती जिल्ह्यातील धारणी गावचे बनसोड काका आणि काकू म्हणजेच श्री. दिनेश माखनलाल बनसोड आणि सौ. अरुणा दिनेश बनसोड.

नोकरीच्या निमित्ताने काका पत्नी मुलांसह नाशिकला स्थायिक होते तर गावी धारणीला त्यांचे आई वडील. काकांची नोकरी, मुलांचे शिक्षण वगैरे नाशिकला व्यवस्थित चालू होते. पण गावी आई वडील एकटे. त्यांच्या उतारवयात त्यांना पाहण्यासाठी, काळजी घेण्यासाठी कोणी नव्हते. हिच एक रुखरुख काकांच्या मनात होती. मुलांचे भवितव्य आणि माता पित्यांची काळजी या दोन्हीही बाबी फार महत्वाच्या होत्या. यातील कोणतीही एक गोष्ट टाळून ते पुढे जाऊ शकत नव्हते. अशा वेळी आता काय करायचे ? हा मोठा प्रश्न होता..
आजच्या युगात जो तो स्वतःचाच विचार करत असतो. मग तिथे आईवडील असले तरी काही फरक पडत नाही. काकांच्या जागी इतर कोणी असते तर स्वतःच्या बायको मुलांना आधी निवडले असते. पण काकांनी आईवडिलांना सांभाळण्यासाठी गावी जायचे ठरवले. या निर्णयाचे काकूंनी मनापासून स्वागत केले. इथेच त्या दोघांचेही वेगळे पण दिसून येते.

या पती पत्नीने तराजूची दोन्ही पारडी अगदी सहजरित्या पेलली. नव्यासवे जुन्या पिढीलाही प्राधान्य देत त्यांनी सुंदर सुवर्णमध्य साधला. काका सेवानिवृत्ती घेऊन आईवडिलांकडे गावी गेले तर काकू मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी, त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण होईपर्यंत नाशिकमध्येच राहिल्या. इथून पूढे त्यांच्या जीवनाचा नवीन अध्यायच सुरु झाल्यासारखा आहे. गावी आल्यावर काय करायचे हा विचारही त्यांनी त्यावेळी केला नव्हता. स्वतःची शेती होती ती करायची, हे मात्र ठरवले होते. त्यासोबत काकांनी गावात उपहार गृह सुरु केले होते. शिक्षणानंतर लगेच नोकरी लागल्यामुळे शेती विषयी त्यांना काही ज्ञान नव्हते. तरीही शेती करायचा निर्णय त्यांनी घेतला. सातत्याने मनापासून प्रयत्न करत असताना अनुभवातून माणूस परिपक्व होत जातो. याची प्रचिती काकांकडे पाहताना येते.

मुलांची बारावी झाल्यानंतर त्यांचे महाविद्यालयात प्रवेश झाल्यावर काकूही गावी धारणीला आल्या. पुन्हा दोघांचा एकत्र जीवन प्रवास सुरु झाला. तोपर्यंत शेतीचे प्रयोग करत काकांनी बरीच प्रगती केली होती. या प्रयोगातूनच त्यांनी लिंबाची बाग लावली. हा प्रयोग यशस्वी झाला होता. लिंबाना छान बाजारपेठ मिळत होती.
सर्व काही सुरळीत चालू असताना अख्या जगात कोरोना महामारीने धुमाकूळ घातलेला होता. ज्याचा परिणाम इथेही दिसून आला. कोरोना काळात लिंबे कुठे विकायची ही मोठी अडचण निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात लिंबे पडून राहू लागली. अति कष्टाने मिळालेले फळ वाया जाऊ लागले होते, जे बघवत नव्हते. अशावेळी हातावर हात धरून बसण्यातले काका काकू नव्हते. त्यांनी यावरही पर्याय शोधलाच.

काका काकूंनी लिंबाच्या लोणच्याचा व्यवसाय सुरु करायचे ठरवले. व्यवसाय करायचा म्हटले तर ते एकदोघांचे काम नसते. यासाठी गरजेनुसार त्या काही आदिवासी महिलांना कामासाठी बोलावून घेऊ लागल्या. त्यामुळे त्या महिलांनाही रोजगार मिळून त्यांच्या संसाराला हातभार लागायला लागला.

या आदिवासी महिलांना काकूंनी स्वछता, टापटीप, साहित्याचे प्रमाण, लोणच्याची पद्धत असे प्रकारचे सर्व धडे दिले. प्रथम “मेळघाट हाट” मध्ये लोणचे बाजारात आणले. तेव्हा तिथले अधिकारी लोणच्याची तपासणी करायला अगोदर घरी आले. लोणचे कसे बनते, तेथील स्वच्छता, वापरल्या जाणाऱ्या सामानांची श्रेणी पाहून गेले. खाण्याचा पदार्थ असल्यामुळे निष्काळजीपणा करुन चालणारे नव्हते. हे माहिती असल्यामुळे काका काकू प्रथम पासूनच याबाबत सजग होते. मालाचा दर्जा उच्च असल्यामुळे खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आदिवासी महिलांना घेऊन काकूंनी एक बचत गट सुरु केला. लोणच्याची मागणी वाढत गेली तसा या बचत गटाला फायदा होऊ लागला. उत्तम प्रकारे जाहिरात होऊ लागली. जवळजवळ १०० किलोमीटरच्या परिसरात धारणीच्या आजूबाजूला कोणतेही मोठे शहर नाही. तरीही त्यांना छान बाजारपेठ मिळत गेली.

आदिवासी लोकांबद्दल बोलताना काकू अगदी भरभरून बोलतात. त्यांच्याकडे सुविधा कमी, उत्पन्नाचे साधने कमी तरीही त्या आनंदात राहत असतात. समाधानी असतात.
आदिवासी फार सरळपणे जीवन जगतात. ते लबाडी करत नाहीत. कुणाला फसवत नाहीत. साधेपणा, प्रामाणिकपणा हे त्यांचे गुण वाखाणण्याजोगे असतात. फुकटचा मानपान, दिखावा यापासून आदिवासी खूप दूर असतात.

काकूंकडे काम करायला येणाऱ्या कामगारांच्या मुलांची त्या शिकवणी घेतात. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत त्यांना संस्कार देतात. गावातील कुणालाही काही गरज लागली तर हे दोघे त्यांच्या मदतीला धावून जातात. काही माहिती हवी असेल तर त्यांना सर्व प्रकारे ती देण्याचा प्रयत्न करतात. लोकांना अर्ज वगैरे भरायला ते मदत करतात.

बोलता बोलता काकांनी चिखलदरा हे नाव कसे पडले, यासाठी महाभारतातील कथा सांगितली. पांडव अज्ञातवासात असताना दुर्योधनापासून लपण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना मेळघाटच्या जंगलात राहायचा सल्ला दिला होता. ती जागा म्हणजे आजचे वैराट स्थळ. इथेच भीमाने किचकाचा वध करून त्याला दरीत फेकले होते. त्यामुळे त्या जागेचे नाव पडले होते किचकधरा. किचकधरा या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे आजचा चिखलदरा. आपण जेव्हा एखाद्याशी बोलतो तेव्हा फक्त ते बोलणेच नसते तर विचारांची देवाणघेवाण होत असते. विविध विषयांचा पैलू समोर येतो. कधी इतिहास तर कधी सांस्कृतिक माहिती स्तिमीत करते. त्यांच्या तिकडच्या पद्धतीने बोलतानाचा गोडवा मराठी भाषेची समृद्धी दाखवतो. जुनेच शब्द पण त्यांची नवीन नवीन नावे समजतात तर कधी एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ अचंबित करतात.

बनसोड काका काकू हे पती पत्नीच्या नात्यास पुरेपूर वाव देतात. एकमेकांच्या मतांचा दोघेही आदर करतात. मान ठेवतात. लोणचे मुरले की त्याचा स्वाद वाढतो. तसेच पती पत्नीच्या नात्याचेही असते. जशी सहजीवनाची संगत एकेक टप्पा पार करत जाते तशी संसाराची अवीट चव वाढत जाते, चटपटीत होते .. अगदी मुरलेल्या लोणच्यासारखीच.
प्रत्येकावर काका काकू मनापासून प्रेम करतात. त्यांना साथ देतात. अगदी मनापासून माणुसकीचे बंध जपण्याचा त्यांचा कल असतो.
काकांचे आज वय ७० आहे तर काकू ६४ वर्षाच्या आहेत. मनातील जिद्द, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा माणसाला बळ देते. सकारात्मक विचार दिशा दाखवते तर इतरांना समजून घेण्याची कला यशाच्या पथावर जाण्यास प्रवृत्त करते. तेव्हा उमगते वय म्हणजे फक्त एक आकडाच असतो बाकी काही नाही. अशा व्यक्ती समाजात फक्त प्रेरणादायीच ठरत नाहीत तर एक आदर्श बनतात. ज्यांच्या उल्लेखनीय कार्याचे ठसे कायम संस्मरणीय ठरतात.

अशा या वयात उद्योगक्षम असणारे त्या सोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे बनसोड काका काकू आजच्या युवकांसाठी मोठीच प्रेरणा देणारे आहेत.
त्यांच्याकडे येण्याचे निमंत्रण स्वीकारत मी त्यांना पुढील सुखद प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हिच सदिच्छा.

मनिषा पाटील

— लेखन : सौ. मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments